Thursday, May 6, 2021

इतिहासाचे अलातचक्र

मला खुप आश्चर्य वाटतं की एखाद्या गोष्टीला हो/नाही म्हणायचा अधिकार इतक्या सहजी सोडून देतात लोकं! मेबी हा अधिकार फार सहजी मिळाला आहे.


एक काळ असा होता की सायन्स की आर्टस कोणती साईड घ्यायची ह्याचा निर्णयही स्वत: घेण्यासाठी संपूर्ण पिढीला झगडावं लागलं. केस कापून बॉबकट करायचा वा मिशी काढून टाकायची तर यासाठीही झगडावं लागलं.

नवीन पिढीला जन्मत:च अनेक स्वातंत्र्य त्यांचे अधिकार म्हणून मिळाले. पण म्हणूनच त्याबद्दल सजगता नाही असं वाटतं. हे फार लागणारं विधान वाटू शकेल पण आसपास पहाताना हे फार जाणवतं!

प्रसारमाध्यमांना अंकित होणं, विविध गॅझेटसना अंकित होणं या गोष्टी या पिढीच्या जीवनाचा भाग होत आहेत. काही प्रमाणात काळाची गरज म्हणून ते मान्यही करावं लागतं.

पण तरीही त्या त्या गोष्टी स्विकारताना कशासाठी काय स्पेअर करतो आहोत याचं भान तरी निश्चित असायला हवं असं वाटतं.

इंटरनेटमुळे सगळं जग जवळ आलं, माहितीची दालनं एका क्लिकवर उघडता आली. स्वाभाविकच तुमची प्रायव्हसी कितीतरी प्रमाणात कॉंप्रमाईज झाली. नेटवर टाकलेला एक शब्द करोडो लोकांसाठी खुला झाला. या खुले होण्यावर व्यक्तीचे फार कमी नियंत्रण राहिले हे मान्यच!

पण त्या सोबत "माहिती काय सगळीकडे जाणारच आहे"; ही बेफिकिरी किंबहुना स्वत:चा अधिकार देऊन टाकण्याचा निर्विकार आला आहे। हा मला फार घातक वाटतो.

माझी म्हणून असणारी पसंती / नापसंती याचा अधिकार कोणातरी क्ष अधिकारी व्यक्तीला आपणहून सुपूर्द करण्या इतका हा निर्विकारपणा किंवा "त्यात काय मोठसं" ही वृत्ती सगळीकडे दिसतेय!

काहींच्यात ती एखाद्या गॅझेटबद्दल आहे. काहींच्यात ती राजकीय घडामोडीबद्दल आहे. तर काहींच्यात ती आर्थिक व्यवस्थेतील घडामोडींमधे आहे.

प्रत्येकच गोष्ट मला कळली पाहिजे हा आग्रह नाही. पण प्रत्येक गोष्टीतील मला कळून घेण्या/न घेण्याचा अधिकार मात्र जपला गेला पाहिजे. गोष्ट छोटीशी वाटेल पण तुम्ही तुमच्या स्विकाराचा अधिकार घालवता आहात. एका अर्थाने स्वत:च्या स्वातंत्र्याशी खेळता आहात याची जाणीव पुरेशी स्पष्ट आहे का अशी भिती वाटतेय.

ही भिती खोटी ठरो! कारण आसपासची परिस्थिती लोकशाही, स्वातंत्र्य, बंधुता, समानता या सगळ्याला धोकादायक बनत चालली आहे. इतिहासाचे अलातचक्र गोल वळून पुन्हा एकाधिकारशाहीकडे वळू नये हिच इच्छा!

No comments:

Post a Comment