गुजर हुआ जमाना आता नहीं दुबारा
चित्रपट: शिरीं फरहाद (१९५६)
दिग्दर्शक : अस्पी इराणी
गीतकार: तन्वीर नक्वी
संगीतकार : एस. मोहिंदर
गायिका : लता मंगेशकर
नायिका :मधुबाला
निजामी गंजवी या सुप्रसिद्ध पर्शियन कवीचे हे एक गाजलेले प्रेमकाव्य - खुसरोव शिरीन ! त्यावर आधारित हा चित्रपट. एक राजकन्या आणि एक सामान्य तरूण यांच्यामधल्या असफल प्रेमाची अतिशय दु:खी कहाणी. लैला मजनू लिहिणाऱ्या कवीचे हे अजून एक काव्य.
मधुबालाच्या सौंदर्याच्या अनेक छटा आहेत. एक अवखळ, निरागसपण आहे. एक हसरं प्रगल्भपणााची आहे. एक सगळं मिळाल्याचा सुकून असणारी आहे. अन असीम दु:खाची एक झालर असणारी ही आहे.
या गाण्यात हीच ती मन हेलावून टाकणारी कारुण्याची किनार आहे. नुसत्या डोळ्यातून सारं पोहोचतं आपल्या पर्यंत... जगण्यात कसलच स्वारस्य न राहिलेलं, सगळं सगळं निर्ममपणे ओलांडून जातानाची एक दुखरी निरिच्छता, आपल्या दु:खापेक्षाही; सोडून जाताना आपण प्रियकराला काय दु:ख मागे ठेवून जातोय याच्यातली अपरिहार्यता, त्याला साधं शेवटचं भेटणंही जमवता न आलेल्याची असहाय्यता... काय काय नाही त्या डबडबलेल्या डोळ्यांमधे!
तन्वीर नक्वींनी याच तिच्या भावना काय उतरवल्यात शब्दात.
गुजरा हुवा जमाना, आता नहीं दुबारा
खुशियाँ थी चार पल की, आसूँ है उम्र भर के
तनहाईं में अक्सर रोयेंगे याद कर के...
तुफाँ है जिंदगी का अब आखरी सहारा...
निकला मेरा जनाजा, मेरी बारात बन कर...
हाफिज खुदा तुम्हारा..
अन संगीत! ते दिलय फार कमी माहिती असलेल्या एस. मोहिंदर यांनी. पंजाबी चित्रपट सृष्टीमधे खूप गाजले हे संगीतकार. हिंदी चित्रपट सृष्टीतही अनेक चित्रपट त्यांनी केले. पण त्यांचं गाजलं ते हे गाणं, गुजरा हुवा जमाना...
अन त्यामागे एक कहाणी आहे, तितकीच दर्दभरी. या चित्रपटामधे शिरिन आपला प्रियकर, गांव, देश, मुलुख सोडून दूर देशी- परदेशी चाललेली असते. तिला माहित असतं की आता परत हे सगळं कधीच आपल्याला दिसणार नाही. हे सगळं आता फक्त आठवणीतच असेल. अन त्यासाठीच शेवटचा हाफिज खुदा (निघते, अच्छा) म्हणतेय. मोहिंदर यांनाही हाच अनुभव आपल्या आयुष्यात आलेला.
मूळचे फैसलाबाद (आताच्या पाकिस्तानातील जिल्हा) जवळच्या गावातले एक शीख कुटुंब. त्यातील हा मुलगा मोहिंदर. संगीताची फार लहानपणापासून आवड असलेला. त्यासाठी शास्त्रीय संगीत शिकत मोठा झालेला. संगीतातच करियर करू पहाणारा एक तरुण मुलगा. वेगवेगळ्या गावी गाण्याचे कार्यक्रम करत असे. 1947 चा सुमार. लाहोरला एक कार्यक्रम गाजवून गावी परत जायला रेल्वे स्टेशनवर आला. पण यायला थोडा उशीर झाला अन गाडी चुकली. चुकली हे एका परीने बरच झालं; जीव वाचला. कारण पुढच्याच स्टेशनवर गाडीतल्या सगळ्या हिंदूंची कत्तल केली गेली होती. तरुण मोहिंदरने दुसरी कोणती गाडी गावाकडे जातेय विचारले रेल्वेमास्तरांना. त्यांनी सांगितलं, " मुला, समोरच्या गाडीत बस. अन जा, जीव वाचव आपला." गाडी होती मुंबईला येणारी. अक्षरश: दोन कपड्यासह मोहिंदरला मुंबईला यावं लागलं. गांव, शेत, घर, मुलूख, देश तडकाफडकी सोडावा लागला. शेवटचं डोळाभर पहायलाही मिळालं नाही.
जिथे वाढलो, जे आपलं गाव- घर- शेत- मुलूख तो असा सोडताना काय दु: ख होतं ते प्रत्यक्ष अनुभवलेला हा गायक. पुढे मुंबईत संगीतकार म्हणून काम करू लागला. अन जेव्हा शिरिन फरिहाद मधे तीच घटना चित्रित होताना बघून काळजातली ती हूरहूर, दु:ख, भळभळत बाहेर पडले ते असे- गुजरा हुवा जमाना....
मोहिंदर यांनी अनेक गोड गीतं दिली. शिरीन फरिहाद मधलचं अजून एक
सुन ले तू मेरी सदा रो रो मेरी मुहोब्बत
तुझको पुकारे आ आ जाओ जाने वफा
तुही बता तेरे सिवा दुनिया में कौन है मेरा
तुझसे सनम होके जुदा जिके करुंगी क्या
ना जा ना जाओ दिलरुबा - तलत, लता
तर पापी चित्रपटातलं (1953)
तेरा काम है जलना परवाने, चाहे शमा जले या ना जले - रफी (राज कपूर, नर्गिस)
पंजाबी चित्रपटातही अनेक सुंदर गीतं त्यांनी दिली. पण त्यांच्या मनाच्या सर्वात जवळचं होतं ते गुजरा हुवा जमाना हेच.
कालांतराने ते अमेरिकेत स्थलांतरित झाले. तिथे एकदा व्हॉईस ऑफ अमेरिका मधे त्यांच्या मुलाखतीत हेच गाणे त्यांनी गायले. अन पुढे म्हणाले की अजूनही मला माझ्या मूळ गावी जायचय. माझं सारं आयुष्य इतरत्र गेलं. पण तिथे मी वाढलो, माझं बालपण गेलं, तारुण्य आलं ते गाव एकदा तरी जाऊन बघायचय. इतका दर्द ज्यांनी आयुष्यभर सोसला, त्यांचं तेच दु:ख त्यांच्या गाण्यातून पाझरलं!
ऐका, पहा
गुजरा हुवा जमाना, आता नहीं दुबारा
---
No comments:
Post a Comment