Thursday, January 16, 2025

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारत




जेव्हा एखादा हुषार माणसाला स्वत:च्याच बुद्धीला न पटणारं बोलावं लागतं. तेव्हा तो अडखळत बोलतो, अं, यु नो, इट्स लुक लाईक, नाउ लुक, आय विल गिव्ह 2-3 रिजन्स असं म्हणून एखादं आचरटसारखं कारण सांगतो... किती दिवस हा बुडबुडा फुगणारे?

अंतर्गत बाबतीत एकवेळ लोकांना देशभक्ती, ग्रेट संस्कृती या सगळ्याची अफू देऊन गुंगवू शकाल. पण आंतरराष्ट्रीय राजकारणातही हेच होऊ लागलं तर जगात हसं होईल अन गंभीर परिस्थिती उद्भवेल हे या हुषार लोकांना समजत नाही असं नाही, पण पक्ष आणि पक्षप्रमुखांचा इतका दट्या आहे की मग असं चाचरत, अतार्किक बोलत सुटावं लागतं.

आज खरं तर जागतिक राजकारणात भारत एकटा पडत चाललाय. अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, चीन, रशिया, इस्राएल हे सशस्त्र मोठे देश आणि पाकिस्तान, बांगलादेश, मालदिव या सारखे छोटे शेजारी देशांचीही मैत्री भारत गमावून बसला आहे. मग उगा पाकिस्तानशी गळाभेट करणं. ज्या रशियाला डावे डावे म्हणून अन नेहरुंना त्यांचे पित्ते म्हणून पाण्यात पाहिलं, ज्याचे कझाकिस्तानबरोबर युद्ध थांबवल्याची ग्वाही मिरवली, आज त्याच रशियाशी मैत्री जोडण्याचे प्रयत्न चालू आहेत. 

एका दुसऱ्या घटनेने पूर्ण आंतरराष्ट्रीय संबंधच नव्याने रचायचे हा अतिशय बालिशपणा आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात वैचारिक भूमिका, व्यापार, अर्थकारण, शस्त्रास्त्र देवघेव आणि मोठ्या काळातला स्पॅन फार महत्वाचा असतो. 

आज अमेरिकेच्या प्रेमात अन दोन वर्षात रशियाशी मैत्री. आज कझाकिस्तानची बाजू अन वर्षभरात रशियाशी मैत्री. असं आंतरराष्ट्रीय राजकारण करू लागलात तर इतर सर्व राष्ट्र तुमचा विचार कितपत गंभीरपणे करतील याबाबत शंकाच आहे.

ज्या भारताने स्वातंत्र्यानंतर लगेचच अलिप्तराष्ट्र संघटना उभारण्यात पुढाकार घेतला, इतकेच नव्हे तर या संघटनेला अनेक देशांसह बलिष्ट केले. इतके की अमेरिका रशिया शीतयुद्धाला मोठा अडसर उभा केला. आज त्या भारताचे स्थान पार घालवले आहे असं वाटू लागलय.

या साऱ्यातून भारताने आंतरराष्ट्रीय राजकारणातली आपली पत पार घालवली आहे असही खेदाने म्हणावं लागतय...


No comments:

Post a Comment