1994 च्या महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार मिळालेल्या ग्रंथामध्ये श्री. अरुण साधू यांच्या 'तिसरी क्रांती लेनिन स्टालिन ते गोर्बाचेव' या पुस्तकाचा समावेश आहे. गेली अनेक वर्षे वृत्तपत्र संपादनाचे कार्य अरुण साधू करताहेत. राजकीय, सामाजिक समस्या, आंतरराष्ट्रीय राजकारण, वास्तव दर्शन, दलित समस्या, लोकसंख्येचा प्रश्न या आणि अशा विविधांगी विषयावर श्री. अरुण साधू यांनी लेखन केले आहे. पडघम नाटक, फिडेल चे आणि क्रांती, मुंबई दिनांक, शापित, सिंहासन ही त्यांची गाजलेली काही पुस्तक होत.
या पुस्तकामध्ये आधुनिक काळातील मानवाच्या जग बदलण्याच्या स्वप्नांपासून व्यवहारातील कठोर वास्तव पर्यंतचा प्रवास श्री. अरुण साधू यांनी केलेला आपल्याला आढळतो. 1776 च्या अमेरिकन क्रांतीपासून रशियातील 1905 क्रांतीपर्यंत घटनांचा रशियावर काय प्रभाव पडत होता. रशियातील झारशाही म्हणजे राजेशाही, तिचे स्थान, प्रभाव, वृत्ती कशी होती याचे सविस्तर चर्चा लेखकांनी प्रथम केली आहे.1905 च्या पीटसबर्ग सोविएटचे कार्य, त्यातील ट्रॉटस्कीचा सहभाग, सर्वसामान्यांचा उत्स्फूर्त सहभाग याचे सविस्तर विवेचन लेखकाने केले आहे.
आज रशियन समाज रशियन माणूस हा अतिशय अबोल, चर्चा करण्यास नकार देणारा, कृती करण्यास तयार नसलेला, असा आपल्यासमोर आहे. परंतु हा समाज असा नाही. उलट हा समाज एकत्र येणार आहे आणि होता. त्यामुळे 1905 मध्ये कोणताही धडाडीचा, प्रभावी नेता नसूनही पिटसबर्ग मधील कामगारांनी एकत्र येऊन क्रांती घडवून आणली होती, हे अरुण साधूंनी स्पष्ट केले आहे.
झारने ही क्रांती दडपून टाकल्यानंतर लेनिन, स्टालिन, ट्रॉटस्की, कामेनेव, झिनोविनेय या नव्या उदयोन्मुख नेत्यांना हद्दपार केले. तेव्हापासून फेब्रुवारी 1917 पर्यंत परिस्थितीचे सविस्तर विवेचन लेखकाने केले आहे. तत्कालीन रशियन समाजाचे चित्रण मराठीमध्ये इतक्या प्रभावीपणे आणि सविस्तरपणे अजून लिहिलेले गेले नव्हते.
फेब्रुवारी 1917 च्या क्रांतीमधील सर्वसामान्यांचा, लष्कराचा, कामगाराचा सहभागही असाच आज पर्यंत मराठी वाचकांना माहिती नव्हता. फेब्रुवारी क्रांतीबाबत तत्कालीन नेते लेनिन, ट्रॉटस्की, कामनेव यांची मते त्यांचे अभिप्राय लेखकाने अतिशय उत्तम पद्धतीने मांडले आहेत
फेब्रुवारी क्रांती ते ऑक्टोबर क्रांतीपर्यंत लेनिन, ट्रॉटस्की यांचा वैचारिक आणि कृतिशील प्रवास लेखकाने वाचकासमोर जिवंत उभा केला आहे. आपण साम्यवादी क्रांती साठी योग्य परिस्थिती निर्माण करत आहोत; प्रत्यक्ष क्रांती अजून दूर आहे. याची जाणीव तत्कालीन सर्वच नेत्यांना होती हे साधूंनी आपल्या लेखनातून स्पष्ट केले आहे. समाजवादाच्या विजयासाठी लेनिनच्या काळात कसे प्रयत्न झाले हे सांगितल्यानंतर स्टालिनने आपल्या विरोधकांना यांना कसे बाजूला केले याचे सविस्तर उदाहरणासहित विवेचन लेखकाने केले आहे. वेळप्रसंगी फोडा आणि झोडा ही नीती स्वीकारून, वेळ प्रसंगी आपले विचार-तत्त्वज्ञान-मते कशी लेनिनचीच होती हे सांगून सामान्यांची भुलावण करून, वेळप्रसंगी लष्करी शक्ती वापरून, वेळप्रसंगी लेनिन चे जे महात्म होते त्याचा गैरवापर करून, स्टालिनने सत्तेच्या सर्व सूत्रांवर ताबा मिळवला आणि विरोधकांचा काटा पूर्णपणे दूर केला. केवळ एवढेच नव्हे तर समाजवादी रचना साम्यवादी समाज रचनेतील प्रमुख संस्था पोलीट ब्युरो हिच्या संरचनेत स्टालिनने हळूहळू बदल घडवून आणून पक्षांतर्गत लोकशाही संपवून टाकली. पॉलीट ब्युरो, मध्यवर्ती कार्यकारणी, मध्यवर्ती समिती आणि पक्षाची शिस्त राखणारा मध्यवर्ती आयोग या सर्व स्वतंत्र संस्थांवर पूर्ण नियंत्रण स्टालिनने जनरल सेक्रेटरी म्हणून निर्माण केले. रशियाचा नवा आर्थिक कार्यक्रम, उद्योगीकरण, प्रशासनात्मक रचना, अन्नधान्याचे उत्पादन, शेतीचे प्रशासन या सर्व बाबत एकच भूमिका न घेता मन मानेल तसे निर्णय घेतले. व त्या त्या वेळेस एका एका विरोधकाला दूर केले. या संपूर्ण काळाचे विवेचन अरुण साधूंनी अतिशय सखोल केले आहे. अभ्यासपूर्ण आणि मार्मिक केले आहे. प्रामुख्याने ट्रॉटस्की चे रशियन क्रांतीतील स्थान; जे आज पर्यंत पूर्ण दुर्लक्ष आणि गुप्त राखले गेले होते, याची स्पष्ट जाणीव लेखकाने करून दिली आहे. ट्रॉटस्कीचे कार्य व सैद्धांतिक भूमिका, लेनिनची सैद्धांतिक मतभेद असूनही लेनिनने ट्रॉटस्कीला दिलेला मान, लेनिन चे ट्रॉटस्की बाबत चे मत, लेनिन चे स्टालिन बद्दलचे मत; या सर्वांचे मराठी वाचकाला स्तंभित करणारे वास्तव चित्र अरुण साधूंनी अतिशय अतिशय समर्थपणे उभे केले आहे. त्यासाठी 'प्रॉफेट रेव्होल्युशन' : लिओ ट्रॉटस्की, 'माय लाईफ' : लिओ ट्रॉटस्की, 'टेन डेज डेज दॅट शुक द वर्ल्ड' : जॉन रिड या आणि अशा दुर्मिळ पुस्तकांचा अभ्यास अरुण साधू यांनी केलेला आहे.
स्टालिनच्या काळात रशियन जनतेवर स्टालिनचा किती प्रवाह होता; कधीकधी लेनिन पेक्षाही स्टालिनची गुणगान कसे होत असे याचे विवेचन लेखकाने 'स्टालिन चे दैवीकरण' या प्रकरणात केले आहे. दुसऱ्या महायुद्धातील स्टालिनची कामगिरी खरी आणि दिखाऊ या दोन्हीची सांगोपांग चर्चा लेखकाने केली आहे. स्टालिनच्या काळात अमेरिका रशिया यांच्यातील शीतयुद्ध परमोच्च बिंदू गाठला होता. या काळातील घडामोडी यावरील स्टालिनची पकड याचेही विवेचन लेखकाने केले आहे. प्रसिद्ध बर्लिनची भींत, तिची उभारणी बर्लिन ची कोंडी या घटनांचाही त्यात समावेश आहे. स्टालिनची कारकिर्द, शेवटी शेवटी त्याच्या अगदी जवळच्यांनाही कशी त्रासदायक धोकादायक वाटत होती, याची तसेच स्टालिनच्या मृत्यूची घटना याची माहिती लेखकाने दिली आहे. नंतरच्या काळात कृश्चेव्ह, मालेन्कोव्ह, बेरिया, मोलोटोव, बुल्गानिन, कामानोविच, ब्रेझनेव, आंद्रोपोव, चेर्नेन्को या सर्वांची माहिती देता देता गोर्बाचेवच्या कारकिर्दीला आवश्यक अशी पार्श्वभूमी कशी तयार होत गेली याची माहिती लेखकाने दिली आहे. साहित्यक्षेत्रातील स्वातंत्र्य, पूर्व युरोप मधील साम्यवादी वर्चस्वाविरुद्ध चळवळी आणि शीतयुद्धातील क्युबाचा प्रश्न आणि नंतरचे सहकार्याचे प्रयत्न याचे विवेचन लेखकाने केले आहे. याच काळात रशियाच्या फसलेल्या अफगाण मोहिमेची माहितीही यात आली आहे. स्टालिनच्या काळात प्रगतीचा उच्च दर्जा गाठला गेला असला तरी नंतरच्या कृश्चेव्ह, ब्रेझनेव, आंद्रापोव, चेर्नेन्को या महासचिवांच्या काळात यात बदल होत गेले. अवजड उद्योग धंदे वाढलेले, लष्करी क्षमता प्रचंड असलेले, परंतु आर्थिक व तांत्रिक क्षेत्रात मागासलेले असे सोविएत युनियनचे स्वरूप होते. तशातच वयोवृद्ध नेत्यांच्यातील सत्ता लालसा आणि शारीरिक क्षीणतेतही खुर्ची न सोडण्याची वृत्ती यातून रशियन जनतेत राजकारणाबाबत एक नैराश्य कंटाळा पसरलेला होता. आर्थिक विवंचनांना हे नेते उत्तर शोधत नव्हते. आणि शासकीय नियंत्रणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत होते. अशा परिस्थितीत अरुण साधू म्हणतात की मिखाईल गोर्बाचेव्ह यांना सचिव बनण्याची काहीही संधी नव्हती. पोलिट ब्युरो, मध्यवर्ती समिती, लष्कर कोणाचाच पूर्ण पाठिंबा गोर्बाचेवना नव्हता. पाठिंबा होता तो फक्त परराष्ट्रमंत्री ग्रोमिको यांचा. चेर्नेन्को च्या मृत्युसमयी पॉलिट ब्युरोचे बरेचसे सदस्य अनवधानाने मास्को बाहेर, तर काही परदेशी गेलेले होते. याचा फायदा घेऊन परराष्ट्रमंत्री ग्रोमिको याने पोलिट ब्युरोची तातडीची बैठक भरवून, गोर्बाचेव यांना महासचिव देण्याचा प्रस्ताव मांडला आणि झटक्यात पास करून घेतला. अरुण साधूंनी, गोर्बाचेव यांचे चरित्रकार मेदवेदेव यांच्या पुस्तकाचा दाखला देऊन असे सांगितले आहे की; 1986 मध्ये गोर्बाचेव कोणालाच इतके उदारमतवादी आणि धाडसी सुधारणावादी असतील असे वाटले नव्हते. परंतु अवघ्या दोन-तीन वर्षात त्यांनी सोविएत युनियनचा पूर्ण चेहरामोहराच पालटून टाकला. गोर्बाचेव यांचे महत्त्व स्पष्ट करताना लेखक म्हणतात, गोर्बाचेवने गतकाळाचा, क्रांत्योत्तर रशियाचा सांगोपांग विचार केला. कोठे काय चुकले, याचा शोध घेतला. शेती आणि पर्यायाने संपूर्ण अर्थव्यवस्थेबाबत निर्माण झालेली समस्या केवळ नैसर्गिक अडचणींनी झालेली नाही; तर शेतीचे सामाजिकीकरण, सामायिकरण आणि प्रशासकीय केंद्रीकरण यांचा खर्च लक्षात न घेतल्याने आणि उत्पादन खर्चाचा विचार न करता; वस्तूंचे दर प्रमाणाबाहेर पाडून ठेवल्याने रशियन अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक परिस्थितीत पोहोचली; हे त्यांनी जाणले. लेखकाने हे स्पष्ट करण्यासाठी शेती, अवजड उद्योग यांची उदाहरणं दिली आहेत. यावर उपाय म्हणून गोर्बाचेव यांनी वस्तूंवरील खर्च व त्यांच्या किंमतीचा मेळ घालण्याचे ठरवले. व्यवस्थापन रचना, अर्थरचना आणि योजनांची केंद्रीय हुकूमातून अंमलबजावणी यातून सर्व मोठ्या स्तरांवर मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार चालत असे. पिठाच्या गिरणीत कोळशाच्या वॅगन्स जाणे, एेन हिवाळ्यात लष्करच्या तळावर केवळ उजव्या पायाच्या बुटांचा पुरवठा होणे ही त्यातली मासलेवाईक उदाहरणे.
गोर्बाचेव यांची वेगळी वाटचाल त्यांची ध्येयधोरणे, मोकळेपणा (ग्लासनोस्त) आणि पुनर्रचना (पेरेस्त्रोईका), प्रशासकीय अंमलबजावणी यांचे विवेचन लेखकाने केले आहे. आधुनिक सुधारणा हवी असे म्हणणारे बुद्धिवादी, भाववाढीने त्रस्त कामगार, आणि बदलाला विरोध करणारे परंपरावादी अशा सर्वांचा विरोध गोर्बाचेव यांना का सहन करावा लागला याची चर्चा लेखकाने केली आहे. तसेच गोर्बाचेव यांना सत्तेवरून दूर करण्याचा प्रयत्न झाला; तेव्हाची परिस्थिती, येल्त्सिन यांचे स्थान-महत्त्व, गोर्बाचेव यांचा मध्यवर्ती समिती विसर्जित करण्याचा निर्णय आणि नंतर रशियातून कम्युनिस्ट पक्षाची समाप्ती या सर्वांचा ऊहापोह त्यांनी केला आहे. रशियातील संघराज्याच्या भवितव्याचा उल्लेख करून लोकशाही स्वरूपाच्या करारांनी रशियन गणराज्यांना एकत्र आणण्याचे यश गोर्बाचेव यांच्या एकी प्रयत्नांना येईल असा आशावाद पुस्तकाच्या शेवटी लेखकाने केला आहे. गोर्बाचेव यांची दृष्टी सोवियत संघ राज्यापुरती मर्यादित नसून, सर्व मानवी समाजाला स्पर्श करणारी आहे. आणि जगात एक अभूतपूर्व रक्तहीन क्रांती गोर्बाचेव यांनी घडवून आणली आहे असे मत लेखकाने मांडले आहे. 'तिसरी क्रांती : लेनिन स्टालिन ते गोर्बाचेव' या पुस्तकाचा आवाका प्रचंड मोठा आहे. काल, घटना, घटनांचे रशिया अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय महत्व, विविध व्यक्ती, विविध विचार प्रणाली, प्रत्येक नेत्याची सैद्धांतिक भूमिका, आर्थिक संरचना, प्रशासकीय संरचना, या आणि अशा विविध अंगांनी विकसित होत जाणारा हा ग्रंथ. अत्यंत क्लिष्ट आणि जड माहितीचे अतिशय सोप्या मार्मिक आणि आकर्षक अशा भाषेतून विवेचन व विश्लेषण हे या ग्रंथाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होय! लेखकाने जरी हा ग्रंथ मूलभूत संशोधन करणाऱ्या अभ्यासूंसाठी नसून, जगाविषयी उत्सुकता असलेल्या तरुणांसाठी आहे; असे म्हटले असले तरी, आज मराठी वाड्:मयामध्ये रशियन क्रांती बाबत इतकी सखोल माहिती विवेचन विश्लेषण करणारा दुसरा ग्रंथ उपलब्ध नाही. प्रस्तुत ग्रंथ आणि त्याला जोडलेली संदर्भ ग्रंथ सूची दोन्हीचा संशोधकांना निश्चितच उपयोग होईल. मराठी वाचकांना व त्यांच्या बुद्धीला उद्युक्त करणारे, रशियातील साम्यवादी क्रांती बद्दल सखोल आणि प्रमाणित माहिती देणारे पुस्तक लिहिल्याबद्दल श्री. अरुण साधू यांचे आभार! त्यांना मिळालेल्या राज्य साहित्य पुरस्काराबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!

- 1995 मधे लिहिलेले परीक्षण
No comments:
Post a Comment