श्याम सुंदर - हिंदी चित्रपट संगीताला मिळालेला एक फार गोड संगीतकार! त्यांचच हे गीत "साजन की गलियाँ छोड चले." गायलय लताने. गीतकार क़मर जलालाबादी. चित्रपट होता 1949 चा बाजा़र. दिग्दर्शक होते के. अमरनाथ.
यात नायक आहे श्याम. त्या काळातला एक सुस्वरुप नायक. त्याची एक छान ओळख म्हणजे सादत हसन मंटोंचा तो खास मित्र. पण वयाच्या 31 व्या वर्षी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यात घोड्यावरून पडून त्याचा अकस्मित मृत्यू झाला. अन हिंदी चित्रपट सृष्टी एका नायकाला मुकली.
मुगल ए आझम मधली निहार सुलताना नक्की आठवत असेल तुम्हाला. हो तीच, बहार! राजवाड्यातली मुख्य नर्तकी. ती या चित्रपटातली नायिका. हे गाणं तिच्यावरच चित्रित केलं आहे.
तर आता गाण्याबद्दल. संगित, त्याचा ठेका, मधेच येणारे शेर - गद्यातले, सुरांमधे भरलेले आर्त दु:ख. सगळं मन भारावून टाकणारे. डोळे मिटून ऐकलं तर नक्की डोळ्यात पाणी यावं... श्याम सुंदरची कमाल!
लतानेया गाण्याला पूर्ण न्याय दिलाय. साजनमधल्या सा वर आणि नंतर गलियाँ वरती जी काय कमाल केलीय तिने. जियो! छोड हा शब्द खरं तर अगदी असांगितीक. पण लताने तो पूर्ण सांगितिक केलाय.
अनिल विश्वास, श्यामसुंदर, सज्जाद, सी रामचंद्र यांच्या संगीतात लताचा आवाज विशेष गोड लागलाय. तिच्या आवाजात दर्द असा ठिबकतो, मन पिळवटून टाकतो. गोड आवाजात दु:ख असं काही समोर ठाकतं... तुम्ही आहा पण म्हणू शकत नाही अन आह् पण म्हणू शकत नाही. मग ते झिरपत रहातं मनात, मधातून दिलेल्या औषध जसं जिभेवर दरवळत रहातं. अगदी तसच कानात, मनात घर करून रहातं!
यात शेवटी येतो तो लताचा फोटोही, ला जवाब!
No comments:
Post a Comment