Saturday, June 3, 2023

आवडती जुनी हिंदी गाणी: ९. ओहो रे ताल मिले


अनोखी रात (1968)
संजीव कुमार, जाहीदा हसिन, अरुणा इराणी, परिक्षित सहानी, तरुण बोस अशी तगडी कास्ट असलेला अन वेगळ्या विषयावरचा अनोखी रात हा चित्रपट.
असित सेन यांनी दिग्दर्शित केलेला.

केवळ एका रात्रीमधे नाट्य घडणारा. अनेक अनोळखी लोकांची आयुष्य, एकमेकांमुळे पार उलथी पालथी करणारी रात्र, म्हणूनच अनोखी.

माणसाचे खरे रुप अडचणींच्या परिस्थितीत कसे उघडकीस येते हे दाखवणारी अनोखी रात्र.

अडचणींतून स्वत:चा फायदा उकळणाऱ्यांपासून स्वत:चा जीव पणाला लावणाऱ्यांपर्यंत मनुष्य स्वभावांची ओळख करून देणारी अनोखी रात!

एका भोळ्या भाबड्या सामान्य माणसाचा दरोडेखोरपर्यंतचा प्रवास अन तरीही त्यातलं न संपणारं माणूसपण उलगडवणीरी अनोखी रात.

या चित्रपटातले हे गीत, " ओहो रे ताल मिले नदी के जल मे, नदी मिले सागर मे, सागर मिले कौन से जल से कोई जाने ना"
आयुष्यातले कोणते वळण कुठे नेऊन सोडेल याची काहीच खात्री देता येत नाही हे सत्य सांगणारं तत्वज्ञान इतकं साधं सोपं करून लिहिलय इंदिवर यांनी.

संगीत दिलय रौशन यांनी. इतकं सुरेल सूर, इतके स्फटिकासारखे स्वच्छ सूर अन मोत्यासारखे शब्द. फार फिर जमून आलेलं ही गीत!

मुकेशच्या आवाजात हे गीत आपल्याला हेलावून टाकतं. मनातला खोल खोल तळ शोधत जातो आपण. आत आतलं स्वच्छ, सुंदर, अलवार अन सच्च काही तरी वर येऊ पहातं.

हा चित्रपट रिलिज होण्याआधीच रौशनने आपला इहलोकाचा प्रवास संपवला. पण हे मनात आल्यावाचून रहात नाही की; इतके सुंदर गीत, इतके सच्चे सूर रौशनच काय,ज्यांच्या ज्यांच्या मनात गुंजत राहिले अशा सर्वांनाच, त्यांच्या सागराचा पैलतीर भेटला असेल!
निश्चितच!!
आमेन!!!



No comments:

Post a Comment