Saturday, July 25, 2015

भूमी

अजूनही आठवतात ते दिवस. नुकती थंड होत होते मी. पोटातली आग अजूनही ढवळायची, वर वर यायची. पण मग आकाशातून तू पाझरु लागला, अन तुझ्या शिडकाव्याने शांतवत गेले मी. मग किती तरी काळ असाच गेला. मी, अन हळूहळू वाढत गेलेले तुझे कोसळणे.
अन मग अचानक काही हलले उदरात. आधी वाटले, तीच ती आग. पण नाही, हे काही वेगळे होते. काही शांत करणारे, अगदी तुझ्या सारखे, मनाला शांत करणारे, मन तृप्त व्हावं असं काही. ती जाणीव, पहिली जाणीव माझ्या स्त्रीत्वाची. काही रुजत होते, वाढत होते, आत आत, उदरात.अस्तित्वाची एक नवी अनुभुती.
अन मग एके दिवशी माझ्यातून कोवळे दोन हात उमलले. हिरवेगार, सृजन, नव्हाळी, नवा जीव. हरकून गेले मी. माझे सृजनत्व, माझे स्त्रीत्व उजळून गेले. इवलुशी, कोवळी , अलवार दोन पानं माझ्या अस्तित्वाला वेगळाच रंग देऊ लागली. हिरव्या रंगाच्या गर्भारपणाने मी भारावून गेले.
अन मग अजून एक, अजून एक.... सारे अंग फुलून गेले. माझ्यातल्या सृजनाचा उत्सव सुरू झाला.
अन त्यातून उमलले कितीतरी काय काय. नुसती हिरवीगार पाने, कधी त्यावर इवलाली रंगीत फुले, कधी त्या फुलांची फळे, कधी डेरेदार वृक्ष, कधी त्याला लगटून नाजूक वेली. काय अन किती, कौतुक करावे तेव्हढे कमीच.
वरतून तूही पहात असे. कधी या नव्या सृजनाला नाहूमाखु घाली, कधी उन्हाने ऊब देई तर कधी आपल्या सावलीचे पांघरुण घाली. आपण दोघांनी कितीतरी काळ अनुभवली ही अभिजात निर्मिती.
काळ जात गेला. कधी हे बीज कधी ते. मला सृजन माहिती होते, अन तुला देणे. बस. कोणते रुप, कोणते रंग, कोणता आकार. कसलीच अपेक्षा नव्हती, कसलाच विधिनिवेश नव्हता. बस, फक्त निर्मिती. त्यातच आपण दोघे आनंदी होतो, समाधानी होतो.
अन मग तो आला, वाढला, आपली स्वत:ची काही धडपड करु लागला. तसा तोही आपलाच. त्याचेही कौतुक वाटू लागले. एव्हढासा जीव पण किती कष्ट, किती प्रयत्न, किती धडपड.
मधेच त्याला लहर आली. नुकताच तू मला खुप उब देऊन गेलेलास.  कितीतरी, कायकाय माझ्या मनात नेहमी प्रमाणे रुजत होते.  पण  त्याच्या मनात काही वेगळेच चालु होते. एक मोठी फांदी घेऊन त्याने माझ्या मनाला ओरखाडे काढायला सुरुवात केली. एक, दोन, चार,... कितीतरी ठिकाणी त्याने जखमा केल्या मला. किती कळवळले, किती भेगाळले. पण त्याला काहीच कळले नाही. तो आपला स्वत:तच मश्गुल. मग काही बाही त्याने बळेबळे कोंबले माझ्या उदरात. मला न विचारता, माझ्या मनाची दखल न करता. या भूमीवरचा पहिला बलात्कारच तो.... त्याला नाही कळली माझी वेदना. पण तू धावलास, बरसलास. माझ्या जखमांवर शीतल शिडकावा केलास. माझे अश्रु स्वता:मधे सामावून घेतलेस. मला शांतावत राहिलास.
अन मग माझ्या मना विरुद्ध त्याची करणी रुजत राहिली. माझ्यातले सृजनत्व, मी टाकून नाही दिले. त्याचे तर त्याचे, पण बीज तर निर्व्याज होते, त्याच्यावर  का अन्याय करायचा? मी त्या नवीन बीजाला सामाऊन घेतले, रुजवले, वाढवले. हळुहळु त्याच्यावरही माझा जीव जडला. नवीन रोपं वाढु लागली, तुझ्या झोक्यांवर लहरु लागली. हळुच त्यातून कणसं डोकाऊ लागली. मीही आनंदले. आता ह्या कणसातली बीजं पुन्हा माझ्या कुशीत येतील, माझ्या बाळांची बाळं... माझं सृजनत्व भरून पावेल...
पण तेही सुख नाही पाहावलं त्या दुष्टाला. सारी सारी कणंसं खुडून नेली त्याने, माझी नातवंड, मी एक नजर बघुही शकले नाही त्यांना. ना एकदाही कुशीत घेऊ शकले...
पुन्हा मन पार विदारले, भेगाळले. त्या दु:खावर डागण्या म्हणून उरलीसुरली वाळलेली ताटं त्याने पेटवून दिली. एकीकडे नातवंडांचा दुरावा अन वर हा माझ्याच लेकरांची चिता... मी कोळपून गेले, हवालदिल झाले.  माझ्यातला अग्नी पुन्हा वर येईल असे वाटू लागले.
तुलाही अजिबात आवडले नाही हे सारे. कळीकाळ होऊन तू धाऊन आलास. तुझ्या संतापाला विजेचे रुप आले. घोंगावणाऱ्या वादळी वाऱ्यांनी, धारांनी तू त्याला झोडपलेस.अन माझ्याकडे धावलास. मला शांत करत राहिलास. पण आला मी थकले होते पार. मी काहीच प्रतिसाद दिला नाही. मग तूही माघारी फिरलास. तुझी माघार पाहून त्याच्या अंगी अजूनच चेव आला.
पुन्हा पुन्हा तो बलात्कार करत राहिला. ना माझ्या इच्छेचा, ना माझ्या मनाचा विचार केला त्याने. ना कधी माझी विचारपूस केली. फक्त ओरबाडत राहिला, इथे, तिथे, हवे तिथे, हवे तसे... मी हळुहळु म्लान होत गेले. तुझाही विरोध करण्याचा जोर हल्ली कमी झालाय.
हाच का आपल्या जीवनाचा अंत? 

No comments:

Post a Comment