Showing posts with label संगीत. Show all posts
Showing posts with label संगीत. Show all posts

Tuesday, March 28, 2023

नैना बरसे...

नैना बरसे .. ची चित्तर कथा 


नैना बरसे रिमझिम रिमझिम

नैना बरसे बरसे बरसे

अधूरा हूँ मैं अफसाना
जो याद आऊँ चले आना
मेरा जो हाल है तुझ बिन
वो आकर देखते जाना
भीगी भीगी पलकें
छम-छम आँसू छलकें
खोयी खोयी आँखें हैं उदास
नैना बरसे रिमझिम रिमझिम
नैना बरसे बरसे बरसे

वो दिन मेरी निगाहों में
वो यादें मेरी आहों में
ये दिल अब तक भटकता है
तेरी उल्फत की राहों में
सूनी सूनी राहें
सहमी सहमी बाहें
आँखों में है बरसों की प्यास
नैना बरसे रिमझिम रिमझिम
नैना बरसे बरसे बरसे
-
कवी : राजा मेहंदी अलि खाँ
संगीत  : मदनमोहन
आवाज : लता मंगेशकर
चित्रपट  : वह कौन थी (1964)
दिग्दर्शक  : राज खोसला
निर्माता  : एन एन सिप्पी
स्क्रिन प्ले लेखन  : धृव चॅटर्जी
अभिनेत्री :  साधना
---

*नैना बरसे... ची चित्तर कथा*

"नैना बरसे.." या गाण्याच्या निमित्ताने लिहायचं तर फार आधी पासून सुरुवात करावी लागते. अगदी थेट १८५९ सालापासून ! का? ऐका तर मग.

१८५९ साली "विकी कॉलीन्स" या ब्रिटिश साहित्यिकांची “दि वुमन इन व्हाईट ” ही कादंबरी प्रसिद्ध झाली. एक रहस्यपूर्ण कादंबरी ! ह्या कादंबरीमधले नाट्य इतके प्रभावी होते की अनेक नाटक कंपनींना, अनेक चित्रपट निर्मात्यांना, अनेक टीव्ही चॅनल्सना इतकेच नव्हे तर एका कॉम्पुटर गेम्स डेव्हलपरलाही याने भुरळ घातली. अगदी १८६० पासून २०१८ पर्यंत यावर विविध कलाकृती होत आल्या आहेत.

सहा नाटकं (1860 पासून 2005 पर्यंत ) ;
1912 मधे पहिल्यांदा चित्रपट - अमेरिकन सायलंट मुव्ही, पुढे विविध देशांत आणि विविध भाषांत (अगदी हॉलीवूड मध्येही), एकूण किमान आठ चित्रपट यावर निघाले;
विविध देशांमध्ये सहा टिव्ही सिरियल्स निघाल्या (यातली अगदी अलिकडची २०१८ मधली); 
या कादंबरीवर दोन रेडिओ ब्रॉडकास्टिंग केली गेली; आजवर युट्युबवर या कादंबरीची किमान ४ वाचन आढळतात;
इतकंच नव्हे तर या कादंबरीवर आधारित अजून तीन स्वतंत्र कादंबरयाही लिहिल्या गेल्यात;
हे कमी झाले म्हणून की के एक कॉम्पुटर गेम डेव्हलपरने यावर आधारित एक गेमाही तयार केला आहे.

अशा या उत्कंठावर्धक कादंबरीकडे हिंदी चित्रपट सृष्टीचे लक्ष वेधले न जाते तरच नवल.

प्रसिद्ध दिग्दर्शक गुरुदत्त यांनी सुनील दत्त आणि वाहिदा रहमान यांना बरोबर घेऊन “राज” या चित्रपटाचा विचार सुरू केला. पुढे सुनील दत्त ऐवजी स्वत:च प्रमुख भूमिकेत राहून शूटिंग सुरु केले. परंतु काही शूटिंग झाल्या नंतर गुरुदत्त यांनी हा चित्रपट अपूर्णच सोडून दिला.

पुढे गुरुदत्त यांचे सहाय्यक राज खोसला यांनी या कथेवर विचार सुरू केला. मूळ कथेमधे काही महत्वाचे बदल करून ध्रुव चटर्जी यांच्या कडून नवी पटकथा त्यांनी लिहून घेतली. पुढे या पटकथेत मनोजकुमार यांनीही काही भर घातली. आणि “वह कौन थी” हा चित्रपट सुरू झाला.

एन एन सिप्पी हे निर्माते, दिग्दर्शक – राज खोसला, स्क्रीन प्ले लेखन - ध्रुव चटर्जी, संगीतकार - मदनमोहन, गीतकार - राजा मेहंदी आली खा, अभिनय – मनोज कुमार, साधना, हेलन, के एन सिंग, प्रेम चोप्रा अशी तंगडी कास्ट लाभलेला हा चित्रपट. बॉक्स ऑफिसवर तर यशस्वी झालाच शिवाय यातील संगीताने जनमानसवर जी भुरळ घातली ती आजतागायत!

मदन मोहन हे या चित्रपटापर्यंत;  न गाजलेल्या चित्रपटांचे संगीतकार म्हणून ओळखले जात होते. त्यांनी संगीत दिलेली अनेक गीते  लोकांच्या ओठी होती. पण चित्रपट यशस्वी होत नव्हते. पण "वह कौन थी" ने हा गैरसमज दूर केला. या चित्रपटातील एक से एक गीतांनी तो काळ  गाजवला. यातलेच एक महत्वाचे गीत "नैना बरसे.."

या गाण्याची पण एक मोठी कथा आहे, किंबहुना दोन कथा आहेत.

या गीताचे संगीत, ट्यून मदनमोहन यांना जवळजवळ १८ वर्ष आधी सुचली होती. पण "वह कौन थी" या चित्रपटाच्या आधी, कोणत्याच चित्रपटात ती वापरावी अशी परिस्थिती (सिच्युएशन) सापडली नव्हती. अन कोणतेच गीतकार त्या संगीतावर गीत लिहू शकले नव्हते. या चित्रपटात मात्र अशी संधी सतत होती. गीतकार राजा मेहंदी आली खाँ यांनी अत्यंत चपखल शब्द घेऊन अतिशय सुंदर गीत यावर लिहिले. तेच हे अजरामर गीत, नैना बरसे..

दुसरी कथा अशीच, पण जास्त मजेशीर. या गाण्यांचे एक शूट हिमाचलमधे, बर्फात व्हायचे होते. पण तोवर गाण्यांचे रेकॉर्डिंग झाले नव्हते. हे रेकॉर्डिंग मुंबईत होणार होते. ते होई पर्यंत हिमाचल प्रदेशांतले बाकीचे शूटिंग केले गेले. इकडे मुंबईमध्ये काही कारणांमुळे लता मंगेशकर गाण्यांच्या रेकॉर्डींगला येऊ शकल्या नाहीत. गाणे रेकॉर्ड करून तर पाठवणे भाग होते. हिमाचलचा बर्फ कमी होण्याआत गाणे शूट होणे भाग होते. मग मदनमोहन यांनी स्वत: हे गाणे गायले आणि मदनमोहन यांच्या आवाजातले "नैना बरसे..." हिमाचल प्रदेशात पाठवले गेले.

मदनमोहन यांना खात्री होती की आपण जसे बसवले आहे सूर अन सूर तसंच पकडून लता गाऊ शकेल.  

इकडे शूटींगला अजूनच धमाल आली. गाणे मदनमोहनच्या आवाजात आणि त्यावर अभिनय करतेय साधना! सगळ्यांची हसून हसून पुरेवाट. साधनाचे अभिनय कौशल्य पणाला लागले. हसू आवरून गंभीर चेहऱ्याने, एक प्रेम विराहिणी दाखवणे त्यातही बर्फाळ प्रदेशात साडीमधे, कोणतेही इतर गरम कपडे न वापरता अभिनय करायचा  होता. आजूबाजूच्या आमजनतेलाही हे गौडबंगाल कळेना. आवाज पुरुषांचा, गात फिरते बाई, नक्की कशाचे शूटींग चालू आहे ?  पण साधना, राज खोसला, सिनेमायफोटोग्राफर के एच कपाडिया यांनी सगळे निभावून नेले. याच कपाडियांना त्या वर्षीचे सर्वोत्कृष्ट सिनेमाटोग्राफर म्हणून फिल्मफेअर बक्षीस मिळाले. अर्थातच पुढे एडिटिंगमधे लताचे गाणे घातले गेले. (या चित्रपटातील एडिटिंगबद्दल अजून एक गंमत आहे, ती पुढे कधीतरी लिहेन)

तर अशी ही नैना बरसे.. या गाण्याची चितार कथा 😊  
----

---

Saturday, November 26, 2022

नैना ना माने...

सकाळी उठले तेच नैना ना माने मनात घोळवत. पण सकाळच्या गडबडीत ते शोधून लावणं काही जमेना. मग उगाचच कामं चुकू लागली, वाढीव कामं होऊ लागली. नको ती कामं निघू लागली. सगळच बिनसलं. मग म्हटलं मरो ती कामं. चक्क पसारा आसपास तसाच ठेवून फोन घेऊन बसले सरळ. आधी शोधलं नैना न माने मोरा. ते लावलं  अन पहिल्याच नैना वर मन डोलू लागलं. मनच काय सारं शरीरच नैनामय झालं. कुमारांचं गारुड मनावर काम करू लागलं. मनातली सगळी उलघाल, अस्वस्थता दूर कुठेतरी पळून गेली. मनभरून नैना बरसले. एक एक तान मनातला एक एक ताण सोडवत गेली. हलकं हलकं होत मन पिसासारखं अलगद विहरू लागलं. 

खरं तर सात मिनिटांची ही सफर पण सकाळची सगळी उलघाल संपली, एक नवा दिवस ताजा होऊन गेला. 

पुन्हा एक गोष्ट सिद्ध झाली, संगीताला टाळणं करायचं नाही. त्या त्या क्षणांचं मागणं पूर्ण करायचं. मग आनंदच आनंद! आता दिवसभर मनात वाजत राहिल नैना न माने... अन मग सगळं मनासारखं घडत जाणार!





Monday, April 24, 2017

घट घट पंछी बोलता...

"घट घट में पंछी बोलता" हे विणाताईंनी गायलेलं कबीरांचं भजन.

घट घट पंछी बोलता
प्रत्येकाच्या शरिरात अडकलेला आत्मा बोलत रहातो. मी अडकलोय, मला सुटायचय, उडायचय, स्वच्छंद उडायचय. पण मी अडकून पडलोय या शरिराच्या बंधनात. शरिरातला आत्मा सारखा बोलतेय, तडफडतोय, सुटायच मला, स्वच्छंद उडायचय....

आपही दंडी आपही तराजु, आपही बैठा तोलता
स्वत:चेच वागणे, स्वत:चेच नियम ठरवतोय आणि स्वत:च बसलाय तपासत.... आपणच अडकून बसला संसारात. कोणतीच व्यवधानं सुटत नाहीत, सगळ्या जबाबदाऱ्या एक एक करत तपासून पहातोय... आणि आतून सारखा तो बोलतोय, यातून सुटायचय, उडायचय, स्वच्छंद उडायचय

सब बन में सब आप बिराजे, जड़ चेतनामें डोलता
सगळ्या जगातल्या सगळ्या  गोष्टी करायच्यात. प्रत्येक गोष्ट करायचीय, अनुभवायचीय, भोगायचीय...या जड जगात अडकून पडतोय आणि तरीही त्याला सुटायचय, स्वच्छंद उडायचय...

आपही माली, आप बगिचा, आपही कलियाँ तोडता
मीच वाढवली सगळी नातीगोती, अन माझेच कुटुंब. आपणच वाढवलेली सगळी नाती, सगळे संबंध. वाढवलेल्या संसाराचा ताटवा... अन त्यातून फुललेल्या बंधांना सोडायचय.... सुटायचय, स्वच्छंद उडायचय...

कहत कबिरा सुनो भाई साधो, मनकी घुंडी खोलता
अरे कबिरा, ऐक ही हाक,  साधका ही हाक ऐक....  तुझ्या मनाची कवाडं  तूच उघडू शकणार आहेस... तुझी बंधनं तूच सोडवू शकणार आहेस.  उघड ती कवाडं, बाहेर पड,  उड, हो स्वच्छंद .....

Thursday, July 28, 2016

गुरुजी, जहाँ बैठु वहाँ छायाजी

https://youtu.be/p1MG9m68rxY
कुमारांचे हे अजून एक निर्गुणी भजन. फार मनाला आत आत कुठेतरी हलवून सोडणारं. ते मला समजलं असं:

गुरुजी जहाँ बैठु वहाँ छायाजी
सोहि तो मालक म्हारी नजराना आया जी

गुरुजी, मी जिथे स्थिरावु पाहिलं, तिथे तिथे त्या परम चैतन्याची सावली तुम्ही माझ्यावर धरलीत. तुमच्या स्नेहाची, आशिर्वादाची ती सावली!

गेरा गेरा झाड झाड शीतल छाया
म्हारा हो सत्गुरु देखन आया जी

प्रत्येक परिस्थितीमधे, प्रत्येक अनुभवामध्ये ही शीतल छाया तुम्ही दाखवत गेलात गुरुजी!

कुम्हाऱ्या जो धरती ये कलशा मंगाया
म्हारे सत्गुरु जी ने भेट चढाया जी

ज्याप्रमाणे कुंभार साध्या मातीतून सुबक, उपयुक्त मडके बनवतो, तद्वतच तुम्ही माझ्या सारख्या साध्या माणसाला घडवलेत आणि ते घडण्यातून मला त्या परम चैतन्याला समर्पित केलत.

तनभर ताला सबद भर कुंजी
म्हारे सत्गुरु जी ने खोल बताया जी

या नश्वर देहात, त्याच्या कर्मात मी अडकून पडलो होतो. अन शब्दांच्या अनुभवांच्या जाळ्यात सापडलो होतो. गुरुजी तुम्ही ह्या सगळ्याच्या चाव्या शोधून दिल्यात, त्यातून मुक्त करून, माझ्यातला मला दाखवलत.

जीव नगर में कांटे भरानु
म्हारा हो सत्गुरु जी ने शोध लगाया जी

जीवनाच्या वाटचालीत असंख्य अडचणी होत्या, दु:ख होतं. पण त्यातून सुख,  मार्ग कसा शोधायचा ते तुम्ही दाखवलत, शिकवलत.

दोही कर जोडु देवानाथ बोल्या
म्हारे केसर तिलक चढाया जी

दोन्ही हात जोडलेल्या- सारे कर्म अर्पण करून मुक्त झालेल्या अशा देवनाथाला तुम्ही मुक्तीचा केशरी तिलक लावलात, गुरुजी!

Thursday, March 17, 2016

मतवारो बादर आयो...

(माननीय वीणा सहस्रबुद्धे यांची ही चिज ऐकताना मनात आलेले ...
संध्याकाळ झाली. दिवसभर रणरणते ऊन आता उतरले, उधळलेला वारा, कोठून कोठून मेघ गोळा करू लागला. साऱ्या दिशा एक झाल्या. अंधारालाच दृष्टी मिळाली. सारा आसमंत काळी पैठणी नेसुन बसलाय.
सगळ्या ढगांचा एकच गूढ धीर गंभीर आवाज नुसताच घुमु लागला. पण त्यातून  त्याचा कोणतीच संदेश ऐकू येत नाहीये.

त्यातच गवाक्षाच्या किनारीवर कोकीळ येऊन साद घालू लागला. वेगवेगळ्या ताना घेऊ लागला. माझ्या मनातली हूरहूर जणु त्याने ओळखली. माझी हरप्रयत्ने समजूत घालु लागला. माझी संपलेली आशा पुन्हा जागी करू लागला. आपल्या सुरेल तानांनी अजून आशा दाखवू लागला. नको निराश होऊस, अजून रात्र आहे, येईल त्याचा संदेश. थांब धीर नको सोडूस , सांगू लागला. मला धीर शिकवत सुरेल ताना घेत राहिला.

मेघ मात्र माझी हूरहूर वाढवत अजून झाकाळून येत होता...

तशात त्या अंधारातच विजेची किनार चमकून गेली. माझ्या दु:खाच्या पैठणीचा झळाळला केशरी पदर... सोसाट्याच्या वाऱ्यात भरभरणाऱ्या साडीत चकाकणाऱ्या त्या शंकांनी, मन पुन्हा भरून गेलं.

खरच येईल का तो? की पुन्हा आजही विरहच आहे सोबतीला? मनातला एकटेपणा, विरागी एकटेपणा धीरगंभीर होत गेला. एक विरक्ती दाटून आली, त्या त्या काळ्या मेघासारखी ....

मीरेच्या मनाला अगदी ओळखीचीच ती....

Sunday, January 3, 2016

सख्या रे...४.एक लखलखीत रात्र

*तारुवा गिनत गिनत*
- अवल

(मुकुल शिवपुत्र यांची 
https://youtu.be/oSLU-r5f7J4
ही चिज ऐकताना जे वाटत गेलं ते असं...)

आणि ती ही रात्र आठवते सख्या...
तुझा निरोप आला अन सारी दुपार, संध्याकाळची वाट बघण्यात गेली. तू येणार...काय करू, काय नको होऊन गेलं.तुझ्या येण्याला साजरं करण्यासाठी किती सोसा सोसाने सारे सजवले, सजले... सजणेच जणु साजण होऊन आले!

अन दुपारची तलखी संपून मनातली गोड हुरहूर अंगभर, अंगणभर पसरत गेली, उतरणाऱ्या उन्हातल्या सावल्यांसारखी.
सारा आसमंत सायंकाळच्या सुरात मिसळून जाऊ लागला. हळुहळू मनातल्या साऱ्या आशा आकांक्षा, इच्छा फुलून वर येऊ लागल्या, मन सुगंधित करू लागल्या. जणु अंगणातली सारी फुले एकाच वेळी उमलली होती.

हळुहळू सुर्याने आपला पसारा आवरला, उन्हाचा झळझळीत अंगरखा गोळा केला, केशरी उपरणेही हळुच आवरून सावरून घेतले . आता तर तो मार्गस्थही झाला...
घर आवरून झाले, स्वत:चे आवरून झाले पण मन.. त्याला आवरणे अवघड होऊ लागले. आत्ता येशील तू, अगदी कधीही तुझी चाहुल लागेल...
सुर्याचा प्रत्येक काढता पाय, तुझी चाहुल देत होता. अन मग तो अगदीच पलिकडे गेला.
हळुहळू शुक्राची चांदणी दिसू लागली...
चमकू लागली...

सायंकाळ अशीच निघून चालली. तुझी चाहुल हुलकावणीच देत राहिली. अरे श्याम न तू? येण्याचा निरोप पाठवूनही ही शाम अशीच धुडकाऊन की दिलीस?
शुक्राची चमकणारी प्रत्येक कला मला वाकुल्या दाखवू लागली. अन मग आल्याच तिच्या  सगळ्या सख्या, एकएक करत. कितीतरी चांदण्या फुलल्या वरच्या अंगणात. तू मात्र नाहीस... माझ्या मनाच्या अंगणात मात्र नुसता अंधार...

हळुहळू रात्र भरात आली. सारीकडे अंधार भरत गेला. तुझी वाटही कशी पाहू? तिथेही सारा अंधार दाटून आला. अन आता तर ती वाटही अंधूक दिसू लागलीय. मनातल्या वाटांनाही डोळ्यातले पाणी पुसु पुसू लागले...
शेवटी त्या वाटेकडे पाठ फिरवून वरती सज्यामधे आले. अन मग तू नाही तर तुझा आठव कितीतरी अंगांनी, दिशांनी अंगावर दाटून आला. रातराणी, प्राजक्त मला घेरु लागला. सारी रात्रच वेढुन वेढून घेऊ लागली.

रात्र अजून चढली. किती मोजू, किती मोजू आकाशातल्या तारका? एकही तारका मला तारेल अशी आशा दिसेना. कधी येणार तू सख्या...
पूर्वेचे तारे मोजून झाले, झाकोळलेली पश्चिमही उजळली ताऱ्यांनी. तेही मोजून झाले... तू मात्र नाहीसच...

साऱ्या विश्वाला आपल्या रंगात रंगवून टाकणारा सदारंग तू! मला मात्र न रंगवता तसेच ठेवलेस आज, निरंग!
मीही या निशे सारखी, तारे मोजत अशीच ताटकळत पडून राहिले. पण तू नाहीच आलास, अखेर पर्यंत...

ती रात्र कशी विसरू रे सख्या? मोजलेला प्रत्येक तारा, घेतलेला प्रत्येक सुगंधी पण जखमी करणारा श्वास, ओघळणारा प्रत्येक खारा मोती, एक न भरणारी लखलखीत जखम... आठवत राहते अन छेडत राहते माझी सारी ती रात्र!
अजून त्या लखलखत्या ताऱ्यांसारखीच लख्ख आठवते ती रात्र, सख्या रे ...
ती रात्र, सख्या रे...
सख्या रे...
---

Friday, July 3, 2015

शून्य गढ शहर, शहर घर बस्ती

हे कुमारांनी गायलेलं गोरखनाथांचे एक निर्गुणी भजन.

शून्य गढ शहर, शहर घर बस्ती
कौन सूता कौन जागे है
लाल हमरे हम लालान के
तन सोता ब्रह्म जागे है


जल बिच कमल, कमल बिच कलियाँ
भँवर बास न लेता है
इस नगरी के दस दरवाजे,
जोगी फेरी नित देता है

तन की कुण्डी मन का सोटा
ज्ञानकी रगड लगाता है
पाञ्च पचीस बसे घट भीतर
उनकू घोट पिलाता है

अगन कुण्डसे तपसी ताप
तपसी तपसा करता है
पाञ्चो चेला फिरे अकेला,
अलख अलख कर जपता है

एक अप्सरा सामें उभी जी,
दूजी सूरमा हो सारे है
तीसरी रम्भा सेज बिछावे,
परण्या नहीं कुँवारी है

परण्या पहिले पुतुर जाया
मात पिता मन भाया है
शरण मच्छिन्दर गोरख बोले
एक अखण्डी ध्याया है
              -गोरखनाथ
-------------------------
मला समजलेला भावार्थ :
नाथ संप्रदायातील  शून्य तत्वज्ञानानुरुप सगळे शून्यातून निर्माण झाले आहे अन सर्व शून्यातच विलिन होणार आहे.
हे शरीर जणु एक शहर आणि त्यातील आत्मा जणु वस्ती
ही वस्ती, आत्मा कोणाचा निद्रिस्त तर कोणाचा जागृत.

देव माझा अन मी देवाचा.
जेव्हा माझे शरीर- मी पण संपते, तेव्हा माझा आत्मा -ब्रह्म जागृत होते.

जीवनाच्या जलाशयात मोहाची कितीतरी कमळे, अन त्याची कितीतरी विलोभनीय रुपं. या मोहातून फिरताना आपल्या दाही इंद्रियांवर पहारा देत योग्याला पुढे जायचे असते.

शरीररुपी खला मधे आत्मारुपी बत्याने खल करत योग्याने ज्ञानाचा शोध घेत राहिले पाहिजे. सृष्टीतील पाच तत्व आणि बुद्धीची 25 क्षेत्र यांचा वेध घ्यायचा प्रयत्न करत राहिले पाहिजे.

या साऱ्या ज्ञानसाधनेच्या अग्नीमधे तप करत पाच तत्वांशी झगडत आमि स्वत:शी सतत संवाद करत योग्याने प्रयत्न चालू ठेवला पाहिजे.

योगी तपश्चर्या करत असतो तशी माया ती मोडण्याचा प्रयत्न करत असते. एक, दोन नव्हे तर अगदी रंभे सारखी मोहमायाही समोर उभी राहते.

आणि विवाहा आधीच पुत्रप्राप्तीचा आनंद त्याला मिळाला. पण अशा सापळ्यात गोरखला अडकायचे नाही, अन म्हणून तो आपल्या गुरुंना, मच्छिंद्रनाथांना मदतीचे आवाहन करतो आहे आणि स्वत:ला सावध राहण्याचा इशारा देतो आहे.
--------------
हे सारे एकताना मनात आलेले विचार...

म्हटले तर सगळेच शून्य, अन म्हटले तर सारे सार इथेच. म्हटले तर शहर, म्हटले तर गुढ गढी. एकच शरीर, एकच मन, एकच आत्मा, एकच कुंडलिनी, एकच ब्रह्म, एकच बस्ती... पण शून्य, जोवर हे सगळे जागृत होत नाही, तोवर सारे सारे शून्य.

म्हटले तर कितीतरी मोह, कितीतरी प्रलोभने, कितीतरी भोग, कितीतरी तत्व, कितीतरी विचार अन कितीतरी तत्वज्ञानं अन कितीतरी ज्ञानाची द्वारे,  अन अजून कितीतरी अनुभूती....

आणि तरीही सगळे पुन्हा शून्यातच विलिन होणारे. शून्यवतच सगळे...
शेवटी हा सगळा आतल्या आतला संवाद, वाद, खल, झगडा... आपला आपल्यालाच सोडवायचा. आपलाच पहारा आपल्यावरच. आपलीच मोहमाया आपणच दूर करायची. आपल्या सुखाच्या मर्यादा ओलांडायच्या आपणच, अगदी पार व्हायचे, आपले आपणच.

 अधिकार नसतानाच सगळे सुख मिळवण्याची हावही आपली अन ती आवरण्याची धडपडही आपलीच. स्व निर्मितीचा आनंद, त्या निर्मितीवरचा अधिकार, हक्क  हाही सगळा एका भोगाचाच भाग.... तो ही पुन्हा शून्याकडेच जाणारा.

ह्या शून्यप्राप्तीचा हा प्रवास, तो ही शून्यच... फक्त त्याची जाणीव होणं, राहणं, सतत ठेवणं हे त्या शून्याचे संपूर्णत्व. ते अंगी येणे म्हणजेच शून्यत्व...

शून्याकडून शून्याकडची वाट मात्र फार फार मोठी....

Wednesday, March 25, 2015

सख्या रे... ३. रंग दे रंग दे, रंगरेजवा

कुमार गंधर्व यांची मधमाद सारंग मधली ही चिज

रंग दे रंग दे रंगरेजवा
जैसी मोरी पिया की पगरिया
रंग दे मोरी सुरंग चुनरिया
जैसी मोरी पियाकी पगरिया

त्यावर काहीबाही सुचलं...
------------------

 किती तो उकाडा.... अगदी काहिली होतेय जिवाची. त्यात तोही नाही जवळ. एकच सुखाची गोष्ट, तो येणार आहे, लवकरच... त्याच्या आगमनाची वार्ताही किती सुखावणारी... जणुकाही ग्रीष्मातल्या दुपारी वळवाची चाहूल. आता इतक्यात हे विरहाचे दिवस संपतील अन मग त्याच्या संगतीत नवीन वसंत फुलेल.

तो येणार, कशी सजवू स्वता:ला? कोणती नवीन वसनं आणू? कोणत्या रंगात रंगवू? ए, रंगरेजवा मला मदत कर ना... माझ्या त्याची पगडी कोणत्या रंगात असेल बरं? त्या रंगात रंगवून दे ना माझी चुनरिया.

कोणता रंग विचारतोस? अं.... असं कर सगळेच रंग आण तुझे अन सगळ्याच दे बरं रंगवून. तसंही तो आला की सारेच रंग फुलणार आहेत... आधी थोडा भांडणाचा मग थोडा रुसव्या फुगव्याचा, तो इतके दिवस आला नाही म्हणून थोडी तर रुसणारच ना मी?
मग थोडा त्याच्या समजूत घालण्याचा. मग आमच्या दोघांच्या प्रेमाचा, .... सगळेच रंगव रे रंगरेजवा...

हा विरक्तीची पांढरा रंग सारा सारा रंगवून टाक, वसंत फुलवून टाक.... माझ्या त्याच्या रंगात बुडवून टाक रे मला...

तू तर साऱ्या जगाचा रंगरेजवा, तुला माहितीच आहेत साऱ्या जगाचे, अगदी माझ्या त्याचेही सारे रंग. मग माझी चुनरिच काय, मलाच रंगवून टाक ना त्याच्या रंगात.

इतके रंगव इतके रंगव की मी मी न राहिन, ना तो तो राहिल. असं रंगव रे रंगरेजवा....

Thursday, December 6, 2012

"आनंद मना .... "

आज कोण कुठले आप्त मला भेटायला सकाळी सकाळी आले.
उठलेच ते काहीशी वेगळ्या मूड मध्ये. आज पर्यंतच्या अनेक त्रासदायक आठवणी उगाचच आठवू लागल्या.

आयुष्यात न आकारलेले आकार, डोळ्यासमोर फेर धरू लागले.उगाचच एक अस्वस्थता तार छेडू लागली. जे जे हाती आले नव्हते, कधी निसटले होते, कधी सोडावे लागले होते, कधी मनापासूनही सोडले होते; ते सगळे भोवती फेर धरून वाकुल्या दाखवत होते.

तशीच सारी कामे करत होते, अन उगाचच खंतावर होते, चिडचिडत होते...

अगदी नवरा, मुलगा दोघांशीही त्रासिक सूर छेडत होते,... अन असंच काही काही....

अन मग एक क्षण आला, बुद्धीला समजलं, काहीतरी हुकतय, मन अवखळ, चिडचिडं, वाभरं, लहान मूल झालय.

त्याला ताळ्यावर आणायचं तर कुमारांशिवाय कोणता उपाय?

एकीकडे कामं करतानाच एक क्षण मोकळा काढला अन कुमार लावले. अन कुमार वेगळेच भिडले आज...

जणु बाबा पुन्हा भेटले....

चिज होती मालकंस मधली "आनंद मना..." ( शक्य झालं तर शेजारी हे लावा, अन मग खालचे वाचा )

मनातले सगळे नैराश्याचे तांडव हळूहळू शांतावत गेले.
मनातला राग, उद्वैग, निराशा सगळं सगळं जणू त्यांना कळलं होतं.
ये गं बायो, किती खंतावशील? बस जरा जवळ. शांत हो बायो. नाराज नको होउस, होतं असं कधी कधी...

ये, ये,... " बैस जरा. जाउ दे सगळं... ठेव डोकं मांडीवर. थोपटत म्हणाले, हो गं, कळतं मला तुझं दु:ख, चिडचिड, उद्वेग....

"आ sssss, दे... " दे, तुझी सारी अशांतता मला दे....,

"ये ना,..., दे ना..." मला सारी तुझी दु:ख! अन थोपटत मला समजावत राहिले..... मला शांत करत राहिले,....

"हां..." समजतय मला....

"ना...." ही गं, तुझं नाही काही चुकलं.... बरोबर आहे गं, होतं असं,....

"ये ही...." रित है दुनियाकी....

" ना..ना...." रडू नको,.... जाऊ दे सारं............ जाऊ दे सारं.....

"हं,..." बास आता....उठ,...., शांत हो, स्वतःला सावर,....

"नैन न ना,..." चल डोळे पूस... आवर बाई तुझं दु:ख,...
"ये ही,..." ये जवळ ये.

हळूवार गोंजारून समजावत राहिले, अगं बाई जरा आनंद मनव ग सगळ्याचा.
आर्जवं करत राहिले, "आनंद मना, मना,..."
समजावत राहिले, "आनंद मना..."

जवळ घेऊन माझ्या मनातल्या सगळ्या उद्वेगाला आपल्या एका कवेत घेऊन दुस-या कवेत मला घेऊन म्हणाले, "हं,..." अगं हेही सगळे तुझेच आहेत, त्यांना घे जवळ, स्विकार. झिडकारू नकोस. स्विकार. स्विकार सारं, अगदी दु:खही....

जसं सुख आपलं तसच दु:खही आपलच गं. यांच्यामुळेच तर तू सुखाला जास्त चांगलं समजू शकलीस ना? हे सगळे तुझेच, तुलाच मिळाले याचाही आनंद मनव बायो! त्यांना आपलं मान, ते आपल्याच घरी आले हे मान, त्याचा आनंद मान; "मोरा जो पिया घर आया, आनंद मना... "

त्यांच्याकडे बोट दाखवून म्हणाले, बघ ते सगळे हळुहळू सुसह्य झालेत, अन दुसरीकडे लक्ष वेधत म्हणाले, ते बघ सगळा आनंद, समाधान आहेच की तुझ्या आयुष्यात, बघ "चहु दिस सब चमकत", सा-या दु:खांच्या पुढे बघ, या इथे सगळा आनंद तर फुललाय " रतिया खिल गयो बगिया"

सारीकडे आनंद, समाधान, सुख पसरलय त्याकडे बघ गं, दु:ख तर असतच ना? पण त्यामुळे तर आनंद लखलखून दिसतो ना, बघ "चहु दिस सब चमकत" जीवनातल्या काट्यांसाठी वाटच चालायची थांबवलीस तर "रतिया खिल गयो बगिया" कशी पहायला मिळाली असती सांग बरं!

अन मग अतिशय प्रेमाने डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, शांत हो बया, अगं असच असतं सारं आयुष्य! उद्गवे, राग, निराशा या सा-याला अगदी तांडव करून निपटलस ना? मग आता कशाला हताशा?

मान्य हे तांडव करताना थकली, दमली, हळवी झालीस. हे स्वाभाविकच ना? पण आता शांत हो, आयुष्याला भीड, जग, "आनंद मना .... "


Thursday, January 19, 2012

एशियन फिल्म फेस्टिव्हल २०११ : भाग २

अ‍ॅन्थनी गोन्साल्व्हिस : हिंदी चित्रपट संगीतातील जादूगार



जुन्या हिंदी चित्रपट गीतांची मी, आमच्या पिढीतल्या सगळ्यांसारखीच वेडी. मला आठवतं तेव्हापासून अभ्यास करताना शेजारी रेडिओ नाही अशी आठवण नाहीच. तशात आईलाही गाणी आवडत असल्याने दुपारच्या तिच्या निवांत वेळेत अन रात्री झोपताना तिने बारीक आवाजात, इतरांना त्रास होउ नये अशा आवाजात लावलेल्या गाण्यांची मोहिनी अजून रुणझुणतेय कानात. नेहमी वाटायचं की या जुन्या गाण्यात असं काय आहे की ज्याने आपण इतके त्यात हरवून जातो ? इतका 'सुकुन' मिळतो या गाण्यांनी ? इतके हळवे होतो आपण ? इतकी मन असण्याची जाणीव होते ? हळुवारपणा, मन उचंबळुन येणं, डोळ्यात पाणी येणं, मन भरून येणं, अगदी धो धो रडावसं वाटणं, प्रफुल्लित होणं, या आणि अशा सगळ्याच भावना कशा बरं मनात निर्माण होतात?
बरं संगीतकारांचे हे गारुड म्हणावं तर त्याच संगीतकारांची काही गाणी अगदी नेमके पणाने सांगायचं तर त्यांची १९६५ नंतरची गाणी का बरं अपील होत नाहीत, तेव्हढी ? मी आपलं मानून घ्यायची की बहुदा हे सगळे आपल्या मनाचेच खेळ आहेत, किंवा आपल्या त्या "स्वप्नील" वयाचा तो परिणाम असावा. पण मग कधी तरी या विषयावर माझ्याहून ८ वर्षांनी मोठ्या मैत्रिणीशी अन माझ्याहून १५ -१६ वर्षांनी मोठ्या मैत्रिणीशी बोलणे झाले तेव्हा त्या दोघींचाही असाच काहीसा अनुभव होता. अन मग मनात हे प्रश्न चिन्ह ठेऊन हा विषय तसाच मनात राहून गेला.

परवा एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सर्वाचे उत्तर अचानक मिळाले. सत्तावीस डिसेंबरला आधीच्या दोन अन नंतरच्या एका चित्रपटामध्ये मला रस होता. त्यांच्या मध्ये काही डॉक्युमेंट्रीज होत्या. मुळात मला अशा डॉक्युमेंट्रीज पहायला खुप आवडतात. कधी कधी अगदी वेगळे विषय, वेगळी माहिती, काही छान, अचानक मिळून जाते. त्यामुळे या डॉक्युमेंट्रीज पहायच्या हे ठरवल होतं. फक्त नाव मात्र मला न आवडणारे होते, रादर मला मिस गाईड करणारे होते. "अ‍ॅन्थनी गोन्साल्व्हिस". अमिताभचे ते गाणे आता पर्यंत माझ्या अगदी डोक्यात जायचे. त्यामुळे मी जरा साशंकच होते. अन मग मिळाला तो एक सुखद धक्का ! माझी सगळी मतच बदलून गेली

अ‍ॅन्थनी गोन्साल्व्हिस, गोव्यातला एक संगीतप्रेमी. वयाच्या बाराव्या वर्षापासूनच का मुलगा गोव्यातल्या चर्चेसमध्ये संगीताचे संयोजन करायला लागला. संगीताच्या प्रेमाने तो पंधराव्या वर्षी मुंबईत आला. अन सुरू झाले एक मॅजिकल युग ! आपल्या व्हॉयोलिनच्या स्वरांनी सगळ्यांना त्यांनी वेड लावले. अवघ्या सोळाव्या वर्षी मुंबईतील जवळजवळ सर्व मोठ्या संगीतकारांकडे त्यांनी आपले व्हॉयोलिन छेडले. अनिल विश्वास, शाम सुंदर, नौशाद, खय्याम, मदन मोहन, अशा दिग्गजांनी त्यांच्यातल्या कलाकाराला दाद दिली.

चर्चमधला संगीत संयोजनाचा अनुभव पाठीशी असल्याने अ‍ॅन्थनी गोन्साल्व्हिस लवकरच म्युझिक अ‍ॅरेंजर म्हणून पुढे आले. हिंदी चित्रपट गीतांचे पहिले म्युझिक अ‍ॅरेंजर म्हणून त्यांना मानले जाते. हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये ऑर्केस्ट्रा प्रथम आणला तोही त्यांनीच, अन तबल्याचा पहिला वापरही त्यांनीच हिंदी चित्रपट संगीतात केला. जवळजवळ २०० चित्रपटांमध्ये हजारों गाणी त्यांनी अ‍ॅरेंजर म्हणून कंडक्ट केली.
१९६५ मध्ये अमेरिकेतून बोलावणे आल्यामुळे तेथे ते संगीताचे शिक्षण देण्यासाठी गेले. अन हिंदी चित्रपट संगीताची मेलडी विस्कटलली.

अशा या 'द म्युझिकल लिजंड ' वरची ही डॉक्युमेंट्री ! १९४२ ते १९६५ या काळातले हिंदी चित्रपट सृष्टीतले त्यांचे योगदान स्पष्ट करणारी ही फिल्म दिग्दर्शित केली आहे अशोक राणे यांनी. ही फिल्म घेताना अशोकजींनी खरच खुप मेहनत घेतली आहे. त्यात लाईटचा केलेला उपयोग वाखाणण्यासारखा. ही सगळी माहिती ऐकताना, अ‍ॅन्थनी गोन्साल्हिसना बघताना एकी कडे आपण चकीत होत जातो, विषण्ण होतो, मनात हूरहूर वाटत राहते, एक काहीतरी हुकलं अशी चुटपूट लागून राहते. त्यांनी अ‍ॅरेंज केलेली गाणी ऐकताना एक नॉस्टाल्जिक फिल येत राहतो. खरच फार फार सुंदर केली आहे ही डॉक्युमेंट्री अशोक राणेंनी ! धन्यवाद अशोकजी !

जेव्हा केव्हा ही फिल्म बघायला मिळेल अजिबात चुकवू नका. त्या स्वप्निल काळाची ज्यांना ज्यांना भूल पडली होती, आहे त्यांनी या लिजंडला मानाचा मुजरा करायसाठी तरी नक्की बघा.

खरं तर एशियन फिल्म फेस्टिव्हल झाल्यावर लगेचच हे लिहायचं होतं. पण दुसर्‍या कामात अडकले. अन याला उशीर झाला. पण आज पेपरमध्ये वाचलं, ते गेले. अन मग राहावलं नाही. माझी ही त्यांना मनापासून श्रद्धांजली ! ज्यांनी आमच्या अनेक भावना जोपासल्या त्या महान संगीत अ‍ॅरेंजरला प्रणाम !

(मला इथे एक प्रामुख्याने नमुद करायचे आहे की या सर्व लिखाणाचा उद्देश त्या त्या संगीतकारांना कमी लेखण्याचा नाही उलट त्यांच्या संगीतातली ताकद ओळखण्याचे श्रेय योग्य त्या व्यक्तीला मला द्यावे वाटतेय. त्या महान व्यक्तीची मला ओळख नव्हती, तशी ज्यांना नसेल त्यांना ती व्हावी, केवळ हाच उद्देश या लेखनाचा आहे. )

Sunday, January 8, 2012

काळालाही गुंगवणारा कलाकार

आताच 'स्वर झंकार' ऐकून येतेय. अजून गुंगी उतरायचीय अन तरीही लिहितेय...

आताच एका महान कलाकाराला ऐकून येतेय. हरिप्रसाद चौरासिया नावाचे बासरीचे गारुड ! ९.४० ला आधीचा राग संपवून दुसरा सुरू करताना ते म्हणाले की "१० वाजता थांबायचं आहे , हे मला माहिती आहे." अन क्षण भर थांबून म्हणाले, "पण मी नाही थांबणार !" नर्म हास्याचा फवारा उठला. अन 'दुर्गा'चे सूर उमटले.

अवर्णनीयाचे कसे वर्णन करू ? मध्यात त्यांनी एक सुरावट वाजवली ... अहाहा... जणू कृष्णाच्या मुरलीतूनच उतरली होती....

बासरी हातात धरायच्या आधी अन नंतरही मध्येच बासरीवरचा हात खाली घेतला की थरथरत होता ! पण बासरीवर आल्यावर छे, नाव नको ! वय वर्ष ७३ पण बासरीतून उमटणारी प्रत्येक तान काय वर्णू ?
सोबत होते विजय घाटे. हरीजींचा मोठे पणा किती ? तबल्याला मध्ये मध्ये संधी देताना स्वतः वाजवत होते, अगदी साथीला त्यांचे शिष्य असूनही,!

त्या दोघांच्या जुगलबंदीने बहार केली. पण शेवटी विजयजींनी हार मानली दोन स्वरांना हे कसे काढू तबल्यातून म्हणून

दुर्गा कित्ती वेळ कानात, मनात बरसत राहिला असा ! अन शेवटची धून पावन पावन करून गेली सगळ्यांनाच ! सहज घड्याळाकडे लक्ष गेलं... हं अकरा नाही नाही ....पण छे, हे कसं शक्य होतं ? घड्याळात चक्क फक्त दहा वाजले होते ! डॉट दहा ! केवळ २० मिनिटात एक दिग्गज कलाकार काय करू शकतो !

हो, हो; त्यांनी नक्कीच काळाला थांबवले होते ! हो नक्कीच !