१३ मार्च
१४ मार्च
१५ मार्च
२३ मार्च
शनिवार, रविवार निखिलची रेस आहे. कोलंबस मध्येच ही रेस आहे.
कमिन्सचा ट्रक्सच्या टेस्टिंगसाठी खास, रिस्ट्रिक्टेड ट्रॅक आहे. कंपनीमध्ये तयार केलेली डिझाइन्स, त्यावरून तयार केलेली इंजिन्स आणि ती ज्या ट्रक्स मध्ये बसवली जातात ते ट्रक्स. यांचे अतिशय कठोर टेस्टिंग केले जाते, त्यासाठी गावापासून जरा दूर ट्रॅक तयार केलेला आहे. अर्थातच तिथे प्रवेश प्रतिबंधीत आहे.
कमिन्स मध्ये अनेक जणं कार रेसिंगचे प्रेमी आहेत. त्यांच्या विविध रेसेसही होतात. अशीच एक रेस शनिरवी आहे. या रेसच्या अरेंजमेंट कमिटीमध्ये निखिलही आहे. साधारण १० सदस्य आहेत या कमिटीत. बहुसंख्य अर्थातच अमेरिकन.
तर या रेस साठी कमिन्स आपला ट्रॅक उपलब्ध करून देते. अर्थातच संपूर्ण वर्षाचे शेड्युल आधी कमिन्स कडून संमत करून घ्यावे लागले. अन मग त्यानुसार रेसेस शेड्युल केल्या जातात. अन त्याची माहिती विविध सोशल मीडियांतून सांगितली जाते.
आज या ट्रॅक वर कोणता ट्रक उभा नाही ना, इतर काही पडलेले नाही ना, रस्ता नीट आहे ना याची पाहणी करायची जबाबदारी निखिलकडे होती. प्रत्यक्षात एक नजर टाकून येणे गरजेचे होते. गाडीत बसूनच ही पाहणी करायची होती; त्यामुळे त्याने मलाही चल म्हटले.
संध्याकाळी ऑफिस संपल्यावर आम्ही बाहेर पडलो. आज हवाही छान होती. कोलंबसच्या काहीशी सीमेवर ही जागा होती. जाताना आसपासची भली मोठी शेते , टुमदार घरं बघत जायला मजा अली. काही शेतांमध्ये काही पेरणी झाली असावी. जांभळ्या रंगाची, अगदी जमिनी लागत रोपं दिसत होती. गाडीच्या वेगात जमीनच जांभळी दिसत होती. इटलीमध्ये व्हॉयलेट्सची शेते काहीशी अशीच दिसत असतील असा गमतीशीर विचार मनात झळकून गेला .
काही अंतरावर डावीकडे वळलो अन समोर अंतरावर एक भले मोठे गेट दिसले. लगेचच रिस्ट्रिक्टेड एरिया असा बोर्डही दिसला. बरोबर इथे कमिन्सच्या ट्रक्सचे टेस्टिंग होत असल्याने हा भाग रिस्ट्रिक्टेड केलेला होता. गेट जवळ गेल्यावर तेथील कार्ड रीडर समोर निखिलने त्याचे, कमिन्सने दिलेले कार्ड स्कॅन केले. तशी आपोआप ते भले मोठे गेट सरकत बाजूला झाले. अन आम्ही आत शिरलो. अशा कोणत्या रिस्ट्रिक्टेड जागेत जायची ही माझी पहिलीच वेळ. एक वेगळेच फिलिंग आले. लेक किती मोठा झालाय. एका मोठ्या कंपनीतल्या विशेष जागेत जाण्याची त्याला परवानगी आहे या सगळ्यांचे आई म्हणून नक्कीच कौतुक वाटले.
मग आतल्या ट्रॅक्स वर बारीक नजर ठेवून सावकाश एक चक्कर मारली. सगळे आलबेल आहे हे पाहून झाल्यावर पुन्हा गेट जवळ आलो. उजवीकडच्या एका ट्रेलरकडे हात दाखवून लेकाने सांगितले कि हा आमच्या रेसच्या लोकांचा. त्यात रेससाठी लागणारी सामग्री, मॉनिटर, इतर यंत्रणा ठेवली आहे. तिथेच मागे रेसिंग ट्रॅक साठी आवश्यक असे मोठे प्लॅस्टिक कोनही होते, रेस न बघताही रेसचे फिलिंग झटकन आले.
गेट पाशी आतून पुन्हा कार्ड स्कॅनर होता. तिथे कार्ड स्कॅन केलं अन गेट सरकत गेले. अन आम्ही बाहेर पडलो .
फार काही आकर्षक घटना नाही, परंतु मला खूप छान वाटलं हे मात्र खरं !
___
17 एप्रिल
काल इंडिला जाताना इथले टोरनॅडो काय ताकदीचे असतात हे नीटच समजलं. नाही आम्ही नव्हतो त्यात अडकलो. सांगते नीट.
तीन आठवडे आधी आम्ही इंडिला गेलेलो. जाताना वाटेत अनेक वेअरहाऊसेस (गोदामं) दिसतात. यांची रचना फार भारी असते. म्हणजे लांबच लांब, उंच अशी आयताकार बांधणी अन लांबीमधे दोन्ही बाजुंना मोठ्ठ्या चौकोनी खिडक्या. बरं जमिनी लगत नाहीत, अन शिवाय शटर्स. मला कळेना, गोदामाला इतक्या मोठ्या खिडक्या का असतील? शेवटी लेकाला विचारलं. मग त्याने एका गोदामाजवळ कार जरा बाजूला घेतली. अन दाखवलं. तर इथले भलेमोठे ट्रेलर्स पाठ करून, ढुंगु त्या चौकोनी खिडकीत खुपसुन बसलेले🤣 माल काढणं घालणं सोईचं व्हावं, मानवी शक्ती पणाला लागू नये यासाठी ट्रेलरचे दारच गोदामाच्या खिडकीत घुसवतात.
पुढे आत काय सिस्टिम असेल याचा पूर्ण अंदाज मला घरी दुपारी अमेझॉनचे, इथल्या पोस्टाचे ट्रक्स येतात ते बघून आला.
कमीतकमी मानवी शक्ती वापरावी लागेल यासाठी किती छोट्या पातळीवरही विचार व्हावा?
तर हे ट्रक्सही भले दांडगे असतात. उंच. जमिनीपासून किमान 3-4 फूट वर. या ट्रक्सच्या मागचे शटर असते त्या खाली एक चौकोनी लिफ्टसदृष्य तराफा असतो. एरवी तो ट्रकच्या खाली असतो. ट्रक चालक ट्रक डेस्टिनेशनला ट्रक थांबवतो. मग उतरून मागे येतो. एक स्विच दाबतो तसा ट्रक खालचा तराफा बाहेर येतो मग स्विच फिरवून ते तराफा ड्रायव्हर खाली जमिनीलगत आणतो. मग त्यावर स्वार होतो. स्विच फिरवतो तसा तराफा वर जातो, ट्रकच्या दाराच्या पातळीवर येतो. मग ड्रायविहर दार- शटर वर करतो. आत जाऊन आतल्या ट्रॉलीवर योग्य ते खोके, वस्तू ट्रॉलीवर ठेवून ट्रॉलीसह तराफ्यावर येतो. स्विच बदलून तराफा जमिनीलगत. तिथून ट्रॉली ढकलत घरांपर्यंत. खोके वस्तू तिथे उतरवून, ट्रॉली घेऊन परत तराफा, तराफा वर, ट्रॉली आत, शटर खाली, तराफा खाली. ड्रायव्हर खाली उतरून स्विच रिलिज करतो की तराफा थोडा वर जाऊन आडवा होऊन ट्रकच्या पोटाखाली. स्विच फिरवून तराफा सिक्युअर. ड्रायव्हर पुढे जाऊन सीटवर, ट्रक पुढच्या इमारतीकडे.
असेच टेक्निक गोदामात वापरले जाते. कमी माणसं, कमी शारिरीक कष्टात मोठी उलाढाल.
त्याशिवाय या कामात माणसाची माणूस म्हणून प्रतिष्ठा टिकते. त्याचे ओझ्याचे गाढव होत नाही. अन आपोआपच हे काम कमअस्सल असा शिक्काही नाही.
तर सांगत काय होते की ही प्रचंड मोठी गोदामं आधी पाहिली होती, समजून घेतली होती. या गोदामांची उंची 30 ते 40 फूट, आणि किमान 10,000 ते 25,000 स्क्वेअर फूटाची. तर अशी अनेक वेअरहाऊसेस या रस्त्यावर सतत दिसतात. परवा वादळ झालं, एक मोठं चक्रिवादळ(टोरनॅडो) या भागातून गेलं. मोठं नुकसान झालं, घरं पडली, काही माणसं मृत्युमुखी पडली वगैरे बातम्या वाचल्या होत्या. पण तरीही त्याची तीव्रता मात्र डोक्यात घुसली नव्हती.
काल येताना एक गोदाम असं का रे तोडलय, नवीनच होतं की. असं लेकाला विचारलं. तेव्हा त्याने आठवण दिली, अगं इथूनच गेलं न ते टोरनॅडो, त्याचा प्रताप आहे.
अन मी हादरले. नुकसान म्हणजे किती असावं? इतकं भलंभक्कम, प्रचंड मोठं गोदाम अक्षरश: चिंध्याचपाट्यांसारखं दिसत होतं. एक बाजू व्यवस्थित अन दुसरी बाजू पार चिपाडं झालेली. आपण कागदाचे, पुठ्याचे टरकाऊन तुकडे करतो तसे दिसत होते.
निसर्ग जितका सुंदर, देणार तितकाच हिरावून घेणारा, भितीदायक अन बिभत्स होऊ शकतो हे डोळ्यांनी पाहिले. इतकी हताश झाले की फोटो काढावा हे मनातही नाही आलं. अन ते बरच झालं. तसंही अजून ते दृष्य डोळ्यासमोरून हलत नाही.
पण अंदाज यावा म्हणून सोबत नेटवरचेच दोन फोटो देते.
---
No comments:
Post a Comment