आज न मला लहानपणीच्या आठवणी येताहेत सारख्या. कसं असतं न लहानपण. त्यातही आठवताहेत आई बरोबरच्या आठवणी
मी केलेले हट्ट, खालेली रागावणी अगदी मारही. आईने शिकवलेले, दिलेले उपदेश, मी त्याकडे केलेलं दुर्लक्ष, आईची चिडचिड, माझी विविध बंडं, आईचं हताशपण, तिचा वैताग, ... सगळं
अगदी लहानपणीचं आठवतं नुसता दंगा, पळापळ, उड्या मारणं. अन आईची काळजी. " अग सांभाळ, पडशील. अग लागेल. अग हळू धाव पडशील. " आणि तरीही माझं पडणं, लागणं, धडपडणं. अन मग तिची काळजीयुक्त माया, औषध लावणं अन जवळ घेऊन पदराने आपले डोळे पुसणं. अन गालाची पप्पी घेऊन "आता शहाण्यासारखं वागशील न राणी" असं तिचं म्हणणं. माझं , निरागसपणे हो म्हणून मान डोलवणं, खुद्दकन हसून सगळं दु:ख विसरणं अन पुन्हा उड्या मारत खेळायला पळणं...
नंतर जरा मोठे पणी, रादर अल्लड वयातलं वेडवय. मोठी झाले नव्हते पण तसं वाटत मात्र होतं तेव्हाच! तेव्हाचं ते हुडपणही निभावलं बाई तिने.
अन मग तारुण्यातली भांडणं, संघर्ष - वागणं, बोलणं, दिसणं, कपडे, मेकअप, केसांची स्टाईल, अगदी तत्व अन विचार यांबद्दलचाही वाद ! मग तिचं काही बाबतीत अधिकारवाणीतलं निर्णय देणं, कधी सोडून देणं तर कधी नुसतं गप्प बसणं तर कधी माझं काही स्विकारणं- मनापासून किंवा मनाविरुद्धही!
अन मग तारुण्यातली भांडणं, संघर्ष - वागणं, बोलणं, दिसणं, कपडे, मेकअप, केसांची स्टाईल, अगदी तत्व अन विचार यांबद्दलचाही वाद ! मग तिचं काही बाबतीत अधिकारवाणीतलं निर्णय देणं, कधी सोडून देणं तर कधी नुसतं गप्प बसणं तर कधी माझं काही स्विकारणं- मनापासून किंवा मनाविरुद्धही!
मग मधला असाही काळ आला की दोघी अनेक बाबतीत एकाच पद्धतीने विचार, कृती करत होतो. अगदी आईसारखीच आहेस हो, ही वाक्य प्रेमाची, अभिमानाची, कृतकृत्याची वाटली. एकमेकींच्या गरजा, अपेक्षा, मदत, आधार सगळं अगदी स्मुथली होत गेलं. ते म्हणतात न, एकमेकांत जेल होऊन जाणं. अगदी तसं मायलेकींचं झालं. माय लेकीं चं मैत्रिणींत रुपांतर झालं. अन मग हे मैत्र कितीतरी दिवस वर्ष राहिलं. कधी तीचं मत तर कधी माझं. कधी तिची आवड तर कधी माझी. अगदी सहजी एकमेकींना समजून, स्विकारून हसतखेळत बरोबर चाललो.
अन मग आता हा नवीन टप्पा...
ती हळूहळू थकायला लागली. पण ते तिला मान्य होत नव्हतं. मग तिची चिडचिड होऊ लागली. आधी मली कळलच नाही, हे काय होतय. इतके वर्ष आमचं मैत्रीचं नातं.... पाया हलू लागला त्याचा. छोट्या छोट्या गोष्टीत ती हट्ट धरू लागली. छोटीशी गोष्ट, ती दुखावली जाऊ लागली. मी पार गोंधळले. माझं काय चुकतय, मी काय बदललेय पुन्हा पुन्हा तपासून पाहू लागले...पण उत्तर सापडेनाच.
अन मग एक दिवशी माझी कणखर आई छोट्याशा गोष्टीमुळे चक्क रडायलाच लागली. मी अवाक. आई आणि डोळ्यात पाणी? मला कळेच ना काय करावं. मी नुसतीच बघत बसले. शेवटी तिच उठली न रडत आत निघून गेली.
ज्या आईने माझं सगळं रडणं आयुष्यभर शांत केलं. जिने सतत माझी समजूत काढली. जी माझ्या प्रत्येक अडचणीत ठामपणे माझ्यासोबत, माझ्या मागे ठामपणे उभी राहिली. ती आई... आज तिला असं हळवं पहाताना मन गलबललच...
अन एका क्षणात मला क्लिक झालं . मला समजून चुकलं आता पारडं बदललय!
इतके दिवस वर्ष मी लहान होते आणि ती माझी निर्माती, दिग्दर्शक, दिशादर्शक, सल्लागार, मेंटॉर होती. परिस्थितीचा पहिला दणका स्विकारायला ती पुढे होती. जगातल्या सगळ्या वाईटाला थोपवून धरायला ती माझी ढाल बनून उभी होती. प्रत्येक आव्हानाला तोंड देताना खंबीर आधार म्हणून ती माझ्या मागे उभी होती.
आता माझी टर्न आहे. ती वयाच्या अशा एका टप्यावर आली आहे की जिथे ती सगळा भार पेलू शकणार नाहीये. आता मी पुढं व्हायला हवं. मी तिची ढाल व्हायला हवं. मी तिचा आधार बनायला हवं.
हे कळलं तो क्षण! तो मला आईची आई बनवून गेला. केव्हढी मोठी जबाबदारी तो क्षण देऊन गेला. नुसतं आईपण कितीतरी सोपं होतं या समोर. कारण त्या आईपणामागे माझी आई खंबीरपणे पाठीशी उभी होती. आता हे आईपण मला माझ्या जिवावर पेलायचय.
वेळप्रसंगी तिची कमी होणारी शारिरीक क्षमता, मनाचा हळवेपणा, दुबळेपण, अवलंबित्व, त्याच्या जाणीवेतून येणारी असहाय्यता, स्वभावाला तिला घालावी लागणारी मुरड, तिचं पटकन हेलावून जाणं, हातपाय गाळणं, टचकन रडणं, हताश होणं,.... सगळं सगळं आता मला समजून घ्यायचय, निभवायचय आणि त्याहुनही महत्वाचं हे, की, हे सगळं तिला स्विकारायला लावताना तिचा स्वाभिमान कुठेही कणभरही दुखावला जाणार नाही याची अगदी काळजी घ्यायचीय. हा बदल तिला शक्य तितका सहज वाटला पाहिजे. गाडीच्या सारथ्याचं स्थित्यंतर अगदी अलवारपणे झाले पाहिजे. जराही खडखड नको, जराही घिसाडघाई नको, कुठेही अहंकार-अधिकार-हक्क यांचे टशन नको. तिला ते अगदी सहज वाटावं अन मी अगदी जाणीवपूर्वक करावं असं हे पारडं बदलणं व्हावं! हे मोठं आईपण निभावण्यासाठी, मला योग्य ते बळ मिळो, डोकं शांत राहो अन यश मिळो हिच इच्छा!
No comments:
Post a Comment