काल पुन्हा सजण दारी उभा वाचत होते. खरंतर कितीदा तरी वाचले, ऐकलं आहे. सुरेश भटांचा त्यामागचा विचारही माहिती होता. मृत्युला कितीतरी जणांनी साजण म्हटले आजवर! म्हटलं तर ही प्रेयसीची धांदल; म्हटलं तर प्रेयसीची आर्तता ; आणि म्हटलं तर मृत्युची आलोचना ! हे सगळं माहिती असूनही काल हे शब्द वाचताना जास्त भिडत गेले.
खरच किती तयार असतो आपण त्यासाठी ? जगण्याच्या कितीतरी गोष्टी आपण पसरवून ठेवलेल्या असतात. किती तरी गोष्टी आवरायच्या राहिलेल्या असतात. अगदी सगळं जगलो म्हणत असतांनाही किती काय काय राहिलेलं असतं..
स्वत :च दिसणं, राहणं, अभ्यास, विचार, या सगळ्या स्वतःच्याच गोष्टी तरी आपण मनानी केलेल्या असतात का? आपल्या आपल्याबद्दलच्या अपेक्षा संपलेल्या असतात का? मी असं असं दिसलं पाहिजे, असं असं वागलं पाहिजे, असा अभ्यास केला पाहिजे, असा विचार केला पाहिजे, या सगळ्याच्या अपेक्षांचे ओझे उतरतच नाही डोक्यावरून. अगदी किती काय काय करूनही स्व बद्दलची आसक्ती काही उतरतच नाही. मीपणाची भूल काही उतरतच नाही...
या माझेपणातून बाजूला होऊन अजून खऱ्या मला कधी बघितलेच नाही. माझ्यातल्या दुबळ्या मनाला मृत्यूसाठी अजून तयारच केलं नाही. आयुष्यातल्या हरएक दुःखाला नीट समजून, नीट स्वीकारून त्या सगळ्यांना एकत्र करून; त्याचा लेखाजोखा मांडलाच नाही. माझ्यातला प्राण; जो त्याअन्तिम सत्याशी बांधलेला आहे; त्याचा अजून विचारच केला नाही. त्या अंतिम सत्याशी होणारी भावी भेट मी अजून अपेक्षितच केलेली नाही. समोर मृत्यू उभा आहे अन मी मात्र अजून जीवनातल्या सुखादुखां:शीच बांधलेली!
मृत्यू पुन्हा समोर दिसतोय. त्याची हाक आता समजतेय; अन समजतेय की ही हाक जन्मजन्मांतरीचा आहे. दर जन्मानंतर तो हाक देतोच. जन्म आणि मृत्यू दोघे एकमेकांचे प्रेमी, त्यांचे अतूट नाते ! राधे शिवाय कृष्ण नाही अन कृष्णाशिवाय राधा नाही, तसे हे घट्ट, अविरत नाते. हे सगळं अगदी नीटच समजतंय पण तरीही जीवनाचा हात सोडवत नाहीये, माझ्याच हृदयाला कसे समजावू? की थांबावं हे धडकण ? तो उभा आहे दारात. आता माघारी फिरणे नको, नकोच!
No comments:
Post a Comment