काही ग्रजेस, दु:ख, अपमान, त्रासदायक गोष्टी वगैरे आयुष्याच्या एका टप्यावर सोडायला हव्यात, सोडता यायला हव्यात.
मान्य की त्या गोष्टींनी तुमच्या आयुष्यातला काही काळ अतिशय बदलून टाकला असेल वा तुम्हाला असंही वाटत असेल की त्या गोष्टीमुळे सारं आयुष्यच बदलून गेलं. अगदी हे खरंही असू शकतं. पण तरीही एका टप्यानंतर हे ग्रजेस बाजूला ठेवता येणं जमवायला हवं. तसा मनापासून प्रयत्न करायला हवा.
हे करताना, का म्हणून? मी त्रास सहन केलाय तर का विसरू ते सगळं? असा विचार असतो. पण तेच जुनं सतत वर काढून आपण दु:ख, त्रास यावरची खपली पुन्हा पुन्हा काढत असतो. आणि त्या व्यक्तीने केलेली जखम ती व्यक्ती नाही, तर आपण स्वत:च ती खरवडून खरवडून ओढून काढतो, अन जखम पुन्हा करवून घेतो. अन या पुढच्या प्रत्येक वेळेस स्वत:च स्वत:ला त्रास करवून घेत असतो. इतकच नाही तर त्या सगळ्या अनुभवांबाबत पुन्हा पुन्हा बोलून, आपल्या आसपासच्या लोकांनाही त्या त्रासातून पुन्हा पुन्हा नेत असतो. कधी कधी हे असे करणे, मूळ घटनेपेक्षा मग जास्त प्रमाणात अन जास्त लोकांना त्रास देणारे होते.
त्यामुळे हे थांबवायला हवे.
अर्थातच हे सोपे नाही. पण एकदा, अनेकदा मनापासून प्रयत्न जरूर केले पाहिजेत. एखाद्या बँकेतले जुने, न वापरातले खाते जसे आपण बंद करतो, तसंच हेही.
जसं जुने, वापरात नसलेले कपडे कपाटात जागा अडकवून ठेवतात, म्हणून ते काढून टाकले पाहिजेत, नव्या कपड्यांना जागा झाली की नवीन कपडे घेण्याचा, वापरण्याचा आनंद मग आपल्याला घेता येतो. तसच आठवणींचं, अनुभवांचं. जर त्रासदायक, वाईट अनुभव, आठवणी या, जोवर आपण मनापासून टाकून देत नाही, मनातली अडगळ दूर होत नाही तोवर नवीन आठवणी, अनुभव यांना आपण कसे बरं "या" म्हणू शकू? असंही होईल की प्रयत्न करताना, त्या गोष्टी वर मान काढतील. तर येऊ देत वर; पण त्या उच्चारायचा मोह टाळायचा प्रयत्न करायला हवा. आपण जेव्हा शब्दांतून व्यक्त करतो तेव्हा ती एक नवीन घटना होते. अन अजून एका घटनेची भर पडते. पण जर मनात आलं, पण बोललो नाही तर आपोआप मनाला सवय होते की हे नकोय आपल्याला. मग ही गोष्ट हळूहळू फिकी होत जाते. अन मग हळूहळू गायब होते. मनाची पाटी जरा मोकळी होते अन नवीन गोष्टी, अनुभव यांना मोकळी जागा तयार होते.
अशा अनेक मोकळ्या जागांसाठी खूप शुभेच्छा 😃
No comments:
Post a Comment