Wednesday, January 8, 2020

आठवणीतलं घर

मला पहिलं घर आठवतं ते कोल्हापूरचं. लाकडी, बाजुने काचा असणारा सरळ उभा जीना आणि वर घर. दारातून आत व्हरांडा त्याच्या समोर हॉल  अन डावीकडे न्हाणीघराची खोली. समोरचा हॉल, त्यामधला मधोमध असलेला लाकडी खांब, त्या भोवती खेळलेले कितीतरी खेळ. हॉलच्या डावीकडे, मधली, झोपायची खोली.  पुढची देवघर आणि कोठीची खोली. तिच्या डावीकडे स्वयंपाक घर. तिच्या डावीकडे न्हाणीघर, भांडी घासायची मोरी, वर कपडे वाळत घालायच्या तारा अशा सगळ्या गोष्टींची थोडी अंधारी खोली. अन पुढे सुरुवातीचा व्हरांडा. तीन+तीन खोल्यांच भलं मोठं घर.
फार अंधुक गोष्टी आठवतात तिथल्या. हॉलमधला खांब, झोपायच्या खोलीतून दिसणारं देवघर, स्वयंपाक घरातलं विटभर उंच जोतं अन त्यावर स्वयंपाक करणारी आई, आत्या. सहाही खोल्यांत गोल गोल फिरून बहिणींशी केलेली पकडापकडी. मोठ्या चुलत भावाशी केलेला दंगा. आईकडून खाल्लेला मार, ओरडा. खाली असलेल्या बाबांच्या ( बाबा मॅनेजर होते) बँकेत जाणं, तिथल्या काका लोकांबरोबर सायकलवरून चक्कर मारून येणं... एकुणात लहानपणच्या अंधुक पण निर्वाज्य आठवणी आहेत त्या घराच्या.
आणि हो, त्या घराने दिलेल्या दोन आठवणी! पहिली मोठी आठवण आहे ती म्हणजे आगीची. आमच्या शेजारच्या घराला आग लागलेली  एके रात्री. आमच्या जीना त्या घराच्या समोर. दोन घरांमधे जेमतेम विती इतकंच अंतर. त्यामुळे आग लागलेली कळल्यावर सगळे खाली उतरलो. पण उतरताना जीन्याच्या काचांमधून समोरच्या आगीच्या ज्वाळा भितीदायक दिसत होत्या. साऱ्या जीन्यात केशरी लाल उजेड अन गरम वाफा येत होत्या. आम्ही मुली अजिबात खाली जायला तयार नव्हतो. आईबाबाआत्याने कसेबसे ढकलत खाली नेलेले. अन मग रात्रभर  रस्त्याच्या पलिकडच्या दुकानाच्या पायरीवर बसून बघितलेली ती आग. आगीचे बंब, आपल्या घरावर सोडलं जाणारं पाणी, शेजारच्या भय्याची खिडकीतून खुंटीवर जळणारी टोपी... असं काय काय आठवणीत. तेव्हा आपलं घर वाचलं पाहिजे, आपल्या घराबद्दल  दाटून आलंलं प्रेम, लागणी अन काय काय पहिल्यांदा जाणवलेलं.

अन दुसरी घटना भूकंपाची. रात्रीचीच वेळ मी तशी लहान होते. पण प्रामुख्याने लाकडी घर असल्याने अन पहिला मजला, त्यामुळे घर बऱ्यापैकी हलत होतं. शिवाय भूकंपही जोरात होता. तो अनुभव अगदी वेगळा म्हणून लक्षात राहिला. तेव्हाही घर कसं काय हलतय हीच भावना मनात होती.

1 comment:

  1. Reply using the best of luck to you from the best of luck to you from the best ofaarti
    god photo
    all katha
    god storythe best of luck to you from the best of luck to you from the best of luck to you from the best of luck to you from the wallpaper

    ReplyDelete