Saturday, September 3, 2022

नास्तिक्य आणि मी

चार्वाक किंवा लोकायत किंवा नास्तिकवाद या बद्दल फार कमी माहिती असते. अनेकदा यातच बौद्ध अन जैन तत्वांचाही समावेश केला जातो.

वर वर पहाता देव आणि वेदांचे महात्म्य नाकारणारे असे स्वरुप मानले जाते.

पण या सर्वांमधे बरेच फरक आहेत.

यातील फक्त चार्वाक अन लोकायत यांचा विचार आता करते.

वेदकाळात जे तत्वज्ञान मांडले गेले ते तत्वज्ञान न पटणाऱ्या व्यक्ती वा समूहाला चार्वाक म्हटले जाते. ही एकच व्यक्ती होती की समूह होता की काळाच्या ओघात अनेक व्यक्ती होऊन गेल्या याची निश्चित माहिती नाही.

तसेच हे तत्वज्ञान म्हणजे नेमके काय याची एक ग्रंथ मांडणी सापडत नाही. काहींच्या मते चार्वाकाची ग्रंथसंपदा जाळली गेली. काहींच्या मते चार्वाकांमधे शिष्य परंपरा नसल्याने  आणि त्याकाळी प्रामुख्याने मौखिक वाड्मयच असल्याने चार्वाक तत्वज्ञान पुढील पिढ्यांकडे संक्रमित झाले नाही; नष्ट झाले.

मग आज आपल्याला हे तत्वज्ञान कसे कळते? तर वेद, पुराण आणि नंतरच्याही  वाड्:मयामधे चार्वाकांना खोडून काढण्यासाठी आधी त्यांची तत्वे मांडली गेली अन मग त्यावर टिका करून ती खोडून काढली गेली. अर्थातच वेदांना शिष्यपरंपरा असल्याने हे सगळे मुखेदगत होऊन पुढचे ते लेखी स्वरुपात आले.

तर काहींच्या मते प्रत्येक काळात असे विचार करणारे असतातच जे वेदांना प्रमाण मानत नाहीत. अशा लोकांची शिष्य परंपरा लौकिकार्थाने अन भौतिक स्वरुपात नसली तरी असे विचार उमटत रहातात. अन त्यांची एक खंडित अशी परंपरा असते. 

माझ्या अनुभवावरून सांगते. माझे आधी कधीच असे काही वाचनात आले नव्हते. फक्त बाबा स्वत: नास्तिक होते. तर फक्त माहिती होतं की देव न मानणारेही असतात. पण बाबांचा स्वभाव इतरांवर प्रभाव पाडणे, आपले मत आग्रहाने सांगणे असा अजिबात नव्हता. अगदीच गरज भासली, समोरून स्पष्ट विचारणा झाली तरच ते आपले मत सांगत असतं. शिवाय आई खूप प्रभावी होती अन ती धार्मीक, श्रद्धा, परंपरांच्या घरातून आलेली. त्यामुळे घरातले वातावरण आस्तिकतेचेच होते.

अशातही साधारण अकरावी बारावीपासून माझी मते तयार होत गेली. प्रत्यक्ष नास्तिकता, चार्वाक वगैरे वाचनात आले ते तर थेट एम ए च्या काळात. सो मूळता माझी नास्तिक बैठक  तयार झाली होती. तिला जास्त ठळक, सुस्पष्टता आली ती या वाचनातून.

त्यामुळे (मूळात मी चार्वाकवादी असल्याने) अनुभव समोर होता अन नास्तिकता म्हणजे काय कळल्यावर मीही खऱ्या अर्थाने चार्वाकवादी झाले. कोणतीही थेट परंपरा नसताना.


देव, श्रद्धा, मान्यता, गुरु  या आणि अशा प्रत्यक्ष सिद्ध न करता येणाऱ्या गोष्टी मान्य नसणे. जे प्रत्यक्षात दिसते, ज्याचा कार्यकारणभाव सिद्ध होतो ती आणि तीच गोष्ट मानणे म्हणजे नास्तिकता.  

कोणतीही गोष्ट मान्य करण्यासाठी पुरावे मागणं म्हणजे नास्तिकता, वा लोकायत. समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल प्रश्न विचारणे, उत्तरे मिळवून निशंक होणे म्हणजे नास्तिकता, वा चार्वाक. 

खरे तर न हा नकारात्मक शब्दही आम्हाला खटकतो. कारण जे आस्तिक नाही ते; एव्हढेच आमचे व्यवच्छेदक लक्षण नाही. उलट प्रत्येक गोष्ट तावून सुलाखून बघणं ही अतिशय सकारात्मक आणि कृतिशील (वैचारिक पातळीवर) गोष्ट आहे. पण सर्वच नास्तिक या न लाही सामावून घेतात कारण जे सिद्ध होत नाही ते ते नाकारणं याला आमच्याकडे पर्याय नसतो  ;)

जे समोर सिद्ध करता येते ते मान्य करणे. जे समोर सिद्ध होत नाही ते अमान्य करणे. अन भावी काळात ते सिद्ध झाले तर तितक्याच सहजपणे, निर्ममपणे मान्य करणे. ही नास्तिकाची काही व्यवच्छेदक लक्षणे. 


मुळात ज्ञानप्रक्रियेत कोणाचाही ( देव, रुढी, श्रद्धा, गुरु,.....) हस्तक्षेप मान्य न करता पूर्णत: बुद्धिनिष्ठ मार्ग अंगिकारणे म्हणजे नास्तिक, चार्वाक वा लोकायत!


माझ्या स्वल्प बुद्धीने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. यात अजून खूप बारीक सारीक तपशील आहेत, अगदी मला माहित नसणारेही असतील. 


सध्या इतकच पुरे!

---

No comments:

Post a Comment