Saturday, June 6, 2020

रामायणातली शांता

मूळ वाल्मिकी रामायणामधे नाही परंतु पुढे भवभुतिच्या रामायणामधे शांता हिचा उल्लेख सापडतो. 

दशरथ, कौसल्याला पहिली मुलगी झाली तिचं नाव शांता. 

एक कथा असं सांगते की शांताच्या जन्मानंतर आयोध्येत सलग 12 वर्ष दुष्काळ पडला. तो शांतामुळे असा समज होऊन दशरथाने कौसल्येची बहिण वर्षिणी हिला शांता देऊन टाकली. वर्षिणी ही अंगदेशाचा राजा रोमपद याची पत्नी.

दुसरी कथा असं सांगते की वर्षिणी कौसल्याला भेटायला आली तेव्हा शांताला बघून, कौसल्येचे आईपण बघून मनात खूप दु:खी झाली. कारण तिला मुलबाळ नव्हते. मग कौसल्या अन दशरथाने शांता वर्षिणीला दत्तक दिली.

एकुणात दत्तक म्हणून शांता अंगदेशात आली. 

एकदा राजा रोमपद शांताशी खेळण्यात मग्न होता तेव्हा एक शेतकरी आला आणि आपली अडचण सांगू लागला. तेव्हा राजाने लक्ष दिले नाही. म्हणून शेतकऱ्याने शाप दिला की दुष्काळ पडेल. अन तसच झालं. या शापाचे प्रायश्चित्त म्हणून एक यज्ञ करावा लागला. तो ऋषी श्रृंग यांनी केला. अन दुष्काळ संपला. त्या प्रित्यर्थ शांताचे लग्न श्रृंग ऋषीशी लावून दिले.

पुढे दशरथाला मूल होईना म्हणून पुत्रकामेष्टी यज्ञ करायला सुचवले गेले. पण हा यज्ञ करायला कोणीच तयार होई ना. कारण जो ऋषी हा यज्ञ करवून घेईल त्या ऋषीचे सगळे सुख, समाधान संपुष्टात येणार होते. शेवटी शांता पुढे झाली अन तिने आपल्या पतीला श्रृंग ऋषीला हा यज्ञ करण्यास परवानगी दिली. स्वत:चे सगळे सुख समाधान पणाला लावून तिने दशरथाचा पुत्र कामेष्टी यज्ञ करवला. अन मग यातून राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमान यांचे जन्म झाले.

पुढे शांता अन श्रृंग ऋषींचं काय झालं मला कुठे अजून सापडलं नाही.

एकुणातच मुलगी हे एक साधन. त्यागाचे प्रतिक, अगदी वडिलांच्या पुत्रप्राप्तीसाठी कारण हे सगळं वाचून पुन्हा ययाती अन माधवी यांचीच आठवण झाली.

---

No comments:

Post a Comment