पुस्तक म्हणे वाचकाला, तू काय वाचणार मला
मीच तर घडवित असतो, सारे आयुष्यभर तुला!
मला आठवतं तेव्हापासून मी दंगेखोर होते. खेळ, धावणं, पळापळी, पाडापाडी, दंगा, धुडगूस, अगदी सगळे हुडपण होते माझ्यात. कधी एका ठिकाणी बसून काही केलय हे आठवतच नाही.अगदी दहावी पर्यंत हाच हुडपणा अंगात होता. दहावीलाही लाडकी मोठी बहिण रागवायची म्हणून बसून काय चारदोन गणितं सोडवाची तेव्हढीच. स्वाभाविकच दहावीला फर्स्ट क्लास मिळाला तेव्हा आईनेच हुश्य केलेले, की चला दहावीतरी निभली. दहावीत शाळेत इतिहास शिकवायला कुलकर्णी मॅडम होत्या, त्याच पीटीलाही होत्या. खेळात मी वाघ होते. कब्बडीत तर चँपियन. खोखो, कब्बडी, लंगडी, सगळ्या टीममधे होते, स्वाभाविकच कुलकर्णी मॅडमची लाडकी होते. त्यांच्यामुळेच मला मग इतिहासही आवडायला लागला. अन दहावी नंतर काय करायचं ते ठरवणं सोपं गेलं.
माझं इंग्लिश शाळेपासून वाईट होतं, अभ्यासाचीही नावड, एकाजागी बसून वाचणं, अभ्यास करणं हे माझ्याबाबतीत अवघड होतं. म्हणून मग सोईचा असा मराठी माध्यमातला आर्ट्सचा मार्ग निवडला. फर्गसनमधे पाऊल टाकलं आणि माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
झालं असं की तिथे मराठीला एक टिचर होत्या, खुप हुषार पण अतिशय टोकेरी बोलणाऱ्या, दुसऱ्याच्या बोलण्यातील चुका शोधून सतत टोकणाऱ्या, उगाचच विद्यार्थ्यांमधले दोष टिपत बसणाऱ्या... फर्गसनमधे साहित्य सहकार म्हणून एक गृप होता. त्यात अतिशय छान उपक्रम चालत. खूप मोठ्यामोठ्या व्यक्तींनी सुरू केलेला हा गृप. आमच्या इतिहासाच्या सरांनी सांगितलं म्हणून साहित्य सहकारच्या मिटिंगला मी गेले. सगळ्यांची नावं विचारली गेली. माझं माहेरचे आडनाव चित्रे. ते सांगितल्या बरोबर या मराठीच्या टिचरनी खवचटपणे विचारले "दि पु चित्रें कोण तुझे? " तोवर माझं वाचन शून्य होतं, मला चित्र्यांचे नावही माहित नव्हते. मी आपली खाली मान घालून गप्पच राहिले. त्या जोरात हसल्या, मला खूपच कानकोंडं झालं. मिटिंग संपली, मी घरी येऊन आईला विचारलं, कोण ग दि पु चित्रे? आई चकित होऊन बघू लागली, आरती आणि लेखकाबद्दल काही विचारतेय? माझ्या आईचे आणि माझ्या मोठ्या बहिणीचे वाचन प्रचंड होते. मग बहिणीने थोडे सांगितले चित्रेंविषयी.
ह्या प्रसंगाचा मनावर दोन परिणाम झाले. एक म्हणजे आपलं वाचन फारच कमी आहे याची जाणीव झाली. आणि दुसरा, ते बदलायला हवं हेही जाणवलं. फर्गसन मधे असण्याचा एक फायदा होता, फर्गसनची लायब्ररी! फार सुंदर आणि मोठी लायब्ररी आहे फर्गसनची, विषय, पुस्तकं, संग्रह, प्रचंड श्रीमंती! शिवाय आमचा रिडिंग हॉल पण फार सुंदर होता.
आर्ट्स कॉलेज असल्याने वेळच वेळ असे, मधले ऑफ पिरियड्स, लेक्चर्स संपल्यानंतर भूक लागेपर्यंतचा वेळ असे. शिवाय तेव्हा लायब्ररीत ओपन अॅक्सेस होता. हव्या त्या विषयाच्या सेक्शनमधे जावे, हवा तो कॅटलॉग पहावा, कुठलेही पुस्तक उघडावे, चाळावे, आवडलं तर नावावर घेऊन रिडिंग हॉसलमधे किंवा घरी घेऊन येऊन वाचावे.
माझा पिंड आता तयार होत होता. या वयात जनरली वाचायची गोष्टी, कादंबऱ्यांची पुस्तकं समहौ नाही वाचली मी. पण ज्याला वैचारिक म्हणावी, अभ्यासाची म्हणावी अशी पुस्तकं वाचायला आवडत गेलं. मग इतिहास,राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र, भूगोल, गणित, मानसशास्त्र , अगदी मराठीत मिळाली म्हणून तत्वज्ञानकोश आमि विश्वकोशही पालथे घातले. काही समजलं, काही डोक्यावरून गेलं, काही लक्षात राहिलं- नाही राहिलं.... पण बुद्धीवर संस्कार होत होते अजाणत: !
याच काळात इतिहास, त्यातही एकोणिसाव्या शतकातीन महाराष्ट्रातील लेखकांचे लिखाण आवडत गेलं. टिळक, आगरकर, रानडे, जांभेकर, लोकहितवादी, फुलेही मंडळी ओळखीची होत गेली. आवडत गेली.
तो पर्यंत बीए चा टप्पा पार पडला. याच काळात फर्गसनमधे काही जुने दस्तावेज आले होते. ती जुनी कागदपत्रे, पोथ्या, पत्र ही देखील पाहता आली आणि एक वेगळेच आकर्षण निर्माण झाले.
हळूहळू माझी अभ्यासाप्रति बदललेली वृत्ती आईच्या लक्षात येत होती. बीए झाल्यावर एम ए करायची इच्छा बोलून दाखवल्यावर आईने पाठिंबा दिला. माझे बाबा थोडे जुन्या विचारांचे होते. ग्रॅज्युएशन झालं की लग्न करून देण्याच्या विचारांचे. माझ्या मोठ्या दोन बहिणींचीही लग्न अशी लगेच ठरली अन झाली. पण माझी अजून शिकण्याची इच्छा आईने लावून धरली. अन मग माझा एम ए चा मार्ग खुला झाला. अन इथेच माझ्या डोळस वाचनाला सुरुवात झाली.
एम ए ला मला माझे गुरु भेटले. डॉ अ म देशपांडे सर! प्रचंड प्रगल्भ, हुशार, सहृद्य, भावनाशील व्यक्तित्व! विद्यार्थीप्रिय आणि संशोधक वृत्तीचे! त्यांच्या लेक्चर्समधून अनेक लेखकांची नावे आम्हाला कळत गेली. आणि त्याच्या प्रोत्साहनाने डोळस वाचन सुरु झालं. पुणे विद्यापीठाची जयकर लायब्ररी म्हणे अलिबाबाचा खजिना होता. एम एची ती दोन वर्ष म्हणजे माझ्या आय्ष्यातली सर्वात सुंदर वर्ष. जयकरलाही तेव्हा आम्हाला ओपन अॅक्सेस होता. दिवसाचे 4-4, 5-5 तास मी तिथे असायची. वेगवेगळी पुस्तकं तिथे वाचली. एम ए ला आम्हाला टर्म पेपर नामक छोटे संशोधनपर लिखाण करावं लागे. देशपांडे सर आम्हाला हिस्ट्रि ऑफ वेस्टर्न फिलॉसॉफी शिकवत होते. त्यांनी पहिल्याच सेमिस्टरला मला सोशल कॉट्रॅक्ट हा विषय दिला, हॉब्ज, लॉक, रुसो यांच्या या संकल्पनेत कसा बदल होत गेला ते लिहायला सांगितलं. मी खूप पुस्तकं शोधली पण मला फार कमी माहिती मिळत होती. सरांशी बोलले तेव्हा त्यांनी इंग्लिश पुस्तकं सुचवली. आता आली का पंचाईत? माझं महान इंग्रजी! पण सरांना नाही म्हणणं शक्यच नव्हतं. मग शब्दाला शब्द लावत चार पुस्तकं वाचली, काही शब्द अडले ते बहिण, सर यांना विचारत पेपर लिहिला. सरांनी खूप कौतुक केलं त्या पेपरचं. अन मग अभ्यासापुरतं का होईना मी इंग्लिश पुस्तकं हाताळू लागले.
मग लोकहितवादींबरोबर एलफिन्स्टन बद्दलही वाचावं वाटू लागलं. मग ते थोडं असं थोडं फार इंग्रजीतून वाचलं.
पुढे इंटरनॅशनल रिलेशन्स असा एक पेपर होता, त्यासाठी इंग्रजी पुस्तकं वाचली गेली; काही अभ्यासाची काही अवांतर. त्यातली दोनतीन आवर्जून आठवतात, विलफ्रेड नॅप चे कोल्ड वॉर आणि वल्ड बिट्विन द टु वल्ड वॉर्स आणि जॉर्ज ऑरवुलचे अॅनिमल फार्म
पण भर होता तो प्रामुख्याने मराठीतल्या वैचारिक लिखाणाचाच. मग एकोणिसाव्या शतकातील लिखाण जास्त जाणीवपूर्वक वाचलं गेलं. मग याच काळावर रिसर्च करायचा असं ठरत गेलं.
एम फिल सुरु झालं तसं साहित्य आणि इतिहास यातली गोडी वाढत गेली.
एम फिल चालू असतानाच टिळक महाराष्ट्र विद्यापीठात लेक्चरर शीप मिळाली, आणि एक वेगळा अध्याय सुरू झाला.
टिमवि मधे इंटरडिसिप्लिनरी बीए सुरू होते. माझे आता पर्यंतचे विविध विषयांवरील वाचन आता उपयोगी होऊ लागले. इथेच माझी सख्खी मैत्रीण मला मिळाली, शोभना. तिलाही वाचनाची प्रचंड आवड! तसेच तिथल्या लायब्ररीतली यामिनी ही लायब्ररियन ही पण छान मैत्रीण झाली.
टिमविमधे बरेच वेगळे प्रयोग केले होते सिलॅबसमधे. त्यातील काही विषयांनी माझ्या वाचनाच्या कक्षा अजूनच मोकळ्या केल्या. साहित्यातून समाजदर्शन, विज्ञान आणि समाज, समाज, संज्ञापन कौशल्य, विशिष्ठ सामाजिक प्रश्नांचा अभ्यास या सारख्या विषयांनी, आणि ते शिकवावे लागणार असल्याने त्यांचे वाचन, अभ्यास अपरिहार्य होता.स्वाभाविकच वाचनही इंटरडिसिप्लिनरी झाले. शिवाय वेळोवेळी लिहावी लागणारी टेक्स्ट बुक्स, लेख यांसाठीही विविधांगी वाचन होत गेले.
माझ्या वाचनाला अजून नवीन कक्षा लाभली ती लेकाला शिकवताना. माझं सगळं शिक्षण मराठी माध्यमातून तर लेकाचं इंग्रजी माध्यमातून. त्याला नववी पर्यंत सगळं मीच शिकवत असे. स्वाभाविकच ते शिकवण्यासाठी आणि त्याला इंग्रजी वाचनाचीही गोडी लागावी यासाठी मी वाचत गेले. नंतर मात्र त्याचे इंग्रजी वाचन माझ्या कितीतरी पुढे गेले.
आणखीन एक वाचन ते म्हणजे संगणक, नेट आणि ब्लॉग साठीचे वाचन. सोशल नेटवर्किंग मी संपूर्णत: माझी मी शिकत गेले, अगदी ब्लॉग म्हणजे काय इथपासून तो कसा तयार करायचा, हे माझी मी शोधत गेले. आणि मी ई अक्षर शत्रू असल्याने फार अवघड होता तो प्रवास.
हे सगळं चालू असताना अर्थातच ललित साहित्याची आवडही निर्माण होत गेली. सुरुवात चांदोबा, जादुच्या गोष्टी, कुमार यांपासून झाली. घरी काही काळ रिडर्स डायजेस्ट आमि काही रशियन पुस्तकं येत. पण माझं लक्ष खेळाकडे जास्त असल्याने दोस्ती नव्हती पुस्तकांशी फार. मग कॉलेजमधे कवितांशी थोडी मैत्री झाली, केशवसुत, बालकवी, पाडगांवकर, इंदिरा संत, बहिणीबाई, सुधीर मोघे, मर्ढेकर, ग्रेस, अशी सगळी कवी मंडळी ओळखीची झाली. एम ए मधे गौरी देशपांडे, इरावती कर्वे, दुर्गा भागवत, अनंत मनोहर, नारायण धारप, द पां खांबेटे, फिरोज रानडे, नाथमाधव, शशी भागवत, व पु काळे, पु ल देशपांडे, शिवाजी सावंत, भा रा भागवत . मग पुढे जीए, सानिया, मेघना पेठे, अरुणा ढेरे, निर्मला देशपांडे, आशा बगे, कविता महाजन, धृव भट, हेमा लेले, मीना प्रभू, अनेक भाषांतरीत पुस्तके. नंतर शास्त्रिय संगीताची आवड निर्माण झाल्यावर त्यावरील आलापिनी, भातखंड्याचे काही खंड, कुमारांची वाशीची लेक्चर्स, कुमारांचे अनूपरागविलास, अशोक रानडेंचे संगीतसंगती अशी काही पुस्तकं वाचली.
बघायला गेलं तर माझं ललितपेक्षा वैचारिक वाचन जास्ती झालं. स्वाभाविकच माझी जडणघडण जास्त वैचारिक राहिली. विविध विषयांच्या वाचनाने कधी कधी एक ना धड ... अशी परिस्थितीपण होते. पण त्याच बरोबरीने कोणताही एकांगी दृष्टिकोन न राहता साकल्याने विचार करण्याचा फायदाही झाला.
या सगळ्या वाटचालीचा आनंद मिळवून दिला तो पुस्तकांनी आणि नेट वरील लिखाणाने. या सर्व पुस्तकांच्या आणि लेखकांच्या ऋणातच राहिन मी ___/\___