Tuesday, February 26, 2019

मोही मनास भारी

नेट वरून साभार
 खरं चित्रांमधलं फार कळत नाही. पण काही चित्र फार पटकन भावतात. तशात रविजींना 4-5 वेळा बघितलंय, एकदा थोडं बोलताही आलंय. त्यामुळे एकदम छान वाटलं.
रविजी मूळचे बेळगावचे अन मग मुंबईत कामानिमित्त राहिलेले. जाहिरात क्षेत्रात त्यांचं काम फार मोठं. इलस्ट्रेशन त्यातही त्यांची  आर्किटेक्श्चरल इलस्ट्रेशन्स  नावाजली गेली.
नंतर ते पुण्यात स्थाईक झाले. जनसामान्यांमधे चित्रकलेचे प्रेम अन ज्ञान पसरवणे ह्यासाठी ते सध्या कार्यरत आहेत. त्या दृष्टीने त्यांनी चित्रकलेवर अनेक सोप्या भाषेतली पुस्तकं लिहिली, लिहित आहेत. त्यांचे " ब्रश मायलेज" हे आत्मचरित्रही जरूर वाचावं असं!
संगीत हे त्यांच्या चित्रांना स्फुर्ती देतं असं ते म्हणतात. संगीत एेकताना चित्र, त्याचे विषय सुचत जातात असं ते मानतात. कलाकार कसा सर्वांगाने कलाकार असतो याचे हे उदाहरणच! असं म्हणतात की त्यांची चित्र मॅजिकल रिअॅलिस्टिक आहेत. याची तपशीलवार माहिती मॅगी/ वर्षा देऊ शकतील.
त्यांच्या व्यक्तित्वात एक हसरं मूल दडलय असं मला नेहमी वाटतं. अतिशय गोड आजोबाही त्यांच्यात  दिसतात मला. जीवनातील कष्टप्रद, ताणकारक गोष्टींना पार पाडून सकारात्मकच नव्हे तर हसरी सकारात्मकता कशी असावी हे रविजींकडून शिकावं. हसतमुख, सकारात्मक आणि सृजनशील असं मन लाभलेला हा कलाकार!
यांच्या चित्रावर कविता करायची हे मोठच चॅलेंज. माझी काही ती पात्रता नाही. पण चित्र पहाताना जे सुचलं ते मांडते.
त्यांच्या बहुतेक चित्रांमधे त्यांची सकारात्मकता अन जगण्याची अलवार जीवनेच्छा दिसत रहाते. त्यांनी निवडलेले रंग, त्या रंगांचा एकमेकांशी संवाद- मिलाप, त्यांच्या चित्रातली त्रिमितता-खोली, त्यांनी चितारलेल्या व्यक्तींचे डोळे, त्यांची उभं रहाण्याची पद्धत, ... अशा अनेक गोष्टी आवडतात.
हे विशिष्ठ, निवडलेलं चित्र विशेष भावलं. कारण कुठेतरी मला मी त्यात सापडले.
यातले पेस्टल कलर स्किम तर भावलीच. त्यातून येणारा सुकून, शांतता, आश्वासकता पोहोचली. चित्राची नायिका साधी वनवासी प्रौढा. पण तिला रेखावं वाटलं रविजींना! तिची उभं रहाण्याची ढब सुचवतेय का, की ती खुप चालून आलीय, दमलीय. थोडी धाप कमी करायला थांबलीय. आणि तरीही तिला स्वत:ची अशी जाणीव आहे, अस्तित्वाची जाण आहे, मागे वळून बघताना एक ग्रेस आहे.
सोबतची म्हटलं तर निष्पर्ण झाडं, पण तिच्या मनाने जगलेले सारे रंग मिसळून गर्द राई वाटणारे!  निसर्गातल्या सगळ्याच गोष्टी, अगदी शेळ्यामेंढ्याही महत्वाच्या मानणारी ही प्रौढा; काठीचा आधार तर घेतेय पण अशा नजाकतीने की क्या बात!
तर असं हे सगळं भावलं मला. मग ते या ओळींतून उतरलं. बघा आवडतय का

पाहते वळुनि मागे
दिसती विविध पाने
उधळण रंगाची ही
मोही मनास भारी
फिरती निवांत चरती
रानात मुक्त विहरत
माझेच हे सवंगडी
मोही मनास भारी
भोवती सभोवतीस
ही राई गर्द हिरवी
मज लपेटुनी घेई
मोही मनास भारी
जीवनाचे दिसे सार
जगले ते, रंग सारे
आजची तृप्तता ही
मोही मनास भारी










No comments:

Post a Comment