सागरतीरी ध्रुव भट्ट यांची पहिली कादंबरी गुजराती मध्ये त्यांनी लिहिलेली. त्याचा मराठी अनुवाद अंजनी नरवणे यांनी केला आहे
आकारानुसार कथा म्हणावे तर हि मोठी आहे तर कादंबरी म्हणावे तर हि छोटी आहे. पण यात मांडलेले विचार, त्तवज्ञान, अनुभव हे मात्र कादंबरीच्याच योग्यतेचे.
हि कथा आहे एका इंजिनियर तरुणाची. काही वर्ष बेकारीत घालवल्यावर एक सरकारी नोकरी त्याला चालून येते. सौराष्ट्राच्या खडकाळ जमिनी वरती एक रासायनिक कारखाना काढायचा आहे अन त्या दृष्टीने जमिनीची मोजमापन करायचे असे हे काम असते. प्रथमतः: या तरुणाला हि नोकरी पसंत नसते. पण बेकारीची झळ पोहोचलेल्या या तरुणाने ती नोकरी जरा नाराज होऊनच स्वीकारलेली असते.
सौराष्ट्रात आल्यावर तिथला निसर्ग, समुद्र, किनारपट्टी, तिथली माणसं, त्यांच्या रूढी परंपरा, त्यांची तत्व , जीवन जगण्याची जिद्द आणि कष्ट या सर्वांची ओळख हळूहळू कथा नायक आणि आपल्याला होत राहाते. अगदी छोट्या छोट्या व्यक्तिरेखा; आपल्या मूलभूत विचारसरणीला धक्का देणार्या ठरतात . तर कधी एखादे वाक्य आपल्याला ठक्कन जागं करते.
उदा. नूराभाई हि व्यक्ती. जंगल खात्यातला एक अधिकारी. कथानायक गप्पामध्ये विचारतो कि हि सगळी झाडी तुम्ही लावलीत का? तेव्हा नूराभाई म्हणतात " थोडी मी लावली काही मजुरांनी. पण वाढवून मोठी करायचा चार्ज माझ्याकड़े होता. पाहिलं झाड वर आलं ना साहेब, तेव्हा वाट्लन, कि आता खुदाला सांगता येईल असं काहीतरी काम हातून झालं . "
एक झाड लावणं, ते मोठं होणं हि आपल्या दृष्टीने एक साधी नैसर्गिक घटना. पण त्या खडकाळ अन काहीही न उगवणार्या जमिनीत हे घडणं, हे एखाद्याच्या आयुष्याची कमाई होऊ शकते. हे असं खाडकन जागं करणारं वास्तव समोर येतं.
अन हे असं अनेकदा होतं. आपल्या नेहमीच्या आयुष्यात सहजी घडणार्या, मिळणाऱ्या गोष्टी अन त्यामुळे त्याला आपण कसं कमी महत्व देतो याची ठळक जाणीव या कादंबरीत सतत होत राहाते. आणि या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष वाचूनच जाणून घ्यायच्या. एकदा नाही तर अनेकदा. प्रत्येक वाचनात काही नवीन कळतं, काही नवीन उमगत. हेच या कादंबरीला मोठं बनवतं.
या पूर्ण कादंबरीमध्ये भाषेचा एक वेगळा लहेजा आहे. म्हटलं तर बोली भाषा पण त्यातही एक अस्सल गावरान खरं तर समुद्रकिनारपट्टीवरची एक खास झाक यावर आहे. सुरुवातीला आपल्याला जरा अडखळल्या सारखं होतं. पण मग त्यातली गोडी कळू लागते. एक प्रकारचा आपलेपणा, एक बांधून ठेवणारी जातकुळी आहे या भाषेची. मूळ गुजराथीत छानच असेल पण अनुवादातही ती फार छान उतरलीय.
कथा जसजशी पुढे जात जाते निसर्ग,मानवी मन यांचे तपशील येत राहातात. निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी ,नायक बरोबरच आपलीही बदलत जाते. हेच आसपासच्या माणसांबद्दलही. हळूहळू व्यक्तिरेखांचे पैलू नायका बरोबरच आपल्यापर्यंत पोहचू लागतात. कादंबरीचे हेही एक वैशिट्य मानावे लागेल. नायकाशी आपण असे काही बांधले जातो कि त्याचा प्रत्येक अनुभव,, त्याचा प्रत्येक विचार हा आपला बनत जातो. विचार, कृती तो नव्हे, तर वाचणारे आपणच करत जातो. नायकाशी इतके तादात्म्य मी तरी फार क्वचित अनुभवलंय.
नायकाचे समुद्रावरील चालणे, कबिराबरोबर जाणे, नूराभाईबरोबर विविध पक्षी पाहणे, दुधराज नावाचा पक्षी मलातर आजही भूल घालतो. बाबाजींचे तत्वज्ञान आणि समाज मानसाचं भान अन शेवटी निसर्गाला मान तुकवणं . सगळंच अचंबित करणार. छोटा बिश्नो आणि त्याची आजी- त्या आजीचं "समुद्र बालटीत मावणारा नाही" अशी धारणा अन श्रद्धा.
किस्ना, त्याने समुद्राचे सांगितलेले चे शिकवलेले नियम. भेंसाला पीर , बेली अन तिचं दुःख, नायकाचं पदभ्रमण, परदेशी माँ , बिष्णुला साप चावणे, हादा भटचा इतिहास, बाभळीच्या काटक्या रात्रीचा अंधारात नेणारी मुलं , एक जमिनीचा तुकडा मिळवण्यासाठी सारं आयुष्यदगड फोडण्यात घालवणारा सबुर आणि या सर्वांत आपले वेगळेपण ठळकपणे उमटवणारी अन सगळ्यांना तारून नेणारी अवलं !
किती किती व्यक्तिरेखा अन कितीतरी अनुभव! शेवटचा वादळाचा अनुभव तर अगदी भिडतोच आपल्याला.
अन हे सगळं अनुभवताना जाणवत राहतं कि आपण केवळ समुद्राच्या तीरावरच आहोत. समोर अथांग पसरलेला समुद्र अजून आपल्या नजरेच्याही आवाक्यात नाही ! मानवी मनाचा समुद्र! कधीच पूर्णपणे आवाक्यात न येणारा. कथा नायका सारखेच आपणही केवळ समुद्रतीरी !
No comments:
Post a Comment