Showing posts with label कुमार. Show all posts
Showing posts with label कुमार. Show all posts

Saturday, November 26, 2022

नैना ना माने...

सकाळी उठले तेच नैना ना माने मनात घोळवत. पण सकाळच्या गडबडीत ते शोधून लावणं काही जमेना. मग उगाचच कामं चुकू लागली, वाढीव कामं होऊ लागली. नको ती कामं निघू लागली. सगळच बिनसलं. मग म्हटलं मरो ती कामं. चक्क पसारा आसपास तसाच ठेवून फोन घेऊन बसले सरळ. आधी शोधलं नैना न माने मोरा. ते लावलं  अन पहिल्याच नैना वर मन डोलू लागलं. मनच काय सारं शरीरच नैनामय झालं. कुमारांचं गारुड मनावर काम करू लागलं. मनातली सगळी उलघाल, अस्वस्थता दूर कुठेतरी पळून गेली. मनभरून नैना बरसले. एक एक तान मनातला एक एक ताण सोडवत गेली. हलकं हलकं होत मन पिसासारखं अलगद विहरू लागलं. 

खरं तर सात मिनिटांची ही सफर पण सकाळची सगळी उलघाल संपली, एक नवा दिवस ताजा होऊन गेला. 

पुन्हा एक गोष्ट सिद्ध झाली, संगीताला टाळणं करायचं नाही. त्या त्या क्षणांचं मागणं पूर्ण करायचं. मग आनंदच आनंद! आता दिवसभर मनात वाजत राहिल नैना न माने... अन मग सगळं मनासारखं घडत जाणार!





Thursday, July 28, 2016

गुरुजी, जहाँ बैठु वहाँ छायाजी

https://youtu.be/p1MG9m68rxY
कुमारांचे हे अजून एक निर्गुणी भजन. फार मनाला आत आत कुठेतरी हलवून सोडणारं. ते मला समजलं असं:

गुरुजी जहाँ बैठु वहाँ छायाजी
सोहि तो मालक म्हारी नजराना आया जी

गुरुजी, मी जिथे स्थिरावु पाहिलं, तिथे तिथे त्या परम चैतन्याची सावली तुम्ही माझ्यावर धरलीत. तुमच्या स्नेहाची, आशिर्वादाची ती सावली!

गेरा गेरा झाड झाड शीतल छाया
म्हारा हो सत्गुरु देखन आया जी

प्रत्येक परिस्थितीमधे, प्रत्येक अनुभवामध्ये ही शीतल छाया तुम्ही दाखवत गेलात गुरुजी!

कुम्हाऱ्या जो धरती ये कलशा मंगाया
म्हारे सत्गुरु जी ने भेट चढाया जी

ज्याप्रमाणे कुंभार साध्या मातीतून सुबक, उपयुक्त मडके बनवतो, तद्वतच तुम्ही माझ्या सारख्या साध्या माणसाला घडवलेत आणि ते घडण्यातून मला त्या परम चैतन्याला समर्पित केलत.

तनभर ताला सबद भर कुंजी
म्हारे सत्गुरु जी ने खोल बताया जी

या नश्वर देहात, त्याच्या कर्मात मी अडकून पडलो होतो. अन शब्दांच्या अनुभवांच्या जाळ्यात सापडलो होतो. गुरुजी तुम्ही ह्या सगळ्याच्या चाव्या शोधून दिल्यात, त्यातून मुक्त करून, माझ्यातला मला दाखवलत.

जीव नगर में कांटे भरानु
म्हारा हो सत्गुरु जी ने शोध लगाया जी

जीवनाच्या वाटचालीत असंख्य अडचणी होत्या, दु:ख होतं. पण त्यातून सुख,  मार्ग कसा शोधायचा ते तुम्ही दाखवलत, शिकवलत.

दोही कर जोडु देवानाथ बोल्या
म्हारे केसर तिलक चढाया जी

दोन्ही हात जोडलेल्या- सारे कर्म अर्पण करून मुक्त झालेल्या अशा देवनाथाला तुम्ही मुक्तीचा केशरी तिलक लावलात, गुरुजी!

Friday, July 3, 2015

शून्य गढ शहर, शहर घर बस्ती

हे कुमारांनी गायलेलं गोरखनाथांचे एक निर्गुणी भजन.

शून्य गढ शहर, शहर घर बस्ती
कौन सूता कौन जागे है
लाल हमरे हम लालान के
तन सोता ब्रह्म जागे है


जल बिच कमल, कमल बिच कलियाँ
भँवर बास न लेता है
इस नगरी के दस दरवाजे,
जोगी फेरी नित देता है

तन की कुण्डी मन का सोटा
ज्ञानकी रगड लगाता है
पाञ्च पचीस बसे घट भीतर
उनकू घोट पिलाता है

अगन कुण्डसे तपसी ताप
तपसी तपसा करता है
पाञ्चो चेला फिरे अकेला,
अलख अलख कर जपता है

एक अप्सरा सामें उभी जी,
दूजी सूरमा हो सारे है
तीसरी रम्भा सेज बिछावे,
परण्या नहीं कुँवारी है

परण्या पहिले पुतुर जाया
मात पिता मन भाया है
शरण मच्छिन्दर गोरख बोले
एक अखण्डी ध्याया है
              -गोरखनाथ
-------------------------
मला समजलेला भावार्थ :
नाथ संप्रदायातील  शून्य तत्वज्ञानानुरुप सगळे शून्यातून निर्माण झाले आहे अन सर्व शून्यातच विलिन होणार आहे.
हे शरीर जणु एक शहर आणि त्यातील आत्मा जणु वस्ती
ही वस्ती, आत्मा कोणाचा निद्रिस्त तर कोणाचा जागृत.

देव माझा अन मी देवाचा.
जेव्हा माझे शरीर- मी पण संपते, तेव्हा माझा आत्मा -ब्रह्म जागृत होते.

जीवनाच्या जलाशयात मोहाची कितीतरी कमळे, अन त्याची कितीतरी विलोभनीय रुपं. या मोहातून फिरताना आपल्या दाही इंद्रियांवर पहारा देत योग्याला पुढे जायचे असते.

शरीररुपी खला मधे आत्मारुपी बत्याने खल करत योग्याने ज्ञानाचा शोध घेत राहिले पाहिजे. सृष्टीतील पाच तत्व आणि बुद्धीची 25 क्षेत्र यांचा वेध घ्यायचा प्रयत्न करत राहिले पाहिजे.

या साऱ्या ज्ञानसाधनेच्या अग्नीमधे तप करत पाच तत्वांशी झगडत आमि स्वत:शी सतत संवाद करत योग्याने प्रयत्न चालू ठेवला पाहिजे.

योगी तपश्चर्या करत असतो तशी माया ती मोडण्याचा प्रयत्न करत असते. एक, दोन नव्हे तर अगदी रंभे सारखी मोहमायाही समोर उभी राहते.

आणि विवाहा आधीच पुत्रप्राप्तीचा आनंद त्याला मिळाला. पण अशा सापळ्यात गोरखला अडकायचे नाही, अन म्हणून तो आपल्या गुरुंना, मच्छिंद्रनाथांना मदतीचे आवाहन करतो आहे आणि स्वत:ला सावध राहण्याचा इशारा देतो आहे.
--------------
हे सारे एकताना मनात आलेले विचार...

म्हटले तर सगळेच शून्य, अन म्हटले तर सारे सार इथेच. म्हटले तर शहर, म्हटले तर गुढ गढी. एकच शरीर, एकच मन, एकच आत्मा, एकच कुंडलिनी, एकच ब्रह्म, एकच बस्ती... पण शून्य, जोवर हे सगळे जागृत होत नाही, तोवर सारे सारे शून्य.

म्हटले तर कितीतरी मोह, कितीतरी प्रलोभने, कितीतरी भोग, कितीतरी तत्व, कितीतरी विचार अन कितीतरी तत्वज्ञानं अन कितीतरी ज्ञानाची द्वारे,  अन अजून कितीतरी अनुभूती....

आणि तरीही सगळे पुन्हा शून्यातच विलिन होणारे. शून्यवतच सगळे...
शेवटी हा सगळा आतल्या आतला संवाद, वाद, खल, झगडा... आपला आपल्यालाच सोडवायचा. आपलाच पहारा आपल्यावरच. आपलीच मोहमाया आपणच दूर करायची. आपल्या सुखाच्या मर्यादा ओलांडायच्या आपणच, अगदी पार व्हायचे, आपले आपणच.

 अधिकार नसतानाच सगळे सुख मिळवण्याची हावही आपली अन ती आवरण्याची धडपडही आपलीच. स्व निर्मितीचा आनंद, त्या निर्मितीवरचा अधिकार, हक्क  हाही सगळा एका भोगाचाच भाग.... तो ही पुन्हा शून्याकडेच जाणारा.

ह्या शून्यप्राप्तीचा हा प्रवास, तो ही शून्यच... फक्त त्याची जाणीव होणं, राहणं, सतत ठेवणं हे त्या शून्याचे संपूर्णत्व. ते अंगी येणे म्हणजेच शून्यत्व...

शून्याकडून शून्याकडची वाट मात्र फार फार मोठी....

Wednesday, March 25, 2015

सख्या रे... ३. रंग दे रंग दे, रंगरेजवा

कुमार गंधर्व यांची मधमाद सारंग मधली ही चिज

रंग दे रंग दे रंगरेजवा
जैसी मोरी पिया की पगरिया
रंग दे मोरी सुरंग चुनरिया
जैसी मोरी पियाकी पगरिया

त्यावर काहीबाही सुचलं...
------------------

 किती तो उकाडा.... अगदी काहिली होतेय जिवाची. त्यात तोही नाही जवळ. एकच सुखाची गोष्ट, तो येणार आहे, लवकरच... त्याच्या आगमनाची वार्ताही किती सुखावणारी... जणुकाही ग्रीष्मातल्या दुपारी वळवाची चाहूल. आता इतक्यात हे विरहाचे दिवस संपतील अन मग त्याच्या संगतीत नवीन वसंत फुलेल.

तो येणार, कशी सजवू स्वता:ला? कोणती नवीन वसनं आणू? कोणत्या रंगात रंगवू? ए, रंगरेजवा मला मदत कर ना... माझ्या त्याची पगडी कोणत्या रंगात असेल बरं? त्या रंगात रंगवून दे ना माझी चुनरिया.

कोणता रंग विचारतोस? अं.... असं कर सगळेच रंग आण तुझे अन सगळ्याच दे बरं रंगवून. तसंही तो आला की सारेच रंग फुलणार आहेत... आधी थोडा भांडणाचा मग थोडा रुसव्या फुगव्याचा, तो इतके दिवस आला नाही म्हणून थोडी तर रुसणारच ना मी?
मग थोडा त्याच्या समजूत घालण्याचा. मग आमच्या दोघांच्या प्रेमाचा, .... सगळेच रंगव रे रंगरेजवा...

हा विरक्तीची पांढरा रंग सारा सारा रंगवून टाक, वसंत फुलवून टाक.... माझ्या त्याच्या रंगात बुडवून टाक रे मला...

तू तर साऱ्या जगाचा रंगरेजवा, तुला माहितीच आहेत साऱ्या जगाचे, अगदी माझ्या त्याचेही सारे रंग. मग माझी चुनरिच काय, मलाच रंगवून टाक ना त्याच्या रंगात.

इतके रंगव इतके रंगव की मी मी न राहिन, ना तो तो राहिल. असं रंगव रे रंगरेजवा....

Thursday, December 6, 2012

"आनंद मना .... "

आज कोण कुठले आप्त मला भेटायला सकाळी सकाळी आले.
उठलेच ते काहीशी वेगळ्या मूड मध्ये. आज पर्यंतच्या अनेक त्रासदायक आठवणी उगाचच आठवू लागल्या.

आयुष्यात न आकारलेले आकार, डोळ्यासमोर फेर धरू लागले.उगाचच एक अस्वस्थता तार छेडू लागली. जे जे हाती आले नव्हते, कधी निसटले होते, कधी सोडावे लागले होते, कधी मनापासूनही सोडले होते; ते सगळे भोवती फेर धरून वाकुल्या दाखवत होते.

तशीच सारी कामे करत होते, अन उगाचच खंतावर होते, चिडचिडत होते...

अगदी नवरा, मुलगा दोघांशीही त्रासिक सूर छेडत होते,... अन असंच काही काही....

अन मग एक क्षण आला, बुद्धीला समजलं, काहीतरी हुकतय, मन अवखळ, चिडचिडं, वाभरं, लहान मूल झालय.

त्याला ताळ्यावर आणायचं तर कुमारांशिवाय कोणता उपाय?

एकीकडे कामं करतानाच एक क्षण मोकळा काढला अन कुमार लावले. अन कुमार वेगळेच भिडले आज...

जणु बाबा पुन्हा भेटले....

चिज होती मालकंस मधली "आनंद मना..." ( शक्य झालं तर शेजारी हे लावा, अन मग खालचे वाचा )

मनातले सगळे नैराश्याचे तांडव हळूहळू शांतावत गेले.
मनातला राग, उद्वैग, निराशा सगळं सगळं जणू त्यांना कळलं होतं.
ये गं बायो, किती खंतावशील? बस जरा जवळ. शांत हो बायो. नाराज नको होउस, होतं असं कधी कधी...

ये, ये,... " बैस जरा. जाउ दे सगळं... ठेव डोकं मांडीवर. थोपटत म्हणाले, हो गं, कळतं मला तुझं दु:ख, चिडचिड, उद्वेग....

"आ sssss, दे... " दे, तुझी सारी अशांतता मला दे....,

"ये ना,..., दे ना..." मला सारी तुझी दु:ख! अन थोपटत मला समजावत राहिले..... मला शांत करत राहिले,....

"हां..." समजतय मला....

"ना...." ही गं, तुझं नाही काही चुकलं.... बरोबर आहे गं, होतं असं,....

"ये ही...." रित है दुनियाकी....

" ना..ना...." रडू नको,.... जाऊ दे सारं............ जाऊ दे सारं.....

"हं,..." बास आता....उठ,...., शांत हो, स्वतःला सावर,....

"नैन न ना,..." चल डोळे पूस... आवर बाई तुझं दु:ख,...
"ये ही,..." ये जवळ ये.

हळूवार गोंजारून समजावत राहिले, अगं बाई जरा आनंद मनव ग सगळ्याचा.
आर्जवं करत राहिले, "आनंद मना, मना,..."
समजावत राहिले, "आनंद मना..."

जवळ घेऊन माझ्या मनातल्या सगळ्या उद्वेगाला आपल्या एका कवेत घेऊन दुस-या कवेत मला घेऊन म्हणाले, "हं,..." अगं हेही सगळे तुझेच आहेत, त्यांना घे जवळ, स्विकार. झिडकारू नकोस. स्विकार. स्विकार सारं, अगदी दु:खही....

जसं सुख आपलं तसच दु:खही आपलच गं. यांच्यामुळेच तर तू सुखाला जास्त चांगलं समजू शकलीस ना? हे सगळे तुझेच, तुलाच मिळाले याचाही आनंद मनव बायो! त्यांना आपलं मान, ते आपल्याच घरी आले हे मान, त्याचा आनंद मान; "मोरा जो पिया घर आया, आनंद मना... "

त्यांच्याकडे बोट दाखवून म्हणाले, बघ ते सगळे हळुहळू सुसह्य झालेत, अन दुसरीकडे लक्ष वेधत म्हणाले, ते बघ सगळा आनंद, समाधान आहेच की तुझ्या आयुष्यात, बघ "चहु दिस सब चमकत", सा-या दु:खांच्या पुढे बघ, या इथे सगळा आनंद तर फुललाय " रतिया खिल गयो बगिया"

सारीकडे आनंद, समाधान, सुख पसरलय त्याकडे बघ गं, दु:ख तर असतच ना? पण त्यामुळे तर आनंद लखलखून दिसतो ना, बघ "चहु दिस सब चमकत" जीवनातल्या काट्यांसाठी वाटच चालायची थांबवलीस तर "रतिया खिल गयो बगिया" कशी पहायला मिळाली असती सांग बरं!

अन मग अतिशय प्रेमाने डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, शांत हो बया, अगं असच असतं सारं आयुष्य! उद्गवे, राग, निराशा या सा-याला अगदी तांडव करून निपटलस ना? मग आता कशाला हताशा?

मान्य हे तांडव करताना थकली, दमली, हळवी झालीस. हे स्वाभाविकच ना? पण आता शांत हो, आयुष्याला भीड, जग, "आनंद मना .... "