Saturday, December 24, 2016

भांडीकुंडी : विशाला म्युझियम

तर, स्वयंपाक करायला खूप आवडतो मला. पण समहौ भांड्या कुंड्यांचा काही शौक नाही. पण तरीही भांड्याकुंड्यांवरच लिहिणार आहे आज. अन तेही खूप भांडी, खूप मोठी भांडी यांवर!

नाही नाही, मी घेतली नाहीत भांडी; मी फक्त फोटो घेतले भांड्यांचे!
मधेच एक पिटुकली ट्रिप केली अहमदाबादला. नेहमी प्रमाणे आधी थोडी शोधाशोध केली, हटके, ऑफबिट काय आहे तिथे? तर त्यात या भांड्याकुंड्यांचा शोध लागला. अर्थात तरीही प्रत्यक्ष बघे पर्यंत अंदाजच आला नव्हता.

तर हे आहे अहमदाबाद येथील भांड्याकुंड्यांचं म्युझियम. इटुकपिटुक गडव्यापासून भल्या मोठ्या तांब्यापर्यंत, कातरी, सुपारी फोडायच्या अडकित्यापासून माणूस झोपू शकेल इतक्या कढई पर्यंत. पुरुषभर उंचीच्या रांजणापासून तीन पुरुष मावू शकतील अशा पेटाऱ्यासह.

हे सारे बघून फक्त अ ब ब इतकच!
त्या काळात स्वयंपाक करणाऱ्या बायका, पुरुष आचारी यांचे खरच कौतुक वाटले. एव्हढा मोठा स्वयंपाक करणे, ते घाटणे, ती भांडी उचलणे, घासणे वगैरे गोष्टी कशा करत असतील?

फुलपात्रांचे असंख्य आकार. पळ्या, देव, देवपुजेच्या वस्तू, यज्ञ-हवनाची पात्रे, गडवे, वाट्या, झार्‍या, पुरुषभर उंचीचा कालथा (उलथणे). इतकच नव्हे तर स्वयंपाक घरातल्या इवलुशा काड्यापेटीतल्या काड्यांनी तयार केलेला तीन फुटाचा ताजमहाल!

शिंकाळी, हुक्के, घुंगूरमाळा, काटे, चमचे, पराती, कढया,.... काय नाही असं नाही.
अगदी पेटारे, कुलपं किल्या - अगदी पाच फुटी कुलूपही!

अगदी वेता-धातूचे बैल, मुखवटे आणि गदाही ! लाकडी बाऊल्स, सट, मूर्ती...
दगडी भली मोठी परात ( शेजारची वाटी; आपली नेहमीच्या आकारातली आहे )
सगळ्यात आश्चर्यजनक, खरं तर बघून वाईटच वाटलं... पण चक्क हुंडा ज्यात भरून द्यायचा अशी हुंड्याचे डबे; लहानही आणि पाच फूट उंची आणि तितकाच घेर असणारे!

भारतीय पद्धतीचे जुने कुकर, पानाचे डबे (एक चक्क मोराच्या आकारातही), तबकं (ट्रे), चांदणीच्या आकाराच्या बैठकी,  मुर्त्या घडवलेला मोठा पितळी घडा, सुंदर रंगकाम करून भाजलेली भांडी,  पुरुषभर उंचीचा लोखंडी बाळकृष्ण,...
अन काय काय.

ही भांडी इतकी मोठी आहेत की त्यांच्यामागील नेहमीच्या उंचीचे दरवाजे आपल्याला बुटके वाटू लागतात अन शेजारचे सात फुटी रस्त्यावरचे दिवेही बुटके दिसू लागतात. अन मोठे वृक्ष झुडपं दिसू लागतात.

सर्वात जुने हजार वर्षांपूर्वीचे भांडेही दिसेल तुम्हाला.
अन घराच्या भिंती एव्हढी मोठी पसरट कढईही दिसेल. अन सहा फुटी वॉचमन इतका अन नंतर त्याहूनही मोठा जवळजवळ सात फुटी रांजणही. अन  जुन्या मोड्क्या यंत्रांपासून तयार केलेला यंत्र मानवही !

एकून नवल वाटतय? खरं नाही वाटत? बरं मग बघाच हे फोटो; सुरेंद्रभाई पटेल यांनी हे संग्रहालय उभं केलय,अहमदाबाद येशील "विशाला" इथे!














































1 comment: