काहीही न करता येणं यासारखं वांझ दु:ख नसेल कोणतं
आज रुळांमधून चालणारे पाय बघितले अन शेजारून धडधडत जाणारी मोकळी मालगाडीही... का का काहीच करू शकत नाही आपण? काय हरकत होती? मोकळ्याच जाणाऱ्या मालगाडीला 200-300 लोकं जड झाली असती? की मालापेक्षाही माणसाचं मोल आज कमअस्सल झालय? त्या धडधडणाऱ्या मालगाडीची चाकंही थबकली अलताल क्षणभर. माझ्या रस्त्यावर ही कोण आलीत म्हणून. पण ना मोटरमनला, ना स्टेशन मास्तरला, ना शासकांना . कोणालाच लक्ष द्यावी अशी वाटलीच नाहीत ही माणसं???
रस्त्यातल्या छोट्या छोट्या गावातली गरीब माणसं मात्र देव बनलीत. आपल्या घासातला घास, आपल्या तहानेतला एक घोट या मजुरांना देताहेत. पण आपण आपण वांझ नुसते. नुसते टिव्हीतल्या असंवेदनशील बातमीदारांचे नकाश्रु बघत रहातो. आपल्या कानांपर्यंत पोहोचत नाहीच आक्रो श मजुरांचा. त्यांच्या पायाचे चटके नाहीच भेदून येत टिव्हीच्या कचकड्याच्या काचेतून. नाहीच कळत खपाटीला गेलेल्या पोटाची रग. अन नाहीच कणव येत गर्भार बाईचं मैलोनमैल फरफटत जाणं.
शंढ शंढ बनत चाललय आपलं मन, बुद्धी, संवेदना...
कसलं हे दु:ख? छे फक्त वांझेटं दु:ख . काहीही करता येत नाही याचं वांझ दु:ख
एकीकडे मोठ्या, भव्य राजप्रासादाची वैभवशाली स्वप्न अन दुसरीकडे ही अशी दळभद्री वांझ दु:ख.
लिहिता वाचता ही न येणाऱ्या, किंबहुना म्हणूनच आयुष्य मजुरीॊ घालवलेल्याला आपण पीडिएफफाईलमधे इंग्रजीने अर्ज लिहायला सांगतोय, पेनड्राईव्ह नसेल तर इमेल करा सांगतोय; ही आपली सहसंवेदना! मारी अँटॉयनेटचेच वंशज आपण. ब्रे़ड नाही तर केक खा सांगणारे!
ना प्रत्यक्ष जाऊन मदत करू शकतो, ना बौद्धिक विचार करून काही ठाम धोरणं ठरवू शकतो. नुसतीच एक भळभळणारी जखम बस!
नव्या युगाचे नवे अश्वत्थामे फक्त!
No comments:
Post a Comment