Thursday, December 12, 2019

भिती अन पुढे


प्रत्येक काळात, प्रत्येक समाजात चांगली माणसंही असतात अन वाईटही. आज संपर्काची साधनं अतोनात वाढली आहेत. माणसाचा मूलत: स्वभाव हा भित्रा असतो. इतर प्राण्यांहून माणूस कमी ताकदवान. त्याचा परिणाम म्हणून ही भिती. पण याच मुळे मानवाने इतर प्राण्यांवर राज्य गाजवलं. भिती दूर करायची तर शारिरीक नव्हे तर मानसिक आणि बौद्धिक ताकद मानवाने वाढवली. त्याच बळावर आपली संस्कृती वाढवली. आज याच भितीचा बोलबाला संपर्कमाध्यमातून जास्त होतो. ते एका अर्थाने बरोबरही आहे. एकमेकांना सावध करणे, एकमेकांना मदत करणे आणि एकमेकांचा जास्त सक्षम बनवणे हेच तर यातून घडवायचे.  आज अनेक नकारात्मक गोष्टी, भितीदायक गोष्टी अगदी अमानवी गोष्टीही आपल्या पर्यंत या संपर्क साधनांतून पोहोचतात, पोहोचवल्या जातात. यातून प्रथमत: घाबरणं, भिती वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण तिथेच आपण थांबलो तर आपलं मानव होण्याचं यश संपेल. भिती तर वाटणारच, ती आपली एक अपरिहार्य अशी भावना आहे. पण त्यापुढे जाऊन त्या विरुद्ध एकत्र येऊन त्या भीतीला तोंड देण्याचा प्रयत्न करणं हे मानव असण्याचं द्योतक. हातपाय गाळून बसलो, आता कसं होणार असं म्हणून रडत बसलो तर आपण मानव रहाणारच नाही. ज्या प्रगत संस्कृतीचा अभिमान आपण पाळतो ती संस्कृती असं हातपाय गाळणारी नाही. उलट एकत्र येऊन समोरच्या भितीला, संकटांना, अडचणींना, अमानवीपणाला रोखण्यासाठी प्रयत्न करणं हे आपल्या मानव पणाचं लक्षण.

समोर वाईट प्रसंग, गोष्टी येतच रहातील. त्याला एकएकटं घाबरून जाण्यापेक्षा एकत्र येऊ, धीटपणे वाईटाला विरोध करण्याचे प्रयत्न शोधू. एकमेकांना हात देऊ, एकमेकांचे हात घट्ट धरू. आणि आपल्याला, आपल्या पुढच्या पिढीलाही सकारात्मकतेने दाखवून देऊ की, ठिके आहेत काही अपयशं पदरात, पण तीही दूर करू. ती वगळून जगताना कितीतरी आनंद आहेत, कितीतरी छान गोष्टीही आहेत, त्या बघु, अनुभवू, एकमेकांना दाखवू.

भिती ही पहिली पायरी. शेवटची नव्हे. ती ओलांडू, थोडं खरचटेल, लागेल. पण त्यानेच जास्त टफ होऊ. अन आनंदाच्या पायऱ्या चढूच.

जगात छान गोष्टी आणणं, त्या वाढवणं, फुलवणं चालू ठेवायलाच हवं. मध्यंतरी पावसाने इतका धुमाकूळ घातला. पण आपण पुन्हा झाडं लावलीच न, रुजवलीच न? आज किती आनंद मिळवतोय प्रत्येक पाना फुला फळाचा. तसच आहे हे. त्यातूनही घडणारं काही आपल्या हाती नसतं. पण जे घडेल त्याकडे आपली बघण्याची दृष्टी सकस, ताकदीची अन सकारात्मक असली तर जे जे घडेल ते जास्त ताकदीने झेलू,पचवू शकू. हार न मानता! ही ताकद मिळवलीच पाहिजे.

No comments:

Post a Comment