Sunday, October 3, 2021
सागरतीरी
Wednesday, June 2, 2021
सजण दारी उभा...
काल पुन्हा सजण दारी उभा वाचत होते. खरंतर कितीदा तरी वाचले, ऐकलं आहे. सुरेश भटांचा त्यामागचा विचारही माहिती होता. मृत्युला कितीतरी जणांनी साजण म्हटले आजवर! म्हटलं तर ही प्रेयसीची धांदल; म्हटलं तर प्रेयसीची आर्तता ; आणि म्हटलं तर मृत्युची आलोचना ! हे सगळं माहिती असूनही काल हे शब्द वाचताना जास्त भिडत गेले.
खरच किती तयार असतो आपण त्यासाठी ? जगण्याच्या कितीतरी गोष्टी आपण पसरवून ठेवलेल्या असतात. किती तरी गोष्टी आवरायच्या राहिलेल्या असतात. अगदी सगळं जगलो म्हणत असतांनाही किती काय काय राहिलेलं असतं..
स्वत :च दिसणं, राहणं, अभ्यास, विचार, या सगळ्या स्वतःच्याच गोष्टी तरी आपण मनानी केलेल्या असतात का? आपल्या आपल्याबद्दलच्या अपेक्षा संपलेल्या असतात का? मी असं असं दिसलं पाहिजे, असं असं वागलं पाहिजे, असा अभ्यास केला पाहिजे, असा विचार केला पाहिजे, या सगळ्याच्या अपेक्षांचे ओझे उतरतच नाही डोक्यावरून. अगदी किती काय काय करूनही स्व बद्दलची आसक्ती काही उतरतच नाही. मीपणाची भूल काही उतरतच नाही...
या माझेपणातून बाजूला होऊन अजून खऱ्या मला कधी बघितलेच नाही. माझ्यातल्या दुबळ्या मनाला मृत्यूसाठी अजून तयारच केलं नाही. आयुष्यातल्या हरएक दुःखाला नीट समजून, नीट स्वीकारून त्या सगळ्यांना एकत्र करून; त्याचा लेखाजोखा मांडलाच नाही. माझ्यातला प्राण; जो त्याअन्तिम सत्याशी बांधलेला आहे; त्याचा अजून विचारच केला नाही. त्या अंतिम सत्याशी होणारी भावी भेट मी अजून अपेक्षितच केलेली नाही. समोर मृत्यू उभा आहे अन मी मात्र अजून जीवनातल्या सुखादुखां:शीच बांधलेली!
अक्ष पातळी : जाणीव नेणिवांची
(पातळी म्हणजे ज्या अक्षावर व्यक्ती उभी असते ती पातळी इथे अपेक्षित आहे. इंग्रजीत ज्याला एक्स ऍक्सेस म्हणतात तो! आणि अक्ष पातळी म्हणजे ज्या अक्षावर व्यक्तीचे डोळे असतात ती )
मागे एकदा एक सुंदर चित्रपट एका मित्राने सुचवला. कर्मधर्म संयोगाने तो टीव्हीवर बघायलाही मिळाला. "दि डेड पोएट सोसायटी" या नावाचा. त्यातली "बाकावर उभं करणं वा राहाणं" हि फ्रेज फारच भावली. अन मग अनेक गप्पांमध्ये ही फ्रेज "जा बाकावर" या स्वरूपात मी अनेकदा वापरली. खरंतर हि फ्रेज आपल्या शालेय जीवनातला एक वाईट, लाज आणणारी गोष्ट! पण या चित्रपटाने हीच गोष्ट एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलीय.
घरात मी सगळ्यात लहान. लहान असण्याचे अनेक फायदेही असतात पण त्याच बरोबर अनेक तोटेही ! मला आठवतं ते मोठ्या बहिणींनी माझ्या वयानुरूप लहान उंचीचा घेतलेला फायदा. मला हवी ती वस्तू हात वर करून उंच धरून ठेवणे, मुद्दाहून माझी खेळणी उंच टेबलावर ठेवणे. या अन अशा त्यांना गंमत वाटणाऱ्या पण मला भयंकर राग येणाऱ्या गोष्टी. त्यांना आता हे आठवणाराही नाही, पण माझ्या स्मरणात त्या घटना अगदी चित्रासारख्या ठसल्या आहेत. मोठं होत असताना त्यामागचा राग, हताशा गेली. नंतर तर घरात मीच सगळ्यात उंच झाले अन मग माझ्या उंचीचा सार्थ अभिमानच वाटत गेला. घर, शाळा, कॉलेज सगळीकडे, खेळांतही.
माझा मुलगा साधारण वर्षांचा असेल; नुकताच पावलं टाकू लागलेला. तेव्हा पलंगावरच एक खेळणे तो टाचा उंच करून प्रयत्न पूर्वक घेताना दिसला. अन मला चटकन माझे लहानपण आठवले. तेव्हापासून मग त्याच्या उंचीचा, त्याच्या हाताच्या पातळीवर त्याच्या वस्तू आहेत न हे पाहण्याची सवय मला लागली. अर्थातच त्याच्यापासून ज्या गोष्टी दूर राहाव्यात वाटतं त्या वर ठेवणं हेही झालंच. सर्वसाधारणात: ही दुसरी काळजी घेतली जाते पण पहिली? त्याबद्दल नेहमी जाणीवपूर्वकता असते का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याचा :)
याच काळात त्याच्यासाठी, एक आडवी न होणारा (तळाला वाळू भरलेली) बाहुला आणलेला. त्याला तो अजिबात आवडत नसे. किंबहुना तो त्याला घाबरत असे. एकदा मी आडवी झालेले असताना तो बाहुला नेमका माझ्या जवळ होता. अन तेव्हा मला जाणवलं की त्या बाहुल्याचे डोळे भितीदायक दिसताहेत. मी चटकन उठून बघितलं तर तो बाहुला छान हसरा दिसत होता.म्हणजे माझ्या डोळ्यांच्या पातळीवर तो हसरा दिसत होता. पण माझ्या लेकाच्या डोळ्यांच्या पातळीवर तो बाहुला भितीदायक दिसत होता. मी लगेचच तो बाहुला नजरे आड केला. मला कळलं कि इतके दिवस मी माझ्याच लेकाला किती भितीदायक अनुभव खेळ म्हणून देत होते.
अन मग तेव्हापासून मला लेकाला द्यायच्या सगळ्या गोष्टी त्याचा अक्षपातळीवर जाऊन तपासायची सवय लागली. अनेकदा दुकानदार हसत. सोबतच्या व्यक्तींना हे सगळे हास्यास्पद वाटे. पण मला माझ्या लेकाचा आनंद आणि त्याला काय आरामदायक वाटेल ते जास्त महत्वाचा वाटे.
लेक शाळेत जाऊ लागला, जरा मोठा झाला. माझं ऑफिस अन घर एकाच आवारात होतं. शाळेतून तो साडेचारपर्यंत येत असे. अन मी पाचला घरी. तो आधी माझ्या ऑफिसमध्ये येई, किल्ली घेई अन घरी जाई. त्याच्यासाठी डब्यात भरून ठेवलेला खाऊ घेऊन गॅलरीत बसून खात असे. ते होई पर्यंत मी घरी येत असे. त्याच्या सोबत शाळेतली वॉटरबॉटल असे. छान सेट झालेलं. एके दिवशी घरी आले तर लेक तहानलेला. पाणी दे पाणी दे. नेमकी शाळेत बाटली सांडलेली. बिचारा. पाणी प्यायलं तसं म्हणाला आई मावशीचा फोन आलेला तिला फोन कर. बहिणीला फोन केला तर ती कळवळलेली. मी विचारलं काय ग? तर म्हणाली "मगाशी फोन केला तर त्याला तहान लागलेली. मी म्हटलं मग पाणी पी. तर म्हणाला बाटलीतलं संपालं. मी म्हटलं की मग स्वयंपाक घरात जाऊन घे न. तर म्हणाला तिथे पाल आहे. मला भीती वाटतेय. मला इतकं वाईट वाटलं. आता ठीक आहे न तो?" अरेच्चा बिचारं पिल्लू. तेव्हापासून २-४ ठिकाणी पाणी भरून त्याला घेता येईल असं ठेवू लागले.
या सगळ्या गोष्टींमधून मला कळत गेलं की मुलांच्या पातळीवरून आपण बघायला हवं. अनेकदा मुलं रडत असतात, घाबरलेली असतात त्याचं कारण आपल्याला कळतच नाही. अशावेळी सरळ त्यांच्या पातळीवर जायला हवं. त्याच्या उंचीवर जायला हवं . त्यांच्या अक्षपातळीवर जाऊन पाहायला हवं. अनेकदा त्यांची अडचण आपल्याला समजलेलीच नसते, त्यांच्या पातळीवर आपण गेलो की आपसूक ती कळते अन मग ती सोडवताही येते.
अन मग अनेक वर्षांनी हा चित्रपट बघितला. अनेक पातळ्यांवर हा चित्रपट भिडत गेला. एक तर स्वतःच लहानपण, तेव्हाचे अनुभव आणि लेकाच बालपण आणि तेव्हाचे अनुभव तर आठवत गेलेच. पण त्याही पेक्षा कितीतरी जास्त हा चित्रपट शिकवून गेला. ही पातळी, ही अक्षपाताळी केवळ भौतिकच असते का? त्यासोबत जाणिवांची आणि नेणिवांचीही पातळी असते. त्यांचीही अक्ष पातळी असते. एकमेकांच्या या जाणीव नेणिवांच्या पातळ्या, अक्षपातळ्यांवर जाऊन विचार करता येतो का? त्या त्या व्यक्तीच्या जाणीव नेणिवांच्या अक्षपातळीवर जाऊन आपल्याला त्या व्यक्ती, त्यांचे विचार जास्त समजू शकतील का? इतकेच नव्हे तर वेगवेगळ्या जाणीव नेणिवांच्या अक्षपातळ्या आपण अनुभवल्या तर आपल्या जाणीव नेणिवा जास्त प्रगल्भ होतील हे या चित्रपटाने ठळक केले. कुठेतरी ही जाणीव होती, पण त्याचे लखलखीत सत्य या चित्रपटाने उजळ केले.
अनेकदा प्रश्न सोपा असतो पण आपल्याला त्याचं उत्तर सापडत नाही; कारण त्या प्रश्नाच्या उत्तराच्या पातळीवर आपण जात नाही. एकदा का त्या त्या प्रश्नाच्या अक्षपातळीवर आपण गेले कि त्याचे उत्तर त्या अक्षपातळीवर सहज सापडते. त्या त्या अक्षपातळीवर जायला जमायला मात्र हवे. आणि म्हणूनच जमेल तेव्हा जमेल त्या बाकावर चढा. वेगवेगळ्या अक्षपातळींवरून दिसणारे विश्व न्याहाळावे , तिथले क्षितिज तपासावे हा छंद लावून घेतलाय.
Thursday, July 28, 2016
गुरुजी, जहाँ बैठु वहाँ छायाजी
कुमारांचे हे अजून एक निर्गुणी भजन. फार मनाला आत आत कुठेतरी हलवून सोडणारं. ते मला समजलं असं:
गुरुजी जहाँ बैठु वहाँ छायाजी
सोहि तो मालक म्हारी नजराना आया जी
गुरुजी, मी जिथे स्थिरावु पाहिलं, तिथे तिथे त्या परम चैतन्याची सावली तुम्ही माझ्यावर धरलीत. तुमच्या स्नेहाची, आशिर्वादाची ती सावली!
गेरा गेरा झाड झाड शीतल छाया
म्हारा हो सत्गुरु देखन आया जी
प्रत्येक परिस्थितीमधे, प्रत्येक अनुभवामध्ये ही शीतल छाया तुम्ही दाखवत गेलात गुरुजी!
कुम्हाऱ्या जो धरती ये कलशा मंगाया
म्हारे सत्गुरु जी ने भेट चढाया जी
ज्याप्रमाणे कुंभार साध्या मातीतून सुबक, उपयुक्त मडके बनवतो, तद्वतच तुम्ही माझ्या सारख्या साध्या माणसाला घडवलेत आणि ते घडण्यातून मला त्या परम चैतन्याला समर्पित केलत.
तनभर ताला सबद भर कुंजी
म्हारे सत्गुरु जी ने खोल बताया जी
या नश्वर देहात, त्याच्या कर्मात मी अडकून पडलो होतो. अन शब्दांच्या अनुभवांच्या जाळ्यात सापडलो होतो. गुरुजी तुम्ही ह्या सगळ्याच्या चाव्या शोधून दिल्यात, त्यातून मुक्त करून, माझ्यातला मला दाखवलत.
जीव नगर में कांटे भरानु
म्हारा हो सत्गुरु जी ने शोध लगाया जी
जीवनाच्या वाटचालीत असंख्य अडचणी होत्या, दु:ख होतं. पण त्यातून सुख, मार्ग कसा शोधायचा ते तुम्ही दाखवलत, शिकवलत.
दोही कर जोडु देवानाथ बोल्या
म्हारे केसर तिलक चढाया जी
दोन्ही हात जोडलेल्या- सारे कर्म अर्पण करून मुक्त झालेल्या अशा देवनाथाला तुम्ही मुक्तीचा केशरी तिलक लावलात, गुरुजी!
Thursday, March 17, 2016
मतवारो बादर आयो...
सगळ्या ढगांचा एकच गूढ धीर गंभीर आवाज नुसताच घुमु लागला. पण त्यातून त्याचा कोणतीच संदेश ऐकू येत नाहीये.
त्यातच गवाक्षाच्या किनारीवर कोकीळ येऊन साद घालू लागला. वेगवेगळ्या ताना घेऊ लागला. माझ्या मनातली हूरहूर जणु त्याने ओळखली. माझी हरप्रयत्ने समजूत घालु लागला. माझी संपलेली आशा पुन्हा जागी करू लागला. आपल्या सुरेल तानांनी अजून आशा दाखवू लागला. नको निराश होऊस, अजून रात्र आहे, येईल त्याचा संदेश. थांब धीर नको सोडूस , सांगू लागला. मला धीर शिकवत सुरेल ताना घेत राहिला.
मेघ मात्र माझी हूरहूर वाढवत अजून झाकाळून येत होता...
तशात त्या अंधारातच विजेची किनार चमकून गेली. माझ्या दु:खाच्या पैठणीचा झळाळला केशरी पदर... सोसाट्याच्या वाऱ्यात भरभरणाऱ्या साडीत चकाकणाऱ्या त्या शंकांनी, मन पुन्हा भरून गेलं.
खरच येईल का तो? की पुन्हा आजही विरहच आहे सोबतीला? मनातला एकटेपणा, विरागी एकटेपणा धीरगंभीर होत गेला. एक विरक्ती दाटून आली, त्या त्या काळ्या मेघासारखी ....
मीरेच्या मनाला अगदी ओळखीचीच ती....
एकटेपण...!
त्यालाच एकटं रहायचं असतं 😏.
कित्ती जणांनी त्याला सोबतीला घेतलं, किती जणांनी त्याची आर्जवं केली.
ती राधा, बिचारी वाट पहातेच आहे यमुनेतिरी...
यशोदा बिचारी त्याची अंगडी टोपडी छातीशी लाऊन जगली , जगत राहिली...
रुक्मिणी, भामा अाणि कितीजणींना वाटलं तो आहे सोबत. पण तो कसला अडकतो.
ती विठाई, तिला वाटलं किमान या काळ्या रुपड्यात तरी सोबत राहिल, पण तीही बिचारी एकटीच विटेवर कधीची...
अर्जुन, त्याने तर सखा मानले त्याला. अगदी युद्धातही आपल्यासोबत सतत आहे असे वाटले. पण तिथेही कृष्णनीतीच. कृष्ण अलवार, लोण्यासारखा सगळ्यातून निसटून कधीच द्वारकेला पोहचला. अर्जून शेवटी भावंडांबरोबरच वाट चालला स्वर्गाची, तीही अयशस्वी. कुठे होता पार्थ वाट दाखवायला...
मीरा, ती तर मेरे तो गिरिधर गोपाल म्हणत वणवण फिरली. पण तिच्या नशिबी फक्त सावळ्याचा रंग, तोही फक्त शेवटी...
त्यालाच नकोय सोबत कोणाचीच...
सूरदासांपासून अगदी तुकयापर्यंत नाहीच जवळ केलं त्याने कोणालाच. नुसतीच हुलकावणी...
खट्याळपणा गेला कुठे त्याचा अजून. की खरे रूप नाही ओळखू येऊ म्हणून लपतोय तो? कोण जाणे. त्याचे त्यालाच माहिती...
जेव्हा भरून येईल हे एकटेपण त्याला; तेव्हा असेल का पण थांबलेली राधा, यशोदा, रुक्मिणी, भामा, रखुमाई,अर्जून किंवा मीरा... किंवा तू, मी....
एकटे, एकटेच आपण. तू, मी अन तो ही...!
Saturday, July 25, 2015
भूमी
अन मग अचानक काही हलले उदरात. आधी वाटले, तीच ती आग. पण नाही, हे काही वेगळे होते. काही शांत करणारे, अगदी तुझ्या सारखे, मनाला शांत करणारे, मन तृप्त व्हावं असं काही. ती जाणीव, पहिली जाणीव माझ्या स्त्रीत्वाची. काही रुजत होते, वाढत होते, आत आत, उदरात.अस्तित्वाची एक नवी अनुभुती.
अन मग एके दिवशी माझ्यातून कोवळे दोन हात उमलले. हिरवेगार, सृजन, नव्हाळी, नवा जीव. हरकून गेले मी. माझे सृजनत्व, माझे स्त्रीत्व उजळून गेले. इवलुशी, कोवळी , अलवार दोन पानं माझ्या अस्तित्वाला वेगळाच रंग देऊ लागली. हिरव्या रंगाच्या गर्भारपणाने मी भारावून गेले.
अन मग अजून एक, अजून एक.... सारे अंग फुलून गेले. माझ्यातल्या सृजनाचा उत्सव सुरू झाला.
अन त्यातून उमलले कितीतरी काय काय. नुसती हिरवीगार पाने, कधी त्यावर इवलाली रंगीत फुले, कधी त्या फुलांची फळे, कधी डेरेदार वृक्ष, कधी त्याला लगटून नाजूक वेली. काय अन किती, कौतुक करावे तेव्हढे कमीच.
वरतून तूही पहात असे. कधी या नव्या सृजनाला नाहूमाखु घाली, कधी उन्हाने ऊब देई तर कधी आपल्या सावलीचे पांघरुण घाली. आपण दोघांनी कितीतरी काळ अनुभवली ही अभिजात निर्मिती.
काळ जात गेला. कधी हे बीज कधी ते. मला सृजन माहिती होते, अन तुला देणे. बस. कोणते रुप, कोणते रंग, कोणता आकार. कसलीच अपेक्षा नव्हती, कसलाच विधिनिवेश नव्हता. बस, फक्त निर्मिती. त्यातच आपण दोघे आनंदी होतो, समाधानी होतो.
अन मग तो आला, वाढला, आपली स्वत:ची काही धडपड करु लागला. तसा तोही आपलाच. त्याचेही कौतुक वाटू लागले. एव्हढासा जीव पण किती कष्ट, किती प्रयत्न, किती धडपड.
मधेच त्याला लहर आली. नुकताच तू मला खुप उब देऊन गेलेलास. कितीतरी, कायकाय माझ्या मनात नेहमी प्रमाणे रुजत होते. पण त्याच्या मनात काही वेगळेच चालु होते. एक मोठी फांदी घेऊन त्याने माझ्या मनाला ओरखाडे काढायला सुरुवात केली. एक, दोन, चार,... कितीतरी ठिकाणी त्याने जखमा केल्या मला. किती कळवळले, किती भेगाळले. पण त्याला काहीच कळले नाही. तो आपला स्वत:तच मश्गुल. मग काही बाही त्याने बळेबळे कोंबले माझ्या उदरात. मला न विचारता, माझ्या मनाची दखल न करता. या भूमीवरचा पहिला बलात्कारच तो.... त्याला नाही कळली माझी वेदना. पण तू धावलास, बरसलास. माझ्या जखमांवर शीतल शिडकावा केलास. माझे अश्रु स्वता:मधे सामावून घेतलेस. मला शांतावत राहिलास.
अन मग माझ्या मना विरुद्ध त्याची करणी रुजत राहिली. माझ्यातले सृजनत्व, मी टाकून नाही दिले. त्याचे तर त्याचे, पण बीज तर निर्व्याज होते, त्याच्यावर का अन्याय करायचा? मी त्या नवीन बीजाला सामाऊन घेतले, रुजवले, वाढवले. हळुहळु त्याच्यावरही माझा जीव जडला. नवीन रोपं वाढु लागली, तुझ्या झोक्यांवर लहरु लागली. हळुच त्यातून कणसं डोकाऊ लागली. मीही आनंदले. आता ह्या कणसातली बीजं पुन्हा माझ्या कुशीत येतील, माझ्या बाळांची बाळं... माझं सृजनत्व भरून पावेल...
पण तेही सुख नाही पाहावलं त्या दुष्टाला. सारी सारी कणंसं खुडून नेली त्याने, माझी नातवंड, मी एक नजर बघुही शकले नाही त्यांना. ना एकदाही कुशीत घेऊ शकले...
पुन्हा मन पार विदारले, भेगाळले. त्या दु:खावर डागण्या म्हणून उरलीसुरली वाळलेली ताटं त्याने पेटवून दिली. एकीकडे नातवंडांचा दुरावा अन वर हा माझ्याच लेकरांची चिता... मी कोळपून गेले, हवालदिल झाले. माझ्यातला अग्नी पुन्हा वर येईल असे वाटू लागले.
तुलाही अजिबात आवडले नाही हे सारे. कळीकाळ होऊन तू धाऊन आलास. तुझ्या संतापाला विजेचे रुप आले. घोंगावणाऱ्या वादळी वाऱ्यांनी, धारांनी तू त्याला झोडपलेस.अन माझ्याकडे धावलास. मला शांत करत राहिलास. पण आला मी थकले होते पार. मी काहीच प्रतिसाद दिला नाही. मग तूही माघारी फिरलास. तुझी माघार पाहून त्याच्या अंगी अजूनच चेव आला.
पुन्हा पुन्हा तो बलात्कार करत राहिला. ना माझ्या इच्छेचा, ना माझ्या मनाचा विचार केला त्याने. ना कधी माझी विचारपूस केली. फक्त ओरबाडत राहिला, इथे, तिथे, हवे तिथे, हवे तसे... मी हळुहळु म्लान होत गेले. तुझाही विरोध करण्याचा जोर हल्ली कमी झालाय.
हाच का आपल्या जीवनाचा अंत?
Friday, July 3, 2015
शून्य गढ शहर, शहर घर बस्ती
शून्य गढ शहर, शहर घर बस्ती
कौन सूता कौन जागे है
लाल हमरे हम लालान के
तन सोता ब्रह्म जागे है
जल बिच कमल, कमल बिच कलियाँ
भँवर बास न लेता है
इस नगरी के दस दरवाजे,
जोगी फेरी नित देता है
तन की कुण्डी मन का सोटा
ज्ञानकी रगड लगाता है
पाञ्च पचीस बसे घट भीतर
उनकू घोट पिलाता है
अगन कुण्डसे तपसी ताप
तपसी तपसा करता है
पाञ्चो चेला फिरे अकेला,
अलख अलख कर जपता है
एक अप्सरा सामें उभी जी,
दूजी सूरमा हो सारे है
तीसरी रम्भा सेज बिछावे,
परण्या नहीं कुँवारी है
परण्या पहिले पुतुर जाया
मात पिता मन भाया है
शरण मच्छिन्दर गोरख बोले
एक अखण्डी ध्याया है
-गोरखनाथ
-------------------------
मला समजलेला भावार्थ :
नाथ संप्रदायातील शून्य तत्वज्ञानानुरुप सगळे शून्यातून निर्माण झाले आहे अन सर्व शून्यातच विलिन होणार आहे.
हे शरीर जणु एक शहर आणि त्यातील आत्मा जणु वस्ती
ही वस्ती, आत्मा कोणाचा निद्रिस्त तर कोणाचा जागृत.
देव माझा अन मी देवाचा.
जेव्हा माझे शरीर- मी पण संपते, तेव्हा माझा आत्मा -ब्रह्म जागृत होते.
जीवनाच्या जलाशयात मोहाची कितीतरी कमळे, अन त्याची कितीतरी विलोभनीय रुपं. या मोहातून फिरताना आपल्या दाही इंद्रियांवर पहारा देत योग्याला पुढे जायचे असते.
शरीररुपी खला मधे आत्मारुपी बत्याने खल करत योग्याने ज्ञानाचा शोध घेत राहिले पाहिजे. सृष्टीतील पाच तत्व आणि बुद्धीची 25 क्षेत्र यांचा वेध घ्यायचा प्रयत्न करत राहिले पाहिजे.
या साऱ्या ज्ञानसाधनेच्या अग्नीमधे तप करत पाच तत्वांशी झगडत आमि स्वत:शी सतत संवाद करत योग्याने प्रयत्न चालू ठेवला पाहिजे.
योगी तपश्चर्या करत असतो तशी माया ती मोडण्याचा प्रयत्न करत असते. एक, दोन नव्हे तर अगदी रंभे सारखी मोहमायाही समोर उभी राहते.
आणि विवाहा आधीच पुत्रप्राप्तीचा आनंद त्याला मिळाला. पण अशा सापळ्यात गोरखला अडकायचे नाही, अन म्हणून तो आपल्या गुरुंना, मच्छिंद्रनाथांना मदतीचे आवाहन करतो आहे आणि स्वत:ला सावध राहण्याचा इशारा देतो आहे.
--------------
हे सारे एकताना मनात आलेले विचार...
म्हटले तर सगळेच शून्य, अन म्हटले तर सारे सार इथेच. म्हटले तर शहर, म्हटले तर गुढ गढी. एकच शरीर, एकच मन, एकच आत्मा, एकच कुंडलिनी, एकच ब्रह्म, एकच बस्ती... पण शून्य, जोवर हे सगळे जागृत होत नाही, तोवर सारे सारे शून्य.
म्हटले तर कितीतरी मोह, कितीतरी प्रलोभने, कितीतरी भोग, कितीतरी तत्व, कितीतरी विचार अन कितीतरी तत्वज्ञानं अन कितीतरी ज्ञानाची द्वारे, अन अजून कितीतरी अनुभूती....
आणि तरीही सगळे पुन्हा शून्यातच विलिन होणारे. शून्यवतच सगळे...
शेवटी हा सगळा आतल्या आतला संवाद, वाद, खल, झगडा... आपला आपल्यालाच सोडवायचा. आपलाच पहारा आपल्यावरच. आपलीच मोहमाया आपणच दूर करायची. आपल्या सुखाच्या मर्यादा ओलांडायच्या आपणच, अगदी पार व्हायचे, आपले आपणच.
अधिकार नसतानाच सगळे सुख मिळवण्याची हावही आपली अन ती आवरण्याची धडपडही आपलीच. स्व निर्मितीचा आनंद, त्या निर्मितीवरचा अधिकार, हक्क हाही सगळा एका भोगाचाच भाग.... तो ही पुन्हा शून्याकडेच जाणारा.
ह्या शून्यप्राप्तीचा हा प्रवास, तो ही शून्यच... फक्त त्याची जाणीव होणं, राहणं, सतत ठेवणं हे त्या शून्याचे संपूर्णत्व. ते अंगी येणे म्हणजेच शून्यत्व...
शून्याकडून शून्याकडची वाट मात्र फार फार मोठी....
Tuesday, March 3, 2015
सख्या रे ...२.कान्हा रे, नंद नंदन
कान्हा, आणि तो दिवस आठवतो तुला?
मी पाणी भरायला निघालेले. अन अनयही बाजारात जायला निघालेला. आम्ही छान गप्पा मारत निघलेलो, अन अचानक कसा कोणजाणे विषय निघालाच .
अनय म्हणला , " पाणी भरून, लवकर जा घरी, आई ओरडत असते तुझ्या यमुनेवर रेंगाळण्याबद्दल..."
" का पण ? मी सारे काम उरकूनच येते ना? बसले जरा वेळ इथे तर काय झाल? तेव्हढच मन मोकळं होत रे माझं..."
" अग तसं नाही ग... मला काहीच नाही वाटत. पण आई उगाचच चिडते अन मारते न तुल. मग मला नाही बरं वाटत. मलाही लागतं ग ते..."
"हो आला मोठा माझी काळजी वाटणारा... सासुबाईंसमोर गप्प बसतोस ते रे ..." मी त्याचा हात धरून त्याला थांबवत म्हटलं
" असं नको ग बोलूस... तिच्यासमोर मी कधीच नाही बोलू शकणार, तुल माहिती आहे. पण म्हणून मला काही वाटतच नाही अस नाही न..."
खरं तर तो अगदी खरच बोलत होता, अगदी मनापासूनही... पण माझच चित्त थ-यावर नव्हतं. मला कळायच पण वळायचं नाही. अन मग आमची नेहमीची वादावादी सुरू व्हायची. आजही तसच झालं...
" काही नाही, तुझाही विश्वास नाही माझ्यावर..."
" राधे, हे असं नाहीये... तुला पक्क माहिती आहे. पुन्हा असं म्हणू नकोस ग..." असे म्हणून अनय तट्टकन उलटा फिरला अन बाजाराच्या दिशेने ताड ताड चालला गेला...
मी खाडकन जागी झाले, माझ्या मनातले बोलताना माझे भान हरवलेले... अनयला उगाचच दोष दिला मी....
कशी बशी यमुनेतिरी आले अन मट्टकन बसले.
चुकलच माझं. या सा-यात अनयची काहीच चूक नव्हती. पाठमो-या दूर दूर जाणा-या अनय कडे बघत त्याला साद घातली "अनय..."
मनातच म्हटलं, चुकले रे मी. तुला दुखवायचं नव्हतं मला....
अन मग माझ्या मनात दुखचे कढ भरभरून यायला लागले. मनात सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. अनेक वेळोवेळी तू माझी समजूत घातलेलीस. कितीतरी वेळा सगळा रोष स्वतावर ओढवून घेतला होतास. सासूबाईंनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना तूच योग्य ती अन माझी बाजू राखणारी उत्तरं दिली होतीस...सगळं सगळं आठवलं...
तुझ्याबद्दलच्या सा-या हळव्या भावना उचंबळून वर आल्या. सारा आसमंत भरून गेला; तुझ्या त्या समर्पणाच्या भावनेने. तुझी सारी घुसमट माझ्या समोर उभी राहिली. त्या क्षणी मला माझीच खूप खूप शरम वाटली. मी माझ्याच दुखात स्वताला वाहवते. तुझे दुख मात्र तू मनात अगदी आत ठेवतोस अनय. कसं कसं जमवतोस हे तू?
आता अनय आता दिसेनासा झाला. अन मग मी डोळे मिटले. डोळ्यातले सारे सारे सर्र्कन गालावर ओघळ्ले. "श्रीरंगा...." कधी मला माझ्या मनावर ताबा ठेवता येणार?
माझ्या मना वरच मी रागावले, मनाला म्हणाले,
" का रे, का छळतोस ?
किती उरापोटी आवरते मी.
अन तू असे वाहून घालवतोस?
आवरायला शीक रे, आवरायला शीक.
ठेवावे थोडे ओठात, पोटात अन उरातही ! "
अन डोळे उघडून बघितले.
तर कान्हा तू समोर उभा.... सारे सारे कळले असल्यासारखा उभा . किती समजतोस तू मला, माझ्या प्रत्येक गरजेला तू उभा असतोसच रे. मला समजावतोस, माझी प्रत्येक वेदना जणू तू भोगतोस.
इतकच नाही तर तिला हळूवार करून तुझ्या बासरीतून हळुवार बाहेर सोडून देतोस.
मला मोकळी करतोस दुखातून.
अन मला पुन्हा प्रेरणा देतोस नव्याने जगण्याची,....
कान्हा रे, नंद नंदन...
कान्हा रे...
Thursday, March 13, 2014
Wednesday, February 19, 2014
"चल पुन्हा जागुयात !"
प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा टप्पा येतो , की ज्यावेळेस आपण आयुष्यात काय केल?, काय मिळवलं ? असा विचार आपण करू लागतो. प्रामुख्याने बायकांना हा विचार वयाच्या चाळीशी/ पन्नाशीला खुपच त्रास देतो. माझ्या पिढीपर्यंत तरी इथल्या बहुतांशी बायकांनी सर्वात महत्वाचा मानला तो संसार, मुलं-बाळ, नवरा अन असेच सगळे. जरी नोकरी, व्यवसाय, करियर केली असली तरी प्राधान्य होते ते संसाराला. मी आजूबाजूला बघते; अनेक बायका बघते, जेव्हा मुल मोठी होतात, स्वत:च्या पंखाने उडायला लागतात. अन त्यांचा सहचर आपल्या करियर मध्ये बुडून गेलेला असतो. अन अशा वेळेस या बायकांना खूप एकटेपणा, रितेपणा आल्याचे मला दिसले.
यावरच एक कविता मला स्फुरली होती. " रिती "
आपले आयुष्य हि एक मोठी वाटचाल. त्यात काही रस्ते सरळ काही सपाट, काही खाच खळग्यांचे, तर काही डोंगर उताराचे. तर काही गडांचे. अशाच एका गडावरची हि कविता
हा रितेपणा माझ्याही आयुष्याच्या एका टप्प्यावर मला भिववून गेला. त्यातून मी कशी बाहेर आले , कोणकोणत्या गोष्टी मी करत गेले त्याचे अनुभव तुमच्याशी शेअर करते. या सर्व गोष्टींनी मला शिकवले, " चल पुन्हा जागुयात ! "
लिखाण
मला आठवत ती त्या वर्षाची सुरुवात होती. अशाच एका मोकळ्या दुपारी माझ्या हातात एक नवी कोरी डायरी आली. अन मग कुठल्या कुठल्या जुन्या आठवणी त्यात लिहून काढायच्या असा विचार मनात आला. आणि जसे जमेल तसे मी लिहीत गेले. कधी गाणी, कधी कविता, चित्रविचित्र आठवणी, लहानपणीचे खेळ, सवंगडी, पाहिलेली गावे, माणसं, शाळेतल्या गमतीजमती , भांडणं, ...
खर तर अतिशय तुटक, विस्कळीत लिखाण होते ते. ना सलगता होती, ना काही साहित्यिक मुल्ये... पण मला मजा येत होती. टीव्ही समोर बसून दुस-यांच्या आयुष्यातील मालिका बघण्यापेक्षा मला माझ्याच आयुष्याचा रिपीट टेलिकास्ट बघायला, लिहायला अन वाचायलाही मजा येत होती.
लहानपणीचे, तरुणपणीचे कितीतरी प्रसंग मला पुन्हा आनंद देऊन गेले. काही सल काट्यासारखे सलायाचे , बोचायाचे पण ते लिहून टाकल्यामुळे थोडे सुसह्य होत गेले.
बरं हे मी जे लिहीत होते; ते कोणालाच वाचायला द्यायचे नव्हते. त्यामुळे माझ्या अनेक त्रुटी- चुका ही, मी बिनधास्त लिहित गेले. मी जे जे केले, वागले ते, त्या त्या वेळेची, परिस्थितीची गरज होती हे पुन्हा वाचताना लक्षात येत गेले. आणि मग मी मनातल्या मनात मलाच माफ करत गेले.
खरं सांगते, ही भावना फार फार महत्वाची असते; " आपण आपल्याला माफ करणं ! " आपण इतरांना एकवेळ माफ करतो पण स्व:ताबद्दल मात्र आपण फार कठोर होतो.
या लिखाणाने मला कितीतरी आनंद दिले. आई, बाबा इतकच नव्हे तर आजीवरही माझ्याकडून छान लेख लिहिले गेले. अनेकांनी ते वाचले आणि त्यांनाही ते खूप आवडले. माझ्यातल्या लेकीला, नातीला खूप समाधान देऊन गेले हे लिखाण
लिखाणाने मला मोकळे केले. आपण पण काहीतरी करू शकतो हा विश्वास दिला. बघा तुम्हीपण हा प्रयत्न करून बघा. आपल्याला वाटतं की मी काय लिहिणार? कसे लिहिणार? कोणी चेष्टा केली तर? पण हे लिखाण काही इतरांनी वाचावे म्हणून लिहिणार नाही. तुम्हाला मोकळे होण्यासाठी लिहा. अगदी लहानपणीच्या आठवणी लिहा. पुन्हा बालपणात पोहोचा, तेव्हाचा निर्वाज्य आनंद पुन्हा उपभोगा. कित्ती फ्रेश होऊन जाल . बघा पुन्हा जागून तर बघा !
प्राणायाम
मला व्यायामाचा खूप कंटाळा ! लहानपणापासून मी खूप खेळले. खोखो, लंगडी , कब्बड्डी, क्रिकेट, बॅडमिंटन... त्यामुळे वेगळा व्यायाम त्या वेळी करावा लागला नाही.
नोकरी लागली तरीही बॅडमिंटन चालू होते. मग लग्न झाले, संसार सुरु झाला. अन मग खेळण्यासाठी वेळच उरला नाही. त्यामुळे शरीराचे चलनवलन फक्त घाई गडबडीत मर्यादित झाले. त्याचा परिणाम जाडी वाढण्यात झाला.
मध्यंतरी माझ्या एका मैत्रिणीने मला प्राणायाच्या क्लासला ओढून नेले. तिथे प्राणायाम शिकले तर खरी पण सातत्याने करणे झाले नाही. पण तरीही या प्राणायामाने ही मला पुन्हा जगायला शिकवले.
प्राणायामाचे जे बेसिक तत्व आहे की श्वासाकडे लक्ष देऊन, तो योग्य प्रकारे घेणे आणि सोडणे. हेही मला खूप आधार देऊन गेले. काय आहे माझा स्वभाव थोडा अती व्यवस्थितपणा, वेळेच्याबाबत अती काटेकोर असा आहे. गोष्टी नीट आणि योग्य पद्धतीनेच होण्या साठी मी खूप काटेकोर होते, आहे. पण याचाच मला फार त्रास होई. गोष्ट नीट, हवी तशी होत नाही म्हटल्यावर मी फार धडधड करून घेत असे.मग त्यातून धावपळ, ताण घेणे या आणि अशा घातक गोष्टी माझ्या स्वभावाच्या भाग बनू लागल्या. मग त्यातून चिडचिड, तडतड होऊ लागली. याचे पर्यावसान झाले ते माझ्या अर्धशिशी मध्ये, मायग्रेन मध्ये. एकदा मायग्रेनचा जबरदस्त अॅटॅक आला अन माझ्या मनात धोक्याची घंटा वाजली. अन मग माझे मलाच मी म्हटले, "अग जग अजून जराशी ! "
अन त्यावेळेस उपयोगी पडला हा प्राणायाम ! आता जेव्हा जेव्हा अशी ताणाची , धावपळीची, नैराश्याची परिस्थिती उद्भवते तेव्हा मी सगळे थांबवते. एक मोठ्ठा श्वास घेते. हळू हळू सोडते. मनावरचे सगळे ताण सुटत जातात. किती वेळ? फारतर १-२ मिनिट. पण तो पर्यंत मी पुन्हा मला सापडते. पुन्हा जगण्यासाठी ताजीतवानी होते. मनाला सांगत " चल, पुन्हा जागुयात "
आणखीन एक व्यायामाचा छोटासा प्रकार. जो मनाला खूप आधार देतो. अनेकदा आपल्याला वाटत की असं कोणीतरी हव ज्याच्या खांद्यावर मन टेकवावी. नेहमीच आजूबाजूला असं हक्काचं माणूस असेलच असं नाहीना. पण एक व्यक्ती नेहमी तुमच्याजवळ असतेच. कोण ? अहो तुम्ही स्वत:च स्मित
खोट, अशक्य वाटत ना? पण शक्य आहे. खरच. हात असलेल्या खुर्चीवर बसा. हात खुर्चीच्या हातावर सरळ ठेवा. आता डोळे मिटा. हळूहळू आपली मान सैल करा. अजिबात मुद्दाहून करू नका, फक्त मान हळूच एका खांद्यावर सोडून द्या. जसा जशी खाली जाईल तसा तशी जाऊ द्या, मुद्दाहून नका प्रयत्न करू फक्त सैल सोडा. तो खांदा वर नका उचलू. पलीकडच्या बाजूचा हात उचलला जाईल, तो उचलला जाऊ देत. बघा. टेकले ना डोके आपल्याच खांद्यावर स्मित आता तसेच हळू हळू मान सरळ करा. आता दुस-या खांद्यावर डोके हळूच सोडून द्या. बघा दोन दोन खांदे आहेत आपले डोके टेकवायला स्मित
" स्वत:चीच मान
ठेव आपुल्याच खांद्यावर
विश्वासाचा किती
सहजसाध्य आधार ! "
खरच सांगते इतके शांत, आश्वासक, प्रसन्न वाटते. आपल्यालाच आधार देत आपलेच मन आपल्याला सांगत असते " चल पुन्हा जागुयात ! "
छंद
तशी मी लहानपणापासून छांदिष्ट ! आई म्हणायची, " चित्र काढायला बसली की चित्रच काढेल. खेळायला लागली की तेच. पुस्तकं वाचायला लागली की झालं..." जोक्स अपार्ट या छंदांनी मला खूप आनंद दिला. एखादे विणकाम, त्याचे डिझाईन, एखादे चित्र, काढून झाले की ते बघण्याचा आनंद, आपल्या हाताने लावलेल्या झाडाला आलेले फुलं पाहण्याचा आनंद, हे सारे आपल्या बालाआलाच पाहिल्याचा आनंद पुन्हा देणारे. हे छंद आपल्याला आपल्या आजूबाजूचे सारे विसरायला लावतात. एका वेगळ्याच विश्वात आपल्याला नेतात. अगदी अनुभवावी अशी हि गोष्ट. मग हे छंद कोणतेही असोत. अगदी टीव्ही बघानायाचाही . फक्त त्यामागे निव्वळ वेळ जात नाही म्हणून बघू नका, तर आपल्याला आवडणारे कार्यक्रम बघा. मग असागी हाही छंद आपल्याला उभारी देणारा असतो. हे सगळे छंद आपल्याला सांगत जातात " चल पुन्हा जागुयात"
छुपा शत्रू
कधी कधी ना मला उगाचच कंटाळा येतो. बाहेर जायचा कंटाळा, स्वयापाकाचा कंटाळा, अगदी टीव्ही वरचा चॅनल बदलायाचाही कंटाळा. पण आता मला या छुप्या शत्रूला ओळखता येते. जरा जरी शंका आली की हा शत्रू शिरकाव करतोय, की मी झडझडून जागी होते. पहिली बसल्या जागेवरून उठते. तोंड धुते, कपडे बदलते, त्यातही आवडीचा ड्रेस घालते, शक्यतो, घराबाहेर पडते. बाहेर छोटी मुळे खेळत असतात, त्यांचा खेळ, उत्साह पाहून मलाही उत्साही वाटायला लागतं, आणि माझी मला मी म्हणते " चल पुन्हा जागुयात"
घरा बाहेर पडणे अगदीच शक्य नसेल तर घरातले राहून गेलेले काम करायला घेते.कपाट आवर, किचन ट्रॉली स्वच्छ कर, खिडक्यांच्या काचा पूस, जळमटे काढ,... अन मग माझा हा कंटाळा कुठच्या कुठे पळून जातो. स्वच्छ झालेल्या खिडकीच्या काचा मला बाहेरची हिरवाई दाखवू लागतात, कपाट आवरताना जुन्या वह्या, जुने कपडे बाहेर पडतात, जुन्या आठवणी फेर धरून नाचू लागतात अन मला म्हणू लागतात " चला पुन्हा जागुयात "
नवे मित्र
हल्ली नेहेमीच किंवा केव्हाही बोलायला कोणी मिळेलच असे सांगता येत नाही. कधी कधी वेळच अशी अडनिडी असते की गप्पा मारायला कोणी नसत्ते. मग अशा वेळेस मला सोबत मिळाली ती संगणकाची, नेटची. सुरुवातीला मलाही या कॉम्प्यूटरची भीती वाटायची. काही झाले तर, काही बिघडले तर , बंदच पडला तर ? तशात काँप्युटर, नेट वरती सगळी माहिती इंग्रजीतूनच असते असा एक गैरसमज होता. पण मी जसजशी काँप्युटर, नेट वापरत गेले तसतशी मला कळत गेले की असे काही नाही. मराठी मध्येही कित्येक गोष्टी इंटरनेटवरती आहेत. अनेक जण मराठीत आपापले ब्लॉग्ज लिहितात, अनेक साईट्स आहेत ज्यावर मराठीतूनच संवाद, लिखाण चालते. अनेक कथा, कादंब-या, कविता, नेट वरती आहेत. अनेक मराठी जुनी नाटकं, चित्रपट आहेत यु ट्यूब वर. अन मग हळूहळू माझी काँप्युटर अन इंटरनेटशी दोस्ती होत गेली. इतकी की आता माझ्या बहिणी, मैत्रिणी मला नेट सॅव्हि म्हणतात.
या दोस्तीतूनच माझे बरेच ब्लॉग्स तयार झाले, आई, बाबांचे ब्लॉग्स तयार झाले. काही मैत्रीणींचेही .
या दोस्तीने अजून एक नवीन द्वार माझ्यासाठी उघडले. ते म्हणजे ऑनलाईन विणकाम शिकवण्याचे. गेल्या वर्षभरात २०-२२ जणीं कॉम्प्यूटर-नेट यांच्या सहाय्याने ऑनलाईन विणकाम शिकल्या. अमेरिका, सिंगापूर, आफ्रिका, आणि भारतातील विविध राज्यातून अनेक जणी खूप सुंदर विणकाम करू लागल्या.
या सगळ्या विद्यार्थिनी कम मैत्रिणीं सोबत नेटाने मला म्हटले " चला पुन्हा जागुयात "
एक देणगी
याच काळात माझी एक खूप जवळची मैत्रीण शोभना, ने माझी ओळख "पुष्पौषधी " शी फ्लॉवर रेमिडी शी करून दिली. एका अडचणीच्या वेळेस या फ्लॉवर रेमिडीचा मला खूप उपयोग झाला. डॉ. बाख या जर्मन शास्त्रज्ञ यांनी ही थेरपी शोधून काढली.मुळात आपल्या मनातील नकारात्मक भावना नियंत्रण करण्यासाठी ही थेरपी खूपच उपयोगी पडते. मुळात कोणत्याही आजारात आपली सकारात्मक वृत्ती खूप परिणाम घडवत असते. ही सकारात्मक वृत्ती निर्माण करण्यासाठी फ्लॉवर रेमिडी अतिशय उपयुक्त ठरते. या फ्लॉवर रेमिडी नेही मला शिकवले, "चला पुन्हा जागुयात"
सुरुवात कवितेने केली होती तर शेवटही कवितेने करते.
गोधडी
Thursday, August 15, 2013
दस्तावेज : "नियतीशी संकेत "
पं. जवाहरलाल नेहरू - आपल्या आदराचे स्थान. स्वातंत्र लढ्यातील नेते, भारताचे पहिले पंतप्रधान, उत्तम प्रशासक, आंतरराष्ट्रीय राजकारणातील मुत्सद्दी, 'शांतीदूत', इतिहासकार, तत्वज्ञानी आणि मुलांचे चाचा नेहरू; एकाच व्यक्तिमत्वाचे किती विविध पैलू !
स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी जनतेने निवडून दिलेल्या घटनासमितीच्या, १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या अधिवेशनात पं. नेहरूंनी भाषण केले. भूतकाळाची योग्य जाण, वर्तमानकाळाचे सजग भान आणि भविष्याचे आव्हान या तिन्हींचे चित्रण पं. नेहरूंच्या या भाषणात आपल्याला दिसते.
पं नेहरूंचे भाषेवरील , भावनांवरील, विचारांवरील आणि घटनेच्या अन्वयर्थावरील प्रभूत्व त्यांच्या शब्दाशब्दात आपल्याला दिसते. त्यांची स्वतंत्र्य लढ्याप्रति असलेली आत्मियता- अभिमान, घडलेल्या दुर्दैवी घटनांबद्दलचे भावस्पर्शी दु:ख आणि उज्ज्वल भवितव्यासाठी उत्कट तळमळ या सर्वांचे प्रतिबिंब त्यांच्या या भाषणात दिसते.
खरे तर मूळातून वाचावे असे हे भाषण! (http://www.svc.ac.in/files/TRYST%20WITH%20DESTINY.pdf) माझ्या अल्पमतीने केलेला त्याचा हा मराठी भावार्थ.
( जालावरून साभार )
" फार वर्षांपूर्वी आपली नियतीशी ही भेट निश्चित झाली होती. आणि आज आपली प्रतिज्ञा पूर्णत्वाने नव्हे परंतु ब-याच अंशी प्रत्यक्षात घेण्याचा क्षण आला आहे. मध्यरात्रीच्या या प्रहरी, जेव्हा जग झोपले आहे, भारत जागा होतोय; जीनवाप्रति आणि स्वातंत्र्याप्रति ! इतिहासात क्वचितच येणा-या क्षणी आपण जुन्याकडून नव्याकडे जात आहोत. एका युगाचा अंत होतो आहे. अन वर्षानुवर्षे दडपलेला राष्ट्राचा आत्मा आज मुक्त होत आहे. या औपचारिक, धीरगंभीर आणि प्रगल्भ क्षणी; भारतभूमीप्रति, तिच्या जनतेप्रति आणि त्याहून ही महान अशा मनवतेप्रति आम्ही समर्पित होऊ अशी प्रतिज्ञा करणे हे अत्यंत औचित्यपूर्ण ठरेल.
इतिहासाच्या ब्राह्ममुहूर्तावर भारतभूमीने आपला न संपणारा शोध सुरू केला. शतकानुशतके अविरत संघर्ष करून अन जयापजयाचे डोंगर पार करून ! चांगल्या- वाईट प्राक्तनातही भारताची दृष्टी या शोधापासून कधीही ढळली नाही किंवा ज्या आदर्शांनी तिला सामर्थ्य दिले त्यांचे विस्मरणही तिला कधी झाले नाही. आपला अंधःकारमय गतकाळ आज संपतो आहे. भारताला पुन्हा एकदा स्वत्वाची जाणिव होते आहे.
आज आपण साजरी करत असलेली उद्दिष्टपूर्ती ही; आपली वाट पाहणा-या विजयश्रीच्या प्रासादाची केवळ एक पायरी आहे. प्रश्न आहे तो, ही संधी प्राप्त करण्याइतका सुज्ञपणा आणि भावी आव्हाने पेलण्याइतके सामर्थ्य
आपल्यात आहे का?
स्वातंत्र्य आणि सत्ता यांच्या जोडीने जबाबदारीही येते. भारताच्या सार्वभौम जनतेचे प्रतिनिधित्व करणा-या या घटनासमितीवर फार मोठी जबाबदारी आहे. स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वी तिच्या निर्मितीच्या सर्व वेदनांतून आपण गेलो आहोत; त्यातील दु:खद आठवणींनी आपले अंतःकरण जड झाले आहे; त्यातील काही वेदनांचा सल अजूनही आपण अनुभवित आहोत. असो. भूतकाळ संपला आहे अन भविष्यकाळ आपल्यासमोर उभा आहे.
हा भविष्यकाळ सहजसाध्य किंवा आरामदायक नाही. अविरत आणि प्रचंड प्रयत्नांतूनच आपण वेळोवेळी केलेली आणि आज करणार आहोत ती प्रतिज्ञा, आपण पूर्ण करू शकू. भारताची सेवा म्हणजे लाखो पीडितांची सेवा, दारिद्र्य-अज्ञान-रोगराई यांचे निर्मूलन करणे आणि संधींच्या विषमतेचे उच्चाटन करणे. प्रत्येकाच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसला गेला पाहिजे अशी आपल्या पिढीतील महामानवाची महत्वाकांक्षा आहे. हे आपल्या आवाक्यापलिकडचे असेल; परंतु जो पर्यंत अश्रू आहेत, दु:ख आहे तोपर्यंत आपले कार्य संपणार नाही.
आणि म्हणूनच आपण सोसले पाहिजे, काम केले पाहिजे, कठोर परिश्रम केले पाहिजेत; तरच आपली स्वप्ने साकार होऊ शकतील. जी भारताची स्वप्ने आहेत, इतकेच नव्हे तर संपूर्ण जगाची आहेत, सर्व राष्ट्रांची आहेत, सर्व जनतेची आहेत. आज मानव एकमेकांशी अनेकविध धाग्यांनी जोडला गेला आहे की एकमेकांशिवाय जगणे त्याला अशक्य आहे. शांतता ही विभागता येत नाही; त्याच प्रमाणे स्वातंत्र्यही, त्याच प्रमाणे आता वैभवसंपन्नताही आणि या एकमेव जगातील सर्वनाशही; आता फार काळ इतरांपासून फुटून - वेगळे असे एकट्याचे काही असणार नाही.
ज्याचे आम्ही प्रतिनिधी आहोत अशा भारतीय जनतेला आम्ही आवाहन करतो की, त्यांनी या उदात्त साहसात श्रद्धा आणि विश्वासाने आमच्या मागे उभे रहावे. आताची ही वेळ क्षूद्र आणि घातक टीकेची, अनिष्ट चिंतनाची वा दुस-यावर दोषारोपण करण्याची नाही. जेथे भावी पिढी सुखाने नांदेल अशा स्वतंत्र भारताच्या प्रासादाची उभारणी आपण केली पाहिजे. मान्यवर, मी असा प्रस्ताव करण्याची विनंती करतो की, असा निर्णय घेतला जावा की -
१. मध्यरात्रीच्या शेवटच्या ठोक्यानंतर या घटना समितीमधील उपस्थित असलेले सर्व सदस्य पुढील प्रतिज्ञा करतील :
भारतीय जनतेने त्याग आणि यातना सोसून स्वातंत्र्य मिळवले. या औपचारिक, धीरगंभीर आणि प्रगल्भ क्षणी मी,... घटना समितीचा सदस्य म्हणून भारताच्या आणि येथील जनतेच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेईन, की ज्या योगे ही प्राचीन भूमी तिचे जगातील सुयोग्य स्थान प्राप्त करून जागतिक शांततेसाठी व मानवतेच्या कल्याणासाठी मनोभावे भरीव सहयोग देईल.
२. या प्रसंगी जे सदस्य उपस्थित नाहीत, तेही अशीच प्रतिज्ञा ( राष्ट्रपती जे बदल सुचवतील त्यानुरुप) समितीच्या पुढच्या सत्रात करतील. "
( पूर्वप्रकाशित : "माध्यम" - टिळक महराष्ट्र विद्यापीठ. पुन:प्रकाशानासाठी परवानगी दिल्याबद्दल मा. डॉ. दीपक टिळक सरांचे आभार )
Sunday, August 4, 2013
सुयांवरचे विणकाम : थोडा इतिहास
सुयां वरचे विणकाम याचे मूळ अजून सापडलेले नाही. निश्चित स्त्रोत माहिती नाही. अगदी शोध घ्यायचा तर इ. स्. पू ५००० पर्यंत आपल्याला मागे जाता येते. लीला डी चाव्ह्स (Lila de Chaves) या इतिहासकार आणि टेक्साटाल तज्ज्ञ यांच्या मतानुसार ग्रीस मध्ये गाठीं शिवाय एकमेकांत गुंफलेल्या कापडांच्या नोंदी आहेत. हे एका सुईवरचे विणकाम असण्याची दाट शक्यता आहे.
इ.स्. पू १५०० मध्ये हातांच्या बोटांनी दोरे एकमेकांत अडकवत विणण्याची कला मानवाने प्राप्त केली असल्याचे आढळते. बोटांच्या आधारे दो-याच्या वेणीसादृष्य विणकाम केलेले आढळते.
इ. स्. २५६ मधील तीन विणलेले कापडाचे तुकडे सिरीयन शहरात – दुरा इथे सापडले. हे विणकाम हातानेच विणलेले, अर्थात सुयाम्वर – एका वा दोन असावे.
प्राचीन काळात भारत, तुर्कस्तान, अरबस्तान, चीन, उत्तर व दक्षिण अमेरिका अशा विविध ठिकाणी विणकाम केले जात असावे.
अलीकडच्या काळात पहिला उल्लेख सापडतो तो १३९० मधला. प्रसिद्ध जर्मन चित्रकार बरट्राम (Bertram) यांनी “ निटींग मेडोना “ हे चित्र काढले आहे. यात विणकाम करत असल्याचे चित्र त्यांनी रेखाटले आहे.
अठराव्या शतकाच्या सुरुवातीला चीन, भारत, अरबस्तान, येथून क्रोशा चे विणकाम पर्शियात आले. अन अठराव्या शतकाच्या शेवटी हे विणकाम युरोप मध्ये पोहोचले.
१८०० मध्ये इटालियन नन्स हे विणकाम करत. त्याच मुळे या विणकामाला “नन्स वर्क “ म्हटले गेले.
प्रबोधन काळात युरोप मध्ये अनेक जुन्या कलांचा नव्याने पुनरुथ्थान झाले. त्यातील एक क्रोशा. त्या काळातील स्त्रियांनी या कलेला पुन्हा जिवंत केले, वाढवले.
भारतात विसाव्या शतकात, नव्याने क्रोशा आणला तो स्कॉटलंड येथील मॅक्रे ( Macrae ) या दांपत्याने.
A short history of knitting
Thursday, July 11, 2013
सखे ग...
_____________________________________________
अग, आहेस का ग ? खूप गरज आहे तुझ्याशी बोलायची, बोल ग...
(आता तिची सगळी वाक्य ... अशी; कारण ती प्रत्येकीची वेगवेगळी अन वैयक्तिक )
काय झालं? बरी आहेस ना
...................
काय झालं
.................
झालं काय पण?
....................
बोल, बोलुन मोकळी हो
.....................
काय झालं नीट सांग
.........................
म्हणजे?
.......................
...............................
......................
अग हे सगऴीकडे असेच असते...जो करतो त्याच्यकडुनच जास्त अपेक्षा असतात
.........................
अग असं नाही ग
...............................
हो, अग त्यांना लक्षातच येत नाहि
.......................
अग माझी बायो...
.......................
........................
.................
हो ग अगदी खरं
..........................
.......................
..........................
बरोबर आहे
.................
.......................
सगळ्या पुरुषांना ना काहीगोष्टी कळतच नाहीत अगदी
..........................
अन त्यांते विश्व, काही वेगळेच असते
.....................
अगदी अगदी
सेम हिअर ग
......................
...............................
माझी पण अशीच चिडचिड होते ग....
.............................
पण एक लक्षात ठेव आयुष्यभरासाठी
पुरुष हा वयाने मोठा होतो पण मनाने तो कधीच मोठा होत नाही.
...........................
माझा अनुभव आहे हा
........................
आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा तो प्रथम गोंधळतो
........................
मग घाबरतो
मग काही करू शकत नाही म्हणुन चिडचिड करतो
.................................
खरं सांगायच तर वयाने वाढलेले ते एक पोर असते.
वय वाढलेले म्हणुन इगो
.............................
........................
अन पोर म्हणुन केअरिंग कसे ते माहिती नाही. फार अभावानेच केअरिंग असणारे पुरुष पाहिले मी
.......................
त्यातून जी बाई कर्तुत्ववान तिचा नवरा हमखास असा नाही, नाहीच
................................
............................
अन मी सगळ्यांसाठी हे करताना सगळे म्हणजे कोण हे ठरव बसुन
अन फक्त त्यांच्यासाठीच सारे कर
....................................
अन ते करताना माझ्यासाठी फक्त आणि फक्त मीच हे कोरुन ठेव मनात
...............................
अन हे सारख सांगत रहायच मनाला
..................
.................
अवघड आहेच पण जमत.
...........................
सर्वात महत्वाचे, स्वत:ला माफ करायला शीक
........................
एखादी गोष्ट नाही जमली करायला तर काही गुन्हा नाही केला
एक दिवस एखादे काम केले नाहीस तर जग बुडी नाही होत
......................................
अन तू कुचकामी पण होत नाहीस
....................................
मला जमणार नाही हे म्हणायचे धाडस कर
...................................
तसे केलेस तर त्याचा अपमान होत नाही
उलट हे म्हणु शकण्याचा हक्क त्याचाच आहे, त्यालाच हे तू म्हणु शकतेस हे सांग
...................................
................................
ती राहणारच ना...ते तुझ पहिलं पोर आहे हे विसरु नको
..........................
शेरे ना, मारु दे. हसत म्हण.... बघ बाबा मला जमत नाहीये, तू शिकव ना जरा; की तूच करतोस?
.......................
...........................
आपण बायका ना सारेच्या सारे फार सिरियसली घेतो. थोडं हलकं घ्यायला शिकायला पाहिजे.
..............................
मग काय करायच?
आपल्या मानेला आपलाच खांदा द्यायचा
......................
..............................
अवघड आहे, हो आहेच अवघड पण उपाय नाही
साध्य करायचेच...जमते
...........................
या सा-यातून गेलेय ना मी पण
सो कळतेय मला काय होते ते
.........................
बघ आताही करुन बघ
............................
हलकेच मान सैल सोड
हळूहळू स्वतःच्याच खांद्यावर टेकवायचा प्रयत्न कर
.....................
जमेल अन रिलिफही वाटेल
शब्दशा सांगते, इट वर्क्स
........................
बरं असू दे आता सारं तसच. तू थोडी झोप आता.
....................................
सगळे विचार, शंका, कटकटी सगळे माझ्याकडे सोपव आणि पड निवांत,मी आहे
.......................
ओके ओके, झोप बघू आता शांत, गुणाची बाय माझी, शांत हो....
Thursday, June 6, 2013
तीस मुलांची आई
माझी पहिली मुलगी अर्थातच तुलसी. सर्वच मराठी घरात पहिली येते ती हीच. घरातले वातावरण स्वच्छ करणारी, संध्याकाळी घर उजळवणा-या दिव्याला सामावून घेणारी, पहाटे हिलाच वंदन करून सुर्याचे दर्शन घ्यावे अशी ही तुळस.
नंतर आला तो पाश्चात्य मनी. घरात सुबत्ता आणण्याचा दावा करणारा. आपल्या सतेज रंगाने नेहमी घरात उत्साही राहणारा मनी प्लॅट.
तिस-या क्रमांकावर होत्या त्या जुळ्या बहिणी. सुरुवातीला एकाचीच चाहूल होती पण पाठ्ला पाठ लावून आल्या या दोघी निशा आणि राणी. माझ्या लाडक्या लेकी. दिवसभर त्यांच्या लांबलचक हिरव्या उत्साहाने सारा दिवस कसा प्रफुल्लित होऊन जातो अन रात्री सुगंधाने मोहवून टाकतात दोघी; सारे घर रात्र भर सुंगंधीत करून टाकणा-या दोन रातराण्या.
सध्या झोपाळ्यावर विसावलेली मधु या दोघींच्या नंतरची. लांब लचक देठांवर घोसच्या घोस घेऊन ओथंबलेली. थोडा गोड, थोडा रासवट मंद सुगंध बरसत वा-याच्या झोक्यावर मंद मंद झोके घेणारी मधुमालती.
अन मग चाहूल लागली पुन्हा जुळ्यांची. याही वेळेस गोंडस लेकी. पिली आणि गुली. लांबच लांब हिरव्या गवतातल्या या दोघी फार फार नाजुक. सुगंध नाहीच पण त्याची भरपाई रुपात. अलवार, तलम, मऊ कांती अन छोट्या झुळुकीवर डोलणा-या. पिवळ्या अन गुलाबी रंगात आपल्याला नाहून टाकणा-या लिली.
मग आली ती भारदस्त पर्णी. तिच्या गडद रंगाने आणि भरदार पणाने आकर्षून घेतले तिने. जाड, गडद हिरवी, गोलाकार, पसरलेल्या तिच्या हातांनी जणूकाही घट्ट मिठ्ठीच मारत असते आपल्याला ती. इतरांच्या तुलनेत भरभक्कम अन भराभर वाढली ही. पण मग तिच्या वाढीला आवर घालावा लागलाच मला.तिला पिटुकले करताना फार काळजी घ्यावी लागली, तिला जगवण्यासाठी भारी कष्ट घ्यायला लागले. आता तिचे छोटे रुप माझ्या आवाक्यातले. माझ्या घराची शोभा वाढवणारी ही इटुकली पिटुकली सातपर्णी.
आमच्या शेजारी राहणा-या छोट्या रामला 'ते' फार त्रास द्यायचे. अगदी त्याचे जिवन असहाय्य करून सोडले 'त्यांनी'. माझ्या निगुतीने वाढणा-या मुलांकडे पाहून मग आमच्या शेजा-यांनी त्यांचा राम मला दत्तक दिला. अन तोही माझ्या गोकुळात सामावून गेला. तुलसीचा हा लांबचा भाऊ म्हणून मह त्या दोघांची गट्टी जमली. आपल्या वासाने आणि चवीने सुगंधीत करणारा हा राम - राम तुळस आता माझाच बनलाय.
मग आली ती झिपरी. सदा उत्साही. छोट्या छोट्या तिच्या झिप-या भुरळ घालणा-या. वेळ, काळ, ऋतु कोणताही असू दे, ही सदा आनंदी अन उत्साही. पाहता क्षणी आपल्या चेह-यावर हसू आणणारी झिपरी.
अन मग एका अपघाताने जन्माला आला तो काटेरी गोंडूस. घरातला ओला कचरा जिरवताना बहुदा याची बी रुजली. आधी कळलेच नाही त्यामुळे त्याचे नामकरण जरा उशीराच झाले. गडद रंग, गोलसर हात अन गोंडुस रासवट सुवासावरून त्याची निश्चिती झाली. अन मद त्याचा काट्यांनी ती नक्की केली. खरे तर हा फार फार भारदस्त. पण त्याला मी वाढवायचे तर पुन्हा पर्णी सारखीच त्याची जोपासना करणे क्रमप्राप्त होते. अजून संस्कार चालूच आहेत. बघू कसा वाढतोय हा काटेरी,गोंडुस मोसंबी.
तश्या या दोघी इतरांच्या घरात पटकन येतात. पण माझ्याकडे या जरा उशीरा आल्या. अन आल्या त्या एकदम, एकमेकींच्या हातात हात घालून. लाली अन गुलाबी. सदा आपल्या उत्साही, रंगीत. एकाच वेळि ३-३, ४-४ फुलांनी फुललेल्या लाल अन गुलाबी सदाफुली.
तसाच राजाही जरा उशीरा आला. त्याचे गावठीपणच मला भावले. गडद लालेलाल अन सुगंधी लाल गुलाब जणु राजाच माझ्या घरचा.
माझी दुसरी दत्तक मुलगी म्हनजे शेवंता.शेजारच्या इमारतीतील एका आज्जींना आता सारे करणे झेपेना. हळू हळु त्यांनी एकेक पसारा आवरायला घेतला. त्यात ही माझ्याकडे दत्तक म्हणुन आली. आली तेव्हा इतकुली असणारी आता छान वाढली, आता फुलेल लवकरच ही शेवंती.
आमच्या सोसायटीतल्या एकाला एके ठिकाणी ही छोटी सापडली. कोणीतरी बेवारशी सोडलेली. त्याला कळवळा आला अन तिला तो माझ्याकडे घेऊन आला. तिची अवस्था अतिशय नाजूक होती. अगदी खुरटलेली, अंगात जीव नसलेली, मरणप्राय अवस्थेतील या छोटीला अगदी सांभाळून वाढवली. अगदी लवंग उष्ण लागेल अन वेलचीने सर्दी होईल अशी तोळा मासा प्रकृती हिची. पण हळूहळू तग धरली हिने. अन आता मस्त डोलते आपला रंगीत भार पेलून.
मध्यंतरी माझ्या दोघी लेकीचा पसारा फार वाढला. मग काही काटछाट करताना मनात आले की पर्णी अन गोंडुस यांच्या सोबत छोटी मधू अन छोटी राणि करावी का? मग त्यांन जन्माला घातले. आताशी त्या दोघी जीव धरू लागल्यात. त्यांचे छोटे होणे कसे जमतेय ते बघू पुढे. पण मोठ्या निशा न राणी या दोघींचे आपल्या या छोटुकल्या राणीकडे लक्ष आहे अन झोपाळ्यावर विसावलेल्या मधूचे आपल्या पिटुकल्या मधू कडे लक्ष आहेच त्यामुळे मला काळजी नाही य पिटुकल्या दोघींची.
मोठ्या प्रेमाने आणि खूप अपेक्षा घेऊन जन्माला आला तो सुगंध. सुरेख वाढला. पण काही केल्या त्याचे मन माझ्याकडे लागले नाही. मनासारखा उमललाच नाही तो. दोन वर्षे त्याच्याशी खूप बोलले, त्याचे खुप लाड केले पण नाहीच फुलला मोगरा.
मग त्याच्या सोबत म्हणून अजून एक सुगंध आणला. हा मात्र लगेच फुलला. सुगंधी मोग-याच्या सोबत बघू पुढच्या उन्हाळ्यात तरी मोगरा फुलतो का.
माझ्या स्वयंपाक घरात माझ्या पदराशी लोंबकळणारा हा सुरुवातीला फार नाजूक होता. तशात कोवळ्या वयात तो व्यायला. त्याच्या फुलांकडे पाहून कॉलनीच्या माळ्याने आता हा वाढणार नाही असे दुष्ट भविष्य वर्तवले. मी मनातून भारी हिरमुसले. पण मग भविष्य हे घडवायचे असते यावर विश्वास ठेऊन त्याच्याशी बोलत राहिले. इथल्या मित्र मैत्रिणींच्या सल्ल्याने त्याचा बहर खुडून टाकला. त्याला समजावले बाळा तुझे वय वाढीचे, बहरण्याचे नाही. अजून त्याला वेळ आहे. त्याला पुन्हा पुन्हा बहर येत होता. अन मी त्याला खुडून टाकत समजावत राहिले. नाठाळ मुला प्रमाणे त्याने माझा फार फार पेशन्स पाहिला. पण अखेर ताकाचा शुद्ध आहार अन माझ्या संस्कारांनी तो शमला. त्याचे उधळले पण निवाले. अन आता गुमाने नीट वाढतोय कढीलिंब.
गोंडुसच्या जन्माने मला शिकवले की काहीही वाया जात नाही. अगदी कच-यातूनही काही जन्मते. मग मी कचराही जिरवायला लागले. त्यातून ही जन्मली. जन्मली तेव्हा कळले नाहीच हिचेही नाव गाव. पण मग एके दिवशी एका हाताखाली नाजूक पांढरे-काळे फुल घेऊन आली. अन मग माझी ट्युब पेटली. त्या फुला कडे त्याच्या नाजूक, अलवार रुपाकडे पाहून कोणाला खरे वाटणार नाही, की यातूनच बनते तिखट मिरची. एकदम झणझणीत आहे माझी मिरची.
बहिणी कडच्या ह्याने मला भुरळ घातली होती. त्याचा सुवास, त्याचे शुभ्र गोजिरे रुपडे मनाला भावून गेले होते. मग तोही आणला घरी. पटकन रुळला तो. अन मग पहाटे माझ्या घरी चांदणे उमलवतो हा कुंद !
एके दिवशी याला पाहिले अन त्याच्या प्रेमातच पडले. मग काय त्याला घरी घेऊन आले. अतिशिय आटोपशीर पणे पसरलेला, वा-याच्या झुळुकेवर झुलणारा, पाखरांच्य घरट्यांना लांब सडक दो-या पुरवणारा माझा लाडका पाम. त्याच्यामुळेच तर लालबुड्या माझ्या दारी येत असतो.
माझ्या दारी सन बर्ड आला तो याच्या मुळे. खरे तर कुंपणावर पडिक असणारा हा. लहान पणापासून माझ्या मनात भरला होता. मग काय घेऊन आले त्यालाही. सुरेख पाच बोटांचे इवलाले हात पसरून तो वाढू लागला. आजूबाजूला जे कोणी असेल त्याला आपल्या नाजूक पण बळकट हातांनी वेढून घेऊ लागला. त्याचा पसारा हळूहळू बाढू लागला. अन मग एके दिवशी सकाळि घरात दरवळ पसरला. रानवट पण अतिशय गोड वास सर्वांना खेचून घेऊ लागला. माझ्या दारी चक्क निळा जांभळा कृष्ण अवतला. अन त्याच्या पाठोपाठ सनबर्डही अवतलला. कृष्णकमळाच्या फुलावर उलटा टिंगून लटकणारा सनबर्ड बघताना काय वाटते ते कसे वर्णन करू ?
थोडी मोठी मुलंही रुळतात हे पाहून याचे कंद आणले. छोटे दोन हात उचलून तो माझ्याकडे बघू लागला आणि मला कलले हाही जन्माला येतोय. अन मग एके दिवशी हळूच आपले फुगलेले पोट त्याने दाखवले. आठवड्यातच एका संध्याकाळी अंधारून यायला अन सोनटक्क्याच्या फुलांनी उमलायला एकच वेळ आली. शुभ्र काही उमलले, सुगंधी काही पसरले, डोळे, मन अगदी निमाले.
हा माझा प्रचंड आवडीचा पण माझ्या छोट्या घरात हा कसा वाढेल अशी शंका होती मनात. पण जेव्हा गोंडुसही माझ्याकडे आपण हून वाढला तेव्हा धाडस करायचे ठरवले. अन त्याला घरी आणले. मोठ्या बालदी मध्ये त्याला स्थानापन्न केले. आणले तेव्हा ब-याच कळ्या होत्या त्याला. त्या तर उमलल्या. पण तो रुजला की नाही ते कळायला अजून वेळ होता. होत्या त्या कळ्या सा-या उमलून गेल्या. अन मग कोवळी पाने नव्याने आली. अन चक्क एक नवी कळीही आलीय. आता नक्कीच माझा चाफा रुजलाय.
मग माझ्या मैत्रिण कम विद्यार्थिनीने तिची तीन बाळे मला भेट दिली. नाजुका, जांभळी अन मखमली. आता त्यांना माझ्या दारी रुजवतेय.
या सा-यांना वेळोवेळी तुम्ही पाहिलं आहेच इथे, त्यामुळे पुन्हा फोटो नाही टाकत त्यांचे. या सा-या मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी, त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी नुकताच आई आणि बहिणींनी झोपाळा दिलाय. मग काय येताय ना माझ्या ३० मुलांशी गप्पा मरायला? मुलं आणि झोपाळा वाट बघताहेत :)
Monday, May 27, 2013
Sunday, December 23, 2012
वत्सल सुधा - उत्तरार्ध (कथा)
कधी कधी मला वाटतं सामाजिक इतिहासात या कथांमागचे बीज जास्त महत्वाचे काही सांगते. उदाहरणार्थ, या कथेत सांगितलेल्या घटनांपेक्षा त्या घटना सांगाव्या, आठवणीत ठेवाव्यात हे वाटणं अन त्या काळात लोकांनी तिच्या ताकदीवर विश्वास ठेवणे, तिच्या आधाराने उभे राहणे; यातून प्रत्यक्ष त्या कारणांपेक्षा तिच्याप्रति त्यांचा असणारा विश्वासच खूप काही सांगून जातो असं मला वाटतं.
भले त्यातल्या काही घटना काहींना (अगदी मलाही ) अशक्य किंवा बुद्धीला न पटणा-या वाटतील. पण अशा गोष्टींवर त्या काळातल्या लोकांचा गाढ विश्वास होता हे तर नाहीना नाकारू शकत ( अगदी मीही) . माझ्या दृष्टीने महत्वाचे हे आहे की तिच्या कर्तृत्वाने, तिच्या कामाने; तिने हा लोकांचा विश्वास संपादन केला होता. सावत्र मुलांसाठी ती करत असलेली धडपड आणि स्वार्थ बाजूला ठेवण्याचे इतके स्वच्छ उदाहरण दुसरे कोणते नसावे. हे लोकांना वाटत, पटत असणे मला जास्त महत्वाचे वाटते.
अशा अनेक व्यक्ती त्या काळात झाल्या; ज्यांनी आपल्या कामातून असा लोकांचा विश्वास प्राप्त केला. त्यांच्या आयुष्याची उदाहरणे अनेकांना प्रेरणादायी ठरली. माझी ही आजी जिला मी पाहिलेपण नाही तिला अन अशा सर्वांना माझी ही भावांजली ! )
वत्सला, सुधा म्हणून नव्या घरात आली तर खरी, पण अनेक आव्हाने तिच्यासमोर उभी होती. मुळात स्वतःच्या दु:खावर, अडचणींवर मात करून ती अतिशय कष्टाने अन अनेकांचा विरोध पत्करून स्वतःच्या पायावर उभी राहिली होती. शिक्षिका म्हणुन नोकरीला लागलेल्या वत्सलाने आपल्या कष्टाने अन हुषारीने हेडमिस्ट्रेस पर्यंत मजल मारली होती. ठाण्यासारख्या शहरात धाकट्या भावंडांना घेऊन राहात होती. अडीनडीला काकांचा आधार होता, पण तिचा स्वाभिमान तिला तो नेहमी घेऊ देत नसे. स्व बळावर भावंडांची शिक्षणं, लग्न करून दिली तिने. अन स्वतःचेही जीवन कर्तृत्वाने, कणखरपणे जगत होती. अशा परिस्थितीत प्रधानांबरोबर लग्न करण्याचा तिचा निर्णय एक मोठीच उडी होती. त्यातून नव्यानेच संमत झालेल्या घटस्फोटाच्या कायद्याचा आधार घेऊन एका नव्या बदलाचे ती प्रतिनिधित्व करत होती. पहिला वाईट अनुभवही वाकुल्य दाखवत असे. अन हे नवे जीवन जगण्यासाठी तिला नोकरीही सोडावी लागणार होती कारण पाच मुलांना वाढवण्याची जबाबदारी तिला उचलायची होती.
परंतु प्रधानांसारख्या सदगृहस्थांच्या साथीवर तिचा विश्वास होता. त्याच्या जोडीने तिने या नव्या घरात प्रवेश केला. या नव्या घरात होती तीन चिल्लीपिल्ली, दोन अडनिड्या वयातली मुलं, एक वयोवृद्ध सासरे अन तिच्या दिवंगत सवतीची वृद्ध आई !
प्रधानांची प्रथम पत्नी गुलाब ही तिच्या आईची एकुलती एक लेक. त्यातून वडिल अगदी तिच्या जन्माच्या आधीच, आई गरोदर असतानाच गेलेले. त्यामुळे गुलाब अन तिची आई या दोघींची ताटातूट कधी झालीच नव्हती. झाली ती गुलाबच्या जाण्यानेच. त्यामुळे प्रधानांच्या घरी गुलाबबरोबर तिची आईही प्रधानांकडेच रहात असे. त्यातून प्रधानांना नोकरी निमित्ताने बाहेरगावी जावे लागे. तेव्हा गुलाबही त्यांच्याबरोबरी कधी कधी जात असे. मुलं मात्र आजीकडे, आईच्या आईकडे प्रेमाने राहात. स्वाभाविकच मुलांना या आजीचा खूप लळा लागला होता.
प्रधानांना त्या वेळेस नोकरी निमित्ताने गुजरातला अंकलेश्वरला जावे लागले. मुलांना मोठ्या सुट्ट्या नसल्याने ती तिघं आजी जवळ ठाण्यालाच राहिली. लहान दोघांना घेऊन प्रधान अन गुलाब अंकलेश्वरला गेले. तिथेच अचानक एके दिवशी देवाची पुजा करताना दिवा लावल्यावर उजळलेली काडी विझली असे वाटून गुलाबने काडी मागे टाकली. दुर्दैवाने ही पेटती काडी तिच्या नऊवारीच्या कासोट्याला लागली अन लक्षात येईपर्यंत गुलाब उभी पेटली. प्रधान कार्यालयात गेलेले अन मुलं अंगणात खेळत होती. गुलाबचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे धावत आले पण घडायचे घडून गेले होते. गुलाब काळवंडून गेला होता.
आईचे हे जाणे सगळ्याच मुलांना अन प्रधानांना अन त्या वेळच्या आसपासच्या सर्वांनाच जिव्हारी लागले. सर्वात लहान मुलगा केवळ चार वर्षाचा होता. आजी जरी घरी असली तरी तिचे वय पाहता मुलीच्या मृत्यूचा हा धक्का तिला सहन करून मुलांना वाढवणे फार अवघड होते. त्यामुळे प्रधानांच्या बहिणीने तू पुन्हा लग्न कर असा प्रस्ताव मांडला. काही काळ गेल्यावर प्रधानांचे मन वळवण्यात बहिणीला यश आले. आणि यातूनच वत्सला अन प्रधान यांची गाठभेट झाली अन दोघांनी प्रस्ताव मान्य केला. यात मोठा अडथळा होता तो वत्सलाच्या घटस्फोटाचा. पण तोही श्री. माधवराव हेगडेंच्या मदतीने पार पडला अन वत्सला सुधा बनून प्रधानांच्या घरी प्रवेश करती झाली.
सुधाचा स्वभाव अन तिने घेतलेला जगाचा अनुभय यांच्या मुळे या नव्या घरात ती हळुहळू रुळली. धाकटी तिघे तशी अजाणत्या वयात होती. त्यांना सुधाच्या वात्सल्याने आपलेसे केले. मोठी मुलगी १५ वर्षांची अन मुलगा १३ वर्षांचा, ही मात्र जाणत्या वयात होती.तशात गुलाबनेही मुलांना खूप मोकळेपणाने वाढवले होते. अगदी मोठ्या मुलीला स्वातंत्र्यलढ्यातील प्रभातफे-यांमध्ये भाग घ्यायलाही तिने प्रोत्साहन दिले होते;अगदी वडील सरकारी नोकरीत मामलेदार असूनही. आपल्या सख्ख्या आइच्या अनेक आठवणी त्यांच्या मनात कोरलेल्या होत्या. पण या दोघांशीही तिने फार चांगला संवाद साधला. एक आदर्श सावत्र आई कशी असावी याचे ती द्योतकच होती. आणि तिचा मोठेपणा हा की ती नेहमी बोलून दाखवी, " मोठ्या दोघांनी मला खूप चांगली साथ दिली. त्यांच्यामुळे मी सारे निभावून नेले. त्यांच्या सहका-यानेच मी त्यांची आई होऊ शकले."
एकंदरच प्रधानांच्या घराची घडी पुन्हा बसायला लागली.
वर्षभरात सुधाबद्दल, तिच्या मुलांना वाढवण्याबद्दल विश्वास वाटला म्हणुन गुलाबच्या आईने आपले बस्तान नागपूरला आपल्या भावाकडे हलवले. आपल्या लेकीची मुलं योग्य हातात आहेत, त्यांचा प्रेमाने सांभाळ होतोय या आनंदात आजी मामाकडे गेली.
याच सुमारास सुधाच्या सास-यांना स्मृतिभ्रंश होऊ लागला. काळ, वेळ, जेवण सगळेच भान हरवू लागले. अनेकदा जेवून झाल्यावर मोकळ्या पानात, मला जेवायला का वाढत नाहीस ? असे विचारू लागले. हळुहळू त्यांचे सगळे भान हरपत चालले. त्यांचे सर्व अगदी लहान मुला प्रमाणे करावे लागे. अन सुधा हे अगदी न कंटाळता, न चिडता करी. जवळ जवळ दोन वर्षे हे असेच चालू राहिले. एकीकडे मुलांना वाढवणे अन दुसरीकडे सास-यांची काळजी घेणे हे सुधाला करावे लागले.
तशात स्वतः प्रधान आजारी पडले. आता मात्र सुधाच्या पयाखालची जमीन हादरली. पाच पाच सावत्र मुले, आजारी सासरे यांची सारी जबाबदारी येऊन पडली अन हाती नोकरीही नाही, आता कसे निभायचे अशी भिती तिला वाटू लागली. या सर्व काळात तिला आधार होता तो तिच्या श्रद्धेचा.
तुळजाभवानी आणि एकवीरेवर तिची नितांत श्रद्धा होती. परंतु तिची ही श्रद्धा तिने इतरांवर लादली नाही. तिचा स्वतःचा मात्र तुळजाभवानी आणि एकविरेवर प्रचंड विश्वास होता. दर मंगळवारी ती एक आण्याचा एक पेढा, २ आण्याच्या दोन वेण्या अन ४ आण्याचे दोन हार असा खूप खर्च करते म्हणुन नातेवाईकांनी खूप गलका केला. परंतु " मी माझ्या नव-याच्या पैशातून करते. अन त्यांचा याला विरोध नाही' हे तिने ठाम पणे सांगितले. ज्या गोष्टी तिला पटत त्या ती कोणाचीही भिडभाड न ठेवता करत असे. आपण जर चांगल्यासाठी करतोय तर घाबरायचे कशाला अन कोणाला, हा तिचा विचार असे. नातेवाईकांचे हे सगळे बोलणे ती आपल्या भक्तीपोटी सहन करी.
या तिच्या भक्तीने तिला एक मोठा वरही मिळाला होता. अनेकदा भावी घडणा-या घटना तिला स्वप्नात दिसत. आगावू सूचनाच जणू तिला मिळत. भावी काळातील सुख - दु:ख पेलण्यासाठी अशी स्वप्न तिला अन जवळच्यांना बळ देत. हे अनुभव तिच्या जवळच्या अनेकांनी, अनेकदा घेतले.
एके दिवशी मोठी मुलगी खोल काळ्या डोहात निपचित पडली आहे असे तिला दिसले. अन मोठे काका अन भाऊ तिला वाचवताहेत असे दिसले. याच वेळेस मोठी मुलगी अतिशय आजारी पडली. मोठे दिर अन त्यांच्या मुलाने धावपळ करून डॉक्टरांना आणले. अन उपचार सुरू झाले. अन मोठी लेक दुखण्यातून बाहेर पडली.
एक दिवस सकाळी उठल्यावर तिला स्वप्नात मधली मुलगी लंगडत चालतेय असे दिसल्याचे तिने सांगितले. थोड्याच दिवसात त्या मुलीच्या पायाला मोठे गळू झाले. ते ऑपरेशन करून काढावे लागले अन त्या काळात तिला लंगडताना पाहून सुधाच्या स्वप्नाची आठवण प्रत्येकाला झाल्यापासून राहिली नाही.
एके दिवशी सुधाच्या स्वप्नात गुलाब आली अन खुप छान हसत राहिली. काही दिवसातच मोठ्या मुलीचे लग्न ठरले तेव्हाही हेच घडले.
काही दिवसांनी सुधाने काळजीने सांगीतले, तुमची आई सारखी रडत होती काल. पुढच्याच आठवड्यात एका लग्नात सुधाने बनारसी शालू नेसला होता, जो गुलाबचा होता. लग्न लागल्यावर सुधाने साडी बदलली अन बनारसी शालू घडी करून पिशवीत घालून सगळ्या सामानात ती पिशवी ठेवली. कशी कोणजाणे पण त्या व-हाडात चोरी झाली अन इतर काही गोष्टींबरोबर हा बनारसी शालूही चोरीस गेला.
अशा किती तरी आठवणी. म्हटले तर विश्वास बसाव्यात अशा, म्हटले तर निव्वळ योगायोग.
सुधाच्या बाबतीत अजून एक वेगळेपण म्हणजे तिचे एकविरेचे सहस्रनाम. वर्षातून सोळावेळा ती एकविरेचे सहस्रनाम करी. श्रावणात फुलांचे अन बाकीचे वर्षभर कुंकवाचे. तिच्या भक्तीचे बळ अनेकांनी अनुभवले होते. सहस्रनामाच्या वेळेस देवीला वाहिलेले कुंकू नंतर अनेकजण येऊन अंगारा म्हणून घेऊन जात. अनेकांना हा अंगारा आपल्याला संरक्षण देतो असे वाटत असे. घरातले तर सर्वच हे कंकू लावूनच बाहेर पडत. परंतु तिच्या भक्तीची प्रचिती अनेक ओळखी लोकांनाही आली होती.
अशा रितीने वात्सल्याचे अमृत घेऊन केवळ प्रधान, त्यांची मुले, कुटुंबीयच नव्हे तर आपल्या आसपासच्या सर्वांचेच आयुष्य तिने उजळून टाकले. आपल्या दोन्ही नावांना सार्थक झाली; वत्सल सुधा !
Thursday, December 20, 2012
वत्सल सुधा : पूर्वार्ध
तिच्या आयुष्याला इथेच कलाटणी मिळाली.
( पुढे चालू....)