Showing posts with label जुनी हिंदी गाणी. Show all posts
Showing posts with label जुनी हिंदी गाणी. Show all posts

Tuesday, August 1, 2023

आवडती जुनी गाणी: 14. गुजरा हुवा जमाना

गुजर हुआ जमाना आता नहीं दुबारा 

चित्रपट: शिरीं फरहाद (१९५६)

दिग्दर्शक : अस्पी इराणी 

गीतकार:  तन्वीर नक्वी

संगीतकार : एस. मोहिंदर 

गायिका : लता  मंगेशकर 

नायिका :मधुबाला 

निजामी गंजवी या सुप्रसिद्ध पर्शियन कवीचे  हे एक गाजलेले  प्रेमकाव्य - खुसरोव शिरीन ! त्यावर आधारित हा चित्रपट. एक राजकन्या आणि एक सामान्य तरूण यांच्यामधल्या असफल प्रेमाची अतिशय दु:खी कहाणी.  लैला मजनू लिहिणाऱ्या कवीचे हे अजून एक काव्य.

मधुबालाच्या सौंदर्याच्या अनेक छटा आहेत. एक अवखळ, निरागसपण आहे. एक हसरं प्रगल्भपणााची आहे. एक सगळं मिळाल्याचा सुकून असणारी आहे. अन असीम दु:खाची एक झालर असणारी ही आहे. 

या गाण्यात हीच ती मन हेलावून टाकणारी कारुण्याची किनार आहे. नुसत्या डोळ्यातून सारं पोहोचतं आपल्या पर्यंत... जगण्यात कसलच स्वारस्य न राहिलेलं, सगळं सगळं निर्ममपणे ओलांडून जातानाची एक दुखरी निरिच्छता, आपल्या दु:खापेक्षाही; सोडून जाताना आपण प्रियकराला काय दु:ख मागे ठेवून जातोय याच्यातली अपरिहार्यता, त्याला साधं शेवटचं भेटणंही जमवता न आलेल्याची असहाय्यता... काय काय नाही त्या डबडबलेल्या डोळ्यांमधे!

तन्वीर नक्वींनी याच तिच्या भावना काय उतरवल्यात शब्दात. 

गुजरा हुवा जमाना, आता नहीं दुबारा


खुशियाँ थी चार पल की, आसूँ है उम्र भर के

तनहाईं में अक्सर रोयेंगे याद कर के...


तुफाँ है जिंदगी का अब आखरी सहारा...


निकला मेरा जनाजा, मेरी बारात बन कर...


हाफिज खुदा तुम्हारा..


अन संगीत! ते दिलय फार कमी माहिती असलेल्या एस. मोहिंदर यांनी. पंजाबी चित्रपट सृष्टीमधे खूप गाजले हे संगीतकार. हिंदी चित्रपट सृष्टीतही अनेक चित्रपट त्यांनी केले. पण त्यांचं गाजलं ते हे गाणं, गुजरा हुवा जमाना...

अन त्यामागे एक कहाणी आहे, तितकीच दर्दभरी. या चित्रपटामधे शिरिन आपला प्रियकर, गांव, देश, मुलुख सोडून दूर देशी- परदेशी चाललेली असते. तिला माहित असतं की आता परत हे सगळं कधीच आपल्याला दिसणार नाही. हे सगळं आता फक्त आठवणीतच असेल. अन त्यासाठीच शेवटचा हाफिज खुदा (निघते, अच्छा) म्हणतेय. मोहिंदर यांनाही हाच अनुभव आपल्या आयुष्यात आलेला.

मूळचे फैसलाबाद (आताच्या पाकिस्तानातील जिल्हा) जवळच्या गावातले एक शीख कुटुंब. त्यातील हा मुलगा मोहिंदर. संगीताची फार लहानपणापासून आवड असलेला. त्यासाठी शास्त्रीय संगीत शिकत मोठा झालेला.  संगीतातच करियर करू पहाणारा एक तरुण मुलगा. वेगवेगळ्या गावी गाण्याचे कार्यक्रम करत असे. 1947 चा सुमार. लाहोरला एक कार्यक्रम गाजवून गावी परत जायला रेल्वे स्टेशनवर आला. पण यायला थोडा उशीर झाला अन गाडी चुकली. चुकली हे एका परीने बरच झालं; जीव वाचला. कारण पुढच्याच स्टेशनवर गाडीतल्या सगळ्या हिंदूंची कत्तल केली गेली होती. तरुण मोहिंदरने दुसरी कोणती गाडी गावाकडे जातेय विचारले रेल्वेमास्तरांना. त्यांनी सांगितलं, " मुला, समोरच्या गाडीत बस. अन जा, जीव वाचव आपला." गाडी होती मुंबईला येणारी. अक्षरश: दोन कपड्यासह मोहिंदरला मुंबईला यावं लागलं. गांव, शेत, घर, मुलूख, देश तडकाफडकी सोडावा लागला. शेवटचं डोळाभर पहायलाही मिळालं नाही. 

जिथे वाढलो, जे आपलं गाव- घर- शेत- मुलूख तो असा सोडताना काय दु: ख होतं ते प्रत्यक्ष अनुभवलेला हा गायक. पुढे मुंबईत संगीतकार म्हणून काम करू लागला. अन जेव्हा शिरिन फरिहाद मधे तीच घटना चित्रित होताना बघून काळजातली ती हूरहूर, दु:ख, भळभळत बाहेर पडले ते असे- गुजरा हुवा जमाना....

मोहिंदर यांनी अनेक गोड गीतं दिली. शिरीन फरिहाद मधलचं अजून एक

सुन ले तू मेरी सदा रो रो मेरी मुहोब्बत
तुझको पुकारे आ आ जाओ जाने वफा
तुही बता तेरे सिवा दुनिया में कौन है मेरा
तुझसे सनम होके जुदा जिके करुंगी क्या
ना जा ना जाओ दिलरुबा - तलत, लता

तर पापी चित्रपटातलं (1953) 

तेरा काम है जलना परवाने, चाहे शमा जले या ना जले - रफी (राज कपूर, नर्गिस)

पंजाबी चित्रपटातही अनेक सुंदर गीतं त्यांनी दिली. पण त्यांच्या मनाच्या सर्वात जवळचं होतं ते गुजरा हुवा जमाना हेच. 

कालांतराने ते अमेरिकेत स्थलांतरित झाले. तिथे एकदा व्हॉईस ऑफ अमेरिका मधे त्यांच्या मुलाखतीत हेच गाणे त्यांनी गायले. अन पुढे म्हणाले की अजूनही मला माझ्या मूळ गावी जायचय. माझं सारं आयुष्य इतरत्र गेलं. पण तिथे मी वाढलो, माझं बालपण गेलं, तारुण्य आलं ते गाव एकदा तरी जाऊन बघायचय. इतका दर्द ज्यांनी आयुष्यभर सोसला, त्यांचं तेच दु:ख त्यांच्या गाण्यातून पाझरलं!

ऐका, पहा

गुजरा हुवा जमाना, आता नहीं दुबारा

---





Wednesday, June 28, 2023

आर. सी, बोराल (१९०३ - १९८१) : हिंदी चित्रपट संगीताचे पितामह!


लाल चंद बोराल हे कलकत्या मधील प्रसिद्ध धृपद गायक! त्यांचे चिरंजीव राय चंद बोराल. वडिलांकडूनच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा वारसा आर. सी. बोराल यांनी घेतला. वडिलांबरोबर अनेक संगीत मैफलींना ते जात. गायन आणि तबलावादन दोन्हीची त्यांनी तालिम घेतलेली आणि दोन्हीची साथ ते वडिलांना देत असत.

१९२७ मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी (पुढे या कंपनीचे नाव ऑल इंडिया रेडिओ झाले) ते काम करू लागले. १९३१ मध्ये ते कोलकत्यातील फिल्म निर्माती कंपनी - न्यू थिएटर येथे रुजू झाले. सुरुवातीच्या सायलेंट चित्रपटांच्या काळातही त्यांनी चित्रपटांना संगीत दिले.

बोलपटामध्ये "मुहोब्बत के आसूँ" (१९३२)या चित्रपटात त्यांना प्रथमच संगीतकार म्हणून संधी मिळाली. पुढे "धूप छाँव" (१९३५) मधल्या गाण्यांनी त्यांचे नाव झाले. हिंदी चित्रपट संगीतात कोरस प्रथम आणला तोही आर सी बोराल यांनी!

सुमारे ७०-७५ हिंदी आणि साधारण तितक्याच बंगाली चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. १९५३ मधला "दर्द ए दिल" हा त्यांनी संगीत दिलेला शेवटचा हिंदी चित्रपट. बंगाली चित्रपटांमध्ये मात्र त्यांनी १९६० पर्यंत संगीत दिले.

आर सी बोराल यांनी हिंदी चित्रपट संगीतात अनेक नवीन गोष्टी सुरु केल्या. त्याकाळी गझल गायकीचा प्रघात जास्त होता. आर सी नी हा प्रभाव कमी करून, हलके फुलके संगीत चित्रपट आणलं. जोडीने बंगाली धून आणि हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत हिंदी चित्रपटांमध्ये आणलं.
याशिवाय पार्श्वगायनाही त्यांनीच आणले. कोरस ची सुरुवात ही त्यांनीच केली. पहाडी सन्याल, कानन देवी, कुंदन लाल सैगल, तलत मेहमूद, राधा राणी, इला घोष, सुपरवा सरकार, धंनजय भट्टाचार्य हे काही सुरुवातीचे नावाजलेले गायक ही आर सी बोराल यांचीच देन !
चित्रपट "विद्यापती" ( १९३७) मध्ये त्यांनी दिलेले संगीत आजवर दिल्या गेलेल्या भारतीय चित्रपट संगीतातील सर्वात सुंदर चित्रपट संगीत मानले जाते. पुढच्या गाण्यात अगदी सुरुवातीचे संगीत, आणि जोडून असणारे पाहिले गाणे ऐकले तरी अंदाज येईल.




हिंदी चित्रपट संगीतामध्ये व्हॉयोलिन, सतार, इतर तयार तंतू वाद्ये (स्ट्रींग) आणि पियानो प्रथम आणला तो आर सी बोराल यांनीच. एक गंमत. "हारजीत" हा १९३९ चा चित्रपट. यातलं गाणं "मस्त पावन शाखाये लहाराये" हे गीत. त्यात सुरुवातीला वाजणारे हे व्हायोलिन ऐका, कोणतं गाणं आठवलं सांगा बरं (२० व्या सेकंदांपासून ऐका)



बोराल यांनीच ऑर्केस्ट्रा हिंदी चित्रपट संगीतात आणला. हिंदुस्तानी संगीत आणि पाश्चात्य संगीत यांची अतिशय सुंदर गुंफण पहिल्यांदा केली ती बोराल यांनीच. बोराल यांनी ३० वाद्यांचा समावेश आपल्या ऑर्केस्ट्रामध्ये केला होता. "चंडिदास" ( १९३२) या चित्रपटामध्ये त्यांनी पार्श्वसंगीत फार प्रभावीपणे चित्रपटात आणले.
आणखीन एक फार सुंदर अन अभिमानाची गोष्ट बोराल यांनी केली. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या आणि नोटेशन बद्ध केलेल्या आपल्या राष्ट्रगीताचे पहिले वाद्य-संयोजन केले ते,आर सी बोराल यांनी; "हमराही" ( १९४४) या चित्रपटात.



त्यांनी संगीत दिलेली आणि गाजलेली काही गाणी

इक बंगला बने न्यारा :


तेरी गठरी मी लागा चोर :



मन कि आखें खोल बाबा :


कौन मन लुभाया :


ना तो दिन हि दिन वो राहे मेरे 



आणि बाबुल मोरा नैहर छुटो ही जाय :


प्रसिद्ध संगीतकार अनिल विश्वास यांनी आर सी बोराल यांना " हिंदी चित्रपट संगीताचे पितामह " म्हणून संबोधले होते. किती यथार्थ संबोधन ___/|\___
---






Monday, June 26, 2023

आवडती जुनी गाणी: 13. चैन से हमको कभी...

 

काही  गाणी अशी असतात कि विसरू म्हणता विसरता येत नाहीत. मनाच्या एका हळव्या कोपऱ्यात रुतून बसतात, कित्येक हळवे क्षण त्या गाण्याशी जोडलेले असतात. तसंच हे एक गाणं!

पण या गाण्याचे वेगळेपण असे की त्याने अनेक हळवे कोपरे तयार केलेत मनात. कितीतरी क्लेषकारक आठवणी, घटना, गुपितं, अफवा या गाण्याच्या आसपास भीरभीरत असतात... 

कवी एस एच बिहारी यांचे शब्द, कसे मधाळ होऊन मनाला चिरत जातात. एकापाठोपाठ एक विसंगती येत राहातात अन मनातला एक एक "चैन" विस्कटून टाकतात. सुखांन जगू देत नाहीत; ना सुखाने मरू देतात. पाहिलंच कडवं पहा, चंद्राच्या रथात बसून, रात्रीची नवविवाहिता येतेय, पण देतेय काय तर "ताडपण्या"चं अविनाशी दु:ख! यातल्या पुढच्या दोन ओळी मूळ गाण्यात हरवल्यात. पण दूरदर्शनवरच्या कार्यक्रमात आशाने त्या गायल्यात...प्रेमाच्या जळत्या जखामांच्या उजेडात, आपल, वेगळं होणं अजूनच ते अजूनच वाढणार आहे , याला काय म्हणायचं? दुःखाच्या डागण्या? अन बरं, हे गाताना कुठेही राग नाही, नुसताच आतल्या आत जाळत जाणं... 

शेवटी, हे वेगळे होण्याऐवजी मरण आलं  असतं तर जीवाला जरातरी सुकून मिळाला असता... हेही असाच काळीज चिरत जातं... 

इतके जीव ओतून दुःख सादर करणारे बिहारी... सादर प्रणाम!

आता सगळ्यात अवघड गोष्ट. संगीतकार ओ पी नय्यर साहेब आणि गायिका आशा भोसले. या दोघांनीं कितीतरी गाणी दिली आपल्याला. अगदी दिल खुश करून टाकणारी. मन उत्साहित करणारी, म्हणतात न मूड बदलून टाकणारी बबली गाणी.पण आता त्यांची आठवण नको... आज फक्त चैन से हम को कभी... 

असं म्हणतात कि, कााही कारणांनी लता मंगेशकर आणि ओ पी नय्यर यांच्यात मानमुटाव झाला. त्यात अजून, एका कार्यक्रमा संदर्भात  काही गैरसमज झाले. त्यातून लता आणि आशा यांच्यात बोलणी झाली. तर काही म्हणतात आशाच्या मुलीला ओ पी काही बोललेले... काय झालं कोण जाणे. पण ओ पी आणि आशा या दोन सुरील्या मैत्रीत वाणवा  पेटला. दोघांची मनं पार दुखावली. हे सगळं घडत होतं तेव्हाच "प्राण जाय पार वाच न जाय"(1974) या चित्रपटाची गाणी करणं चालू होतं. यातीलच एक गाणं चैन से हम को कभी... हे गाणं रेकॉर्ड झालं. ओ पी आणि आशा दोघांच्याही मनातले दुःख जणू यात बिहारीजींनी मांडलेेलं ... हे गाणं या जोडगोळीचं एक फार वेगळं गाणं, अन तितकच अप्रतिम!

पण सुरुवातीला म्हटलं न, काही गाणी आपलं वेगळचं नशीब घेऊन जन्माला येतात; तसच या गाण्याचं. या चित्रपटाचे निर्मात कि दिग्दर्शक यांना हे गाणं फार संथ वाटलं. चित्रपट ऍक्शन पट. त्याची कथा अन चित्रणामध्ये या गाण्याचा समावेश करावा असं काही त्यांना वाटेना. गाणं रेकॉर्ड होऊनही चित्रपटात ते घेतेलंच गेलं  नाही. पण गीताची  स्वतःची क्षमता इतकी; कि तरीही फिल्म फेअर अवॉर्ड मध्ये त्याला उकृष्ट गीत म्हणून पुरस्कार मिळाला. अर्थातच आशा काही या बक्षीस समारंभाला गेली नाही. तिचं पारच मन उतारलेलं. अखेर ओ पी नय्यर यांनी ते बक्षीस घेतलं. पण आशा पर्यंत ते पोहोचलं, नाही? कोणास ठाऊक... 

ओ पी - आशा जोडी संपली ती संपलीच... अजून कितीतरी गोड गाणी झाली असती पण... त्या त्या गाण्यांचे नशीब नव्हते हेच खरे. या नंंतर आशा कधीच ओ पी नय्यर यांच्याकडे गायली नाही. अन ओ  पींच्या करियरची  उतरती कळा सुरू लागली. एका सुंदर गाण्याने एका अतिसुंदर मैत्रीचा शेवट झाला... 

तर हे ते गाणं. मुद्दाहून सगळे गीतही देते. आणि दोन लिंक्सही. एक मूळ रेकॉर्ड झालेलं पण चित्रपटात न आलेलं. अन दुसरं दूरदर्शन मध्ये एका कार्यक्रमात आशाने गायलेलं. काही जागा वेगळ्या जरूर आहेत. पण दोन्ही गाणी तितकीच मनाला चिरत जाणारी... !

 ---

चित्रपट:  प्राण जाय पर वचन न जाय (1974)

संगीतकार: ओपी नैय्यर

गायिका: आशा भोसले
गीतकार : एस एच बिहारी

चैन से हमको कभी, आपने जीने ना दिया

ज़हर भी चाहा अगर, पीना तो पीने ना दिया

चैन से हमको कभी... 


चांद के रथ में रात की दुल्हन जब जब आएगी

याद हमारी आपके दिल को तडपा जाएगी

प्यार के जलते जखमोंसे जो दिलमे उजाला है 

अब तो बिछडके और भी जादा बढने वाला है

आपने जो है दिया, वो तो किसीने ना दिया

ज़हर भी चाहा अगर, पीना तो पीने ना दिया

चैन से हमको कभी... 


आपका ग़म जो इस दिल में दिन-रात अगर होगा

सोचके ये दम घुटता है फिर कैसे गुज़र होगा

काश ना होती अपनी जुदाई मौत ही आ जाती

कोई बहाने चैन हमारी रूह तो पा जाती

इक पल हँसना कभी दिल की लगी ने ना दिया

ज़हर भी चाहा अगर, पीना तो पीने ना दिया

चैन से हमको कभी... 

मूळ गीत:


दूरदर्शनवर सादर झालेले गीत:



Tuesday, June 6, 2023

आवडती जुनी गाणी: १२. किसी तऱहसे मुहब्बतमें चैन पा न सके



बडी माँ हा 1945 चा चित्रपट. मा. विनायक यांची निर्मिती अन दिग्दर्शन. सुप्रसिद्ध तारका नूरजहाँ नायिका अन ईश्वरलाल, याकूब, सितारादेवी, मीनाक्षी, दामुअण्णा मालवणकर, अशी तेव्हाची तगडी कास्ट असणारा हा चित्रपट.

दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची कथा उलगडत जाते. जागतिक राजकारण, जपान, भारताचे देशप्रेम अशा अनेक वळणांनी हा चित्रपट समृद्ध होत जातो. 

या गीताचे संगीत कार होते सुप्रसिद्ध के. दत्ता होते. तर गीतकार अंजुम पीलीभीत.

या गाण्याची जान आहे ती नूरजहाँनच्या "पाऽऽ न सके" या मुरकीमधे. 

सुरुवातीच्या हिंदी चित्रपट सृष्टीमधे कोल्हापूर अन मराठी कलाकारांचा कसा वरचष्मा होता हे या चित्रपटाची कास्ट बघितली की कळतं. निर्माता, दिग्दर्शक(मा. विनायक),  संगीतकार ( के. दत्ता म्हणजेच दत्ता कोरेगावकर) , बॅनर ( प्रफुल्ल पिक्चर्स), कथा ( व्ही. एस. खेडेकर) , एक गीतकार(राजा बढे), एक गायिका(लता), चार स्त्री कलाकार ( मीनाक्षी, लता, आशा, बेबी अलका), एक पुरुष कलाकार ( दामुअण्णा मालवणकर).

आज या चित्रपटाची फिल्म, शक्यता आहे की फिल्म

आर्काईव्हजमधे कुठेतरी असेल. पण किमान नूरजहाँच्या या आणि इतर गाण्यांनी रसिकांच्या मनात हा चित्रपट जागा राहील.

सध्या इतकच!

-


Monday, June 5, 2023

आवडती जुनी हिंदी गाणी: ११. मुझे जा न कहो मेरी जाँ


मुझे जा न कहो मेरी जाँ
चित्रपट अनुभव1971
बासु भट्टाचार्य दिग्दर्शक निर्माता कथा
संगीत कनु रॉय
गीत गुलझार
गायलय गीता दत्त
राग खमाज वर आधारित लोकधून मधून आलेला
कहरवा ताल एक वेगळा ताल हिंदी गाण्यात कमी वापरला जातो.
कहाँ वरची कारिगरी आहाहा
चित्रित केलय तनुजा अन संजीवकुमार
तनुजा अती रोमँटिक, चुलबुली
संजीवकुमार तितकाच शांत, ब्रह्मचारी स्वभावाचा. बासुजींचं खरोखर कौतुक हे इतकं रोमँटिक गाणं या दोघांकडून करवून घेणं
यातलं अजून एक सेक्सी गाणं मेरा दिल जो मेरा होता.... त्या काळाच्या मानाने तनुजाचे बोल्ड सीन्स अगदी  ;)
आता मेरी जाँ बद्दल.मॅच्युअर्ड रोमँटिक गाणं म्हणेन मी याला. छान मुरलेलं लग्न, अन तरीही धगधगती आच, तितकच आकर्षण अन तितकच समर्पितपणा, सगळं घडूनही प्रत्येक घडण्याचं तितकच ताजेपण,,तितकच आसुसलेपण. पूर्ण ओळखीतूनही सापडणारं नवं काही. जे ओळखीचच आहे, पण तरीही ताजं,नवं, उत्फुल्ल!
बाकी चित्रपट नंतर वेगवेगल्या लाटेत वर खाली होत जातो. नात्यामधले नवनवे आयाम तपासले जातात. कधी जरा संशयाने, कधी छे छे म्हणून सगळं नाकारणं, गैरसमज, राग, लोभ, विश्वासाचा तळ खरवडून वर काढणारे सगळे काही....नात्यातला सर्वात महत्वाचा घटक, विश्वास! स्वत:च्या आत वळून पहायला लावणारा, आरशातले स्वत: चेच प्रतिबिंब पुन्हा पुन्हा पडताळून बघावे वाटणे. अन त्यातून स्पष्ट, स्वच्छ होत जाणारं, अजून घट्ट होत जाणारं नातं. आपलं आपल्यालाच तपासून पहाणं. आणि मॅच्युअर्ड वाटणारं नातं, खऱ्या अर्थाने मॅच्युअर होणं. गैरसमजाला कधी समजायचं, खऱ्या अर्थाने समजायचं हे उलगडून दाखवणारा हा समंजस चित्रपट! मेरी जाँ जेव्हा खरी जाँ होते  :)






Sunday, June 4, 2023

आवडती जुनी हिंदी गाणी: १०. तारारी आरारी

 



दासताँ 1950 फार गाजलेला चित्रपट!
अब्दुल रशिद कारदार दिग्दर्शित
तीन भावंडं अन नव्याने आलेली एक अनाथ मुलगी. या सगळ्यांचा बालपणापासून तरुण पणा पर्यंतचा प्रवास म्हणजे दासताँ.
चित्रपटाचं संगीत आहे नौशाद यांचं.
गीत शकिल बदायुनी यांचं.
अन हे गाणं आहे तारारी, आरारी...
गायक सुरैय्या आणि रफी.
चित्रित केलय सुरैय्या अन राज कपूरवर. राजकपूरला सहसा असा आनंदी, रोमँटिक फार कमी पाहिलाय. त्याच्या रोमान्स मधे नेहमी एक समोरच्या नायिकेला तडपवण्याची झाक असते. त्याची नायिका सतत त्याच्यासाठी आसूसलेली वगैरे असते. अन प्रेमात नेहमी  त्याचा वरचष्मा जाणवत रहातो. त्या काळातही काहीसा डॉमिनन्ट नायक त्याने साकारला. हे गाणं मात्र याला अपवाद आहे.
उलट सुरैय्या सगळा भाव खाऊन जाते या गाण्यात. अर्थात हे स्वाभाविक आहे, या वेळी सुरैय्या तिच्या करियरच्या सगळ्यात वरच्या पायदानावर हेती. तर राजकपूर तसा नवा होता. अशी जरा उलटी भूमिका बघताना मला तर थोडा आसूरी आनंद मिळाला   ;)
एरवी राजकपूर कितीही आवडत असला तरी बायकांप्रती त्याचा अॅप्रोच मला खटकत आलाय. म्हणजे हृदयात एक कळ येते वगैरे ठिके हो, पण सतत का आपला त्याचा माज, हुर्रऽऽऽ  ;)
तर ते असो. आज जरा बोलायचय ते संगीत अॅरेमजमेंट बद्दल. मलाही जरा कमीच माहिती होती. पण एका एशियन फिल्म फेस्टिव्हलमधे एक फिल्न बघितली अन डोळे लख्ख उघडले. नुसता संगीतकार नव्हे, गायक नव्हे, वादक नव्हे तर अरेंजरची किती मोठी भूमिका असते ते लख्ख कळलं.
या गाण्यात मधे मधे सतत साथ करणारं व्हॉयॆलिन वाजवल अँथनी गोन्साल्व्हिस यांनी. हेच ते महान अरेंजर. आता हे गाणं ऐका. अन मग लगेच खाली दिलेल्या लिंकवर जाऊन माझा त्यांच्यावरचा लेख जरूर वाचा. https://arati-aval.blogspot.com/2012/01/blog-post_19.html

Saturday, June 3, 2023

आवडती जुनी हिंदी गाणी: ९. ओहो रे ताल मिले


अनोखी रात (1968)
संजीव कुमार, जाहीदा हसिन, अरुणा इराणी, परिक्षित सहानी, तरुण बोस अशी तगडी कास्ट असलेला अन वेगळ्या विषयावरचा अनोखी रात हा चित्रपट.
असित सेन यांनी दिग्दर्शित केलेला.

केवळ एका रात्रीमधे नाट्य घडणारा. अनेक अनोळखी लोकांची आयुष्य, एकमेकांमुळे पार उलथी पालथी करणारी रात्र, म्हणूनच अनोखी.

माणसाचे खरे रुप अडचणींच्या परिस्थितीत कसे उघडकीस येते हे दाखवणारी अनोखी रात्र.

अडचणींतून स्वत:चा फायदा उकळणाऱ्यांपासून स्वत:चा जीव पणाला लावणाऱ्यांपर्यंत मनुष्य स्वभावांची ओळख करून देणारी अनोखी रात!

एका भोळ्या भाबड्या सामान्य माणसाचा दरोडेखोरपर्यंतचा प्रवास अन तरीही त्यातलं न संपणारं माणूसपण उलगडवणीरी अनोखी रात.

या चित्रपटातले हे गीत, " ओहो रे ताल मिले नदी के जल मे, नदी मिले सागर मे, सागर मिले कौन से जल से कोई जाने ना"
आयुष्यातले कोणते वळण कुठे नेऊन सोडेल याची काहीच खात्री देता येत नाही हे सत्य सांगणारं तत्वज्ञान इतकं साधं सोपं करून लिहिलय इंदिवर यांनी.

संगीत दिलय रौशन यांनी. इतकं सुरेल सूर, इतके स्फटिकासारखे स्वच्छ सूर अन मोत्यासारखे शब्द. फार फिर जमून आलेलं ही गीत!

मुकेशच्या आवाजात हे गीत आपल्याला हेलावून टाकतं. मनातला खोल खोल तळ शोधत जातो आपण. आत आतलं स्वच्छ, सुंदर, अलवार अन सच्च काही तरी वर येऊ पहातं.

हा चित्रपट रिलिज होण्याआधीच रौशनने आपला इहलोकाचा प्रवास संपवला. पण हे मनात आल्यावाचून रहात नाही की; इतके सुंदर गीत, इतके सच्चे सूर रौशनच काय,ज्यांच्या ज्यांच्या मनात गुंजत राहिले अशा सर्वांनाच, त्यांच्या सागराचा पैलतीर भेटला असेल!
निश्चितच!!
आमेन!!!



Friday, June 2, 2023

आवडती जुनी हिंदी गाणी: ८. आसू भरी है


"आसू भरी है ये जीवन की राहें"
परवरिश (1958) चित्रपटातलं हे गीत.
गायलय मुकेशनी.
संगीत: दत्ताराम, 
दत्ताराम वाडकर गोव्यातून मुंबईत आल्यावर डॉकयार्डवर हमाल म्हणून काम केलं. पण तबल्यावरचे त्यांचे कौशल्य त्यांना हिंदी चित्रपट सृष्टीत खेचून घेऊन आले. सुरुवातीला सुप्रसिद्ध संगीतकार सज्जाद यांच्याकडे  अन नंतर शंकर जयकिशन यांच्याकडे संगीत अरेंजर म्हणून काम केलं. पुढे राजकपूरने आपल्या चित्रपटासाठी संगितकार म्हणून दत्तारामना निवडलं. अन पुढे अनेक सुंदर गीतं त्यांनी दिली. त्यातलंच हे एक.

राजकपूरवर चित्रित हे गाणं फार गाजलेलं.
राजकपूर अन मुकेश या  दोन व्यक्ती पण आत्मा एक असावेत इतके सारखे. राजकपूरच गातोय असं वाटावं.
मुकेशच्या आवाजातला दर्द अधिक की राजकपूरच्या चेहऱ्यावरील हे ठरवताच येत नाही...
गीतकार: हसरत जयपुरी.
हसरत जयपुरींचे शब्द तर आयुष्याचा, दु:खाचा अर्क पिळवटून येणारे.
दोन एकमेकांमधे गुंतलेले जीव.
या गाण्या आधी  तिला कळतं की परिस्थितीमुळे  लांब जावं लागणार तेव्हा  "लुटी जिंदगी और गम मुस्कराये, तेरे इस जहाँ से हम बाज आये " हे तिचं दु:ख व्यक्त करणारं गीत. पण मग जगात चांगले लोकही आहेत हे कळून तिच्या मनासारखे होत असते. पण त्याला त्याचे कर्तव्य सोडता येत नाही. शेवटी तिचं मन तोडून तिला कठोरपणे दूर केल्यावर त्याचं भळभळतं हृदय या शिवाय दुसरं काय गाऊ शकतं? 

Thursday, June 1, 2023

आवडती जुनी हिंदी गाणी: ७. क्या रात सुहानी है


श्याम सुंदर या संगितकाराचं अजून एक गोड गाणं -"क्या रात सुहानी है." चित्रपट अलिफ लैला 1953मधला. साहिर लुधियानवींचे शब्द. महम्मद रफी अन लता. आशा माथूर आणि विजय कुमार वर चित्रित. दोघेही तसे फारसे माहित नसतील. पण जोडी म्हमून फार छान शोभलेत. विजयची जुल्फ देवानंदची जरूर आठवण करून देतील  ;)

खरे तर निम्मी ही पण आहे चित्रपटात. पण हे सुंदर गाणं मिळालं आशा माथूरला. आशा माथूर ही हिंदी चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या काही सुक्षिशित नायिकांमधली एक. तिचं अजून एक प्रसिद्ध गाणं " हम सें ना पुछो कोई प्यार क्या है

आता गाण्याबद्दल. या गाण्यात प्रश्न पडतो की रफी आहे की तलत  :) त्याची  "जमाने " मधली मुरकी आहाहा.

लता चे "फुरसत" आपली मान वळवल्याशिवाय रहात नाही.

म्हटलं तर साधी सरळ चाल पण गुंगवून टाकणारी, मधाळ! 

दोघांच्या आवाजाचा मुलायम पोत वेगळाच माहौल तयार करतो एव्हढं नक्की!

जरा अॅबरप्टली संपलय यात गाणं. पण दुसरी लिंक सापडली नाही

Wednesday, May 31, 2023

आवडती जुनी हिंदी गाणी : ६. साजन की गलियाँ छोड चले


श्याम सुंदर -  हिंदी चित्रपट संगीताला मिळालेला  एक फार गोड संगीतकार! त्यांचच हे गीत "साजन की गलियाँ छोड चले." गायलय लताने. गीतकार क़मर जलालाबादी. चित्रपट होता 1949 चा बाजा़र. दिग्दर्शक होते के. अमरनाथ. 

यात नायक आहे श्याम. त्या काळातला एक सुस्वरुप नायक. त्याची एक छान ओळख म्हणजे सादत हसन मंटोंचा तो खास मित्र. पण वयाच्या 31 व्या वर्षी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यात घोड्यावरून पडून त्याचा अकस्मित मृत्यू झाला. अन हिंदी चित्रपट सृष्टी एका नायकाला मुकली.

मुगल ए आझम मधली निहार सुलताना नक्की आठवत असेल तुम्हाला. हो तीच, बहार! राजवाड्यातली मुख्य नर्तकी. ती या चित्रपटातली नायिका. हे गाणं तिच्यावरच चित्रित केलं आहे.

तर आता गाण्याबद्दल. संगित, त्याचा ठेका, मधेच येणारे शेर - गद्यातले, सुरांमधे भरलेले आर्त दु:ख. सगळं मन भारावून टाकणारे. डोळे मिटून ऐकलं तर नक्की डोळ्यात पाणी यावं... श्याम सुंदरची कमाल! 

लतानेया गाण्याला पूर्ण न्याय दिलाय. साजनमधल्या सा वर आणि नंतर गलियाँ वरती जी काय कमाल केलीय तिने. जियो! छोड हा शब्द खरं तर अगदी असांगितीक. पण लताने तो पूर्ण सांगितिक केलाय. 

अनिल विश्वास, श्यामसुंदर, सज्जाद, सी रामचंद्र यांच्या संगीतात लताचा आवाज विशेष गोड लागलाय. तिच्या आवाजात दर्द असा ठिबकतो, मन पिळवटून टाकतो. गोड आवाजात दु:ख असं काही समोर ठाकतं... तुम्ही आहा पण म्हणू शकत नाही अन आह् पण म्हणू शकत नाही. मग ते झिरपत रहातं मनात, मधातून दिलेल्या औषध जसं जिभेवर दरवळत रहातं. अगदी तसच कानात, मनात घर करून रहातं!

यात शेवटी येतो तो लताचा फोटोही, ला जवाब!

Tuesday, May 30, 2023

आवडती जुनी हिंदी गाणी: ५. जिसे तू कबुल कर ले

  


देवदास (1955) चित्रपटातलं हे गीत. एस डी बर्मन संगीतकार. गायिका अर्थात लता.

या गाण्यात खूप चकीत व्हावं असं मिक्सिंग आहे


एकतर वेगवेगळी वाद्यं वापरली आहेत. सरोद,टाळ, ढोलक, तबला, सतार, बुलबुल तरंग, बासरी, बीन, कितीतरी. अगदी एकमेकांबरोबर न जाणारी. 

शिवाय यात तालही वेगळे आहेत. एका तमासगिरीच्या तोंडी अन भजनी ताल अन टाळही.

मूडही आर्जव, दु:ख, निराशा, झिडकारलेपणाची भावना,  तो परततो तेव्हा थोडा जीव भांड्यात पडतो असा,  सगळं पणाला लावणं,पुन्हा आर्जव, प्रेमाची कबुली, समर्पण, त्याच्यावरचं अवलंबित्व अन पुन्हा शेवटी एक दर्दभऱाच पण सुकून.. त्या त्या मुडनुरुप वाद्य अन धून येत रहातात. अन इतकं वैविध्य असूनही गाणं एकसंधच. स्टोरी टेलिंगचं एक उत्तम उदाहरण ठरावं हे गाणं. अन वैजयंतीमालाच सहज नृत्य, तिचा अभिनय- कायिक, चेहऱ्यावरचा. अन दिलिप कुमार "द ट्रॅजेडी किंग"चं "सगळं सगळं सोडून दिलय, अगदी जगणंही! केवळ तुझ्या सुरांमुळे पाय परत फिरलेय. पण तेही फार वरवर काम करताहेत, आतून तर मी पूर्ण कफल्लक झालोय",  हे ठसवत रहाणं तेही अतिशय खरं वाटावं असं. 

थोड्या संथ वाटतील, भाबड्या वाटतील, शब्दांना त्यातील अलवार भावना भिडतील, नायकनायिकेच्या रुपात स्वत:ला ढालतील; अशा गाण्यांच्या प्रेमात आमची पिढी ☺️

नव्या पिढीला अरे काय बावळट आहे का असे वाटू शकतं. पण आमची मनं गलबलतात ही गाणी ऐकता, बघताना. अशी सटल दुखरी गाणी वरवर पहाता दु:खं देतात; पण मनात आतून एक अलवार सुकून देतात. या गाण्यात जसा तिला शेवटी मिळालाय. माहितीय क्षणिक आहे, पण तोही पुरेल आयुष्यभर असा काहीसा☺️🙃


Monday, May 29, 2023

आवडती जुनी हिंदी गाणी: ४. बेईमान तोरे नैनवा

  


तराना चित्रपटातलं हे गोड, रोमँटिक गाणं. 1951 चा हा चित्रपट. दिलिप कुमार, मधुबाला यांचा हा पहिला चित्रपट. याच काळात दोघांचे जीव एकमेकांत गुंतले. 

दिग्दर्शक होते राम दरयानी

गीतकार डि. एन. मधोक

संगीत आहे अनिल विश्वास यांचं. फार गोड गाणी दिलीत त्यांनी. 1932 ते 65 एव्हढा मोठ्या काळात त्यांनी सत्तर हून अधिक चित्रपटांमधून अनेक बहारदार गाणी दिली. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, बाऊल संगीत आणि भटियाली संगीतांचा त्यांचा गाढा अभ्यास होता.

गाण्याआधीचा प्रेमळ, खट्याळ, लाडिक संवादही 💗

त्याकाळातला हातभर लांब राहून केला जाणाऱ्या रोमान्सवर हा रोमान्स फारच गहिरा झालाय. ती आपली म्हणतेय की डोळे मिटून घे. पण इतकं स्वर्गीय सौंदर्य समोर असताना कसे बरं त्याचे "नैन मुंद ले" तील? मग त्या लोभस बेईमानबद्दलही प्रेम दाटून येतं, तिचंच नाही तर आपलंही😉

साधी सुकलेल्या गवताची पातीही झळाळतात त्या प्रेमात, नाहून निघतात...

चित्रिकरणात प्रकाश सावलीचा इतका सुंदर वापर केलाय... "आधे सोये आधे जागे" असे एक स्वप्नातलं जग आपल्याही मनात एक "भरम" निर्माण केल्याशिवाय रहात नाही. .

Sunday, May 28, 2023

आवडती जुनी हिंदी गाणी: ३. मेरी बीना तुम बिन रोये


देख कबीरा रोया... एक सदाबहार विनोदी चित्रपट! (1957) नसेल बघितला तर बघा😂 

खरे तर नावापासूनच गंमत सुरु होते. कबीराचा एक दोहा आहे. 

"चलती को गाड़ी कहे ,खरे  दूध का खोया ,

रंगी को नारंगी कहे ,देख कबीरा रोया।"

 

समोर जे दिसतय, जे हातात आहे ते नाकारून, पळत्याच्या मागे लागणं हे कसं चुकीचं आहे हे समजावणारा हा दोहा. 

हीच शिकवण एका प्रेमकथेतून सांगण्याचा हा प्रयत्न. चित्रपटाच्या शेवटी हा दोहा येतो. जुन्या काळचे, मूल्य शिक्षण देणारे चित्रपट हे 😇

तीन कपल्स अन त्यांची गंमतजंमत. जुना चित्रपट आहे, सो भाबडा, साधा, थोडा संथ आहे. पण गाण्यांची मैफिल अगदी!

एकसे एक गाणी आहेत. संगीत मदनमोहन. शुभा खोटे, अनिता गुहा, अमिता, अनूप कुमार, जवाहर कौल, दलजित असे कमी माहितीचे कलाकार. पण दिग्दर्शक अमिया चक्रवर्तींनी जी काही कमाल केलीय!

तीन जोड्यांची आपापसातल्या आवडीनिवडीची सरमिसळ आणि ती सांभाळण्यासाठी नायकांची कसरत, त्यातून होणारे गैरसमज, गोंधळ. आणि त्या सगळ्याची नंतर सोडवणूक. अशी गमतीशीर गोष्ट, पण गाणी ऐकली तर वाटतं कि खूप गंभीर, रडका चित्रपट आहे कि काय.

सोबत जुनं मुंबई पहाणं हेही एक सुख!

यात एके ठिकाणी ही तीन गाणी एकापाठोपाठ येतात. म्हटलं तर दु:खी, सिरियस गाणी. पण चित्रपट बघताना मनात मिश्किल हसू घेऊन येतात. तीनही गाणी एकमेकांत छान जेल केलीत - त्रिवेणी संगमच जणु! संगीतकाराने केलेला एक वेगळा प्रयोग. जरूर ऐका, पहा. 

मेरी बीना तुम बीन रोये,अशकों से तेरी हमने आणि तू प्यार करे या ठुकराए!

एंजॉय😃


Saturday, May 27, 2023

आवडती जुनी हिंदी गाणी : २. महोब्बत ऐसी धडकन है

 


अनारकली चित्रपटातील हे गाणं, साल 1953. गायिका लता, संगीतकार सी रामचंद्र. नायिका बीना रॉय

सी रामचंद्र, हिंदी चित्रपटातील नावाजलेले एक मराठी नाव. अतिशय सुरेल, तीन पट्यांमधे सरसर फिरणारे सूर, गायकाला मोठं चॅलेंज असणारी चाल, वाद्यांची नेमकी निवड अन नेमका वापर, ही काही वैशिष्ट्य.

अनारकली गाजला तो गाण्यांसाठी. 14 गाणी आहेत यात😃अन प्रत्येक गाणं बंदा रुपया. ज्यांना गाणी, संगीत आवडतं जरूर बघा हा चित्रपट. संथ वाटू शकेल, प्रदिपकुमार असल्याने जरा डोळ्यांवर अत्याचार होतील😂पण गाणी, बीना रॉय 💞

 हे गाणं माझं फार आवडीचं. काय एक एक जागा आहेत. गंमत म्हणजे एखादा शब्द रिपीट होताना दरवेळी वेगळी सुरावट. सी रामचंद्र🙏🏻 नहींऽऽ, जातीऽऽ,  सजदे,... दर वेळी वेगवेगळं.

Friday, May 26, 2023

आवडती जुनी हिंदी गाणी : 1. बहार आयी खिली कलियाँ


सज्जाद हुसेन हे 1945-60 मधले फार वेगळे संगितकार. खूप हटके संगीत दिलय त्यांनी. लताच्या गळ्याच्या रेंजचा इतका सुंदर वापर इतर कोणीच केला नसेल. लताचा आवाज यांच्या संगितात वेगळा जाणवेल

1953च्या अलिफ लैलातलं हे गाणं