Wednesday, June 2, 2021

अक्ष पातळी : जाणीव नेणिवांची

(पातळी म्हणजे ज्या अक्षावर व्यक्ती उभी असते ती पातळी इथे अपेक्षित आहे. इंग्रजीत ज्याला एक्स ऍक्सेस  म्हणतात तो! आणि अक्ष पातळी म्हणजे ज्या अक्षावर व्यक्तीचे डोळे असतात ती  )

मागे एकदा एक सुंदर चित्रपट एका मित्राने सुचवला. कर्मधर्म संयोगाने तो टीव्हीवर बघायलाही मिळाला. "दि डेड पोएट सोसायटी" या नावाचा. त्यातली "बाकावर उभं करणं वा राहाणं" हि फ्रेज फारच भावली. अन मग अनेक गप्पांमध्ये ही फ्रेज "जा बाकावर" या स्वरूपात मी अनेकदा वापरली.  खरंतर हि फ्रेज आपल्या शालेय जीवनातला एक वाईट, लाज आणणारी गोष्ट! पण या चित्रपटाने हीच गोष्ट एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलीय. 

घरात मी सगळ्यात लहान. लहान असण्याचे अनेक फायदेही असतात पण त्याच बरोबर अनेक तोटेही ! मला आठवतं ते मोठ्या बहिणींनी माझ्या वयानुरूप लहान उंचीचा घेतलेला फायदा. मला हवी ती वस्तू हात वर करून उंच धरून ठेवणे, मुद्दाहून माझी खेळणी उंच टेबलावर ठेवणे. या अन अशा त्यांना गंमत वाटणाऱ्या पण मला भयंकर राग येणाऱ्या गोष्टी. त्यांना आता हे आठवणाराही नाही, पण माझ्या स्मरणात त्या घटना अगदी चित्रासारख्या ठसल्या आहेत. मोठं होत असताना त्यामागचा राग, हताशा गेली. नंतर तर घरात मीच सगळ्यात उंच झाले अन मग माझ्या उंचीचा सार्थ अभिमानच वाटत गेला. घर, शाळा, कॉलेज सगळीकडे, खेळांतही. 

माझा मुलगा साधारण वर्षांचा असेल; नुकताच पावलं टाकू लागलेला. तेव्हा पलंगावरच  एक खेळणे तो टाचा उंच करून प्रयत्न पूर्वक घेताना दिसला. अन मला चटकन माझे लहानपण आठवले. तेव्हापासून मग त्याच्या उंचीचा, त्याच्या हाताच्या पातळीवर त्याच्या वस्तू आहेत न हे पाहण्याची सवय मला लागली. अर्थातच त्याच्यापासून ज्या गोष्टी दूर राहाव्यात वाटतं त्या वर ठेवणं हेही झालंच. सर्वसाधारणात: ही दुसरी काळजी घेतली जाते पण पहिली? त्याबद्दल नेहमी जाणीवपूर्वकता असते का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याचा :)

याच काळात त्याच्यासाठी, एक आडवी न होणारा  (तळाला वाळू भरलेली) बाहुला आणलेला. त्याला तो अजिबात आवडत नसे. किंबहुना तो त्याला घाबरत असे. एकदा मी आडवी झालेले असताना तो बाहुला नेमका माझ्या जवळ होता. अन तेव्हा मला जाणवलं की त्या बाहुल्याचे डोळे भितीदायक दिसताहेत. मी चटकन उठून बघितलं तर तो बाहुला छान हसरा दिसत होता.म्हणजे माझ्या डोळ्यांच्या पातळीवर तो हसरा दिसत होता. पण माझ्या लेकाच्या डोळ्यांच्या पातळीवर तो बाहुला भितीदायक दिसत होता. मी लगेचच तो बाहुला नजरे आड केला. मला कळलं कि इतके दिवस मी माझ्याच लेकाला किती भितीदायक अनुभव खेळ म्हणून देत होते. 

अन मग तेव्हापासून मला लेकाला द्यायच्या सगळ्या गोष्टी त्याचा अक्षपातळीवर जाऊन तपासायची सवय लागली. अनेकदा दुकानदार हसत. सोबतच्या व्यक्तींना हे सगळे हास्यास्पद वाटे. पण मला माझ्या लेकाचा आनंद आणि त्याला काय आरामदायक वाटेल ते जास्त महत्वाचा वाटे. 

लेक शाळेत जाऊ लागला, जरा मोठा झाला. माझं ऑफिस अन घर एकाच आवारात होतं. शाळेतून तो साडेचारपर्यंत येत असे. अन मी पाचला घरी. तो आधी माझ्या ऑफिसमध्ये येई, किल्ली घेई अन घरी जाई. त्याच्यासाठी डब्यात भरून ठेवलेला खाऊ घेऊन गॅलरीत बसून खात असे. ते होई पर्यंत  मी घरी येत असे. त्याच्या  सोबत शाळेतली वॉटरबॉटल असे. छान सेट झालेलं. एके दिवशी घरी आले तर लेक तहानलेला. पाणी दे पाणी दे. नेमकी शाळेत बाटली सांडलेली. बिचारा. पाणी प्यायलं तसं म्हणाला आई मावशीचा फोन आलेला तिला फोन कर. बहिणीला फोन केला तर ती कळवळलेली. मी विचारलं काय ग? तर म्हणाली "मगाशी फोन केला तर त्याला तहान लागलेली. मी म्हटलं मग पाणी पी. तर म्हणाला बाटलीतलं संपालं. मी म्हटलं की मग स्वयंपाक घरात जाऊन घे न. तर म्हणाला तिथे पाल आहे. मला भीती वाटतेय. मला इतकं वाईट वाटलं. आता ठीक आहे न तो?" अरेच्चा बिचारं पिल्लू. तेव्हापासून २-४ ठिकाणी पाणी भरून त्याला घेता येईल असं ठेवू लागले. 

या सगळ्या गोष्टींमधून मला कळत गेलं की मुलांच्या पातळीवरून आपण बघायला हवं. अनेकदा मुलं रडत असतात, घाबरलेली असतात त्याचं कारण आपल्याला कळतच नाही. अशावेळी सरळ त्यांच्या पातळीवर जायला हवं. त्याच्या उंचीवर जायला हवं . त्यांच्या अक्षपातळीवर जाऊन पाहायला हवं. अनेकदा त्यांची अडचण आपल्याला समजलेलीच नसते, त्यांच्या पातळीवर आपण गेलो की आपसूक ती कळते अन मग ती सोडवताही येते.  

अन मग अनेक वर्षांनी हा चित्रपट बघितला. अनेक पातळ्यांवर हा चित्रपट भिडत गेला. एक तर स्वतःच लहानपण, तेव्हाचे अनुभव आणि लेकाच बालपण आणि तेव्हाचे अनुभव तर आठवत गेलेच. पण त्याही पेक्षा कितीतरी जास्त हा चित्रपट शिकवून गेला. ही पातळी, ही अक्षपाताळी केवळ भौतिकच असते का? त्यासोबत जाणिवांची आणि नेणिवांचीही पातळी असते. त्यांचीही अक्ष पातळी असते. एकमेकांच्या या जाणीव नेणिवांच्या पातळ्या, अक्षपातळ्यांवर जाऊन विचार करता येतो का? त्या त्या व्यक्तीच्या जाणीव नेणिवांच्या अक्षपातळीवर जाऊन आपल्याला त्या व्यक्ती, त्यांचे विचार जास्त समजू शकतील का? इतकेच नव्हे तर वेगवेगळ्या जाणीव नेणिवांच्या अक्षपातळ्या आपण अनुभवल्या तर आपल्या जाणीव नेणिवा जास्त प्रगल्भ होतील हे या चित्रपटाने ठळक केले. कुठेतरी ही जाणीव होती, पण त्याचे लखलखीत सत्य या चित्रपटाने उजळ केले.   

अनेकदा प्रश्न सोपा असतो पण आपल्याला त्याचं उत्तर सापडत नाही; कारण त्या प्रश्नाच्या उत्तराच्या पातळीवर आपण जात नाही. एकदा का त्या त्या प्रश्नाच्या अक्षपातळीवर आपण गेले कि त्याचे उत्तर त्या अक्षपातळीवर सहज सापडते. त्या त्या अक्षपातळीवर जायला जमायला मात्र हवे. आणि म्हणूनच जमेल तेव्हा जमेल त्या बाकावर चढा. वेगवेगळ्या अक्षपातळींवरून दिसणारे विश्व न्याहाळावे , तिथले क्षितिज तपासावे  हा छंद लावून घेतलाय.

1 comment:

  1. खूप खूप सुंदर मांडलं आहेस, अवल! सजग पालकत्व काय असतं माहीत होतं पण हे त्याही पलीकडचं आहे, अगदी संधान साधून जाणीवपुर्वक जपून केलेली प्रत्येक कृती !!
    पिक्चर लवकरच शोधून बघणार :)
    मला अक्षपातळी हा शब्द खूप आवडला.

    ReplyDelete