Saturday, November 26, 2022

नैना ना माने...

सकाळी उठले तेच नैना ना माने मनात घोळवत. पण सकाळच्या गडबडीत ते शोधून लावणं काही जमेना. मग उगाचच कामं चुकू लागली, वाढीव कामं होऊ लागली. नको ती कामं निघू लागली. सगळच बिनसलं. मग म्हटलं मरो ती कामं. चक्क पसारा आसपास तसाच ठेवून फोन घेऊन बसले सरळ. आधी शोधलं नैना न माने मोरा. ते लावलं  अन पहिल्याच नैना वर मन डोलू लागलं. मनच काय सारं शरीरच नैनामय झालं. कुमारांचं गारुड मनावर काम करू लागलं. मनातली सगळी उलघाल, अस्वस्थता दूर कुठेतरी पळून गेली. मनभरून नैना बरसले. एक एक तान मनातला एक एक ताण सोडवत गेली. हलकं हलकं होत मन पिसासारखं अलगद विहरू लागलं. 

खरं तर सात मिनिटांची ही सफर पण सकाळची सगळी उलघाल संपली, एक नवा दिवस ताजा होऊन गेला. 

पुन्हा एक गोष्ट सिद्ध झाली, संगीताला टाळणं करायचं नाही. त्या त्या क्षणांचं मागणं पूर्ण करायचं. मग आनंदच आनंद! आता दिवसभर मनात वाजत राहिल नैना न माने... अन मग सगळं मनासारखं घडत जाणार!





No comments:

Post a Comment