Showing posts with label सख्या रे. Show all posts
Showing posts with label सख्या रे. Show all posts

Thursday, March 17, 2016

एकटेपण...!


त्यालाच एकटं रहायचं असतं 😏.
कित्ती जणांनी त्याला सोबतीला घेतलं, किती जणांनी त्याची आर्जवं केली.
ती राधा, बिचारी वाट पहातेच आहे यमुनेतिरी...
यशोदा बिचारी त्याची अंगडी टोपडी छातीशी लाऊन जगली , जगत राहिली...
रुक्मिणी, भामा अाणि कितीजणींना वाटलं तो आहे सोबत. पण तो कसला अडकतो.
ती विठाई, तिला वाटलं किमान या काळ्या रुपड्यात तरी सोबत राहिल, पण तीही बिचारी एकटीच विटेवर कधीची...
अर्जुन, त्याने तर सखा मानले त्याला. अगदी युद्धातही आपल्यासोबत सतत आहे असे वाटले. पण तिथेही कृष्णनीतीच. कृष्ण अलवार, लोण्यासारखा सगळ्यातून निसटून कधीच द्वारकेला पोहचला. अर्जून शेवटी भावंडांबरोबरच वाट चालला स्वर्गाची, तीही अयशस्वी. कुठे होता पार्थ वाट दाखवायला...
मीरा, ती तर मेरे तो गिरिधर गोपाल म्हणत वणवण फिरली. पण तिच्या नशिबी फक्त सावळ्याचा रंग, तोही फक्त शेवटी...
त्यालाच नकोय सोबत कोणाचीच...
सूरदासांपासून अगदी तुकयापर्यंत नाहीच जवळ केलं त्याने कोणालाच. नुसतीच हुलकावणी...
खट्याळपणा गेला कुठे त्याचा अजून. की खरे रूप नाही ओळखू येऊ म्हणून लपतोय तो? कोण जाणे. त्याचे त्यालाच माहिती...
जेव्हा भरून येईल हे एकटेपण त्याला;  तेव्हा असेल का पण थांबलेली राधा, यशोदा, रुक्मिणी, भामा, रखुमाई,अर्जून किंवा मीरा... किंवा तू, मी....
एकटे, एकटेच आपण. तू, मी अन तो ही...!

Sunday, January 3, 2016

सख्या रे...४.एक लखलखीत रात्र

*तारुवा गिनत गिनत*
- अवल

(मुकुल शिवपुत्र यांची 
https://youtu.be/oSLU-r5f7J4
ही चिज ऐकताना जे वाटत गेलं ते असं...)

आणि ती ही रात्र आठवते सख्या...
तुझा निरोप आला अन सारी दुपार, संध्याकाळची वाट बघण्यात गेली. तू येणार...काय करू, काय नको होऊन गेलं.तुझ्या येण्याला साजरं करण्यासाठी किती सोसा सोसाने सारे सजवले, सजले... सजणेच जणु साजण होऊन आले!

अन दुपारची तलखी संपून मनातली गोड हुरहूर अंगभर, अंगणभर पसरत गेली, उतरणाऱ्या उन्हातल्या सावल्यांसारखी.
सारा आसमंत सायंकाळच्या सुरात मिसळून जाऊ लागला. हळुहळू मनातल्या साऱ्या आशा आकांक्षा, इच्छा फुलून वर येऊ लागल्या, मन सुगंधित करू लागल्या. जणु अंगणातली सारी फुले एकाच वेळी उमलली होती.

हळुहळू सुर्याने आपला पसारा आवरला, उन्हाचा झळझळीत अंगरखा गोळा केला, केशरी उपरणेही हळुच आवरून सावरून घेतले . आता तर तो मार्गस्थही झाला...
घर आवरून झाले, स्वत:चे आवरून झाले पण मन.. त्याला आवरणे अवघड होऊ लागले. आत्ता येशील तू, अगदी कधीही तुझी चाहुल लागेल...
सुर्याचा प्रत्येक काढता पाय, तुझी चाहुल देत होता. अन मग तो अगदीच पलिकडे गेला.
हळुहळू शुक्राची चांदणी दिसू लागली...
चमकू लागली...

सायंकाळ अशीच निघून चालली. तुझी चाहुल हुलकावणीच देत राहिली. अरे श्याम न तू? येण्याचा निरोप पाठवूनही ही शाम अशीच धुडकाऊन की दिलीस?
शुक्राची चमकणारी प्रत्येक कला मला वाकुल्या दाखवू लागली. अन मग आल्याच तिच्या  सगळ्या सख्या, एकएक करत. कितीतरी चांदण्या फुलल्या वरच्या अंगणात. तू मात्र नाहीस... माझ्या मनाच्या अंगणात मात्र नुसता अंधार...

हळुहळू रात्र भरात आली. सारीकडे अंधार भरत गेला. तुझी वाटही कशी पाहू? तिथेही सारा अंधार दाटून आला. अन आता तर ती वाटही अंधूक दिसू लागलीय. मनातल्या वाटांनाही डोळ्यातले पाणी पुसु पुसू लागले...
शेवटी त्या वाटेकडे पाठ फिरवून वरती सज्यामधे आले. अन मग तू नाही तर तुझा आठव कितीतरी अंगांनी, दिशांनी अंगावर दाटून आला. रातराणी, प्राजक्त मला घेरु लागला. सारी रात्रच वेढुन वेढून घेऊ लागली.

रात्र अजून चढली. किती मोजू, किती मोजू आकाशातल्या तारका? एकही तारका मला तारेल अशी आशा दिसेना. कधी येणार तू सख्या...
पूर्वेचे तारे मोजून झाले, झाकोळलेली पश्चिमही उजळली ताऱ्यांनी. तेही मोजून झाले... तू मात्र नाहीसच...

साऱ्या विश्वाला आपल्या रंगात रंगवून टाकणारा सदारंग तू! मला मात्र न रंगवता तसेच ठेवलेस आज, निरंग!
मीही या निशे सारखी, तारे मोजत अशीच ताटकळत पडून राहिले. पण तू नाहीच आलास, अखेर पर्यंत...

ती रात्र कशी विसरू रे सख्या? मोजलेला प्रत्येक तारा, घेतलेला प्रत्येक सुगंधी पण जखमी करणारा श्वास, ओघळणारा प्रत्येक खारा मोती, एक न भरणारी लखलखीत जखम... आठवत राहते अन छेडत राहते माझी सारी ती रात्र!
अजून त्या लखलखत्या ताऱ्यांसारखीच लख्ख आठवते ती रात्र, सख्या रे ...
ती रात्र, सख्या रे...
सख्या रे...
---

Wednesday, March 25, 2015

सख्या रे... ३. रंग दे रंग दे, रंगरेजवा

कुमार गंधर्व यांची मधमाद सारंग मधली ही चिज

रंग दे रंग दे रंगरेजवा
जैसी मोरी पिया की पगरिया
रंग दे मोरी सुरंग चुनरिया
जैसी मोरी पियाकी पगरिया

त्यावर काहीबाही सुचलं...
------------------

 किती तो उकाडा.... अगदी काहिली होतेय जिवाची. त्यात तोही नाही जवळ. एकच सुखाची गोष्ट, तो येणार आहे, लवकरच... त्याच्या आगमनाची वार्ताही किती सुखावणारी... जणुकाही ग्रीष्मातल्या दुपारी वळवाची चाहूल. आता इतक्यात हे विरहाचे दिवस संपतील अन मग त्याच्या संगतीत नवीन वसंत फुलेल.

तो येणार, कशी सजवू स्वता:ला? कोणती नवीन वसनं आणू? कोणत्या रंगात रंगवू? ए, रंगरेजवा मला मदत कर ना... माझ्या त्याची पगडी कोणत्या रंगात असेल बरं? त्या रंगात रंगवून दे ना माझी चुनरिया.

कोणता रंग विचारतोस? अं.... असं कर सगळेच रंग आण तुझे अन सगळ्याच दे बरं रंगवून. तसंही तो आला की सारेच रंग फुलणार आहेत... आधी थोडा भांडणाचा मग थोडा रुसव्या फुगव्याचा, तो इतके दिवस आला नाही म्हणून थोडी तर रुसणारच ना मी?
मग थोडा त्याच्या समजूत घालण्याचा. मग आमच्या दोघांच्या प्रेमाचा, .... सगळेच रंगव रे रंगरेजवा...

हा विरक्तीची पांढरा रंग सारा सारा रंगवून टाक, वसंत फुलवून टाक.... माझ्या त्याच्या रंगात बुडवून टाक रे मला...

तू तर साऱ्या जगाचा रंगरेजवा, तुला माहितीच आहेत साऱ्या जगाचे, अगदी माझ्या त्याचेही सारे रंग. मग माझी चुनरिच काय, मलाच रंगवून टाक ना त्याच्या रंगात.

इतके रंगव इतके रंगव की मी मी न राहिन, ना तो तो राहिल. असं रंगव रे रंगरेजवा....

Tuesday, March 3, 2015

सख्या रे ...२.कान्हा रे, नंद नंदन

( केदार रागातली एक चिज - कान्हा रे, नंद नंदन, " ऐकताना तीच ती राधा मला वेगळीच दिसली ती ही अशी... )

कान्हा, आणि तो दिवस आठवतो तुला?
मी पाणी भरायला निघालेले. अन अनयही बाजारात जायला निघालेला. आम्ही छान गप्पा मारत निघलेलो, अन अचानक कसा कोणजाणे विषय निघालाच .

अनय म्हणला , " पाणी भरून, लवकर जा घरी, आई ओरडत असते तुझ्या यमुनेवर रेंगाळण्याबद्दल..."

" का पण ? मी सारे काम उरकूनच येते ना? बसले जरा वेळ इथे तर काय झाल? तेव्हढच मन मोकळं होत रे माझं..."

" अग तसं नाही ग... मला काहीच नाही वाटत. पण आई उगाचच चिडते अन मारते न तुल. मग मला नाही बरं वाटत. मलाही लागतं ग ते..."

"हो आला मोठा माझी काळजी वाटणारा... सासुबाईंसमोर गप्प बसतोस ते रे ..." मी त्याचा हात धरून त्याला थांबवत म्हटलं

" असं नको ग बोलूस... तिच्यासमोर मी कधीच नाही बोलू शकणार, तुल माहिती आहे. पण म्हणून मला काही वाटतच नाही अस नाही न..."

खरं तर तो अगदी खरच बोलत होता, अगदी मनापासूनही... पण माझच चित्त थ-यावर नव्हतं. मला कळायच पण वळायचं नाही. अन मग आमची नेहमीची वादावादी सुरू व्हायची. आजही तसच झालं...

" काही नाही, तुझाही विश्वास नाही माझ्यावर..."

" राधे, हे असं नाहीये... तुला पक्क माहिती आहे. पुन्हा असं म्हणू नकोस ग..." असे म्हणून अनय तट्टकन उलटा फिरला अन बाजाराच्या दिशेने ताड ताड चालला गेला...

मी खाडकन जागी झाले, माझ्या मनातले बोलताना माझे भान हरवलेले... अनयला उगाचच दोष दिला मी....

कशी बशी यमुनेतिरी आले अन मट्टकन बसले.

चुकलच माझं. या सा-यात अनयची काहीच चूक नव्हती. पाठमो-या दूर दूर जाणा-या अनय कडे बघत त्याला साद घातली "अनय..."
मनातच म्हटलं, चुकले रे मी. तुला दुखवायचं नव्हतं मला....

अन मग माझ्या मनात दुखचे कढ भरभरून यायला लागले. मनात सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. अनेक वेळोवेळी तू माझी समजूत घातलेलीस. कितीतरी वेळा सगळा रोष स्वतावर ओढवून घेतला होतास. सासूबाईंनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना तूच योग्य ती अन माझी बाजू राखणारी उत्तरं दिली होतीस...सगळं सगळं आठवलं...

तुझ्याबद्दलच्या सा-या हळव्या भावना उचंबळून वर आल्या. सारा आसमंत भरून गेला; तुझ्या त्या समर्पणाच्या भावनेने. तुझी सारी घुसमट माझ्या समोर उभी राहिली. त्या क्षणी मला माझीच खूप खूप शरम वाटली. मी माझ्याच दुखात स्वताला वाहवते. तुझे दुख मात्र तू मनात अगदी आत ठेवतोस अनय. कसं कसं जमवतोस हे तू?

आता अनय आता दिसेनासा झाला. अन मग मी डोळे मिटले. डोळ्यातले सारे सारे सर्र्कन गालावर ओघळ्ले. "श्रीरंगा...." कधी मला माझ्या मनावर ताबा ठेवता येणार?

माझ्या मना वरच मी रागावले, मनाला म्हणाले,
" का रे, का छळतोस ?
किती उरापोटी आवरते मी.
अन तू असे वाहून घालवतोस?
आवरायला शीक रे, आवरायला शीक.
ठेवावे थोडे ओठात, पोटात अन उरातही ! "

अन डोळे उघडून बघितले.
तर कान्हा तू समोर उभा.... सारे सारे कळले असल्यासारखा उभा . किती समजतोस तू मला, माझ्या प्रत्येक गरजेला तू उभा असतोसच रे. मला समजावतोस, माझी प्रत्येक वेदना जणू तू भोगतोस.
इतकच नाही तर तिला हळूवार करून तुझ्या बासरीतून हळुवार बाहेर सोडून देतोस.
मला मोकळी करतोस दुखातून.
अन मला पुन्हा प्रेरणा देतोस नव्याने जगण्याची,....

कान्हा रे, नंद नंदन...
कान्हा रे...

Thursday, July 3, 2014

सख्या रे ...१. तू तू आणि तूच

जगातला तत्वनिष्ठ, बुद्धिवादी पण मानवतावादी चांगुलपणा - लहानपणी यालाच कृष्ण मानलं अन आता नास्तिक असले तरी शेवटी तो सखा असण्याशी मतलब ना; मग त्या नावाला हरकत कसली ? 
__________


माझी बालपणीची ही पहिली आठवण असेल. मला आठवतं की आई मला हाक मारून उठवत असे. एकीकडे ती करत असलेल्या पुजेचा दरवळ, घंटेचा नाद, निरांजनाचा मंद पिवळसर उजेड, आणि साखरझोपेतून डोळे किलकिली करणारी मी. मग पोटावर पालथे पडून आईची पुजा बघत बसायची. आई काहीबाही बोलत असायची... "बघ ताई उठून आवरून शाळेत गेली पण ! हा तुझा बाळकृष्ण बघ आंघोळ पांघोळ करून कसा तयार झालाय..... " ....आणि काय काय..... मी मात्र तिच्या हातातल्या लखलखणा-या तुला पहायची. ती तुला ताम्हणात घ्यायची, तुला आंघोळ घालायची, पुसायची, गंध लावायची,... आणि अजून काय काय. अन तू माझ्याकडे पाहून खट्याळ हसायचास....  अन मग सुरू व्हायचा  माझा दिवस ! तेव्हापासूनच, तू माझा;  ही जाणीव लख्ख कोरली गेलीय बघ !

मग आठवतं एकदा कधीतरी मी आईकडे हट्ट धरला, मलाही करायचीय पुजा. मग तिने तुला माझ्याकडे दिलं अन म्हणाली, "घे हा तुझ्याच वेळी आलेला, मग तुझाच तो. कर त्याची पुजा!" मग तुझे लाड करण्यात बाळपणीचा काही काळ लोटला.

नंतरची आठवण आहे ती एका वेगळ्या स्वरुपातली. माझा सगळ्यात मोठा दादा, चुलतभाऊ आलेला. माझा अगदी लाडका दादा अन मी पण त्याची खूप लाडकी. मी असेन ५-६ वर्षाची. जवळजवळ अकरा वर्षांचे अंतर आमच्यात. गुजराथहून कोल्हापूरचा, रात्रभरचा प्रवास करून आलेला तो. जेवणं झाली अन दुपारी तो गाढ झोपला. माझी मधली बहीण थोडी खट्याळ. तिने आंब्याच्या पेटीतली एक काडी घेतली अन त्याच्या कानाजवळ नेली. त्याने झोपेतच कुस बदलली. मला हा खेळ वाटला, आवडला. मग मी पण काडी घेतली अन त्याच्या  कानाजवळ नेली. आमचा हा खेळ त्याची झोप उडवायला पुरेसा ठरला. अगदी शांत असणारा दादा खवळला अन आम्हा दोघींना पकडायला धावला. मोठी बहीण सुळ्ळकन पळून गेली. मला पळायचे कशाला हेच मुळी समजले नाही. अन दादाच्या तावडीत सापडले. मग त्याने दिला एक धपाटा ठेऊन. झालं.... मी धो धो रडायला लागले. अन मग झोपेतून जागा होत दादाला  काय घडले हे कळाले. चटकन त्याने मला जवळ घेतले म्हणाला , " सोन्या  असे का केलेस ग? मी दमलो होतो ना, झोपलो होतो ना मग? " " पन ताईने  केले तसेच मी पन केले. तु मलाच का माल्ले?" माझी ती बालीश तक्रार त्याला हसायला पुरेशी होती. मला कडेवर घेत म्हणाला " पण मी तुझा लाडका दादा न. मग असा त्रास देतात दादाला? " मी त्याच्या गळ्यात हात गुंफले अन "नाही" असा कबुली जवाब देऊन मोकळी झाले. मग कित्तीतरी वेळ दादा काहीतरी समजावत होता अन मी हुं हुं म्हणत त्याच्या गळ्यात हात टाकून त्याच्यातल्या तुला पहात राहिले.... काहीही न समजताच खूप काही आत उतरत गेले....

अन मग एक आठवण आहे ती  इचलकरंजीची. मी असेन साधारण आठ एक वर्षांची. बाबांची नुकतीच बदली झालेली. बँक खाली अन आम्ही  रहायला वर. शेजार असा काही नव्हताच. त्यामुळे ४ वाजले की मी खाली बाबांकडे जायची. अन बाबां पेक्षा बँकेतल्या सगळ्यांशी गप्पा मारायची. अन बाबा रागावले  की पलिकडच्या मैदानात खेळायला जायची. त्यामुळे बँकेतले सगळे माझे दोस्त होते.
एकदा बँकेतले सगळे  कोणाच्यातरी शेतावर जायचे होते. बाबांच्या स्कुटरवर बसून मीपण निघाले. तिथे शेतावर खूप मजा आली. खूप खाली वाहणारी कृष्णामाई, तिच्या काठावरची कोवळी वांगी कच्चीपण इतकी गोड लागली; अजूनही त्यांची चव जिभेवर आहे माझ्या. परत येताना मात्र मी झोपेला आले. दुपारचे उन पण खूप झालेले. वाटेत आमच्या गडलिंग काकांचे घर होते. बाबांनी त्याला सांगितले की "जा हिला तुझ्या घरी सोडवून ये, संध्याकाळी घरी घेऊन ये. " झालं आमचं बोचकं, गडलिंग काकांच्या घरी पोचलं. मी तर तिथे लगेच झोपून गेले.
जागी झाले तर आधी कळेच ना, आई कुठे गेली. डोळे चोळत बघितलं तर गडलिंग काका दिसले. ते म्हणाले, " ताई ही बघा माझी भैन, अन ही माझी आये . "  मला खुदकन हसूच आलं, एव्हढ्या मोठ्या काकांची एव्हढुशी आई बघून. पण त्या आजी मला खूप आवडल्या. ते घर केव्हढ वेगळच होतं. जमीन गार गार होती, हिरवी,पिवळी. डोक्यावर गवत होतं, मस्त गारेगार वाटलं मला. पण खूप भूक लागलेली. मग मी काकांना म्हटलं, " काका भूक लागलीय, खाऊ द्याना." तर त्या आजीबाई " अग्गोबय्या, आता कसं करायचं ? " असं म्हणाल्या. मला वाटलं आता या खाऊ देणारच नाहीत. तेव्हढ्यात काका म्हणाले, "दे ग माये, साहेब अन बाईसाहेब काय्बी मानत न्हाईत. .... " आणि काय काय .... मला नाही समजले. मग मात्र आजीबाई पटकन उठल्या अन मला  आवडायची ती भाकरी अन वांग्याची भाजी चकचकीत ताटलीत घेऊन आल्या. सोबत माझ्या आवडीचा गूळ्पण होता.  मला म्हणाली " खा गो बायो, खा, वाईच्च कोरड्यास तिखट लागेल, तर गुळाबरोबर खा हा का" अन माझ्या डोक्यावरून हात हिरवला, अन  तिच्या कपाळावर दोन्ही बाजुला ठेऊन खट्टक असा आवाज काढला. हे काहीतरी नवीनच होतं. मला खुदकन हसू आलं. अन मी गुळाचा खडा मटकावला. भाकरी अन भाजीपण खाली. थोडी तिखट लागत होती पण मस्त, मजा आली. पाणी प्यायला वर बघितलं तर त्या आजीबाईंच्या डबडबलेल्या डोळ्यातून तूच तर पहात होतास माझ्याकडे. अन मग  मला ती आजी एकदमच ओळखीची वाटली होती.

मग आठवते ती शाळेतली एक दुपार. गॅदरिंगच्या नाटकाची तयारी चालू होती. राजा, राणी आणि त्यांना धडा शिकवणारे प्रधानजी आणि विदुषक अशी काहीशी गोष्ट होती. दर वर्षी प्रमाणे मी पण होतेच नाटकात. या वर्षी मला विदुषकाचे काम मिळाले होते. त्यात मला दोन तीनदा मोठ्यांदा हसायचे होते. पहिल्या २-३ वेळा मी हसले मोठ्यांदा. पण मग मला कंटाळा आला. बाईंना मी म्हटले, " आता एकदम गॅदरिंगलाच हसेन, मला येतं हसता" बाईंनी मला समजावलं की, " असं नाही तुला सगळ्यांबरोबर प्रॅक्टिस करावी लागेल. जसे संवाद तसेच हसणं". पण मी तयार नव्हते, मी संवाद सगळे म्हणायचे, बाकीच्या सर्व अ‍ॅक्शन्स करायचे पण हसणे आले की म्हणयचे " आता मी हसले  हा हा हा" पण हसायचे नाही. दोन चार दिवस गेले. बाईंनी मला खूप समजावले. पण मी हट्टून बसले. शेवटी बाईंनी माझा रोल  बदलला. पण मला हा बदल नको होता. मी विदुषक करेन नाहीतर करणारच नाही नाटक अशी अडून बसले.
त्या दिवशी घुश्श्यातच घरी आले. आईला लक्षात आले, काही तरी बिनसलेय. तिने मला विचारल्यावर रागात चुकून शब्द बाहेर आले, " नाटकातून मला काढून टाकलं. " " का पण ? " " मला नाटकात हसता येत नाही म्हणून " आईला हे फारच धक्कादायक होतं. माझ्या अभिनयावर तिचा फार विश्वास होता. तिने मला हसायला सांगिअलं, मग मी खुन्नस म्हणु तिला खदाखदा हसून दाखवलं. आता तर तिची पक्की खात्री झाली. बाईंचीच काहीतरी चूक झालीय. झालं. माझ्या आईला अन्याय , तोही आपल्या मुलींवर झालेला अजिबात खपायचा नाही. कर्मधर्म संयोगाने माझ्या मोठ्या बहिणीलाही नाटकात महत्वाचा रोल मिळालेला. आणि  त्यांचा वर्ग तीन अंकी नाटक बसवत होता. अन त्याची तयारी जवळजवळ एक महिना आधीपासून चालू होती. आईने फतवा काढला, "आरतीला नाटकात काम करता येत नसेल तर तिच्या मोठ्या बहिणीलाही येत नाही. ती पण नाटकात काम करणार नाही." तिला बिचारीला माझा हा सगळा आगाऊपणा माहितीच नव्हता, अन आई रागवेल म्हणून नंतर मीपण तिला काही बोलले नाही.
झालं, दुस-या दिवशी मोठ्या बहिणीने हा निरोप बाईंना कळवला. आता बाईंना कळेना, हा तिढा सोडवायचा कसा? शेवटी त्यांनी आईला शाळेत बोलावले. आई लगेच बाईना भेटली. सगळा गैरसमज दूर झाला. आई आधी थक्क झाली अन मग खूपच रागावली. आपल्या मुलीवर अन्याय होत नाहीये तर आपली मुलगी अन्याय करतेय हे समजल्याने ती भयंकर दुखावली अन रागावलीही. पण बाईंनी तिला गळ घातली "तुम्ही काहीही बोलू नका, मी आरतीला समजावते. "
मला एव्हढच समजल होतं की आई शाळेत आली अन गेली.  आमच्या तालमी एक मोठ्या हॉलमध्ये होत. तिथे बाईंनी मला एकटीलाच बोलावलं. आता मात्र मी थोडी घाबरले. आई आली,  मला न भेटता गेली, आता बाईंनी एकटीलाच बोलवलय....  हॉलमध्ये आता गेले तर फक्त बाईच होत्या, त्यांना " आत येऊ का" विचारलं. अन आत जाऊन खाली मान घालून उभी राहिले. दोन मिनिटं तशीच शांततेत गेली. मी हळूच मान वर करून बघितलं,..... माझ्या लक्षात आलं चुकलच आपलं,.... बाईंच्या डोळ्यातून तर तूच  निरखत होतास.
" नक्की काय झालं आरती , मला सांग बरं ..." " बाई मी चुकले, माझच चुकलं. बाई, मी रोज हसायला पाहिजे होतं, मी चुकले बाई,.... आता रोज नक्की हसेन, मोठ्या मोठ्यांदा ...." रडत रडत मी कबुली दिली; ती बाईंना आणि तुलाही.
बाईंनी चटकन जवळ घेतलं, प्रेमानं थोपटत म्हटलं " बरं असू दे, आता हसणार म्हणतेस न, मग हास बघू, रडतेस का? इकडे बघ, चल झालं गेलं गंगेला मिळालं. तुला तुझी चूक समजली ना. बसं. आता घरी जाऊन आईला नमस्कार कर, पुन्हा असं करणार नाही म्हण. मग सगळं त्या कृष्णार्पण ! " बाईंनी बरोब्बर तुलाच अर्पण केलं सगळं. मी पटकन वाकून तुम्हा दोघांना नमस्कार केला. बाईंनी माझे डोळे पुसले, एक टपली मारली अन म्हणाल्या " चल पळ वर्गात, हे फक्त आपल्या तिघांतच हा " " मला हसायला मिळेल न मग " मी बावरतच विचारलं. " असा विदुषक शोधून दुसरा मिळेला का आम्हाला ? हो ग बाई, तूच आमचा विदुषक " बाई हसत म्हणाल्या.  मला पुन्हा तुझा भास झाला त्यांच्यात. मग मी नाचत उड्या मारत वर्गात आले. घरी आल्यावर अर्थाच आईला आधी नमस्कार केला, आणि पुन्हा अशी चू़क करणार नाही असं सांगितलं. पण तरीही एक लक्षात आलं, शिक्षा म्हणून आई रात्री जेवलीच नव्हती. झोपताना पुन्हा तिच्या गळ्यात पडून कबुली दिली, बाईशी काय बोलले ते सांगितलं. तशी जवळ ओढून म्हणाली,  "खरं वागवं ग बायो, खरं वागावं.... शब्दानीही  कधी खोटं वागू नये." अन मग दुपारी सगळं मिळालेलं असूनही ती गंगा आलीच आईच्या डोळ्यात. अन मग माझ्याही. अन लक्षात आलं, आडून आडून तूही पाहतो आहेसच, अन डोळेही पुसतो आहेसच.

असाच भीडत अन भिनत गेलास तू. माझ्या अवतीभवती,  माझ्या सोबती अन माझ्या सवे. कधी माझ्यातला चांगुलपणा जागवत, कधी माझ्यातला वाईटपणा निपटून काढत, कधी जगातला चांगुलपणा दाखवत , कधी जगाच्या वाईटपणातून वाचवत.

आयुष्याच्या एका टप्प्यापर्यंत विचारपूर्वक नास्तिक बनले. आणि तरीही तू सापडत राहिलासच कशा कशात. एक मार्गदर्शक, एक  हितचिंतक, एक दिशादर्शक आणि एक सखा म्हणूनही.

भर पावसात, रात्री, सारी कडचे दिवे गेले असताना, रस्ता फूट- दिड फूट पाण्यात असताना,दारू पिऊनही मला " ताई घाबरू नका,  पाणी भरलेल्या रस्त्यातून गाडी सावकाश नेली की बंद नाही पडत " असे दर दुस-या मिनिटाला समजावणा-या आणि मला सुखरूप घरापर्यंत सोडवाना-या रिक्षावाल्या मध्ये, तू दिसलास.
बहात्तराव्या वर्षीही शिकण्याची उमेद घेऊन पदवी मिळवणा-या विद्यार्थ्यांतही तू दिसलास.
२ महिन्याचे पोर नव-याकडे सोपवून, मध्यात बाळाला पाजण्याची  परवानगी घेणा-या परीक्षार्थी विद्यार्थिनीतही दिसलास तू.
गरोदर पणात दोन महिने झोपून राहिलेल्या बायकोचे सारे प्रेमाने करणा-या नव-यात तूच तर दिसलास.
मुलगा जेमतेम नऊ महिन्याचा असताना मृत्युच्या भोज्याला शिवून परतताना, माझ्यातल्या जगण्याच्या उर्मीतही तू दिसलास.
लेकाच्या प्रत्येक हास्यात, बोळक्यात अन  त्याच्या प्रत्येक गळाभेटीतून तूच तर भेटत राहिलास.
कधी एखाद्या म्हातारबाबाच्या आशिर्वाद तूच होतास.
तर कधी मैत्रिणीने दिलेल्या हाकेल ओ देताना माझ्या आवाजात तूच तर बोललास.
मिळालेल्या प्रत्येक ज्ञानातून तूच भिनलास अन प्रत्येक कलेतून तूच तर पाझरलास.
आज पर्यंत तुझ्या सोबतीचा प्रवास इथे मांडतेय तेही तुझ्याच सोबतीने ना .....
सख्या, सख्या रे....