Monday, May 17, 2021

नांदी

जीवाची कशी काहिली काहिली होतेय. रणरणतं उन नको होतय अगदी. जरा आठ वाजाहेत तोवर सुर्याची किरणं जाळू लागतात. सारी सृष्टीच एक भगभगीत भट्टी होऊन जातेय. खिडकीतून पहातानाही डोळेच नाही तर त्वचाही जळजळतेय इतका उकाडा. कधी सरणार हे रण? कधी थंडावेल हा ताप? फार फार असह्य होतय आता...

बागेतला मोगराही आता सुकू लागलाय. उन्हाचा तडाखा कमी करत उमलणाऱ्या त्याच्या कळ्याही हळूहळू मावळायला लागल्यात. कुंपणालगतचा गुलमोहर तापून तापूनलाल भडक झालाय इतका की अजून एक पायरी चढता तर तोच अग्निशलाका बनता. तळ्याकडे धावणाऱ्या पक्षी- पाखरांच्या फेऱ्याही किती वाढल्यात आजकाल. बाकी सगळं जाऊ दे पण ही धरतीही किती आक्रोशतेय! आपल्या नसानसातून उकलतेय, टाहो फोडतेय... 

संध्याकाळ झाली अन अचानक रो रो वारं वाहु लागलं, उष्णच पण जोरदार. जमिनीवरची कोरडी करडी धूळ गरगरत सगळीकडे धावू लागली; वेड्यासारखी दिशाहिन. आसमंतच धुळभरला झाला. मातकट काळपट. अन मग एकदम अंधारूनच आलं. वाऱ्याचा वास बदलला, त्याचा स्पर्श बदलला.

अन लक्षात आलं ही नांदी आहे, ... त्याची! तो येतोय... वाजत गर्जत येतोय!

तो येतोय...



No comments:

Post a Comment