Thursday, June 11, 2015

चाहुल

मोठ्ठा श्वास घेतला....आहा.... चाफा! अन गेले कितीतरी मागे, खूप खूप... शाळेचे दिवस.

त्या दिवशी बाबा खुशीत घरी आले होते तेव्हा दरवळला होता हाच वास.

बाबा दारात होते अन त्याचा घमघमाट ओसरीवरून थेट माजघरात शिरला. चुलीसमोरची आई लगबगीने उठली. "अग बाई..." करत चटचट हात धुवत पदराला हात पुसत बाहेर गेली.
चेहरा नुसता फुलला होता तिचा.

बाबा ओसरीवर झोपाळ्यावर बसलेले. त्यांनी हात पुढे केला. हिरव्यागार लांब लांब पानांवरती सोनसळी चाफे घमघमत होते. आई डोळे मिटून नुसती वास घेत खाली बसली. बाबांनी ओंजळ पुढे केली. तरी आई डोळेच उघडेना. मी टक लावून बघत होते.

आई इतक्याइतक्यात काही वेगळीच दिसत होती. मग बाबांनी हळूच ती फुलं आईच्या ओटीत सोडून दिली. एक एक करत आईची ओटी हिरवी पानं आणि सोनसळी फुलांनी सजली.

अन आईने डोळे उघडले. "इश्य..."म्हणत लाजून ती पटकन उभी राहिली, पण ओटीतली फुलं पटकन सावरून ओढुन घेतली जवळ.. अन दुसरी कडून मला कुशीत घेत बाबांकडे एक चोरटी नजर टाकत म्हणाली, "या वेळेस नक्कीच चाफा हं"


 


No comments:

Post a Comment