Saturday, September 2, 2017

लाकूडतोड्याची जुनीच गोष्ट: माध्यम वेगळं

(स्क्रिप्ट रायटिंगच्या वर्कशॉपच्या निमित्ताने केलेला एक प्रयत्न )


अॅक्ट 1:
सीन1
वेळ :पहाट    स्थळ झोपडी (इंटिरियर)

एका छोट्या खेड्यामधला एक मध्यामवयीन, तगडा लाकूडतोड्या अन त्याची मध्यमवयीन बायको रहातात. गरिबीत पण सचोटीने रहाणारे दांपत्य.  साधी गवताने शाकारलेली झोपडी पण स्वच्छ अन नीटनेटकी. घरात देवतेचा एक फोटो, समोर तेवणारा दिवा अन एक फुल (मोंटाज1).  एकुणात गरीब, कष्टाळू , सुखी जोडपं.

सीन 2:

वेळ : सकाळ           स्थळ:  सुकलेलं जंगल(एक्टिरिअर)
सकाळी दोघं उठून जंगलात जातात. लाकूडतोड्या लाकडं तोडतो. अन बायको तोडलेल्या लाकडाच्या मोळ्या बांधते. मग दोघे बाजारात जातात,  मोळ्या विकतात. अन सचोटीने जीवन जगतात.

आज दोघेही नेहमी सारखे जंगलात आलेत. लाकूडतोड्या एक झाड तोडतोय. अन बायको मोळी बांधायला वेली शोधतेय.

अॅक्ट 2:

सीन 1:
वेळ : सकाळ           स्थळ:  सुकलेलं जंगल(एक्टिरिअर)
ती एक फुलाची( मोंटाज1 तेच फुल जे देवीला वाहलय) वेल जोरात ओढते अन तोल जाऊन मागे पडते.  ते पाहूऩ लाकूडतोड्या हातातली कुऱ्हाड टाकून पळत तिला मदत करायला धावतो.  कुऱ्हाड एका फांदीवर आदळून वर उसळलेली दाखवली जाईल.( मोंटाज 2)  पण कुठे पडलीय नाही दाखवलं जाणार.

सीन 2:
वेळ : सकाळ           स्थळ:  सुकलेलं जंगल(एक्टिरिअर)
लातो पळत पुढे येतो
संवाद:
ला तो:  अग अग, काय झालं ग?लागलं का? ये, हात धर. उठ, सावकाश. पाय अडकला का कशात?
बायको: आईग... कळलच नाही काय झालं. ही वेल ओढली तर सटकलेच एकदम.
लातो: बस बस जरा, पाणी आणतो थांब.

सीन3:
वेळ : सकाळ           स्थळ:  सुकलेलं जंगल, नदी किनारा(एक्टिरिअर)
असं म्हणून लातो नदीजवळ जातो अन पाणी ओंजळीत भरून आणतो. बायको सावरते. अन दोघं पुन्हा कामाला लागतात.
लातो: अरेच्या, माझी कुऱ्हाड कुठे गेली? अरे, मगाशी मी पटकन टाकली कुऱ्हाड...
आता मगाचचा सीन पुन्हा रिपीट, कुऱ्हाड फांदीवर आदळून उसळते आणि नदीमधे पडते...(मों2)
लातो: हो, नदीतच पडली ती. मी आवाज एेकलेला... आता काय करावं? आता लाकूड कसं तोडू? देवी, वाचव ग वाचव...
बायको: अहो, अशी कशी पडली नदीत? आता काय करणार? देवी, वाचव ग, मदत कर

सीन 4:
वेळ : सकाळ           स्थळ:  नदी किनारा (एक्टिरिअर)
 दोघं नदीजवळ येतात.
दोघेही हात जोडून देवीची आळवणी करू लागतात.  इथे गाणे/ देवीची प्रार्थना घालता येईल.

अॅक्ट3:

सीन 1:
वेळ : सकाळ           स्थळ:  नदी(एक्टिरिअर)
 अचानक नदीवर निळा प्रकाश पसरतो. नदीतून तीच फुलं वर वर यायला लागतात(मों1). अन अचानक त्यामधून देवी वर येते. आजुबाजूला निळा प्रकाश परसलेला आहे.
देवी: वत्सा, मी प्रसन्न आहे तुझ्यावर. तू आणि तुझी बायको अतिशय गुणी आहात, कष्टाळू आहात. तुमच्या इतकी वर्ष तुम्ही नित्य नेमाने माझी पुजा करत होतात.  आज पहिल्यांदा तुम्ही मला हाक मारलीत मी प्रसन्न झाले आहे. सांगा, काय करू मी तुमच्यासाठी?

सीन 2:
वेळ : सकाळ           स्थळ:  नदी किनारा(एक्टिरिअर)
दोघे धरणीवर पडून नमस्कार करतात, डोळ्यातून घळाघळा अश्रु वहाताहेत.
लातो: देवी, धन्य झालो, धन्य झालो आम्ही. तू दर्शन दिलेस, आमचा जन्म सार्थ झाला. आता काही नको.
बायको: माते, सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. तुझे दर्शन हाच आमचा मोक्ष. आता काही नको.
देवी: मी तुमच्या वागण्याने अतिशय प्रसन्न झालेय. तुम्ही मागत नाही पण मला काही द्यावे वाटतेय.
देवी नदीत हात घालून बाहेर काढते. हातात सोन्याची कुऱ्हाड आहे.
वत्सा, ही घे तुझी कुऱ्हाड
लातो: छे छे, ही माझी कुऱ्हाड नाही. सोनं वापरणं हा राजाचा मान. तो मी कसा डावलू?

सीन 3:
वेळ : सकाळ           स्थळ:  नदी किनारा(एक्टिरिअर)
देवी पुन्हा पाण्यातून एक चांदीची कुऱ्हाड काढते.
देवी: मग ही घे
लातो: छे छे ही पण माझी नाही. चांदी ही व्यापाऱ्याच्या उपयोगाची. त्याचा हक्क मी का वापरू?

सीन 4:
वेळ : सकाळ           स्थळ:  नदी किनारा(एक्टिरिअर)
देवी: लाकुडतोड्या, खरोखर तू अतिशय हुषार आणि शहाणा आहेस. इतर कोणाचा हक्क तू वापरला नाहीस. त्याच बरोबर तुझ्या उपयोगाची गोष्ट कोणती हे ही तू जाणतोस. ही घे तुझी लोखंडी कुऱ्हाड.
लातो: माते मी धन्य झालो. तुझे दर्शन झाले. शिवाय माझे काम मला पुन्हा करायला मिळणार. तुझा महिमा अगाध आहे.
बायको: खरच देवी, तू सगळ्यांची जननी, संरक्षण कर्ती आहेस.

अॅक्ट 4
 सीन 1:
वेळ : सकाळ           स्थळ:  नदी किनारा(एक्टिरिअर)
देवी: तुम्ही दोघं अतिशय सज्जन आहात. तुमच्यात राजा होण्याचे आणि व्यापार करण्याचेही गुण आहेत. तेव्हा या तिनही कुऱ्हाडी तुमच्याच आहेत. भावी काळात चांगला व्यापार करून नंतर तू उत्तम राजा बनशील, तथास्तु
असे म्हणून देवी अंतर्धान पावली.

सीन 2:
वेळ : सकाळ           स्थळ:  सुकलेले जंगल (एक्टिरिअर)
लातो आणि बायको दोघांनी नमस्कार केला, अन दोघं आपापल्या कामाला लागले. इथेगाणे टाकता येईल काही.इन्सपिरेशन चे वगैरे

No comments:

Post a Comment