Monday, September 5, 2022

शेतीची सुरुवात आणि तेव्हाचे आराध्य - गणपती

मानवी इतिहासाचे टप्पे विचारात घेताना विविध टप्यांवर विविध आराध्य देवता निर्माण होत गेलेल्या दिसतात. अगदी रानटी अवस्थेपासून या देवता दिसतात. त्या त्या काळानुरुप देवता, त्यांच्या हातातील आयुधे, देवतांच्या पुजेचे स्वरुप बदलत गेलेले दिसते.


मानवी समाज  शेती करू लागला,  त्या काळात गणपती या देवतेचा उगम झाला असावा असे मानतात. गणपतीच्या एकूणच रचनेतून हे ध्वनित होतं.

मूर्ती घडवायची, ती मातीची अन त्यातूनही नदीकाठच्या ओलसर मातीची. हेही शेती सुरु केलेल्या समुदायाला शक्य होते. गणपतीचे विसर्जनही नदीत, वाहत्या पाण्यात करावे हा संकेत याचेच द्योतक.
गणपतीचा रंग लाल मानला जातो. शेती ही सृजनाशी निगडीत होती. अन मानवी सृजनात रक्तस्त्राव हा अपरिहार्य असल्याने सृजनाची देवता लालच असणे संयुक्तिक होते.
त्याला अर्पण करण्याचे पुष्पही रक्तवर्णीयच असावे हा संकेतही हेच दर्शवतो.

आषाढ हा शेतीच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा महिना, तेव्हाच गणपती सण असणं;
आरास करताना धनधान्यांच्या लोंब्या, फळं, फुलं यांचा प्रामुख्याने वापर हेही शेतीचेच द्योतक.

नांगराचे प्रतिक असलेला एकदंत;
भरपूर धान्य सुरक्षित ठेवणारे कणगी सदृष्य मोठे पोट;
गणपतीच्या हातातील अंकुश हा शेतीसोबत येणाऱ्या पशु पालनाशी निगडित आहे.
तसेच पाश हा देखील पशुपालनाशीच संबंधीत आयुध आहे.
दुसऱ्या हातातील परशु(कुऱ्हाड) हा शेतीसाठी जमीन मोकळी करताना मोठे वृक्ष कापण्यासाठीची उपयुक्तता दर्शवतो.
सुपासारखे मोठे कान हेही शेतीशी निगडित. तयार धान्याच्या लोंब्यातून पाखडून दाणे बाजुला करायचे तर सुपाचा उपयोग आवश्यक होता.
डोळे बारीक असणे हेही शेतीशी निगडित. जमिनीत पेरावयाचे धान्याचे दाणे नीट निवडावे लागत. धान्य पेरले की त्याला किड तर लागत नाही ना हे पाहण्यासाठी ही डोळे बारीक करावे लागत. तसेच याच काळात मानव वल्कलं शिवू लागला. या शिवणासाठीही  डोळे  बारीक करणे भाग होते.
शेतकऱ्यांचा मित्र मूषक याची वाहन म्हणून नेमणूक सार्थ ठरते. (उंदीर शेतकऱ्याचा मित्र का? तर जमिनीत बिळं खणून जमीन भूसभुशीत करण्याचे काम तो करतो).
शेतीला योग्य जमीन करण्यासाठी तण उपटून काढावे लागते, त्याचा संबंध दुर्वांशी.

गणपती हा गणांचा पती म्हणजेच अनेक गटातील लोकांचा अधिपती आहे. शेती सुरु झाली त्या आधी रानटी टोळ्या होत्या. या टोळ्यांना एकत्र आणून, शांतता प्रस्थापित करणे शेतीसाठी आवश्यक होते. त्यामुळे गणपती हा अनेक गणांना, टोळ्यांना एकत्र बांधून ठेवणारा देव निर्माण झाला.

अशा रितीने ज्या काळात मानवाने शेती करणे सुरु केले त्या काळाचे प्रतिनिधित्व करणारा देव म्हणजे गणपती!

No comments:

Post a Comment