Thursday, July 12, 2018

"भरजरी ग पितांबर दिला फाडुन..."


आई मुलांचं नातं किती विविधरंगी, विविधढंगी! कित्येकदा प्रेमाचं, लाडाचं, कौतुकाचं तर कधी अगदी भांडणाचंही! त्यातलाच एक रेशमी किनार असलेला थोडा कणखर आणि टोचणाराही एक पदर म्हणजे हे गाणं! श्यामची आई या कादंबरीने किमान तीन पिढ्यांना तरी नक्कीच रडवलं. कोणाला हमसून हमसून, कोणाला धो धो तर कोणाच्या डोळ्यात तरळणारं पाणी... तीव्रता कमी जास्त असेल पण आतून हललं नक्की काही तरी...
काहींना तो मेलोड्रामा वाटला असेलही, पण किमान दोन पिढ्या तरी श्यामच्या आईचे संस्कार घेत वाढल्या.
संस्कार म्हणा, डोस म्हणा किंवा आजच्या भाषेत सर्मन म्हणा किंवा संयमित चर्चा म्हणा. आई अन मुलांच्या नात्यातला हा भरजरी कोपरा आज उलट वळून बघावा वाटतोय.
आजही चालतात ही? सर्मनं, पण त्याचं प्रमाण आता अगदी कमी झालय. एक बेसिक वेव्हलेंग्थ मॅच झालीय. आईवडिलांची अपेक्षा- विचार- मतं हवी तितकी पोहोचली मुलांपर्यंत की हळुहळू कमी व्हायला लागतीतच ही. क्वचित कधी तरी आईपण बापपण येतं उफाळून पण मनातून माहिती अाहे आता, कि फारशी गरज नाहीये आता.
मुळात माझा भर समजाऊन देण्यावर होता त्यामुळे रागवारागवी पेक्षाही सर्मनं जास्त होत. कालांतराने त्याचे रुपांतर संयमित चर्चांवरही झाले. आता एकमेकांचा पॉईंट ऑफ व्ह्यु समजून घेणं एव्हढच पुरतय.

केव्हढा मोठा प्रवास आहे नाही हा? बोट धरून चालण्यापासून त्याचा विचार समजून घेण्यापर्यंतचा. आणि तितकाच आनंददायकही ! लहानपणी डोळे झाकून स्विकारले गेलेले संस्कार, टिन एज मध्ये- हा काळ नशिबाने खुपच कमी होता, पण होता- प्रत्येकच गोष्टीत रिबेल करून बघण्याचा काळ. नंतर स्वत: विचार करून खऱ्या अर्थाने चर्चा करण्याचा काळ. अन आताचा काही बाबतीत वैचारिक मतभेद असले तरी एकमेकांच्या मतांना समजून घेऊन होणारा संवाद.

आज वळून बघताना सगळेच टप्पे खुप आनंद देणारे. समाधानही देणारे. या गीता इतका भावनिक निचोड नाही जमला फार पण वैचारिक, तात्विक निचोड जमला, आणि तरीही भावविक आपुलकी टिकली यातच आनंद! पुढचा काळ नक्की उलटी भूमिका असणार याची जाणीव आहे अन तयारीही. आणि सोबत विश्वास आहे की तोही प्रवास भरजरीच असेल, आमेन!

Tuesday, May 15, 2018

काय आणि कशासाठी

बिग बॉस मुळातच एक आचरट अतरंगी आणि बिभत्स खेळ आहे. आणि तरीही तितकाच अवघड खेळही आहे. व्यक्तीची मानसिकरित्या संपूर्ण घुसळण इथे होऊ शकचे, रादर केली जाते. मानसिकरित्या तुमचा प्रचंड कस तिथे लागू शकतो. अगदी वाईट शब्दात धज्जियाही उडू शकतात. तिथले टास्क, केले जाणारे गृप्स, पडणारे गृप्स या सगळ्यातून मानसिक खच्चिकरण सहजी होऊ शकतं.  त्याच व्यक्ती अन त्यांना न टाळता येऊ शकणं हे भयंकर इरिटेटिंग होऊ शकतं. शिवाय व्यक्तीच्या मनातल्या राक्षसी, हिंसक, भांडकुदळ, एकुणातच नकारात्मक भावना कशा वर येतील हे यात बघितलं जातं. केवळ खेळणारे नव्हे तर पाहणार्यांच्याही. एकदा बघायला सुरुवात केली की त्या जाळ्यात सामान्य व्यक्ती ओढली जाते. मानवी स्वभावातली नकारात्मकता यात उद्दिपित केली जाते. अन प्रबळ मानसिक ताकद नसेल तर हे न बघणं टाळता येणं अवघड जातं. आणि याचाच फार वाईट उपयोग यात केला जातो.

लोकांना निष्क्रिय बनवणं, स्पर्धकांवर वाटेल त्या पातळीवर जाऊन उघड बोलता येणं, शिव्या घालणं, वाभाडे काढणं, त्यांची नैतिकपातळीवर बोलणे हे सगळे प्रेक्षकांना सहजी करता येतं, कारण ते खेळावर बोलणं असतं. व्यक्तीच्या मनातली सगळी गरळ इथे ओकता येते. खेळमारे अन प्रेक्षक दोघांनाही. आपापली नैराश्य, असमर्थता, चिड, संताप सगळी भडास काढण्याची ही हक्कीची जागा वाटू लागते.

सो या सगळ्यापासून कृपया दूर रहावे असे माझे मत. आपल्या मनातील नकारात्मकता वर काढणं कितपत चांगलं? बरं ती वर काढली म्हणजे एकदाची ओकून मी निर्मळ होते का? तर तसं हेत नाही, उलट अधिकाधिक पित्त तयार होतं. त्या एेवजी आपल्यातली सकारात्मकता वाढेल असं काही केलं तर? गाणी एेका, चित्र काढा, फिरायला जा, अंगमेहनत करा, खेळा, पळा, मुलांशी खेळा, गप्पा मारा, किंवा सरळ शांत झोपा.


अर्थात हे अवघड आहे. मनाला उचकवणारं जास्त आकर्षक असतं. तर मनाला शांत करणारं निष्क्रिय वाटू शकतं. हा प्रत्येकाचा आपापला कंफर्ट झोन. कोणाला वरणभाततूपलिंबु आवडतं तर कोणाला तांबडारस्सा अन नळी. फक्त आपल्याला काय सोसतं ते आपणच ठरवायचं. आपलं तारतम्य आपणच ठरवायचं अन आपणच भोगायचं. 

Sunday, February 18, 2018

आपलाची संवादु आपणासी : मैत्र


खूप दिवस जाणवतय.
मी ज्या टिप्स इथे लिहिते, काही फोटो शेअर करते ते काही माझा ग्रेटपणा दाखवण्यासाठी नाही. उलट मला माझ्या यंग एजमधे कोणी गाईड करायला फार नव्हतं, स्पेसिफिकली नोकरी संसार करताना डुज अँड नॉटडुज सांगणारं कोणी अनुभवी नव्हतं. माझ्या आधीची पिढी घरी असणाऱ्या बायकांची होती... माझ्या आसपासची. सो मला खूप ट्रायल एरर करत झगडावं लागलं. तो अनुभव फारच जिकिरीचा होता. तरुण मुलींची आजची धावपळ पहाताना ते सगळं आठवतं. मग काही टिप्स ज्या ट्रायलएररने मला कळल्या त्या शेअर कराव्या वाटतात. मेबी त्यांना  उपयोगी पडतील, मेबी नाही. पण खरच त्यात माझा फक्त मोठा अनुभव असतो, बाकी कोणताही शहाणपणा नसतो.
तशात स्वयंपाकघर हा माझा जिव्हाळ्याचा प्रांत आहे. सो त्यातले प्रयोग जरा हटके असतात. त्यातही वेळ वाचवण्याचे अन मुलांना आवडतील अशा प्रकारचे प्रयोग असतात. कधी आधीचे कधी आताचे...
माझी ही पॅशन आहे. याचा अर्थ असा नाही की मला हे जमतं म्हणजे मी काही ग्रेट. अरे मला हे जमतं बसं. जस एखादीला लेकाला ड्राईव्ह करायला घेऊन जाणं जमतं तसं मला कधीच जमलं नाही. दुसरीला जसा बिझनेस जमला तसा मला कधीच जमला नाही. तिसरीला जसं अॅक्टिंग जमलं तसं मला कधीच जमलं नाही. बट इट इज परफेक्टली ओके. प्रत्येकालाच सगळं कसं जमेल?
मलाही आज जे काही जमतय ते हाती असलेल्या मोठ्या वेळामुळे. सो माझ्या अशा प्रयोगांनी " मला जमेल का" असंही म्हणू नका अन " ही अॅट पार काहीतरी करते" असंही म्हणू नका प्लिज ___/\___ थोडी अधिक सहज दृष्टी ठेऊत. आपल्यात
फरक फक्त इतकाच आहे की अनुभव ( वयाचा आणि लिखाणाचा) कमी जास्त आहे.
सो चिल मारा की. वुई ऑल आर सेम बोट. कुणाचं काही जास्त कुणाचं काही कमी. पण समान धागा मैत्रीचा आहे न? दॅट मॅटर्स. त्या मैत्रीत हेवाही नको अन टिकाटिपण्णीही नको. काही लोकंतरी राहू दे की या सगळ्या परे  😃
काय म्हणता?

Tuesday, December 26, 2017

सखे गं... मोठं आईपण

सखे गं...
हाय, कशी आहेस सखे?

आज न मला लहानपणीच्या आठवणी येताहेत सारख्या. कसं असतं न लहानपण. त्यातही आठवताहेत आई बरोबरच्या आठवणी

मी केलेले हट्ट, खालेली रागावणी अगदी मारही. आईने शिकवलेले, दिलेले उपदेश, मी त्याकडे केलेलं दुर्लक्ष,  आईची चिडचिड, माझी विविध बंडं, आईचं हताशपण, तिचा वैताग, ... सगळं

अगदी लहानपणीचं आठवतं नुसता दंगा, पळापळ, उड्या मारणं. अन आईची काळजी. " अग सांभाळ, पडशील. अग लागेल. अग हळू धाव पडशील. " आणि तरीही माझं पडणं, लागणं, धडपडणं. अन मग तिची काळजीयुक्त माया, औषध लावणं अन जवळ घेऊन पदराने आपले डोळे पुसणं. अन गालाची पप्पी घेऊन "आता शहाण्यासारखं वागशील न राणी" असं तिचं म्हणणं. माझं , निरागसपणे हो म्हणून मान डोलवणं, खुद्दकन हसून सगळं दु:ख विसरणं अन पुन्हा उड्या मारत खेळायला पळणं...

नंतर जरा मोठे पणी, रादर अल्लड वयातलं वेडवय. मोठी झाले नव्हते पण तसं वाटत मात्र होतं तेव्हाच! तेव्हाचं ते हुडपणही निभावलं बाई तिने.
अन मग तारुण्यातली भांडणं, संघर्ष - वागणं, बोलणं, दिसणं, कपडे, मेकअप, केसांची स्टाईल, अगदी तत्व अन विचार यांबद्दलचाही वाद !   मग तिचं काही बाबतीत अधिकारवाणीतलं निर्णय देणं, कधी सोडून देणं तर कधी नुसतं गप्प बसणं तर कधी माझं काही स्विकारणं- मनापासून किंवा मनाविरुद्धही!

मग मधला असाही काळ आला की दोघी अनेक बाबतीत एकाच पद्धतीने विचार, कृती करत होतो. अगदी आईसारखीच आहेस हो, ही वाक्य प्रेमाची, अभिमानाची, कृतकृत्याची वाटली. एकमेकींच्या गरजा, अपेक्षा, मदत, आधार सगळं अगदू स्मुथली होत गेलं. ते म्हणतात न, एकमेकांत जेल होऊन जाणं. अगदी तसं मायलेकींचं झालं. माय लेकीं चं मैत्रिणींत रुपांतर झालं. अन मग हे मैत्र कितीतरी दिवस वर्ष राहिलं. कधी तीचं मत तर कधी माझं. कधी तिची आवड तर कधी माझी. अगदी सहजी एकमेकींना समजून, स्विकारून हसतखेळत बरोबर चाललो.

अन मग ाता हा नवीन टप्पा...

ती हळूहळू थकायला लागली. पण ते तिला मान्य होत नव्हतं. मग तिची चिडचिड होऊ लागली. आधी मली कळलच नाही, हे काय होतय. इतके वर्ष आमचं  मैत्रीचं नातं.... पाया हलू लागला त्याचा. छोट्या छोट्या गोष्टीत ती हट्ट धरू लागली. छोटीशी गोष्ट,  ती दुखावली जाऊ लागली. मी पार गोंधळले. माझं काय चुकतय, मी काय बदललेय पुन्हा पुन्हा तपासून पाहू लागले...पण उत्तर सापडेनाच.

अन मग एक दिवशी माझी कणखर आई छोट्याशा गोष्टीमुले चक्क रडायलाच लागली. मी अवाक. आई आणि डोळ्यात पाणी? मला कळेच ना काय करावं. मी नुसतीच बघत बसले. शेवटी तिच उठली न रडत आत निघून गेली.

ज्या आईने माझं सगळं रडणं आयुष्यभर शांत केलं. जिने सतत माझी समजूत काढली. जी माझ्या प्रत्येक अडचणीत ठामपणे माझ्यासोबत, माझ्या मागे ठामपणे उभी राहिली. ती आई... आज तिला असं हळवं पहाताना मन गलबललच...

अन एका क्षणात मला क्लिक झालं . मला समजून चुकलं आता पारडं बदललय!

इतके दिवस वर्ष मी लहान होते आणि ती माझी निर्माती, दिग्दर्शक, दिशादर्शक, सल्लागार, मेंटॉर होती. परिस्थितीचा पहिला दणका स्विकारायला ती पुढे होती. जगातल्या सगळ्या वाईटाला थोपवून धरायला ती माझी ढाल बनून उभी होती. प्रत्येक आव्हानाला तोंड देताना खंबीर आधार म्हणून ती माझ्या मागे उभी होती.

आता माझी टर्न आहे. ती वयाच्या अशा एका टप्यावर आली आहे की जिथे ती सगळा भार पेलू शकणार नाहीये. आता मी पुढं व्हायला हवं. मी तिची ढाल व्हायला हवं. मी तिचा आधार बनायला हवं.

हे कळलं तो क्षण! तो मला आईची आई बनवून गेला. केव्हढी मोठी जबाबदारी तो क्षण देऊन गेला. नुसतं आईपण कितीतरी सोपं होतं या समोर. कारण त्या आईपणामागे माझी आई खंबीरपणे पाठीशी उभी होती. आता हे आईपण मला माझ्या जिवावर पेलायचय.


वेळप्रसंगी तिची कमी होणारी शारिरीक क्षमता, मनाचा हळवेपणा, दुबळेपण, अवलंबित्व, त्याच्या जाणीवेतून येणारी असहाय्यता, स्वभावाला तिला घालावी लागणारी मुरड, तिचं पटकन हेलावून जाणं, हातपाय गाळणं, टचकन रडणं, हताश होणं,.... सगळं सगळं आता मला समजून घ्यायचय, निभवायचय आणि त्याहुनही महत्वाचं हे,  की, हे सगळं तिला स्विकारायला लावताना तिचा स्वाभिमान कुठेही कणभरही दुखावला जाणार नाही याची अगदी काळजी घ्यायचीय. हा बदल तिला शक्य तितका सहज वाटला पाहिजे. गाडीच्या सारथ्याचं  स्थित्यंतर अगदी अलवारपणे झाले पाहिजे. जराही खडखड नको, जराही घिसाडघाई नको, कुठेही अहंकार-अधिकार-हक्क यांचे टशन नको. तिला ते अगदी सहज वाटावं अन मी अगदी जाणीवपूर्वक करावं असं हे पारडं बदलणं व्हावं! हे मोठं आईपण निभावण्यासाठी, मला योग्य ते बळ मिळो, डोकं शांत राहो अन यश मिळो हिच इच्छा!

बरोबर आहे ना ग सखे? तुला काय वाटतं?
म्हणशील ना, आमेन?  सखे गं...

-  तुझीच अवल

Saturday, December 2, 2017

नातीसाठी बडबडगीत: निमित्त नातवाचे बारसेगुंड्याभाऊंचा सारखा दंगा किती
स्वराताईशी खेळायची मज्जा किती

पायांनी किका मारतात किती
बाबासोबत बॉल खेळायताय किती

चुळबुळ चुळबुळ करतात किती
आईसारखे देश पाहु किती

डोळे लकलक करती किती
काकासारखा फोटो काढू किती

पाय तालावर हलवतो किती
काकी सारखे नाचू किती

हत्ती, घोडे खेळणी किती
मामाशी चेस खेळु किती

हाताची बोटं फिरवतो किती
आजीसारखी पेटी वाजवू किती

तंद्रीलावून विचार करतो किती
आजोबांसारखा अभ्यास करू किती

कुडकुड वाजते थंडी किती
पणजीचे स्वेटर घालु किती

टिपेचा स्वर लावतो किती
आत्याबरोबर गाणी म्हणू किती

डोळे भिरभिर फिरती किती
निखु काकाची काररेस बघु किती

गुंड्या गुंड्या म्हणता किती
नाव ठेवा ना आता तरी!


रुद्रम मालिका: शेवट

मला आवडला रुद्रमचा शेवट. ज्या पद्धतीने संपूर्ण सिरिज जात होती, तिचा शेवट असाच होणं मलातरी आवडलं. आणि सगळ्या अत्यावश्यक गोष्टींचा योग्य तो शेवट, उलगडा, पूर्ण विराम,... सगळच पटलं मला. इव्हन शेवट न्युज वगैरे दाखवताना दाखवली नाही तेही आवडलं. एकदम सटल एंड! आय लव्ह मुक्ता  :) जगातल्या कितीही मोठ्या अडचणी समोर, शत्रू समोर एक सामान्य व्यक्तीने ठरवलं तर नाही मान झुकवत, हे खूप सुरेख मांडलं. माखिजा सारखी माणसं असतात जगात, प्रचंड ताकद, पैसा, सत्ता असणारी... गॉडफादर चित्रपट आठवला , जगातली अगदी भारतातलीही काही लोकं बघितली की लक्षात येतं , असतात अशी माणसं.अर्थात हेही एक प्रतिकच. मुळात जगातला, जीवनातला अशक्य वाटणारा शत्रु, त्यालाही तोंड देता येतं. हे फार छान दाखवलं. ही सकारात्मकता, ताकद देणारी सकारात्मकता भावलीच! मुळात हा रागिणीच्या उद्वस्त झालेल्या आयुष्याचा होम! त्याचमुळे स्वत:चा जीव ओवाळून टाकायला, उधळून द्यायला तयार असलेली रागिणी फार समर्पकपणे आली समोर. सस्पेन्स अन थ्रिलर करण्याच्या नादाला न लागतो एखादी रागिणीसारखी सामान्य व्यक्ती जशी वागेल सेम तसाच शेवट केला हे मला आवडलच. हो, काही गोष्टी खटकण्यासारख्या होत्या पण हे खटकणं व्यक्तिसापेक्ष म्हणून सोडून देता येण्याजोगं. रायटर्स लिबर्टी, दिग्दर्शकाचा दृष्टिकोन म्हणून सहज मान्य व्हावा. एकुणातच, एक फार छान कलाकृती! मराठीत इतकी आव्हानात्मक आणि तरीही बॅलन्स्ड, तारतम्य पाळणारी, शेवटपर्यंत सनसनाटीचा मोह टाळलेली, उगाच भव्यदिव्य न करता मूळ कथेशी प्रामाणिक राहिलेली मालिका म्हणून नक्की बराच काळ मनात राहील. पुन्हा बघायलाही नक्की आवडेल. शेवट अपेक्षित असला तरी त्याचं टेकिंग अतिशय समंजस, प्रगल्भ होतं, आणि म्हणूनच आवडला शेवटही!
कलावंत सगळेच, मुक्ता बर्वे, किरण करमरकर प्रामुख्याने, लेखक, दिग्दर्शक, संगीत, एडिटिंग, कास्टिंग, कॅमेरा( उगा ढँग ढँग ढँग न करणारा), संकलन, मेकअप, कॉश्च्युमस, सगळ्यांनीच एक स्टेटस ठेवलं पूर्ण वेळ. कधीही फोकस हलला नाही. ( आबा हे अतिशय महत्वाचे प्रकरण होते, रागिणीच्या दृष्टीने. कारण ज्या घटनेने तिचे सारे आयुष्यच पालटून गेले त्याचे धागेदोरे त्यातच अडकलेले. सो मला योग्य वाटलं तिचं आबासाठी पराकाष्ठा करणं)
एकुणातच संपूर्ण रुद्रम टीम, हॅट्स ऑफ   ____/\___👍🏻

मोठे काका

माझे मोठे काका फार सुंदर रंगवून सांगत अशा कथा. एकतर त्या काळात (1970 च्या आसपास) त्यांचं इंग्रजी वाचन प्रचंड होतं. अन्क गुढकथा, रहस्य कथा, भूताच्या कथा ते सांगत. तेव्हा ते फडवेल नावाच्या गुजराथमधल्या अगदी छोट्या गावी रहात. शाळेचे मुख्याध्यापक होते ते. गावापासून थोडी लांब हेती शाळा न हॉस्टेल. मे महिन्यात सगळी मुलं घरी जात. अन अम्ही काकांकडे. तेव्हा तिथे वीजही नव्हती. रात्री जेवण झालं की काका अंगणात खाट टाकलेली असे तिथे बसत. वर चांदण्यांनी चमचमणारं आकाश अन खाली आम्ही सगळी चुलत भावंडं. मी अगदी लहान होते, 7-8 वर्षांची. गोष्टी कोणत्या, कथा काय, काहीच आठवत नाही आता. पण तो माहौल आठवतो, ती वाटलेली भिती आठवते, त्या भिती वर विजय मिळवून, डोळे तारवटून शेवटपर्यंत जागून  संपूर्ण गोष्ट एेकलेली आठवतय. आणि नंतर काकीच्या कुशीत झोपलेलंही आठवतय.... स्विट मेमरिज....
काका खरच फार वेगळे, वल्लीच होते. वेगळच व्यक्तिमत्व.
19550-52  च्या काळात प्रेमविवाह. आणंद मधली नोकरी, तिथले धडाडीने केलेले काम मग वरिष्ठांशी झालेले मतभेद. तडकाफडकी सोडून दिलेली नोकरी, राहिलेला पगारही न घेण्याचा बाणेदीरपणा( काहींच्या मते वेडेपणा), मग शाळेची नोकरी, फडव्ल सारख्या अतिशय खेडवळ गावात शाळा, हॉस्टेल उभं करणं, चालवणं, सारं आयुष्य तिथे घालवणं. काकीची त्यांना असणारी पूर्ण साथ, त्या दोघांचे एकमेकांवरचे प्रेम, काकाचे तिथले कष्ट, हालअपेष्टा, चार मुलांची शिक्षणं, ....खरच कितीतरी अशा व्यक्ती भूतकाळात हरवून जातात न? कितीतरी विद्यार्थी घडले त्या शाळेत, अनेकांची आयुष्य बदलून गेली असतील.....पण ना चिरा ना पणती.... अशा कितीतरी व्यक्ती🙏🏻🙏🏻🙏🏻___/\___