Thursday, July 12, 2018

"भरजरी ग पितांबर दिला फाडुन..."


श्यामची आई चित्रपटातले हे गाणे, प्र. के अत्रे यांनी लिहिलेले. जुन्या गोष्टी, गाण्यांमधून मुलांवर संस्कार घडवणारी एक कणखर अन विचारी आई आणि तितकाच हळवा, हुषार मुलगा यांची ही गोष्ट. चित्रपट बघताना, या गाण्यातून मायलेकात एक नाजूक धागा विणला जाताना आपण अनुभवतो. मुलांच्या मनात कणव, प्रेम, आपुलकी निर्माण व्हावी यासाठी हे गाणे अन कृष्ण द्रौपदीची गोष्ट आई सांगतेय. अतिशय हृद्य असा प्रसंग! 

आई मुलांचं नातं किती विविधरंगी, विविधढंगी! कित्येकदा प्रेमाचं, लाडाचं, कौतुकाचं तर कधी अगदी भांडणाचंही! त्यातलाच एक रेशमी किनार असलेला थोडा कणखर आणि टोचणाराही एक पदर म्हणजे हे गाणं! श्यामची आई या कादंबरीने किमान तीन पिढ्यांना तरी नक्कीच रडवलं. कोणाला हमसून हमसून, कोणाला धो धो तर कोणाच्या डोळ्यात तरळणारं पाणी... तीव्रता कमी जास्त असेल पण आतून हललं नक्की काही तरी...
काहींना तो मेलोड्रामा वाटला असेलही, पण किमान दोन पिढ्या तरी श्यामच्या आईचे संस्कार घेत वाढल्या.
संस्कार म्हणा, डोस म्हणा किंवा आजच्या भाषेत सर्मन म्हणा किंवा संयमित चर्चा म्हणा. आई अन मुलांच्या नात्यातला हा भरजरी कोपरा आज उलट वळून बघावा वाटतोय.
आजही चालतात ही सर्मनं, पण त्याचं प्रमाण आता अगदी कमी झालय. एक बेसिक वेव्हलेंग्थ मॅच झालीय. आईवडिलांची अपेक्षा- विचार- मतं हवी तितकी पोहोचली मुलांपर्यंत की हळुहळू कमी व्हायला लागतीतच ही. क्वचित कधी तरी आईपण बापपण येतं उफाळून पण मनातून माहिती अाहे आता, कि फारशी गरज नाहीये आता.
मुळात माझा भर समजाऊन देण्यावर होता त्यामुळे रागवारागवी पेक्षाही सर्मनं जास्त होत. कालांतराने त्याचे रुपांतर संयमित चर्चांवरही झाले. आता एकमेकांचा पॉईंट ऑफ व्ह्यु समजून घेणं एव्हढच पुरतय.

केव्हढा मोठा प्रवास आहे नाही हा? बोट धरून चालण्यापासून त्याचा विचार समजून घेण्यापर्यंतचा. आणि तितकाच आनंददायकही ! लहानपणी डोळे झाकून स्विकारले गेलेले संस्कार, टिन एज मध्ये- हा काळ नशिबाने खुपच कमी होता, पण होता- प्रत्येकच गोष्टीत रिबेल करून बघण्याचा काळ. नंतर स्वत: विचार करून खऱ्या अर्थाने चर्चा करण्याचा काळ. अन आताचा काही बाबतीत वैचारिक मतभेद असले तरी एकमेकांच्या मतांना समजून घेऊन होणारा संवाद.

आज वळून बघताना सगळेच टप्पे खुप आनंद देणारे. समाधानही देणारे. या गीता इतका भावनिक निचोड नाही जमला फार पण वैचारिक, तात्विक निचोड जमला, आणि तरीही भावविक आपुलकी टिकली यातच आनंद! पुढचा काळ नक्की उलटी भूमिका असणार याची जाणीव आहे अन तयारीही. आणि सोबत विश्वास आहे की तोही प्रवास भरजरीच असेल, आमेन!

No comments:

Post a Comment