"राधे ... "अनुक्रमणिका

१. मनातले काही
२. सृजन
३. कच्चे रंग
४. संचित करुणेचे
५. शाम सखी
६. हे माझ्यास्तव...
७. राधे राधे जपून ठेव ग
८. गिरिधारी
९. रंगुनि रंगात साऱ्या...
१०. अद्वैत
११. गोकुळ सोडताना
१२. पूर्णपुरुष
१३. रिता
१४. मीरा
१५. रुका हुवासा है, आज जमाना एक

----
१. मनातले काही
राधे,

या राधेने  मला नेहमीच  भुरळ घातली आहे. नक्की कोण ही राधा?

तसं म्हणावं तर कृष्ण महाभारतातून उतरला. पण असे म्हणतात की महाभारतात राधेचा उल्लेखच नाही.

राधा, आठवते ती मथुरेतली, यमुनातीरी कृष्णाची वाट बघणारी, रास खेळणारी, सासूचा मार खाणारी, अनयची बायको म्हणून वावरणारी, यशोदेशी छान मैत्री असलेली.

राधा,  कधी कृष्णाच्या बरोबरीची, कधी कृष्णा पेक्षा कितीतरी मोठी असणारी,...

राधा, यमुने सारखी निळी सावली, कधी गोरीपान, कधी गडद-गुढ -खोल डोळ्यांची, कधी बासरीत स्वत:ला हरवलेली, कधी यमुनेच्या पाण्यात पाय सोडून माधवाची वाट पाहणारी, कधी कृष्ण आणि त्याच्या  गोपांवर रागावलेली, ....

राधा, किती रूपं, किती गोष्टी, किती कथा, किती रुपकं,...

आणि तरीही  ओंजळीतून पाणी खाली झिरपून जावन तशी निसटून गेलेली...

असाच तिचा विचार करताने मनात एक तरंग उठला,...

राधा खरी नसेलच तर? राधा म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून कृष्णाची विवेकनिष्ठा असेल तर? त्याचा  सारासार विचार, त्याची सहृदयता,  त्याचे निर्मळ मन म्हणजे तर राधा नव्हे ?

राधा ही मला कृष्णाची सारासार विवेकबुद्धी वाटते; राधा म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून कृष्णाचे अंतर्मनच आहे. भले- बुरे, नैतिकता- अनैतिकता, राजकारण- माणुसकी, ... या सा-यात एक तरल सीमा रेषा आखणारे त्याचे मन म्हणजे राधा. आणि म्हणून ही राधा त्याला त्याच्या सा-या आयुष्यभर भेटत राहतेय. खरी राधा गोकुळापुरती; पण ही त्याची मनसखी मात्र सतत त्याच्या सोबत, त्याला सजग ठेवणारी.अन मग मला हे फार भावलं. खर काय असेल ते असो, मला आता राधे मध्ये कृष्णाचे मन दिसू लागले.

आणि कृष्ण !

कृष्ण, नेहमी मनाला भुरळ घालणारे एक गारुड ! किती विविधांगी व्यक्तित्व ! आपण पाहू तसे दिसणारे, अन तरीही प्रत्येक वेळा काही नवे सांगणारे, सूचवणारे, शिकवणारे.

या व्यक्तित्वाच्या सोबत काही जुन्या, काही नव्या, काही काल्पनिक घटना जगून बघायचा हा प्रयत्न. या सर्व लिखाणाला पुरावे सापडतीलच असं नाही, किंबहुना माझ्या मनातले हे सारे खेळ... कधी काही वाचलेले, ऐकलेले. त्याला धरून मनात उठणारे हे तरंग. ते चितारण्याचा हा प्रयत्न फक्त !

त्यामुळे काहींना पटतील, भावतील, काहींना अवास्तव वाटतील. पण त्यात वास्तव शोधायचेच तर त्यातील भावना, तत्व यांत शोधा. अन्यथा कवी कल्पना म्हणुन सोडून द्या.
------
 २. सृजन

मला अजून आठवतो तो दिवस. नुकतेच कालिया मर्दन झाले होते. त्यामुळे मी खूष होतो. आम्ही सगळेच बालगोपाल; इतकेच नव्हे तर मैय्या, नंदबाबा आणि सगळेच गोकुळ आनंदात अन काळजीमुक्त होते.

त्या दिवशी सकाळीच सुदामा आणि ५-६ जण आले. आणि मैय्याला विचारू लागले,
" आम्ही जाऊ का यमुनातीरी, कान्हाला घेऊन ? " अन मैय्यानेही हसत हसत आम्हाला जाऊ दिले होते.

एकमेकांना ढुशा देत अन सुदाम्याची चेष्टा करत आम्ही सगळे यमुनातीरी आलो. आणि कदंबाच्या अंगाखांद्यावर विसावलो. सूर्य आता वर आलेला; पण कदंबाच्या पानांनी आमच्यावर छान सावली धरलेली. मी माझ्या लाडक्या फांदीवर बसलो.अन सुदाम्याने पाव्याला हात लावत प्रेमळ हट्ट केला, " वाजव की रे ..."

मी पावा काढला आणि ओठावर ठेऊन वाजवणार; इतक्यात दूरवर तू दिसलीस. तू अन अनय येत होतात. तू काहीतरी तावातावाने सांगत होतीस अन तो हात मागे बांधून, ताठ मानेने पुढे पुढे चालत होता. तू मागून त्याला एकदा थांबवण्याचा प्रयत्नही केलास...पण तो न थांबता तुलाच थोडी खेच बसली. तू पुन्हा त्याच्या मागे धावलीस... वा-यावर तुझी ओढणी फडफडली. जणुकाही अनय तुला पुढे ओढत होता अन वाहणारे वारे तुला मागे ढकलत होते. तुझी होणारी घालमेल, ओढाताण स्पष्ट दिसत होती अगदी !

आता तू अगदी समोर आलीस. ऐकू येत नव्हतं काही, पण स्पष्ट दिसत मात्र होतं. अनय तट्टकन उलटा फिरला. मागे बांधलेले हात आता सुटले. एका हाताने तुझा दंड धरत तुला त्याने ठामपणे थांबवले. आणि दुस-या हाताने काहीतरी समज दिल्यासारखी मुद्रा करत काहीबाही बोलला. अन दुस-या क्षणी तुला सोडून देत तो पुन्हा तट्ट्कन उलटा होऊन बाजाराच्या दिशेने ताड ताड निघून गेला.

तू तशीच उभी... काष्ठवत ! कोरड्या डोळ्यांनी पाठमो-या जाणा-या अनय कडे बघत.

अन मग कोणीतरी ढकलल्यासारखी तू तीरावर आलीस. अगदी माझ्यासमोर येऊन मटकन बसलीस. हातातली घागर कधी खाली ठेवलीस तुलाही कळलं नाही. अन गुढग्यांना पोटाशी धरत, भकास नजरेने वर बघितलस... माझ्या आरपार... !
अन कोमल ऋषभ लावत साद घातलीस... "अनय...."
तू आरपार बघत होतीस माझ्यात. अन मलाही जाणवलं, माझ्या आत आत एका कोप-यात अनय ताडताड चालत दूर जातच होता की !

तू अनयला साद घातलीस तोच कोमल ऋषभ माझ्या पाव्यातून वाहू लागला. अन माझ्याही न कळत मी पाव्यात फुंकर मारली. सारा आसमंत त्या कोमल ऋषभाने हेलावून गेला. अन कितीतरी वेळ तुझी वेदना माझ्या पाव्यातून ठणकत राहिली. सारे, सारे त्या वेदनेने हेलावले. हळुहळु एक एक जण पांगले.
आता तीरावर केवळ तू, मी अन कोमल ऋषभ नुरले. एक क्षणी माझी बोटं थरथरली अन अलगत षडजावर स्थिरावली.

अन मग तुझ्या काळ्याभोर डोहात कुठुन कुठुन जलद भरून आले. भरभरून ओथंबू लागले. ते पाहून माझी बोटं थरथरली अन पुन्हा ऋषभ निनादला. तशी त्या थेंबांनी किनारा सोडला. गंधार कसाबसा गाठला मी, पण तुझ्या धारांनी मात्र सगळाच ठावठिकाणा सोडला होता...
अन तुझ्या ओठी आलेच...." श्रीरंगा..." अगदी सा रै ग...

आता तुझ्या डोळ्यात ओळख आली. माझ्यातल्या अनयला विसरून माझ्यातल्या श्रीरंगाची ओळख तुला पटली. तशीच उठून माझ्यासमोर उभी राहिलीस.

" का रे, का छळतोस ?
किती उरापोटी आवरते मी.
अन तू असे वाहून घालवतोस?
आवरायला शीक रे, आवरायला शीक.
ठेवावे थोडे ओठात, पोटात अन उरातही ! "

... मला तू शिकवलेला, तो पहिला धडा होता.
पावा असा वाजवावा की सूर तर निघावा हवा तसा, पण वेदना आत - आत आवरून, सावरून रुजू द्यावी.
तरच ते सृजन !

"राधे... "
------
३. कच्चे रंग

आणि तो ही दिवस आठवतो...

थंडीचे दिवस होते; मध्यान झालेली. सगळे बाल गोपाल जेवून यमुनेतीरी उन खात पहुडलेले. सारीकडे छान हिरवेगार गालिचे पसरलेले. वृक्ष डेरेदार होऊन हिरवी छत्र चामरं ढाळत उभे होते. उन्हे डोक्यावर आली तरी हवेत एक दाट गारवा भरला होता. यमुनाही थोडी जडशीळ झालेली, सुस्तावलेली;अन सभोवती आम्ही सारे!

तेव्हढ्यात तू झळकलीस, हो हो झळकलीसच. उन्हात तुझा कोरा, नवीन राजवर्खी रंगाचा, पिवळ्या, लाल, हिरव्या रंगाच्या नक्षीचा, घागरा खरच झळकन लकाकला. घाग-यावरच्या छोट्या छोट्या बिंदल्या;तुझ्या पावलांच्या ताला;; उन्हात चकचकत होत्या .

डोक्यावरची गर्द निळ्या रंगाची ओढणी वा-यावर मंद गोलाकार घेत होती अन खाली तुझ्या डौलदार चालीतून तुझा घागरा तालात पुढे मागे होत होता. जणुकाही एखादा मोरच आकाशातल्या मेघांना पाहून आपला पिसारा फुलवत नाचत होता.

आम्ही सारे मंत्रमुग्ध होऊन तुझ्या येण्याकडे टक लावून पहात होतो.
अन तू ... तू कोणत्या तरी धुंदीत भराभर चालत येत होतीस.

अगदी जवळ आलीस तशी एका गोपीने तुला हटकले..
"राधे काय ग, ना सण ना काही कारण; आज नवीन घागरा? "
अन मग तू आधी दचकलीस अन मग लाजलीस.
"अग कालच अनयने आणला मथुरेच्या बाजारातून. "
" अग मग तसाच कोरा घातलास; आजच? "
" अग तोच मागे लागला ना" तुझ्या तोंडून अलगद शब्द सुटले. अन पुन्हा लाजलीस.
" अन मग, आता दुपारची यमुनेवर का आलीस ग? आज तर अनय घरीच आहे की "
" काय करू ? अनयचा हट्ट मी नवीन घागरा घालावा, अन सासूचा राग. कशाला पुरे पडू सांग ग.... मग सासूने रागाने पाठवले पाणी भरायला... यावच लागलं ग..."

तुझी घाई चालूच होती. माझ्याकडे नजरही न टाकता पटकन घागर भरलीस अन पाठमोरी होऊन चालू पडलीस.

माझा हात बासरी कडे जातच होता, तेव्हढ्यात सर्र्कन वळलीस, म्हणालीस " कृष्णा आज नको रे थांबवूस..."
अन पुन्हा वळून पुढे झालीस.

तुझ्या गर्द निळ्या ओढणीत पुन्हा वारा भरू लागला. अन मला कुठून तरी हुक्की आली; हातात कधी गलोल आली अन सण्णकन दगड तुझ्या घागरीवर आपटला.... ढप्प ...

अन क्षणात कोरा करकरीत सुरेख रंगीत घागरा चिंब चिंब झाला, सारे कच्चे रंग एकमेकात मिसळून गढूळ झाले.
सारे गोप हसू लागले. तसा तर नेहमीचा आमचा हा खेळ. तुलाही ओळखीचा झालेला. पण आज वेळ वेगळी होती.
तू हलकेच वळलीस. तुझा घागराच नव्हे तर तुझे डोळेही गढुळले होते. ओढणीतले सारे काळे-निळे मेघ डोळ्यात जमा झाले होते.
एका क्षणात तू पुन्हा उलटी वळलीस अन ओला, जड घागरा कसाबसा सावरत पळत सुटलीस. त्या कच्च्या रंगांना खारट पाण्यात घालून; त्यांचा रंग टिकवण्याची तुझी धडपड होती. पण आता उशीरच झाला होता.

कधी नव्हे ते माझ्याही मनात काही डचमळले. काय ते नाही कळले, पण काही तरी हलले होते खासच.
अन मग ती संध्याकाळ अशीच पारोशी-पारोशी होत गेली.
रात्रही गार, शांत असूनही नेहमी सारखी कुशीत घेत निजवली नाही.

मग दुसरा दिवस उजाडला, आळसावलेला, कसलीही उभारी नसलेला. तुझ्या ओढीने यमुने तीरी आलो खरा पण ना तू आलीस, ना यमुना माझ्याशी बोलली, अन बासरी.. ती ही बिचारी मुकीच राहिली.
असेच अजून दोन दिवस गेले.
थंडीतलेही खूssssप मोठ्ठे दिवस...

अन मग तू भेट्लीस. संध्याकाळ होत आलेली. गारठा हाडांपर्यंत पोहचत होता. मी गाईंना घेऊन मी माघारी येत होतो. अन यमुनेच्या काठावर एका खडकावर तू बसलेलीस.
मी जवळ येताच तट्टकन उठलीस, सामोरी झालीस.
माझ्या डोळ्यात डोळे रोखून पहात विचारलस,
"कधी मोठा होणार तू लल्ला?..."
माझ्या गालावर ओघळणारे थेंब पुसत म्हणालीस,
" असा का रे वागतोस ? "
अन माझं लक्ष तुझ्या हाताकडे गेलं... काळे निळे झालेले ते हात, मी दचकून वर पाहिलं. तुझ्या फिक्या ओढणीतून तुझ्या गालावरचे, पाठीवरचे वळ... मी कळवळलो.
"राधे, माझ्यामुळे मार बसला ना तुला? "
मटकन मी तुझ्या पायाशी बसलो. तू पण मागच्या खडकावर टेकलीस. माझे मस्तक मांडीवर घेत थोपटत म्हणालीस;

" अरे कच्चे रंग, ते नाजूकच असतात रे. म्हणून तर त्यांना खा-यापाण्याने न्हाहू घालायचे. तरच पक्के होतात ते. तसेच सोडले वाहत्या पाण्यात, तर वाटेल तसे रंगतील अन शेवटी गढुळतीलच की ..."
अन मग माझ्या माथ्यावर खा-या पाण्याचा अभिषेक करत राहिलीस तू ... कितीतरी वेळ...

"राधे ..."
----
४. संचित करुणेचे

आणि तो ही दिवस आठवतो

मध्यान्हीचे उन अलवार होत होते; सारीकडे अलगद गारवा पसरू लागला होता. आम्ही सारे गोप कालिंदी तटी खेळायला निघालो. पेंद्या नेहमीप्रमाणे मागून हळू हळू एका पायावर लंगडत येत होता. आम्ही पऴत पळत किना-यावर आलो. वाळू आता छान नरम-गरम अन ओलसर होती. कोणी त्यात घरं बांधू लागले, कोणी विहीर खणू लागला. कोणी पारंब्यांवर लटकला तर कोणी नदीत डुंबू लागला.

मी वळून पाहिले, पेंद्या अजून येतच होता. लांबून पाहताना तो खूप मजेशीर दिसत होता. एका छोटया पायावर हलकेच झोका देऊन लगेच मोठ्या पायावर येत - हेलकावे घेत तो येत होता. त्याच्या मागे सूर्य अस्ताला चालला होता, त्यामुळे पेंद्या; छोटया पायावर आला की सूर्य दिसे, हेलकावा घेऊन मोठ्या पायावर गेला; की सूर्य दिसेनासा होई.
एवढासा, लुकडा पेंद्या सुर्याला झाकत होता. मला माझ्याच कल्पनेचे हसू आले.

माझे खिदळणे पाहून सारी माझ्या भोवती जमा झाली. मी बोट दाखवून ती गंमत सगळ्यांना दाखवली. झाले, सारी "ए मला बघू मला बघू" करून ढकला ढकली करू लागली. एक नवीनच खेळ मिळला गोपांना...

अन इतक्यात मागून तू आलीस. आधी तुलाही कळेना काय चाललेय. सारी ओरडत होती,
"पेंद्या-सूर्य, पेंद्या-सूर्य..." " झाकला , दिसला..." "झाकला, दिसला.."
पेंद्या बिचारा लाजून चूर झालेला. कसातरी भरभर यायचा प्रयत्न करत होता तो; तर ही जमाडी गंमतही भरभर होत होती. सारे गोप खिदळत होते.

अन मग तुला समजलं... अगदी सारं समजलं.
रागा रागाने तू पुढे झालीस. एकेकाला बखोट धरून बाजुला केलस. रागे भरू लागलीस...
" बिचारा पेंद्या, एक जण हात द्यायला पुढे येत नाही, वर दात काढतात. मित्र अहात की वैरी रे "

तेव्हढ्याने तुझे समाधान होईना. सगळ्या गोपींना हाका मारत पुढे आलीस. माझ्या समोर उभी राहिलीस. मला तर अजूनच हसू आवरेना. मग तू अजूनच चिडलीस. कमरेची ओढणी तावातावाने सोडवलीस, वाकून शेजारची एक काठी घेतलीस. अन खस्सकन माझा हात ओढलास. मी धप्पकन खाली बसलो. तशी माझ्या, गुढगा वाकलेल्या पायाला आपल्या ओढणीने काठी बांधलीस. माझा एक पाय पेंद्यासारखाच लहान केलास.
"बांधा ग सगळ्यांचे असेच पाय. कळू दे पेंद्याला होणारा त्रास , यांनाही! " तू रागानेच सा-या गोपींना हाक दिलीस.

अन क्षणात कालिंदी तटी पेंद्यांची फौज उभी... उभी कसली लंगडी झाली.

"आता रात्री घरी जाई पर्यंत सोडली काठी, तर गाठ माझ्याशी आहे, सांगून ठेवतेय. " रागाने तू नुसती फणफणलेलीस.
आमच्याकडे पाठ फिरवून तू पाणी भरायला तटावर गेलीस. सा-या गोपीही तुझ्या पाठोपाठ गेल्या.

आम्ही सारे किंकर्तव्यं अवस्थेत द्रिढमुढ झालो. हा काही विचार आमच्या मनातच नव्हता. आम्ही आपले नेहमीसारखे पेंद्याची गंमत करत होतो.
दोन पाच मिनिटांनी त्या धक्यातून वर आलो अन मी उभे राहण्याचा प्रयत्न करू लागलो. पण कसचे काय? साधे उभे राहणेही जमेना. सा-यांची हीच कथा. कसे बसे झाडाला धरत, एकमेकांना टेकू देत आम्ही उठलो. आता पेंद्याही नजरेच्या टप्प्यात आला. आता तर मला पुन्हा हसू यायला लागले. पेंद्यापेक्षा आमची अवस्था वाईट होती. मी हसू लागलो तशी बाकीचेपण सारे हसू लागले. झालं. पुन्हा सगळे एक एक करत धपाधप पडले. कोणी मातीत, कोणी दुस-याच्या अंगावर, कोणी तिस-याच्या, हीsss धम्माल नुसती.

कोणी उभा रहायला लागला की शेजारच्याच्या काठीत त्याची काठी अडके. एखादा उभा राही तर त्याचा धक्का लागून उभा राहिलेला दुसरा पडे.
सारे खिदळत होते, पडत होते, मार लागत होता. पण कोणालाच काही वाटत नव्हते. एक नवीन खेळत जणु मिळाला सा-यांना. सगळे ओरडत होते, "पेंद्या, पेंद्या, सारे सारे पेंद्या "
नुसता गदारोळ चालू होता. मागे चाहूल लागली म्हणून वळून पाहिले तर पेंद्या माझ्या समोर उभा. डोळ्यातून घळघळ अश्रू वाहात होते.

"माधवा, माधवा..." म्हणत माझ्या पायाशी तो वाकला. सर्रकन बांधलेली ओढणी त्याने सोडवली, काठी दूर भिरकावून दिली. अन दुस-या गोपाकडे धावला, त्याला मोकळं केलं तशी तिस-याकडे... सगळ्यांना धावून धावून मोकळं केलं त्याने. अन दुसरीकडे डोळ्यांतून अभिषेक चालूच...
"अरे राधा ओरडेल, असे नको करूस... राधे, ए राधे . हे बघ. आम्ही नाही सोडलं. हाच बघ सोडतोय...."
अन मग तू गर्रकन वळलीस... धावत पेंद्याजवळ गेलीस.
"का रे, का सोडवलस? तुझी चेष्टा करतात म्हणून शिक्षा केली ना मी"

" राधे.... राधे...
तुला कळत नाही गं...
अग या पांगळेपणाचे दु:ख तुला कळतच नाही राधे....
नको ग, मी सोसतोय तेव्हढं, अगदी तेव्हढच पुरे गं...
अजून कोण्णा कोण्णाला नको हे दु:ख...
राधे..."
पेंद्या रडतच कसं बसं बोलला, अन पाठ वळवून दूर दूर निघून गेली...
त्या दिवशी केवळ तूच नाही, तर पेंद्यानेही जीवन बदलून टाकलं माझं... करुणेचे संचित सतत पाझरत राहिलं तेव्हापासून...

"राधे... "
------
५. शाम सखी

उभी कधीची यमुनातीरी
मध्यान सरली, उन्हे उतरली
शाम वेळ अन शाम न सोबती
धीर न उरला मनी जराही
हूरहूर, काहूर मनी दाटली
अंधारुनि आली सृष्टी सारी
शाम सखी मी, शाम सखी

दाट धुक्याने वाट अंधुकली
शीरशिरी उठली यमुने वरती
सोबत तिच्या मी आसुसलेली
पाठराखणीस कदंब सावली
पु-या मिसळलो आम्ही तिघी
एकच तू, नयनी - हृदयीही
शाम सखी मी, शाम सखी

अवनी सारी गंधीत झाली
त्यात मिसळली धुंद पावरी
घेऊन तुझिया चाहूल आली
अंतर्बाह्य पुलकित झाली
राहिले न मी, मी माझी
तूच तू, झाले मी सारी
शाममय मी, शाम सखी
------
६. हे माझ्यास्तव...
(खरं तर मलाही पूर्ण माहिती नाही कुब्जेची कथा. काही लहानपणी एेकलेल्या गोष्टी, मोठेपणी वाचलेल्या काही छोट्या गोष्टी आणि हो तुम्हा सर्वांना आठवलेली इंदिराबाईंची कविता.

पूर्वाश्रमीची शूर्पणका, त्या जन्मातील संचित घेऊन कुब्जा जन्मली ती तीन ठिकाणी वाकडेपणा घेऊन. पाठीला कुबड असणारी परंतु सुंदर चेहरा असलेली ही कुब्जा चंदनाच्या मोळ्या विकणारी मथुरेतील, कंसाची एक दासी. तीने दिलेल्या चंदनाने आणि तिच्या भक्तीने भारावून कृष्णाने तिचे व्यंग दूर केले. अशी काहीशी ही कथा. चूक भूल दयावी घ्यावी.

मला यात भावले ते अगदी जगाने दुर्लक्षिलेल्या व्यक्तीलाही कृष्णाने आपले मानले. कोणत्याही बाह्य रुपापेक्षा मनाचे सौंदर्य त्याने महत्वाचे मानले. ते मांडण्याचा हा प्रयत्न)


आणि तो ही दिवस, छे तो ब्राह्ममूहूर्त आठवतो मला
तू म्हणाली होतीस, "तुझी बासरी दिवसभर माझ्या आसपास वाजत असते."
अन मग थबकून म्हणालीस, "पण सगळे कुठे दिवसाला सामोरे जाऊ शकतात रे ?"
अन उदास होऊन यमुनेच्या पाण्यात पाय हलवत बसून राहिलीस किती तरी वेळ.

अन मग दिवस कलला, रात्र यमुनेच्या पाण्यासारखी गडद होत गेली. तू तिथेच बसून राहिलीस. मग मी कसा हलणार होतो? सारीकडे शांत शांत होत गेले. आता मी ही पावा बाजूला ठेवला
गोपाळांचे पायारव लांब जात गेले, गायीच्या गळ्यातील घुंगरू नाजूक होत गेले. आता तर गोठ्यात, पार शांतावले ते नाद. मग घर घरातील बाल बोलही थांबले. अन प्रेमळ अंगाई हळुवार झाल्या. हळूहळु माईचे थोपटणेही थांबले.

सारीकडे अलवार शांतता नांदू लागली, एक फक्त यमुनेच्या लाटांचे चुबकावणे, सा-या आसमंतात भरून राहिलेले.
अन तू, त्यात संथ नजरेने दूरवर काही पहात तशीच बसलेली.
अन मी तुला.
कसली, कोणाची वाट पहात होतीस तू ?
असेच अजून काही प्रहर गेले. यमुना, तू, मी अन शांत-क्लांत आसमंत.

आता तर चंद्रही मावळला. चांदण्याची धूसर दुलई पांघरून यमुनाही पहुडली.
तू हळुच पाय काढून घेतलेस. तुझे, माझे अस्तित्वही जाणवू नये अशी खबरदारी घेऊन तू माझ्या सोबत कदंबाला टेकलीस. हळूच पावा माझ्या हातात अलगद टेकवलास. अन नजर उचलून यमुनेच्या खालच्या तीरावर नजर नेलीस.

एक वाकलेली काळी सावली यमुनेला हलकेच स्पर्श करत होती. अगदी यमुनेलाही कळेल, न कळेल इतका अस्पर्श स्पर्श... जगाला, कोणालाही आपले अस्तित्व कळुच नये; यासाठी जीवाचे रान करत; एक एक पाऊल सावकाश टाकत ती पुढे झाली.
अन मला कळलं
मला कळलं, तू कोणाची वाट बघत होतीस.
दिवसाला सामोरी जाऊच न शकणारी ती कुब्जा, रातीच्या अंधारात आपले आन्हिक उरकत होती. तिचा आयुष्यभरचा हा नमस्कार मला आज पोहचत होता. आज तिच्यासाठी; केवळ तिच्यासाठी मी पावा उचलला.
केवळ मला, तुला अन तिला ऐकू येतील असे सूर मी छेडू लागलो. अन चांदण्यात तिची थरथरणारी काया सा-या यमुनेला हेलावून गेली.

तू हळूच पुढे झालीस अन तिला आधार देत बाहेर आणलस.
कुब्जेच्या तोंडी केवळ दोनच शब्द " हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव..."
तिचा नव्हे, माझाच जन्म सफल झाला....
राधे, राधे, केवळ तुझ्यामुळे!

"राधे... "
------
७. राधे राधे जपून ठेव ग
राधे राधे, जपून ठेव ग, 
मधुसुदनाची प्रेम कहाणी

पळ पळ राहु दे ऱ्हदयी, 

गाभाऱ्यात आरसपानी,
तसेच राहो शाम प्रेम हे; 

अस्पर्श, अशब्द, अविनाशी
राधे राधे, जपून ठेव ग, 

मधुसुदनाची प्रेम कहाणी

गुपीत मनातच राहू देई, 

बोलू नको शब्द काही
न कोणा ओळखू येई, 

न एेकू येई, न समजेल काही
राधे राधे, जपून ठेव ग 

मधुसुदनाची प्रेम कहाणी

विरह शाम सख्याचा देईल, 

दु:ख  तुजला गे राणी
त्या त्या वेळी बघ आभाळी, 

गडदमेघ तो निरखत राही
राधे राधे, जपून ठेव ग, 

मधुसुदनाची प्रेम कहाणी

उकिडवे रांधता काही; 

डोळा येता खळ्ळकन पाणी
ढकल सखे ग ओले लाकूड; 

धूर तयाचा सारे लपवी
राधे राधे, जपून ठेव ग, 

मधुसुदनाची प्रेम कहाणी

शाम रंगी रंगून जाता, 

जपून ठेव तुझे ते वसन रेशमी
भवचक्राच्यातून फिरताफिरता; 

वसनाची का चिंता करिशी
राधे राधे, जपून ठेव ग, 

मधुसुदनाची प्रेम कहाणी
------
८. गिरिधारी

"आणि तो ही दिवस आठवतो का गिरिधारी ?"
तू गिरिधारी म्हणालीस....
अन मला लख्खकन आठवला तो दिवस

धुम पाऊस पडत होता. कितीतरी दिवस आकाश कोसळतच राहिलेले. सारी सुष्टी नुसती चिंब भिजत, काकडलेली. गाई गुरं गोठ्यातच थरथरत होती. मुलं भिजून भिजून कंटाळली होती. गवळणी दुधाच्या कळशा घेउन कशाबशी मथुरेला जात होत्या. गोपी सारे घरात बसून बसून कंटाळून गेले होते.
आता तर माझी बासरीही मऊ पडली, सूर हवे तसे येईचनात. अन तूही भेटली नव्हतीस कितीतरी दिवस, कशी बरं सुरेल वाजावी ती तरी...

बघावं तिथे फक्त पाणी पाणीच दिसत होतं, सगळीकडून पाण्याचे ओहळ वाहात होते. यमुनातर तुडुंब वाहत होती. पावसाच्या माऱ्याने तिचे पाणी अजूनच काळे दिसू लागले होते.
सारे गोकुळ त्रस्त त्रस्त झाले होते. "आकाशीचा बाप्पा असा का रागावलाय" असा सूर सगळे काढत होते. माईपण अगदी त्रासली होती. ना बाहेर जाता येत होतं, ना घरातली काही कामं काढता येत होती...
नंदबाबाला तर साऱ्या गोकुळाची चिंता पडलेली. हा असाच पाऊस पडत राहिला तर शेतात उभं राहिलेलं कोवळं पीक पार वाकून जाईल, मातीत मिळेल या भीतीने, साऱ्या गोकुळवासियांच्या काळजीने त्यांची झोपच उडालेली.

अन तो दिवस उजाडला. पहाटे पासून पाऊस थोडा मंदावला, उत्तरेकडचे आकाश खरं तर अगदी काळेकुट्ट झालेले, जणुकाही सारे सारे ढग उतरेत एकवटलेले. पण गोकुळावर मात्र एक उन्हाची तिरिप उमटली. सगळे गोकुळवासी आपापल्या घरांमधून बाहेर पडले, गोप आपल्या गाईंना थोडे उन दाखवायला बाहेर पडले, काही आपल्या शेतीकडे पहायला गेले. गोपी आज जरा उघडिप आहे तर पटकन मथुरेला जाऊ म्हणून लगबग बाहेर पडल्या. मग आम्ही सगळी पण यमुनेतीरी आलो. तू ही मैत्रिणींसह यमुनेचे तुडुंब रुप पहायला धावलीस.
सगळे उन्हात जरा बसलो, "किती हा पाऊस" अशा गप्पा केल्या. तोच तू यमुनेकडे बोट दाखवलस, म्हणालीस " कान्हा रे, अरे काही वेगळच घडतय बघ..."
यमुनेच्या पाण्याला प्रचंड वेग आलेला, नेहमीची संथ, शांत यमुना हळुहळू रौद्र रुप धारण करू लागली. तिच्या काळ्या पाण्याच्या लाटा जणू सगळे भक्ष करण्याच्या तयारीत मोठ्ठा आ वासू लागल्या. सगळे गोप, गोपी गावाकडे धाऊ लागले.  यमुना आता तीर सोडू लागलेली.
तू पुन्हा लक्ष वेधलस, म्हणालीस, " कान्हा, काही तरी कर रे, ते बघ वरच्या अंगाला नदी कशी दिसतेय..."
मी मान वर उचलून बघितलं, खरच यमुना यमुना राहिलीच नव्हती, आभाळातले सारे जलद आपल्या कुशीत घेऊन धावत सुटलेली ती यमुना आता नदी नव्हेतर जलकुंभ झालेली. काही तरी करायला हवं.
मी मान वळवून गोकुळाकडे बघितलं, या नदाचे पाणी गोकुळात शिरायला फार वेळ लागणार नव्हता. तू हात धरून दुसरीकडे दाखवलास, गोवर्धन पर्वत. हो आता गोवर्धनच आपल्या साऱ्यांना वाचवणार होता.

मी साऱ्या गोपांना आवाज दिला, " सुदामा, मुकुंदा, पेंद्या, अरे तिकडे नाही, इकडे गोवर्धनकडे चला... राधा , तू या सगळ्यांना ने तिकडे"
अन मी पळत गोकुळात आलो, सगळ्यांना गोवर्धन कडे चला सांगत पळत राहिलो. दिसेल त्या बांधलेल्या गाईला सोडवत गेलो, लोकांबरोबर त्या अन त्यांची वासरं गोवर्धन कडे  जाऊ लागली. यमुना आता आपला काठ सोडत होती. आम्ही सगळे गोवर्धन पाशी पोहचतो न पोहचतो तोवर आभाळ अंधारून आलं. इतकावेळ दर्शन देणाऱ्या सुर्यदेवांना काळ्या ढगांनी ग्रासून टाकलं. अन कडकड कडकड करत एक विज चमकली अन पुन्हा मुसळधार पाऊस पडू लागला. आपण सगळे गोवर्धन पर्वत चढू लागलो. अन मला आठवण झाली. मागे एकदा खेळता खेळता मला इथली एक मोठी गुहा सापडलेली.
" चला, सगळे माझ्यासोबत चला, इथे एक मोठी गुहा आहे, तिथे आसरा घेऊत. "
आणि मग तो पूर्ण दिवस सारे गोकुळ त्या गुहेत विसावले. मनामधे भिती होती सगळ्यांच्याच. धाकधूक होती, काळजी होती... आता काय होईल??? गाईगुरं कावरीबावरी झालेली. लहानमुलं आपापल्या आईला गच्च धरून बसलेली.

तू हळूच पुढे झालीस, माझ्या हातात बासरी दिलीस.
“ आत्ता?"
" हो, सगळ्यांना एक दिलासा हवाय, एक विश्वास हवाय. तो फक्त तू, तुझी बासरीच देऊ शकतो. वाजव. विसरतील सारी सगळे. वाजव"
अन मग मी बासरी ओठांना लावली....

पळ गेले, जात राहिले....

संध्याकाळ होत आली, आभाळातले जलद बरसून बरसून थकले. हळूहळू विरळ होत गेले. अन पुन्हा एकदा सुर्यनारायणाने पश्चिमेला दर्शन दिले. खाली बघितलं, यमुनाही हळूहळू आपल्या मर्यादेत वाहू लागली होती. सारे गोकुळ तिने उलथेपालथे करून टाकले होते. पण आता ती परतली होती. तिचा ओघही मंदावला होता.

ती रात्र आपण सगळ्यांनी तिथेच काढली. अन सकाळी खाली उतरून गोकुळ पुन्हा आपलसं केलं सगळ्यांनी.
किती तरी दिवस लागले सारे सुरळीत व्हायला. पण झाले. हळूहळू ती आठवण साऱ्याच्या मनातून पुसून गेली.
पण राधे तू लक्षात ठेवलीस न? अजूनही?

राधे....                    
------

९. रंगुनि रंगात साऱ्या...


अन तोही दिवस आठवतो सखे,...

रंगपंचमीचा दिवस होता तो. सकाळीच माईने मला ओवाळले, तिलक लावला, नंदबाबांनी गुलाल लावला गालाला आणि रंगीत करून टाकला सारा दिवस. त्यांचे आशीर्वाद घेऊन बाहेर पडलो अन सगळ्या गोपांनी घेरून टाकलं. नुसती धमाल सुरू झाली.

सगळे एकमेकांना रंगवत यमुनेतीरी आलो. तर तू अन तुझ्या सख्याही तिथे आलेलात, नेहमी प्रमाणे पाणी भरायला. पण आज तुम्हाला घाई नव्हती. तू पुढे झालीस, मला हळूच गुलाल लाऊन उलटी वळलीस. पण मी असा सोडणार नव्हतोच तुला. मीही गुलाल उधळला. सगळेच गोपही रंग उडवू लागले. लाल, निळा, गुलाबी, केशरी सारे रंग एकमेकांत रंगू लागले.

किती वेळ गेला, कोणालाच भान राहिले नव्हते. डोक्यावर उन मी म्हणू लागले. तसे एक एक गोप जण यमुनेत उतरले, आता तर यमुनाही रंगली. मीपण यमुनेचे ते रंग अंगावर घ्यायला पाण्यात उतरलो. पण आता सगळेच रंग एकमेकांत मिसळले. इतका वेळ आपापले वेगळेपण ते कोरडे रंग मिरवत होते, पण यमुनेच्या पाण्याने साऱ्यांना एकत्र केलं. साऱ्यांना सामावून घेता घेता रंगच राहिला नाही, काळा, मातकट बेरंग सगळ्यांवर चढला.

सगळे चोळून चोळून तो रंग काढू लागले. तेव्हढ्यात तू हाक दिलीस.
"कान्हा, कान्हा. तसाच ये बाहेर.... नाही नको काढूस तो रंग. तोच तुझा खरा रंग रे"
मी तसाच बाहेर आलो अन नजरेनेच विचारले, म्हणजे काय ग?
अन तू म्हणालीस,

" सारे सारे रंग तू लाऊन घेतोस. आम्हालाही लावतोस. अगदी अगदी रंगवून टाकतोस साऱ्या रंगात तू आम्हाला. अन तू, तू मात्र आता दिसतोयस तसाच आहेस. निरंग... सगळे रंग लेऊनही, त्या परे जाणारा, निरंग. बघितलं तर दिसताहेत अगदी सगळे रंग पण एकच एक नाव द्यावं असा नाहीच एकही वेगळा. आहेत तुझ्यात अगदी सारे सारे अंश, पण स्वतंत्र करून दाखवावा असा एकच एक नाही. सारे सामाऊन, सारे दाखवून, सारे लेऊन; सारे एकत्र करून निरंग असा तू.... हाच तू खरा. म्हणून तर तू सावळा, निळा... सारे सामावूनही निरंग... कृष्णा..."

त्या क्षणी, माझ्यातल्या मलाच निरंग करून दाखवलस राधे तू ! मी मी न राहिलो, माझ्यातलेही मीपण संपवलेस राधे...

राधे...
----
१०. अद्वैत

यमुना तीरी राधा कधीची, वाट पाही श्रीरंगाची
मिटलेल्या तिच्या लोचनी, मूर्ती चित्तचोरट्याची |

कोण जाणे कसे झाले, एक अवचित घडून गेले
मोरपीस डोईवरले, पुर्‍या शरीरी तिच्या फिरले |

माधवाचे रुप गोजिरे, रेखियले तिच्या मुखी
नाग लाघवी वेणूचे, उतरले तिच्या वेणी
चैतन्य परमात्याचे , सामावले तिच्या पदरी
सावळ्याची निळाई, उतरली तिच्या देही
काया मोहरूनी तिची, झाली अंतर्बाह्य हरीची |

आला आला श्रीरंग, हरपूनी होई स्तब्ध
पाहूनी राधेतलं, स्वतःचेच प्रतिबिंब
हरी चकीत बेभान, पाहुनी द्वैतातले अद्वैत |
------
११. गोकुळ सोडताना

आणि आठवतो तो ही दिवस राधे, गोकुळ सोडतानाचा....

मी निघालो होतो मथुरेला जाण्यासाठी. तुम्ही सगळे यमुनातिरी आलेलात, निरोप द्यायला. मथुरेला जाणं भागच होतं. कंसाचे अत्याचार आता थांबवणं गरजेचेच होते. वसुदेवबाबा अन देवकीमातेला सोडवायचे होते साऱ्यातून.

मी,नंदबाबा, यशोदामाई, पेंद्या, सारे गोप, तू, साऱ्या गोपी आपण सगळे यमुनातिरी पोचलो. मग मात्र मी सगळ्यांना थांबवलं. मला माहिती होतं, आता आपली भेट होणार नाही. पण तुम्ही सगळे याकडे फक्त काही काळाचा विरह म्हणून पहात होतात.
नंदबाबांच्या पायाशी मी वाकलो, त्यांनी धड वाकूही दिलं नाही अन आपल्या छातीशी धरलं. "बाबा मी मथुरेला जातो. आता गोवर्धन पाठीशी आहे, नाही येणार काही इथे संकट"
"कान्हा हो रे, नको इथली काळजी घेऊस. तू इतके छान बस्तान लावून दिलं आहेस, कसलीच काळजी नाही बघ इथली. तू तुझी काळजी घे. कंसाशी नीट बोल, तुझे गोड आर्जवी बोलणे तो नाहीच नाकारू शकणार. अन वसुदेव, देवकी त्यांना आमचा नमस्कार सांग. त्यांची ठेव आम्ही नीट जपली ना हे सांग बाबा."

" बाबा, असं नका म्हणूत, मी तुमचाच. हा कान्हा इथेच ठेऊन जातोय. मथुरेला जातोय तो श्रीकृष्ण बाबा"
"जा बेटा, जा. मोठा हो, आभाळा एव्हढा मोठा हो.." आणि नंदबाबा डोळे पुसत निग्रहाने दूर झाले.
"अन मग मोठा अवघड क्षण तुझ्यासमोर उभा राहिला ना कान्हा? यशोदामाईला निरोप देणं, हे तुझ्या आयुष्यातला अनेक अवघड क्षणांपैकी एक असेल ना रे?"

" खरं सांगू राधे, मलाही तसच वाटत होतं. पण माई फार फार वेगळी अन खूप ताकदीची बाई. ज्या क्षणी मी तिचा नाही हे तिला कळलं, त्या क्षणी तिने मला तिच्या प्रेमाच्या बंधनातून मुक्त केलं, अगदी मनापासून, आनंदाने, अन एका तृप्ततेनेही.
मी वाकलो पायाशी तर म्हणाली, "कान्हा खाली बस रे जरा, लहान होतास तेव्हा कसा माझ्या कमरेपर्यंतच यायचास..."
मी गुढग्यावर बसलो तशी पटकन ओढून धरलं तिने मला पोटाशी. मग मी ही लहानपणी घालायचो तसा विळखा घातला तिला. तो एक क्षण.... तो एक क्षण .... अनेक युगं जगलो आम्ही दोघंही...

अन मग दुसऱ्या क्षणी नाळ कापावी, आपल्या मुलाला स्वता:चा श्वास घेता यावा म्हणून नाळ कापावी तशी, अत्यंत निग्रहाने माईने स्वताला खटकन दूर केलं. म्हणाली,
" कान्हा, जा तू. देवकी कधीची डोळे लावून बसलीय. सारी मथुरा तुला बोलावतेय. त्या कंसाचे अपराध आता अगदी नाही सहन होत आहेत, जा, जा, कान्हा. अन माझी काळजी नको करूस, माझ्याकडे तुझ्या इतक्या आठवणी आहेत, तुझी सारी बाळलेणी, दुपटी, झबली आहेत. प्रत्येक रांजण, गोकुळातली प्रत्येक जागा तुझ्याशी इतकी बांधलेली आहे, की मला तू नाहीस याचं दु:ख करायलाही वेळ होणार नाही बघ. त्या सगळ्या आठवणी सारे आयुष्य जपून ठेवेन बाळा. जा, शुभास्ते पंथानाम्..."

"कान्हा...., अगदी खरं रे. ही यशोदामाई, खूप वेगळी, खूप मोठी, कोणालाच नाही कळली बघ. आईपण कसं असावं याचे दुसरे कोणते उदाहरण असेल सांग. आईपणाचे लाड, कौतुक, थोरवी, मुला बद्दलचा लळा प्रत्येकीलाच असतो. पण मुलाच्या मोठे होण्यासाठी आपलाच असणारा अडसर असा दूर करणारी आई विरळाच बघ कान्हा. लहानपणी तुला शिस्त लागावी म्हणून,,तुझ्या खोड्यांनी गोपगोपींना त्रास होऊ नये म्हणून हीच माय बांधून घालायची तुला. मग तू किती कांगावा करायचास, किती मखलाशी करायचास, माझ्याकडे तक्रार करायचास. अन मी समजावलं की कधी मानायचास, कधी रुसून बसायचास. हे सगळे लाड, शिस्त लावणं कित्ती मनापासून, आसूसुन केलं तिने. अगदी सगळ्या आया करतात तसच. पण हे स्वता:हून दूर होणं केवळ, केवळ माईच करू जाणे"
"खरय राधे, आपली मायेची पाखर मुलाला खुजं करून टाकेल हे कळल्याक्षणी यशोदामाईने मला अलगद दूर केले. अन्यथा तो क्षण या श्रीकृष्णालाही खूप अवघड गेला असता... "
"अन मग सारे गोप रडू लागलेले, मुक्त हस्त प्रेम अन प्रेमच केलं त्यांनी माझ्यावर. कसलीही अपेक्षा न ठेवता केलेलं निर्वाज्य प्रेम या गोपांचे. मी म्हणेन ते, म्हणेन तसे करणारे हे गोप. कसा मुक्त होणार होतो मी त्यांच्या प्रेमातून? कसा समजावणार होतो मी त्यांना?

अन तू फार मोठा निर्णय घेतलास तेव्हा. हो तूच सूचवलं होतस मला. फक्त एक नजर टाकलीस तू माझ्या कमरेपासच्या तुझ्या प्राणप्रिय बासरीकडे.... तसंही ही बासरी द्वारकेच्या कोलाहलात हरवून गेेली असती. तिचा आवाज तिथे दबलाच असता. ...."
"हो, ती बासरी माझी प्राणप्रिय सखी होती. पण गोपांचा तो प्राण होता रे. साऱ्या गोमाता तुझ्या बासरीने पाझरायच्या, मुक्त पाझरायच्या. वासरांना पोटभर पाजूनही पासरी पासरी पाझरायच्या त्या, तुझ्या त्या बासरीच्या सुरांनी. म्हणून तर गोकुळ बहरले. साऱ्या पंचक्रोशीला दूधदूभते पोचवू शकायचे हे गोप. त्या बासरीवर माझा जीव होता, पण  तिच्यावर गोपांचा जीव होता,  गोपांचाच हक्क होता तिच्यावर, कान्हा..."
" खरय, राधे... म्हमूनच मग मी ती बासरी गोपांकडे सोपवली. एका अर्थाने त्यांचा कान्हा त्या बासरीपुरता त्यांनाच परत केला.

अन मग सगळ्या गोपी पुढे झाल्या. त्यांचा उत्साह, त्यांचे तारूण्य, त्यांचे सौंदर्य, यांना मी कसा पुरा पडणार होते? पण तू पुढे झालीस म्हणालीस, 'पेंद्या , सगळे गोपहो मिळाली ना बासुरी, मग वाजवाना. ' अन गोपांनी वाजवलेल्या बासरीवर तुझी पावलं थिरकू लागली. तू अन मी केलेली रासक्रिडा तू गोपींना देऊन टाकलीस. गोपींही भान हरपून गरबा करू लागल्या. माझ्या भोवती कडे करून गोपी आपली रासक्रिडा करण्यात मग्न झाल्या. त्यांचे सारे लक्ष तुझ्या हालचालींवर केंद्रित झाले, तशी तू खूण केलीस मला... जा, कृष्णा जा...."
" दुसरा काही पर्यायच नव्हता कृष्णा, त्या गोपींना समजावणं खरच अशक्य होतं. त्या माई इतक्या मनाने कणखर नव्हत्या त्या. हा वियोगाचा क्षण त्यांना झेपणारा नव्हता कृष्णा...त्यांच्या दु:खातून त्यांना बाहेर काढायचं तर ही रासक्रिडाच एकमेव उपाय होता..."

" पण राधे, त्यामुळे मी तुझा निरोपही नाही घेऊ शकलो ग.... ना तुला बासरी देऊ शकलो, तुझी रासक्रिडाही केवळ तुझी नाही राहिली,  तुझ्याजवळ काहीच न देता मी निघून गेलो, राधे.... क्षमा कर राधे..."
"नाही रे श्रीरंगा.... नको असे म्हणूस"
"राधे कसं सावरलस स्वता:ला? माईकडे माझे सारे बालपण होते, नंदबाबाकडे गोकुळ, गोपांकडे बासुरी अन गोपी रासक्रिडा. त्या त्या गोष्टीत माझा विरह ते सोसत होते, पण तू? तू एकटीच, कसलीही आधार, कसलीही ओळखीची खूण न देता, तुला अगदी एकटी टाकून गेलो ना मी..? काय होतं तुझ्या सोबत, राधे!"

" कृष्णा नको रे शिणूस.... लौकिक अर्थाने तुझा अंश, अनय होताच की माझ्या सोबत. अन खरं सांगायचं तर मी दूर झालेच कुठे तुझ्यापासून? मी तर तुझा विवेक, मी तर तुझी विचारशक्ती, मी तर तुझी प्रेरणा, मी तर तुझ्यातल्या जागतेपणाची खूण, मी तर तुझ्या असण्याची जाणीव.... अरे मी होतेच सतत तुझ्या सोबत... बघ आताही आहेच की मी तुझ्यासोबत, तुझ्या आत. अरे, मी राधा, कृष्णाची राधा, तिला दुसरं अस्तित्वच कुठेय? कृष्ण आहे तर राधा आहेच ना,..."

"राधे..."
------
१२. पूर्णपुरुष

अन तोही दिवस आठवतो
किती चित्र विचित्र घटनांचा दिवस!
दुर्योधनाने आयोजलेला द्युताचा समारोह.

कधी नव्हे ते युधिष्ठिराच्या हातून घडलेला अपराध, द्युताच्या मोहाने केलेला घात.  पांडवांचे राज्य, संपत्ती इतकेच नव्हे तर स्वतः पांडव, त्यांची आई कुंती आणि पत्नी द्रौपदी त्याने पणाला लावली.  पणाला लावले सारे  अन हरला तो.
तो हरला की जगातील  चांगुलपणाचा पराभव होता तो? कलियुगाची सुरुवात तर नव्हती ती ?
सभागृहात महामह भीष्म, महाराज धृतराष्ट्र, अनेक देशोदेशीचे रथी महारथी उपस्थित होते. पण एकालाही द्रौपदीची दया आली नाही, एकही जण दुर्योधनाच्या विरुद्ध तिला मदत करू शकले नाहीत.

अगदी द्रौपदीचे पाचही पती माना खाली घालून तिची विटंबना सहन करत होते. कुंतीने घालून दिलेला नियम, युधिष्ठिराच्या आज्ञे वाचून कोणीही पांडव कोणावरही आक्रमण करू शकणार नाही हा नियम! अन युधिष्ठिर स्वतःच दास बनलेला, तो कोठून आज्ञा देणार ? सारे पांडव त्या क्षणी निष्प्रभ झाले होते.
अन त्या एका क्षणी कृष्णेने मला साद घातली, करुणपणे माझा धावा केला. आता मलाच कृष्णेची मदत करायला जाणे भाग होते.  तिची मदतीची हाक, तिची विनवणी मी टाळू शकत नव्हतोच. माझी सखी, कृष्णा आज संकटात होती.
भर दरबारात दु:शासन एकामागून एक वस्त्र ओढत होता तिचे. शेवटी मीच एक एक वस्त्र तिला नेसवत गेलो. पण दु:शासनाची रग   जिरत नव्हती. अखेर मी पितांबर नेसवले तिला. अन पितामहांना जाग आली. त्यांनी दु:शासनाला थांबवले. अन्यथा त्याचा अंत तिथेच झाला असता. राजसभेतील सराच प्रकार अतिशय निंदनीय घडलेला. फक्त द्रौपदीची लज्जा काही प्रमाणात तरी राखू शकलो मी एव्हढेच समाधान.

आता रात्री झोपताना सारे आठवतो आहे. जरी मी अनर्थ थोपवला असला तरी मनाला शांतता का नाहीये? काहीतरी चुकलेय असे का वाटतेय?
"राधे? तू ? किती दिवसांनी येते आहेस? ये अशी. बैस. कशी ..."
"माधवा, मी शिळोप्याच्या गप्पा करायला आलेली नाहीये. हे काय करून बसलास तू ?"
"राधे ?"
"तुला समजलही नाही ? तू काय करून बसलास ते? "
"राधे कशा बद्दल बोलते आहेस?"
"आज, आजच्या बद्दल बोलतेय. असा कसा वागू शकलास तू? तू असा कसा वागू शकलास? माझा विश्वासच बसत नाही."

तुझ्या डोळ्यात काय नव्हत? अविश्वास, वेदना, नाराजी, असहायता. आणि ते सारे भरून तुडुंब डबडबलेले डोळे तुझे, मला कसला जाब विचारत होते?
"कृष्ण म्हणवतोस स्वतःला आणि तुझ्या कृष्णेला असं वागवलस?"
"अग मी तर उलट वाचवलं तिला. मदत केली, लज्जा वाचवली तिची..."
"खरच का माधवा?
आठवतं तुला? एकदा भेटायला गेला होतास तिला. अचानक काही लागलं तुला, तुझ्या बोटाला धार लागली रक्ताची. आठवतं ? तुला स्वतःलाही त्या जखमेची कळ कळे पर्यंत कृष्णेने आपल्या पदराचा शेव फाडून तुझी जखम रोधली होती. एकही थंब सांडू दिला नव्हता तिने. आठवत? "
"हो राधे, लख्ख आठवतय मला. अजून जपून ठेवलीय मी ती चिंधी."
"आणि तरीही, तरीही तू तिचा एक एक अपमान होऊ दिलास? राजसभेत पणाला लावलं गेलं तिला, तुला कळलच नाही ? कळलं नाही असं कसं म्हणू? तुला कळत होतं सारच.
दु:शासनाने तिला, रजस्वला तिला फरफटत ओढून आणलं, राजसभेत. ती प्रत्येकाकडे न्याय मागत होती. तुला ऐकू आलच नाही तिचं न्याय मागणं?
न्यायदेवतेची पट्टी सा-यानी; अगदी सा-यांनी बांधली डोळ्यांवर. भीष्म, ध्रुतराष्ट्र, कर्ण, सारे सारे आंधळे झाले, पण माधवा तू ? तू तर सर्वसाक्षी ना? तू का ओढून घेतलीस डोळ्यावर पट्टी.
इतर कोणी फसेल, मी नाही. माधवा
तू जाणून बुजून गप्प राहिलास. कारण असेल; भावी काळातल्या घटनांना बांधील.
पण कृष्णेचा सखा नाहीच राहिलास तू. ना तिचा, ना माझा...
अन जाणतोस तू हे. म्हणूनच मन खातय तुला तुझच."

"अग पण मी प्रयत्न केलाच ना? एका मागून एक वस्त्र नेसवत गेलो ना तिला, अगदी पितांबरही... "
"केलास, हो हो केलास प्रयत्न. पण कधी ?
अरे जिने तुझ्या रक्ताचा एक थेंब सांडू दिला नाही जमिनीवर,तिचे इतके अश्रू कसे सांडू दिलेस राजसभेत? जिने तुला कळ समजण्याआधी तुझी वेदना समजून घेतली, त्या कृष्णेची कळ, वेदना कधी पोहोचली तुझ्या पर्यंत ?
तिने याचना केली, मदतीची भीक मागितली, दयाघना म्हणून साद घातली तेव्हा?
ती मदत होती ? की केवळ तुझ्यातल्या देवत्वाचा तो दिखावा होता माधवा? "

"नाही नाही राधे, मी तिची लज्जा राखण्यासाठीच गेलो होतो..."
"माधवा, अरे  लज्जा तिची नाही गेली रे, लज्जा गेली तुझी, सा-या मानव जातीची. तुझ्या देवत्वाचा पुरावा द्यायला गेलास पण तो पुरावा नव्हता रे, तो तुझ्या देवत्वाचा अंत होता.
आता तू उरलास  फक्त पूर्णपुरुष - फक्त पूर्णपुरुष! जाते माधवा, हा माझा कृष्ण नव्हे, हा माझा सखा नव्हे...  हा माझा कृष्ण नव्हे..."

"सखे थांब, राधे, राधे ... "

"राधे... "
------
१३. रिता

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
भेटलीस तू मला
पण नाहीच देऊ शकलो,
साथ मी तुला

बालपणीच्या निरागस प्रवासात,
भेटलीस होऊन राधा
सोडून जाताना घेतला नाही,
निरोप सुद्धा साधा

करून सारे समर्पण,
बनलीस माझी रुक्मिणी
सुख्-दु:खांच्या तराजूत,
झालो फक्त तुळशी

तारुण्याच्या मखमलीत,
भेटलीस होऊन सत्यभामा
सोडताना फक्त लावून गेलो,
प्राजक्ताच्या झाडा

आयुष्याच्या उतरणीवर,
भेटलीस होऊन मीरा
दिला तुला प्यायला,
विषाचा एक प्याला

आयुष्याची इतकी वळणे,
चाललो अनेक वाटा
भोगले सारे सारे,
शेवटी पण मी एकटा

देणे सार्‍या आयुष्याचे,
पुरे फेडू जाता
तृप्त तुम्ही सार्‍या,
मी मात्र रिता !
------
१४. मीरा

आणि तोही दिवस आठवतो...
कितीतरी युगं पुढे नेऊन ठेवलस त्या दिवशी तू मला...

आपली लाडकी यमुने काठची अशीच एक सुंदर सकाळ होती ती. पाणी भरता भरता, एका क्षणी तू थबकलीस, पुन्हा घट यमुनेत रिकामा केलास; अन पुन्हा भरू लागलीस. जरी मी पावा वाजवत असलो तरी लक्ष तुझ्याकडेच होतं माझं. तू पुन्हा घट रिकामा केलास अन पुन्हा भरू लागलीस...???
हसलीस अन वळून माझ्याकडे पाहिलस. मी नजरेनेच तुला काय विचारलं. तर तूही नजरेनेच जवळ बोलावलस. मी पावा थांबवला अन उठलो, तुझ्याजवळ यमुनेत पाय टाकत काही बोलणार, तर नजरेनेच गप्प केलस. आणि पावा वाजव म्हणालीस.अन एक नजर घटातल्या पाण्याकडे टाकलीस.मी पुन्हा आसावरी छेडला. वादी ध पाशी आलो तशी तू मला थांबवलस आणि घट पाण्यात बुड्वून भरलास.... माझ्या आसावरीतला ध तू बरोब्बर साधलास.
मग पुन्हा थांबलीस म्हणालीस, " मी रा..." अन घटातून पुन्हा धा वाजवलास.

पुन्हा म्हणालीस " मीरा..." अन घट पाण्यात न बुडवता मला सामोरी झालीस अन माझ्या डोळ्यात खोलवर पाहिलस. सर्र्कन माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.... आजवर माझ्याही लक्षात न आलेली गोष्ट तू अशी लख्ख उभी केलीस डोळ्यासमोर... तू मीरा......

तू खूप गूढ हसलीस अन पाठमोरी होत तो अर्धा भरलेला घट घेऊन निघून गेलीस. छे अर्धा माझ्यासाठी यमुनातीरी ठेऊन गेलीस. त्या मीरेला पोटात सामावून घेत, आतल्या आत रिचवत कितीतरी शतकं तसाच उभा आहे मी... राधे... मीरा....धे....

"राधे... "
------
१५. रुका हुवासा है, आज जमाना एक

(राधा-कृष्णा बद्दल कित्ती तरी लिहिलं गेलं. पण राधेने कृष्णाचा शेवट कसा पेलला असेल याचा विचार करताना हे सुचले.)


ठंड के छोटे छोटे दिन, धुंद में लिपटी शाम
चुपचाप खडे पेड, धुंदलीसी राह
यमुनाका नीरव किनारा, ठहराया शामल जल
गहरी परछाईयाँ, हिलाते हुए पेड
हलकेसे डुबकी लगाती नीली मछली एक
और पावोंमे चुभती हुई सफेत रेत
रुका हुवासा है, आज जमाना एक

तुम्हारा लाडला कदंब, आज झुका हुवा क्यू है
यमुना की लहरे, आज रुकी रुकी क्यू है
अष्टमी की चाँदनी, आज उदास सी क्यू है
पवन की बांसुरी, आज ऐसी अबोल क्यू है
आसमंत मे आज, सन्नाटे की आहट क्यू है
और इस सन्नाटे के बोल, आज आर्त क्यू है
रुका हुवा सा जमाना, आज क्यू है

खाली है यमुनाकी रेत
खाली है कदंब की छाया
खाली है वृंदाबन का खेल
खाली है मथुरा का कुंभ
खाली है बांसुरीका सूर
खाली है आत्मा की उमंग
है कदंबके पैरोंतले सिर्फ तीर एक
रुका हुवासा है, आज जमाना एक

"हाय ssss....
बस, बस, अब बस भी करो...
नहीं, नहीं, न जाओ...
ठहरो, मुझे भी ले चलो..."
और फिर एक सन्नाटा...
रुका हुवासा है, आज एक जमाना

कल की सुबह हुई, लेके साथ में
सूरज की बुझी बुझी आखें
आसमंत की नीरविकार आखें
कदंब की नीरस हुई आखें
आकाशकी झुकी झुकी आखें
धरती की सुखी सुखी आखें
पवन की गिरी हुई आखें
और यमुना की भरी हुई आखें
पार्थीव राधाका, लिये साथ में
और कहीं दूर, दूर वहाँ जंगलों में
................ श्याम का

रुका हुवासा है, आज एक जमाना
------

No comments:

Post a Comment