Sunday, October 16, 2022

“आठवेल तसं" च्या निमित्ताने, "लोकांना रुचेल तेच लिहावे का?"

गेला आठवडा दुर्गा भागवतांचं "आठवेल तसे" वाचत होते. आत्मचरित्राऐवजी आठवणी असं लिहिलय. पण मी वाचाच किंवा वाचू नका दोन्ही नाही म्हणू शकत. त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वात जो ताठरपणा, जो फटकून वागणं किंवा अती स्पष्टवक्तेपणा म्हणूत. त्यातून या सगळ्या आठवणींतून ८०- ८५ % आठवणी नकारात्मक आहेत. म्हणजे आठवलेल्या बहुतांश व्यक्तींबद्दल त्यांनी वाईटच लिहिलय, म्हणजे तसा अनुभवही असेल. पण एकुणात बिटर निवड दिसली. जरा वाईटच वाटलं सतत वाचताना. की इतकी हुषार, कर्तृत्ववान बाई आतून खूप बिटर होती... एकही अनुभव हृद्य असा लिहिलेला जाणवला नाही. म्हणजे असू शकतं असं जीवन एखादीचं; त्यातून दुर्गाबाईंसारखं व्यक्तित्व विरळाच. 

एकदा वाटलं की मग हे नसतं लिहिलं तरी चाललं असतं न? पण मग आहे मनोहर तरिही आठवलं. मग वाटलं, का नाही लिहू? एखादीला, त्यातून जिने आयुष्य तत्व आणि मुल्यांशी बांधून घेतलय तिचे अनुभव असे बिटर असायचेच, अन मग तिनं इतर साहित्य लिहिल्यानंतर हे अनुभवही लिहिले तर काय हरकत आहे? जग असही दिसू शकतच की अशा प्रगल्भ व्यक्तित्वाला. मला पुस्तक आवडलं, नावडलं असं ठरवू शकत नाही. पण हे लिहायची त्या बाईंची ताकद जरूर वाखाणावी वाटली. तसंही प्रत्येक साहित्य आनंद देणारच असलं पाहिजे असं कुठेय? वास्तवाची अशी ठळक अन थेट जाणीव करून देणारं साहित्यही हवचं की.

खूप विस्कळित लिहिलय, रादर लाऊड थिंकिंगच आहे. पण अशी पुस्तकंही वाचली पाहिजेत असं जरूर वाटलं.

दुर्गाबाई अन सुनिताबाई यांची तुलना अजिबातच नाही. एका अर्थाने पुरुषप्रधान क्षेत्रात दंड ठोकून उभी राहिलेली नावाला सिद्ध करणारी दुर्गा होती ती. सुनिताबाईंनी असे समाजाविरुद्ध बंड ठोकलं नाही. त्यांचं नातं समन्वयाशी जोडलेला.

खरं तर  दोघींचा पिंडच वेगळा. तुलना करणंच बरोबर नाही वाटत मला. अर्थात सुरुवात माझ्याकडूनच झाली पण मला ती तुलना फक्त अन फक्त लोकांना रुचेल तेच लिहायला नकार देणं इतक्यापुरतीच अपेक्षित आहे. तेव्हा लिहावंच की, लोकांना न रुचेल असं  ;)

No comments:

Post a Comment