Wednesday, June 28, 2023

आर. सी, बोराल (१९०३ - १९८१) : हिंदी चित्रपट संगीताचे पितामह!


लाल चंद बोराल हे कलकत्या मधील प्रसिद्ध धृपद गायक! त्यांचे चिरंजीव राय चंद बोराल. वडिलांकडूनच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा वारसा आर. सी. बोराल यांनी घेतला. वडिलांबरोबर अनेक संगीत मैफलींना ते जात. गायन आणि तबलावादन दोन्हीची त्यांनी तालिम घेतलेली आणि दोन्हीची साथ ते वडिलांना देत असत.

१९२७ मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी (पुढे या कंपनीचे नाव ऑल इंडिया रेडिओ झाले) ते काम करू लागले. १९३१ मध्ये ते कोलकत्यातील फिल्म निर्माती कंपनी - न्यू थिएटर येथे रुजू झाले. सुरुवातीच्या सायलेंट चित्रपटांच्या काळातही त्यांनी चित्रपटांना संगीत दिले.

बोलपटामध्ये "मुहोब्बत के आसूँ" (१९३२)या चित्रपटात त्यांना प्रथमच संगीतकार म्हणून संधी मिळाली. पुढे "धूप छाँव" (१९३५) मधल्या गाण्यांनी त्यांचे नाव झाले. हिंदी चित्रपट संगीतात कोरस प्रथम आणला तोही आर सी बोराल यांनी!

सुमारे ७०-७५ हिंदी आणि साधारण तितक्याच बंगाली चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. १९५३ मधला "दर्द ए दिल" हा त्यांनी संगीत दिलेला शेवटचा हिंदी चित्रपट. बंगाली चित्रपटांमध्ये मात्र त्यांनी १९६० पर्यंत संगीत दिले.

आर सी बोराल यांनी हिंदी चित्रपट संगीतात अनेक नवीन गोष्टी सुरु केल्या. त्याकाळी गझल गायकीचा प्रघात जास्त होता. आर सी नी हा प्रभाव कमी करून, हलके फुलके संगीत चित्रपट आणलं. जोडीने बंगाली धून आणि हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत हिंदी चित्रपटांमध्ये आणलं.
याशिवाय पार्श्वगायनाही त्यांनीच आणले. कोरस ची सुरुवात ही त्यांनीच केली. पहाडी सन्याल, कानन देवी, कुंदन लाल सैगल, तलत मेहमूद, राधा राणी, इला घोष, सुपरवा सरकार, धंनजय भट्टाचार्य हे काही सुरुवातीचे नावाजलेले गायक ही आर सी बोराल यांचीच देन !
चित्रपट "विद्यापती" ( १९३७) मध्ये त्यांनी दिलेले संगीत आजवर दिल्या गेलेल्या भारतीय चित्रपट संगीतातील सर्वात सुंदर चित्रपट संगीत मानले जाते. पुढच्या गाण्यात अगदी सुरुवातीचे संगीत, आणि जोडून असणारे पाहिले गाणे ऐकले तरी अंदाज येईल.




हिंदी चित्रपट संगीतामध्ये व्हॉयोलिन, सतार, इतर तयार तंतू वाद्ये (स्ट्रींग) आणि पियानो प्रथम आणला तो आर सी बोराल यांनीच. एक गंमत. "हारजीत" हा १९३९ चा चित्रपट. यातलं गाणं "मस्त पावन शाखाये लहाराये" हे गीत. त्यात सुरुवातीला वाजणारे हे व्हायोलिन ऐका, कोणतं गाणं आठवलं सांगा बरं (२० व्या सेकंदांपासून ऐका)



बोराल यांनीच ऑर्केस्ट्रा हिंदी चित्रपट संगीतात आणला. हिंदुस्तानी संगीत आणि पाश्चात्य संगीत यांची अतिशय सुंदर गुंफण पहिल्यांदा केली ती बोराल यांनीच. बोराल यांनी ३० वाद्यांचा समावेश आपल्या ऑर्केस्ट्रामध्ये केला होता. "चंडिदास" ( १९३२) या चित्रपटामध्ये त्यांनी पार्श्वसंगीत फार प्रभावीपणे चित्रपटात आणले.
आणखीन एक फार सुंदर अन अभिमानाची गोष्ट बोराल यांनी केली. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या आणि नोटेशन बद्ध केलेल्या आपल्या राष्ट्रगीताचे पहिले वाद्य-संयोजन केले ते,आर सी बोराल यांनी; "हमराही" ( १९४४) या चित्रपटात.



त्यांनी संगीत दिलेली आणि गाजलेली काही गाणी

इक बंगला बने न्यारा :


तेरी गठरी मी लागा चोर :



मन कि आखें खोल बाबा :


कौन मन लुभाया :


ना तो दिन हि दिन वो राहे मेरे 



आणि बाबुल मोरा नैहर छुटो ही जाय :


प्रसिद्ध संगीतकार अनिल विश्वास यांनी आर सी बोराल यांना " हिंदी चित्रपट संगीताचे पितामह " म्हणून संबोधले होते. किती यथार्थ संबोधन ___/|\___
---






No comments:

Post a Comment