आपलाचि संवादु आपणासि ...!
लेखिका - आरती खोपकर
१. मी कशी ?
आपलाचि संवादु आपणासि असंच हे सगळं लिखाण! कधी आयुष्याकडे वळून बघेन, कधी मनात डोकावेन, कधी विचारांना तपासून बघेन, जसं जमेल तसं स्वत: लाच शोधत जाईन. आता हे इथे का लिहिणार? तर कधी कधी काही पोस्ट वाचताना जाणवतं, की इथूनच मी जात होते, गेले होते, धडपडले होते, तेव्हा कोणी हात दिला, नाही दिला, कधी माझी मीच शोधत, सापडवत, तयार करत गेले होते. ते सगळं वाचताना एखादीला एखादं वाक्य उपयोगी पडलं तरी? पडेलच उपयोगी असही नाही, पण वाचायला आवडलं तर, म्हणून इथे लिहितेय. मी काय फार महान लिहितेय ही भूमिका नाही, नाहीच! जस्ट मनातलं शेअर करतेय.
माझ्या आयुष्यातली फार मोठी गोेष्ट, जिने मला घडवले ती म्हणजे मी स्वत:ला ओळखलं. आता यात काय वेगळं? तर हो, होतं वेगळं. मी मला जे समजत होते, मला आरसा जे दाखवत होता ते वेगवेगळं होतं. किंबहुना मी जशी असायला हवी त्यांचं इतकं दडपण होतं माझं माझ्यावरच की त्यामुळे खऱ्या मला मी फार फार उशीरा ओळखू लागले.
लोकं म्हणतात तशी मी आहे, या समाजात वावरताना मी अशी वावरले पाहिजे म्हणून मी ही अशी आहे असे विविध गैरसमज मनात होते. पण मग तसं वागताना फार ओढाताण व्हायची. मी म्हणजे 1,2,3,4,... य गोष्टी अशी प्रतिमा मनात तयार झालेली. आणि मग मी 2 एेवजी अडिच वागले की गडबड सुरु व्हायची. मग आयुष्याच्या एका टप्यावर हे गणित उलगडत गेलं.
अरे गोरं असणं म्हणजेच सौंदर्य नाही. मुलगी असून विविध खेळ खेळता येणं हे काही वाईट नाही. कब्बडी खेळणं, झाडावर चढता येणं, फ्युज बसवता येणं यातून मी पुरषी आहे हे नाही ध्वनित होत. घरातल्या सगळ्यांनी सायन्स साईड निवडलीय आणि मी आर्ट्स निवडलीय याचा अर्थ मी बुद्धिमत्तेने कमी आहे असा नाही होत..... असे कितीतरी शोध लागत गेले. एनलाईटनमेंटच की ही एका अर्थाने :)
अन मग मात्र मी स्वत: ला शोधलं, खऱ्या स्वत:ला शोधलं.
माझं दिसणं, माझा रंग, माझं शिक्षण, माझ्या आवडी, माझे छंद, माझे विचार, माझे कंफर्ट झोन्स, मला सहन न होणाऱ्या गोष्टी, मला राग येणाऱ्या गोष्टी, मला संताप येणाऱ्या गोष्टी, मला आनंद देणाऱ्या गोष्टी, मला नकारात्मक करणाऱ्या गोष्टी, मला सकारात्मक करणाऱ्या गोष्टी, मला शॉर्ट टर्म मधे काय हवय, लॉंग टर्म मधे काय हवय, काय केलं तर चालेल,...... असंख्य गोष्टी लिहून काढल्या, दहा वेळा विचारलं, हे खरच मनापासून की कोणत्या दडपणातून? जोवर मनातून हुंकार आला नाही, तो वर खोडत राहिले. लिहित राहिले. अजूनही हा खेळ चालूच आहे. पण मूळ ढाचा आता तयार झालाय. डिटेल्स कधी हलतात, जातात, परत येतात. पण आता जे घडतं ते बरचसं कॉंशस लेव्हलला. सो त्याची पण एक मजा येते. आधी सगळंच अंदाधुंदी असायचं मग सगळीच चिडचिड, निराशा, राग, वैताग, अपमान, मी कोणाला आवडतच नाही अशी सगळी नकारघंटा वाजत रहायची. आता कमी होतं असं.
एव्हाना मी जशी आहे, अगदी जशी, आहे तशीच्या तशी मान्य केलंय. विदाऊट एनी रिग्रेट्स! अन मग आयुष्य कितीतरी टप्यांवर, कितीतरी लढायांवर सोपं होऊन गेलं. मनातली सगळी नकारात्मकता हळूहळू विरू लागली. येणारी प्रत्येक अडचण ही स्वत:ला, स्वत:तल्या गुणांना पारजून बघण्याची संधी म्हणून पहात गेले. आयुष्यातील कितीतरी अपयश पचवताना मनात कटुता राहिली नाही, उलट या अपयशांनी माझ्या सीमा जास्त अधोरेखित केल्या याची कृतज्ञताच मनात राहिली.
स्वत:ला खरच नीट ओळखायला शिकले. स्वत: बद्दल जजमेंटल होऊ होऊ दिलं नाही . +/- अशी यादी न करता. स्वत:ची स्वभाव वैशिष्ट्ये ओळखायचा प्रयत्न केला, लिहून काढली. आणि ती जशी आहेत तशी मान्य केलं, अभिमानाने. मग मनातलं नैराश्य, नकारात्मकता, अपयश, अपमान सगळे निवळत गेलं. स्वत:शी खोटं बोलणं सगळ्यात सोप्पं असतं. पण तेच टाळलं. स्वत:ला फसवणं थांबवलं. यस मी आहे ही अशी आहे!
वाटलं पुन्हा कधी तर लिहेनही, किंवा नाहीही. आतला संवाद मात्र नक्की करत राहिन :)
अगदी लहानपणीची एक आठवण आहे. माझी एक नेहमी सोबत असणारी, अगदी घट्ट मैत्रीण. काही तरी खेळताना झालं भांडण. मला खूप राग आला, खूपरडू आलं की मी डोकं भिंतीकडे करून झोपून जायची. तशीच त्याही दिवशी भींतीकडे तोंड करून झोपले. पण डोळे टक्क उघडे होते. मला खूप खूप राग आलेला. का बरं ही अशी वागली? अशी कशी ग तू?
अन मग मला ती दारातून धाडदिशी बाहेर गेली ते आठवलं. मला खूप खूप रडू आलेलं.
मग थोडी मोठी झाले. माझी सगळ्यात आवडती बहिण. तीने एकदा एक गणित शिकवताना, बावळट आहेस का, असं काय करतेयस म्हटलं. झालं. पुन्हा भींत, धुमसणं, बहिणीचा वैतागलेला चेहरा आणि शेवटी माझं रडणं....अन मनात प्रश्न, अशी कशी ग तू?
मग अजून थोडं मोठेपणी माझा काहीतरी खूप हट्टीपणा. आईचं रागावणं. पुन्हा माझी भींत, धुमसणं, आईचा हताश चेहरा आणि माझं रडणं... अन मनात प्रश्न, अशी कशी ग तू?
मग तरूणपणी एका मैत्रिणीशी झालेले वाद, मैत्री तुटणं. भींत, धुमसणं, मैत्रिणीचा रडवेला चेहरा आणि मग माझं रडणं.... अन मनात प्रश्न, अशी कशी ग तू?
मग नंतर नवऱ्याशी झालेला एक वाद. भींत, धुमसणं, नवऱ्याचा गोंधळलेला चेहरा आणि माझं रडणं.... अन मनात प्रश्न, असा कसा रे तू?
मग एकदा लेकाशी झालीच वादावादी. भींत, धुमसणं, तुझा कावराबावरा झालेला चेहरा, आणि माझं रडणं, अन मग सगळं झुगारून तुला कुशीत घेणं.... अन मनात प्रश्न, असा कसा रे तू?
अगदी परवा परवाही असाच एका मैत्रिणीशी झालेली झकाझकी. भींत, मैत्रिणीचा न दिसणारा पण गोंधळलेला, हळवा चेहरा आणि मग माझं रडणं.... अन मनात प्रश्न, अशी कशी ग तू?
असे हजारो प्रसंग. का होतं बरं असं? प्रत्येकाचे प्रसंग वेगळे असतील.
पण धुमसणं सेम असतं.प्रश्न तोच असतो, अशी कशी तू?
भींत नसेल पांघरूण असेल, डायरी असेल, कचाकचा भांडणं असेल, रुसणं असेल, अजून काय काय असेल....
आणि शेवटी पुन्हा रडणं असेल, हताश होणं असेल, वैतागणं असेल, जगाचा राग येणं असेल किंवा स्वत:चा, स्वत:च्या नशीबाचा राग येणं असेल. आणि मग असतोच तो प्रश्न, अशी कशी ग तू?
70% लोकं तरी या प्रोसेस मधून जातच असतील.
मी माझ्याबाबतीत एकदा विचार केला. का होतं असं?
माझ्या मनात काही परिघ तयार होत गेले. एक परिघ नुसता ओळखीचा, खूप मोठा. त्याहून थोडा लहान, आतला एक परिघ नात्यांचा - रक्ताची आणि मैत्रीचीही नाती. त्याच्या आत नेहमीच्या संपर्कातला व्यक्तींचा परिघ. त्याही आत, मनात घर केलेल्या व्यक्तींचा परिघ.
आणि लक्षात आलं की प्रत्येक परिघाशी मी वेगवेगळी जोडली गेलेय. त्या त्या परिघानुसार त्या त्या व्यक्तीकडून माझ्या अपेक्षा बांधल्या गेल्यात.
मी काय आहे हे कोणाला किती कळावं, कळायला हवं याच्या अपेक्षा ठरल्यात. जेव्हा या अपेक्षा तुटतात तेव्हा त्या त्या परिघानुरुप माझी चिडचिड होते.
सर्वात मोठ्या परिघात काहीही घडलं तरी मी फार वैतागत नाही. म्हणू दे काय म्हणायचं ते. माझ्या कॉन्शन्सशी मी बांधील आहे न झालं तर. मग मी पाठ फिरवून शांत झोपू शकते.
आतला, रक्ता-मैत्रीच्या नात्याच्या परिघापासून घोळ सुरू होतो. माझ्या अपेक्षा, समोरच्याच्या अपेक्षा, मधल्या कोणाच्या तरी अपेक्षा,.... सगळ्यांचा गुता व्हायला सुरुवात होते. एकीकडे आपण त्या व्यक्तीला जवळची म्हणून मान्य तर केलेले असते, पण पूर्णपणे ती व्यक्ती आपल्याला माहिती नसते, काही बाबतीत पूर्णच अनोळखी असते. मग कधी भांड्याला भांड लागतं. कधी ठिणग्या उडतात. तर कधी सरळ खडाजंगी होऊन परिघ रिअॅरेंज केला जातो. याही बाबतीत थोडाच वेळ भींत समोर असते. पण तरीही स्वत: ला सावरून, हवा तसा कोट उभारून पाठ फिरवून झोपणं जमतं याही परिघात.
मग असतो रोजच्या संपर्कातला परिघ. म्हटलं तर ओळखीचा, रोज संपर्कात येणारा, काहीसा अपरिहार्य असा हा परिघ. बऱ्याच अंशी ओळखत असतो आपण एकमेकांना. आपले संवादाचे क्षेत्र, आपले वादाचे क्षेत्र मनात छान डिफाईन असते. त्यामुळे छान सजगपणे आपण हाताळत असतो परिस्थिती. पण शेवटी कधी न कधी उडतातच खटके. बरं झट्टकन तोडून टाकावं अशी परिस्थिती नसते, काही कारणांनी समोरासमोर येणं भागही असतच. मग आपली चिडचिड वाढते. बऱ्याचदा ती मनातच दडपून ठेवावी लागते. मग भींत सारखीच पुढे असते. कधी डोकं भिंतीवर आपटून घेत, कधी वैतागून, रडून, कशा कशाला दोष देऊन, आणि शेवटी दमून भागून अपरिहार्य पणे शरण जाऊन झोपून जातो आपण, भींतीकडे तोंड करूनच!
हा परिघ अतिशय दमवणारा असतो. ना तोडता येत, ना जोडता येत. धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं अशी कुचंबणा नुसती. या परिघाची सीमारेषा थोडी सैल करून काही लोकांपुरती सीमा किलकिली करून त्या व्यक्तींना हळूच बाहेरच्या परिघात ढकलणं हे हळूहळू जमवावं लागतं. मगच हा परिघ थोडा सुसह्य होतो.
सगळ्यात अवघड असतो तो सर्वात आतला, कोअर परिघ. खूप खूप अपेक्षांनी दाट, नात्यातल्या बंधनांनी घट्ट बांधलेला, प्रेमाच्या नाजूक रेशमी धाग्यांनी विणलेला हा परिघ! अतिशय प्रेशस, आपण स्वत: विणलेला, प्रेमाने मऊसूत केलेला, आपुलकीने उबदार केलेला हा अगदी मनातला परिघ. यात कोणालाही शिरकाव सहजासहजी नाहीच मिळत. खूप घट्ट दार असतं. खूप खूप तटबंदी असते. आपली बुद्धी, विचार, भावना, स्वभाव, अनुभव, इंस्टिक्ट, अन काय काय. सगळ्या पायऱ्या चढून ती व्यक्ती या परिघात येते. पण आली की मात्र पूर्ण पूर्ण आपली होऊन जाते. कोणतीही गोष्ट कधीही, कशीही सांगितली की त्या व्यक्तीला ती बरोब्बर तशीच समजणार आहे हा विश्वास, गाढ विश्वास असतो. जगात कुठल्याही कोपऱ्यात असू दे, माझ्या एका उच्चारावर तिला माझी सगळी परिस्थिती कळणार आहे हा विश्वास तयार होतो. माझा अगदी एक स्वल्पविरामही समोरच्याला कळणार आहे. इतकेच नाही तर माझे अव्यक्त, स्वगतही तिच्या पर्यंत पोहचणार आहे, असा विश्वास या परिघातल्या सर्व व्यक्तींना एकमेकांबद्दल वाटत असतो.
हा परिघ अतिशय, अतिशय प्रेशस, अतिशय नाजूक, अतिशय डेलिकेट, अतिशय संवेदनाशील असतो. हा तयार करताना अतोनात काळजी घेतलेली असते.
पण
पण हाच परिघ जपणं अतिशय कौशल्याचे असते. सर्वात मोठा तडाखा याच परिघाकडून मिळू शकतो आणि ती परिस्थिती नीट हाताळली गेली नाही तर दोन्ही बाजूंना पराकोटीचा त्रास, नुकसान होत असतं.अगदी नैराश्याच्या कडे पर्यंत ढकलली जाऊ शकते व्यक्ती.
आणि याच परिघाला कसं सांभाळायतं याचं कोणतच मार्गदर्शन नसतं. प्रत्येक घटना, क्षण वेगळा.
पण प्रत्येकावर उपाय एकच असतो. वेळ देणं आणि पूर्ण विश्वास ठेवणं. पण हे सांगितलच जात नाही कधी.
या परिघातले जे काही समजगैरसमज असतील ते भांडून, वाद घालून नाही तर केवळ आणि केवळ थांबून, वेळ देऊन, विश्वास दाखवूनच दूर करता येतात. त्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रचंड पेशन्स हवा. आणि कधीतरी या गैरसमजामागची कारणं आपोआप दूर होतील यावर विश्वास हवा. इथे घिसाडघाई केली तर ह्या परिघाची तरलता जाते, त्यातला जो मूलत: असणारा ओलावा, तरलपणा हरवता कामा नये.
भले नाही पटली एखादी गोष्ट? सर सांगा, एेका. थांबा. एकमेकांना पटवापटवी नको, नकोच. तुम्ही मांडलेली बाजू तिची तिला कळेल कधीन कधी. हा विश्वासच पुरतो, हा विश्वासच हे नातं अधिक घट्ट करतं.
त्याहूनही महत्वाचं हे, की कोणाची बाजू चूक बरोबर या पेक्षा दुसऱ्याची काही बाजू आहे हे समजणं! एखाद्या गोष्टीला दोन / चार बाजू असूच शकतात न? हे स्विकारण्यासाठी हा कोअर परिघ सर्वात सुरक्षित! आयुष्यातला फार मोठा धडा आपण केवळ आणि केवळ, या कोअर परिघातच शिकू शकतो. जग फक्त काळं पांढरं नाही. आणि माझी बाजू बरोबर म्हणजे समोरच्याची चूक असे नाही हे कळण्यासाठी, समजण्यासाठीच तर हा असा परिघ हवाच. माझ्या डोळ्यासमोर एक दिशा आहे, तशीच समोरच्याच्या डोळ्यासमोरही दिशा आहे, ज्यामुळे मी त्याला दिसतोय. अन मला तो दिसतोय. हा दृष्टिकोन मला फक्त या कोअर परिघातच मिळू शकतो.
तो स्विकारणं हा या परिघाची अन आपलाही सकारात्मक बाजू असते.
व्यक्ती जितकी मोठी तितके तिचे परिघ कमी होत जातात. तिचा कोअर परिघ वाढत जातो अन बाहेरचे परिघ त्यात समाविष्ट होत जातात.
तर काहींच्या बाबतीत बरोब्बर उलटे घडत जाते बाहेरचा परिघ आत आत येत जातो अन कोअर परिघ फक्त स्व: मधे केंद्रित होतो.
प्रत्येकाचा स्वभाव, विचार, अनुभव, ... यांतून हे घडतं. पण आपण या सगळ्या घडामोडीकडे थोडं जाणीवपूर्वक बघितलं तर यातले काही बदल आपण नियंत्रित करू शकतो. जितका कोअर परिघ वाढेल तितका आपल्याला समजून घेणाऱ्या , आपल्याला सामावून घेणाऱ्या व्यक्ती वाढतील. जीवनातले धक्के, नैराश्य पचवायला हा परिघ शॉक ऑब्झॉर्व्हरचे काम करेल.
आजही अनेकदा मी चिडते, धुमसते, भींतीकडे तोंड करते, पण गंमत म्हणजे हल्ली ह्या भींतीत मला त्या व्यक्तीचा चेहरा दिसू लागतो. मग ती व्यक्ती कोअर परिघात आहे असच वाटू लागतं. तरीही जुन्या सवयीने करतेच कधी तडतड, चिडचिड, अगदी तावातावानं भांडणं ही. पण मग कोअर परिघातल्या व्यक्तींमधून मला आरपार दिसतं काही, मग भींत आरसा बनत जाते हळूहळू. काश भींत राहणारच नाही कधी
थांकु कोअर परिघ
----
आई मुलांचं नातं किती विविधरंगी, विविधढंगी! कित्येकदा प्रेमाचं, लाडाचं, कौतुकाचं तर कधी अगदी भांडणाचंही! त्यातलाच एक रेशमी किनार असलेला थोडा कणखर आणि टोचणाराही एक पदर म्हणजे हे गाणं! श्यामची आई या कादंबरीने किमान तीन पिढ्यांना तरी नक्कीच रडवलं. कोणाला हमसून हमसून, कोणाला धो धो तर कोणाच्या डोळ्यात तरळणारं पाणी... तीव्रता कमी जास्त असेल पण आतून हललं नक्की काही तरी...
काहींना तो मेलोड्रामा वाटला असेलही, पण किमान दोन पिढ्या तरी श्यामच्या आईचे संस्कार घेत वाढल्या.
संस्कार म्हणा, डोस म्हणा किंवा आजच्या भाषेत सर्मन म्हणा किंवा संयमित चर्चा म्हणा. आई अन मुलांच्या नात्यातला हा भरजरी कोपरा आज उलट वळून बघावा वाटतोय.
आजही चालतात ही? सर्मनं, पण त्याचं प्रमाण आता अगदी कमी झालय. एक बेसिक वेव्हलेंग्थ मॅच झालीय. आईवडिलांची अपेक्षा- विचार- मतं हवी तितकी पोहोचली मुलांपर्यंत की हळुहळू कमी व्हायला लागतीतच ही. क्वचित कधी तरी आईपण बापपण येतं उफाळून पण मनातून माहिती अाहे आता, कि फारशी गरज नाहीये आता.
मुळात माझा भर समजाऊन देण्यावर होता त्यामुळे रागवारागवी पेक्षाही सर्मनं जास्त होत. कालांतराने त्याचे रुपांतर संयमित चर्चांवरही झाले. आता एकमेकांचा पॉईंट ऑफ व्ह्यु समजून घेणं एव्हढच पुरतय.
केव्हढा मोठा प्रवास आहे नाही हा? बोट धरून चालण्यापासून त्याचा विचार समजून घेण्यापर्यंतचा. आणि तितकाच आनंददायकही ! लहानपणी डोळे झाकून स्विकारले गेलेले संस्कार, टिन एज मध्ये- हा काळ नशिबाने खुपच कमी होता, पण होता- प्रत्येकच गोष्टीत रिबेल करून बघण्याचा काळ. नंतर स्वत: विचार करून खऱ्या अर्थाने चर्चा करण्याचा काळ. अन आताचा काही बाबतीत वैचारिक मतभेद असले तरी एकमेकांच्या मतांना समजून घेऊन होणारा संवाद.
आज वळून बघताना सगळेच टप्पे खुप आनंद देणारे. समाधानही देणारे. या गीता इतका भावनिक निचोड नाही जमला फार पण वैचारिक, तात्विक निचोड जमला, आणि तरीही भावविक आपुलकी टिकली यातच आनंद! पुढचा काळ नक्की उलटी भूमिका असणार याची जाणीव आहे अन तयारीही. आणि सोबत विश्वास आहे की तोही प्रवास भरजरीच असेल, आमेन!
(ही घडलेली घटना. नावं, काही तपशील अर्थातच बदलली आहेत.)
---
*
" हलॉ, मावशी. मला एखादा चांगला चाईल्ड सायकॉलॉजिस्ट सजेस्ट कर ग. "
" ओह, थांब हं आठवते.... हा अग त्या ***रोडवर अगदी सुरुवातीला चाईल्ड सायकॉलॉजी सेंटर आहे बघ. तिथे डॉ.*** ना भेट. त्या नीट गाईड करतील. पण साधारण किती वर्षाचं आहे मूल?"
" अग दुसरं कोणी नाही ग, माझीच मुलगी, राही बद्दल बोलतेय..."
" अग... असं काय म्हणतेस?"
" मावशी मला काही कळेनासंच झालय. राही अशी का वागतेय? तू तरी मला मदत कर ना ग" आहानाचा सूर आता अगदीच रडवेला झाला.
" शांत हो आहाना, होईल सगळं नीट. बरं एेक असं करतेस का, उद्या राहीची शाळा संपली की इकडे येता का दोघी? जेवायलाच ये. तसंही खूप दिवसात आली नाहीस तू "
" मावशी अग जेवणाचा नको घोळ..."
" घोळबिळ नाही. नेहमीचच करते. ये. समोरासमोर नीट बोलता येईल. जमेल न उद्या?"
" हो, मावशी. मी तर आताही उठून येईन. पण राही अगदीच झोपेला आलीय. येते उद्या दुपारी"
" हो या दोघी, मी वाट बघते. आणि काळजी करू नको. सगळं छान होणारे. झोप आता तूही निवांत"
" मावशी खरच बरं वाटलं ग. उद्या येतोच. गुड नाईट"
" गुड नाईट बेटा"
---
**
सगळं आवरं अन शतपावल्या करताना मनात आहानाबद्दल विचार सुरू झाला.
आहाना, माझी भाची. पण खूपशी माझ्या अंगाखांद्यावरच वाढली. ताई नोकरी करत होती, शिवाय धाकटी, संसार या सगळ्यांत खूप गुरफटली होती. धाकटी लहान, सतत आजारी म्हणून स्वाभाविक तिला जास्त वेळ द्यावा लागे ताईला. मग आहानाची माझ्या गट्टी झाली.
तिची शाळा, कॉलेज, मित्रमैत्रिणी सगळ्यांबददल बोलत रहायची. तशी बडबडीच होती लहानपणापासून.
अन मग नवीन नोकरी, तिथे भेटलेला नवीन मित्र, आशिष. त्यांचे जुळलेले बंध. खरं तर त्याचं घरी येणं जाणंही सुरू झालेलं. पण का माहिती नाही ताईला हे नातं उमगलं नाही लवकर. तशी ताईची शिस्त थोडी कडक होती. अर्थात ते स्वाभाविकच होतं. संसार नोकरी, आलंगेलं सगळं पहायचं तर ही शिस्त असणं गरजेचं होतं. आहाना पहिल्यापासून ताईला थोडी घाबरून असायची.
एकदा मी आहानाला म्हटलंही, की "तूहून आशिष बद्दल सांगायला हवंस आईला." पण ती घाबरत होती. शेवटी व्हायचं तेच झालं. बाहेरून ही बातमी ताईला कळली. ताईला हे खूप लागलं. अर्थात, ताईने मुलगा चांगला आहे हे बघून अगदी व्यवस्थित लग्न लावून दिलं आहाना आशिषचे. पण मायलेकींचं नातं तणावाचच राहिलं. असं म्हणावं असं काहीच नव्हतं. पण त्या दोघीही एकमेकींपासून अंतरावरच असत.
पण मग आहानाला दिवस गेले अन हे सगळे तणाव संपून गेले. राहीचा जन्म झाला अन मग तर सगळेच आलबेल झाले. या काळात ताईची खूप दगदग झाली. तिची नोकरी, तिथल्या वाढलेल्या जबाबदाऱ्या, आहानाचे बाळंपण, सगळे निभावले तिने, तिच्या नेहमीच्या शिस्तबद्ध रितीने.
दरम्यानच्या काळात आहानाने नोकरी सोडली. घर, राही, सासुसासरे, नोकरी सगळं काही झेपेना तिला. हे ताईला अजिबातच आवडले नाही. आणि बरोबर होतं तिचं रागावणं. तिने स्वत: दाखवून दिलं होतं की सगळं कसं मॅनेज करता येतं. पण ती हे विसरत होती की प्रत्येकाची कपॅसिटी वेगळी. पण झालं, पुन्हा दोघींच्यातले संबंध ताणले गेले.
अनेकदा मनात येई की बोलूयात ताईशी. पण ते तिला अजिबात आवडलं नसतं. मुलगी आई हे इतकं नाजूक नातं असतं. खरं तर प्रत्येकच नातं असच नाजूक. इतर कोणाचीही ढवळाढवळ ते नातं अजूनच बिघडायलाच कारणीभूत होऊ शकतं. नातं निर्माण होणं, ते वाढणं, जोपासणं, दुरुस्त करणं फक्त आणि फक्त त्या दोन व्यक्तींच करू शकतात. हे मला अगदी अगदी पटलं होतं. मग त्यांना योग्य तो वेळ देणं हेच आपलं काम.
पण लहान मुलांच्या बाबतीत मात्र तसं नसतं. त्यांचं त्यांना काही उमजतही नसतं. अशा वेळेस तिसरं माणूस मदतीला हवं वाटतं. म्हणूनच आहानाच्या हाकेला मला ओ द्यावी वाटलीय. बघु उद्या काय घडतय...
---
***
आज खूप दिवसांनी आहाना आणि तिची लेक राही घरी यायची म्हणून सकाळचे सगळे पटपट आवरून घेतले. तिच्या आवडीचा स्वयंपाक करून कुकर खालचा गॅस विझवला अन तेव्हढ्यात बेल वाजली. अन दारावर थापट्या पण पडल्या.
लगबगीने दार उघडलं. " या, अगबाई कित्ती मोठी झाली आमची राही? आतातर काय बाई शाळेत पण जाते न तू?" राहीला कडेवर उचलून घेत म्हटलं. " ये ग सावकाश. कशी आहेस? सगळं ठाकठिक न?"
" हो मावशी बरी आहे मी. राहीच जरा ..."
" हा हा ते बोलू आपण नंतर. आधी गरम गरम जेऊन घेऊत." जाणीवपूर्वक विषय थांबवला.
" चला चला आज राहीची आवडीची भेंडीची भाजी आहे. झालच तर जाम आहे. आणि मऊ मऊ खिचडीपण. चला जेवायचं न राही?"
तिघीजणी स्वयंपाक घरात आलो. राहीची गोड बालिश बडबड चालू होती आणि मावशी आजीच्या भोवती भोवती ती लुडुबत होती. " राही आजीला त्रास नको देऊन. इथे बैस खुर्चीवर" आहाना जरा चिडूनच म्हणाली. " असू दे ग. राही मदत करतेय आजीला, होकी नाही."
" आजी मला तू खूप आवडते, मी आज तुझ्याकडेच रहाणारे, राहू? सांग ना सांग ना. मला नाही आईबरोबर घरी जायचं. इथेच रहायचय. " माझ्या हाताला लोंबकळत राही म्हणाली.
अन आता पर्यंत रोखून धरलेला आहानाचा बांध कोसळला. " मावशी हेच, हेच चालू आहे राहीचं... मला नाही सहन होत हे आता... का, का म्हणते ती सारखी असं? काय कमी केलं मी तिच्यासाठी? मी, आशिष दोघे धडपडत असतो हिच्यासाठी..."
" आहाना, आहाना, सावर स्वत:ला. नाही अजिबात रडायचं नाही. हा विषय आता नाही काढायचा. हे पाणी पी. आणि जा उठ, तोंड धू, पाणी मार तोंडावर. आणि बस बाहेर जरा गाणी बिणी लाव. मी आलेच जरा वेळात , राहीला झोपवून."
मला घट्ट बिलगलेल्या राहीकडे पाहिलं. आणि पोटात खड्डाच पडला." राही, ये बेटा. आपण आता मस्त जेऊ.मग झोपताना मी तुला परीची गोष्ट सांगते. चालेल?" असं म्हणत शाळेतल्या गप्पा गोष्टी करत राहीला भरवलं. राहीपण अगदी शहाण्या मुलीसारखी शाळेतल्या गमती जमती सांगत पटापट जेवली. पण माझा एक हात मात्र तिने घट्ट धरून ठेवला होता.
" शाब्बास राही. सगळी खिचडीपण संपवलीस, भाजीपण संपवलीस. जा आता बाथरुममधे जाऊन तोंड धू. आणि शू करून ये. तो पर्यंत मी आईला जेवायला वाढते. चालेल? " " आणि मग परीची गोेष्ट?" " हो आणि मग परीची गोष्ट! "
पटकन आहानाचे ताट तयार केले अन बाहेर आले. आहाना अजूनही विमनस्कपणे बसलेली.
" आहाना, आता कसलाच विचार नको. आता आधी जेऊन घे. काही हवं असेल तर आत टेबलवर आहे ते घे. मी राहीला निजवून येते"
" मावशी अगं तुझं जेवण?" " राहीला झोपवते अन येते मी पण"
मी आत वळली. तर राही कॉटवर पडून वाट बघत होती. मग तिला पांघरूण घातलं, पंखा लावला. अन शेजारी आडवी झाले. " मावशीआजी, आई कुठेय, ती झोपयला येणारे ना?"
" मनुराणी आई जेवतेय. जेऊन झालं की येणार तुझ्या शेजारी झोपायला" राही खुदकन हसली. "गोष्ट? गोष्ट सांग ना" मग परीची गोष्ट एेकता एेकता राही पटकन झोपून गेली. माझा हात घट्ट पकडून. हळूच हात सोडवून घेतला अन तिच्या हातात बनी रॅबिटचा हात दिला. राहीन झोपेतचे बनीला पकडलं. राही गाढ झोपलीय हे बघून मग मी बाहेर आली. आपलं ताट वाढून हॉल मधे आले. बघितलं तर आहाना आता खूपच शांत झालेली.
" आहाना, कॉफी करतेस माझं जेवण होई पर्यंत? मग गप्पा मारत मस्त कॉफी घेऊ"
---
****
" हं आता बोल. नक्की काय बिनसलय? आणि एक, न रडता, न चिडचिड करता बोलायतं, शांतपणे. "
" मावशी खरच किती परफेक्ट सांगत असतेस तू. आणि माझी बाजू एेकून घ्याला नेहमी तयार असतेय." तिचा आवाज भरून यायला लागला.
" हं हं, आताच सांगितलं न? न रडता, शांतपणे. असं कर, तू जणूकाही दुसऱ्या आई अन लेकीची कथा सांगतेयस असं त्रयस्थ होऊन सांग बरं. म्हणजे तुला कमी त्रास होईल."
" हो मावशी" कॉफीचा एक घोट घेऊन एक क्षण आहाना थांबली, मग म्हणाली...
" बघ हं, आताचच उदाहरण घे. मगाशी राही म्हणाली न, 'मी आज तुझ्याकडेच रहाणारे, राहू? सांग ना सांग ना. मला नाही आईबरोबर घरी जायचं. इथेच रहायचय.' तसच करतेय ती सध्या सगळीकडे. म्हणजे आई कडे गेले तर तिला तिथेच रहायचं असतं, माझ्या मैत्रिणीकडे गेले तरी तेच. परवा तर शाळेतला मुलगा अन त्याची आई भेटली तर त्यांनाही म्हणाली, मी येऊ तुमच्याकडे रहायला? तिला मी, आशिष आवडेनासेच झालोत का ग? की तिला आमचं घर आवडत नाही?"
" एकदम टोकाला नाही जायचं ग. थांब आपण एक एक करत बोलू. मला सांग तुमचं रोजचं रुटीन कसं असतं? किती वेळ देतेस राहीला?"
" अग सध्या धावपळ होतेय जरा. म्हणजे आशिष पूर्ण त्याच्या कामात अडकलाय. तो सकाळी सातलाच डबा घेऊन बाहेर पडतो. मग मला साडे पाचला उठावच सागतं. राही उठते बाबा जायच्या वेळेस.मग तिचं आवरणं, आमचा नाश्ता. तोवर तिची रिक्षा येते. मग कुकर, उरलेला स्वयंपाक, इतर कामं. एकला ती परत येते. मग जेवण. दुपारी दोनला मी इतकी दमते की राही बरोबर झोप लागून जाते. चारला चहा, नाश्ता. तोवर राही उठते. मग तिचा अभ्यास. साडेपाचला ती आजी बरोबर खाली जाते खेळायला. मग रात्रीचा स्वयंपाक. ती खेळून आली की राहिलेला अभ्यास, जेवण. की झोप. दिवस कसा जातो कळतही नाही ग."
" हम्... म्हणजे तू अन राही भेटता एकमेकींना ते केवळ जेवण, झोपणं आणि अभ्यासापुरत्या. बरोबर?"
" अं... हो, सध्या झालय खरं तसं. पण खरच वेळच नाही पुरते."
" खरय, आयुष्यातला हा टप्पा खरच दमवणारा असतो. बरं मला सांग तू राहीला दिवसातून किती वेळा रागावतेस? हे कर, ते करू नको म्हणतेस?"
" अग ते तर दिवसभर चालूच असतं. हल्ली इतकी वेड्यासारखी वागते ती. खाऊच्या वाटीला पाय लावू नको म्हटलं की लावलाच हिने. अभ्यास करताना इतकी चुळबूळ. नीट सलग जेवत नाही. मग सारखी भूक भूक करते. पोट भरत नाही मग रात्रीची रडत उठते.पण हे सगळं ठिके. मूल म्हटल्यावर हे सगळं मला मान्य आहे. या कशाची तक्रार नाही माझी. पण ती जेव्हा आमच्या पेक्षा इतरांजवळ रहायला मागते न तेव्हा पोटात तुटतं ग."
" आहाना, एक सांगू? मला वाटतं तिला न तिची आई भेटतच नाहीये."
" मावशी, अग शाळा अन संध्याकाळचं खेळणं सोडलं तर तिन्ही त्रिकाळ मी सोबतच असते ग तिच्या"
" हो तू सोबत असतेस सतत पण कशी? बघ हं, ही वाक्य तू किती वेळा म्हणतेस?
राही, असं पाय पसरून बसू नाही. राही पसारा आवर. राही चल अभ्यास कर पटपट. राही लवकर लवकर खा ग. राही आजीला असं नाही बोलायतं. राही त्रास नको ग देऊ.
आणि आता सांग ही वाक्य तू किती वेळा म्हणतेस? राही माझं गोड गोड बाळ. राही, चिमणे ये, मांडीत बस. राही चल आपण खेळुयात? राही जेवताना कोणती गोष्ट एेकायतीय? राही चल आपण अभ्यास करुयात? राही माझ्याबरोबर पसारा कोण आवरणारे?"
आहाना आता एकदम गप्प झाली. तिला हळूहळू कळायला लागलं, नक्की काय गडबड होतेय.
" कसय न आहाना, हे तिसरं वय जssरा वेडं असतं. मुलांना स्व बद्दल जाणीव होत असते. या वयात चांगलं वाईट कळत नसतं पण वेगवेगळं करायला हवं असतं, आवडत असतं. याच वेळेस मोठ्यांना वाटत असतं की आताच नीटनेटकेपणाची सवय लावायला हवी. शिस्त हवी. पण ही शिस्त मुलांना अवडणारी नसते. तशात कोण रागावतं, कोण लाड करतं हे त्यांना कळायला लागतं. मग मुलं जे रागावतात, शिस्त लावायला बघतात त्यांच्यापासून लांब जायला बघतात. जे रागवत नाहीत. हे कर, ते करू नको सांगत नाहीत ती लोकं मुलांना आवडायला लागतात."
" मावशी पण मग मुलांना शिस्त कशी लागणार? रागवायचच नाही का त्यांना?"
" खरं तर शिस्त, चांगलंवाईट, नियम कळण्याचं हे वयच नसतं ग. पण अगदी न सांगणंही बरोबर नाही. सांगत रहायचच पण प्रमाणात. आता कसं होतय तू जे काही राहीशी बोलतेयस ते सगळं शिस्त लावण्याचच बोलतेय, अनवधानाने. तिला लाड हवेत, प्रेम हवय, आईचा स्पर्श हवाय, बाबाचा आधार हवाय. आणि नव्या जगाचा अनुभवही हवाय. ही सगळी प्रोसेस सोपी नाहीच. पण आपणच मार्ग काढायला हवा न..किती तरी मार्ग असतात. जसं खाली खेळायला आजी बरोबर पाठवतेस, तर तूही जा सोबत. जेवायला बसताना तिच्या सोबत बैस, गोष्ट सांग, गाणी म्हण. अगदी तुझ्या लहानपणीच्या गमती सांग, शाळेतल्या गमती, अगदी काहीही सांग. तिला जे नवीन असेल. आता तिला तुझ्याकडून काही नवीन मिळत नाहीये, अन लाड करणारी आईपण हरवलीय."
" हम्... होतय खरं मावशी असच. खरं तर थांबून विचार करायलाही विचार मिळत नाही. वेळेचं कसं करू?"
" वेळ मिळत नाही ग. आहे त्यातच शोधून काढावा लागतो. स्वयंपाक करताना तिच्याशी गप्पा मारणं जमव. भाजी आणायला बाहेर गेलीस तर तिला सोबत ने, पैसे देणं, घेणं करायला लाव. तुझ्या सोबत तिला नवीन गोष्टी कळू दे. शक्य झालं तर घरातल्यांचा घरातल्या कामात सहभाग वाढव. ते शक्य नाही झालं तर जेवणाच्या पद्धती हळूहळू बदल. वन डिश मेन्यु ट्राय कर. मार्ग तुझा तुलाच शोधायचाच. फक्त तो शोधायचाय हे सांगण्याचे काम माझे."
" नक्की प्रयत्न करेन मी. पण मी, आशिष आईबाबा म्हणून तिला आवडत नाही असं तर नाही ना ग झालं?" आहानाचा स्वर हळवा झाला.
" अग वेडी की काय तू. असं कसं होईल? ती इतरांकडे रहायला जायला मागते. पण दुसऱ्या दिवशी घरी येते न? आणि रात्री झोपताऩा तुझी आठवण काढतेच की. आताही तिने विचारलच की, आई कुठेय, कधी येणार झोपायला?"
" हो ग, ते आहेच. आईकडे राहिली तरी झोपताना फोन असतोच तिचा." डोळे पुसत आहानाच्या चेहऱ्यावर हसू झळकले.
" बघ म्हटलं ना. अग ही एक फेज आहे. आता थोडी शिस्त बाजुला ठेव. तिला थोडं आश्वस्थ कर, की आई आहे, ती लाड करते. आईला राही आवडते. हे पोहोचू दे तिच्यापर्यंत. मग नंतर लाव काय शिस्त बिस्त लावायची ती."
" मावशी खरच किती मोकळं वाटतय मला. खरच मला इतकी भिती वाटत होती की आपलं पिल्लु आपल्याला विसरतं की काय? काही काही सुचत नव्हतं. मी माझ्याच इवलुशा पिल्लाला किती एकटं पाडत होते ते कळलं. बिच्चारी राही. इतकी गुणी पोर किती कावरी बावरी झाली असेल न?"
" अगदी बरोब्बर ओळखलस. आईबाबा आपल्या बाजुला उभे नाहीत असं वाटलं की मुलं खरच कावरीबावरी होतात. तुम्ही एक हात पुढे केलात की कुशीत धावत येतात पोरं. फक्त विश्वासाने हात पुढे कर. बसं. सगळं छान होईल बघ."
तेव्हढ्यात आतून आवाज आला, " आई ये न झोपायला. मला झोप येत नाही तुझ्याशिवाय."
" आले ग पिल्लु, आले..." आहाना डोळ्यात पाणी अन ओठात हासू घेऊन तटकन उठली अन आत धावली.
---
*****
" हलॉ, मावशी अग तू सांगितलेले बदल करतेय. आणि काय सांगू राही पुन्हा चिकटलीय मला" आहानाचा हसरा आवाज एेकून अगदी बरं वाटलं.
" अग मी कुठे काही सांगितलं? तुझं तुलाच उलगडत गेलं काय करायचं."
" नाही ग मावशी. मी पार भंजाळले होते. काय होतय समजतच नव्हतं. तुझ्याशी बोलले अन सगळा उलगडा झाला."
" वेडी मुग्गी. अग मावशी कशासाठी असते मग? बरं, पुन्हा ये राहीला घेऊन. आणि आता रहायलाच ये एक दिवस. "
" हो मावशी नक्की येते. राहीलाही तुझी गोष्ट एेकायचीय"
" ये, नक्की ये. ठेऊ फोन?"
" मावशी, मावशी लव्ह यु ग. कसली गोड आहेस तू. थांकु "
" चल चहाटळ कुठली. ते लव्ह यु म्हणा दुसऱ्या कोणाला तरी."
आहानाचा खळखळत हसणारा आवाज सांगून गेला, सारं काही आलबेल झालय म्हणून.
----
अन मग तारुण्यातली भांडणं, संघर्ष - वागणं, बोलणं, दिसणं, कपडे, मेकअप, केसांची स्टाईल, अगदी तत्व अन विचार यांबद्दलचाही वाद ! मग तिचं काही बाबतीत अधिकारवाणीतलं निर्णय देणं, कधी सोडून देणं तर कधी नुसतं गप्प बसणं तर कधी माझं काही स्विकारणं- मनापासून किंवा मनाविरुद्धही!
बरोबर आहे ना ? तुम्हाला काय वाटतं?
म्हणाल ना, आमेन?
----
पण सामान्य दमणुकीतून शांतता मिळावं म्हणून , सामान्य ताण मोकळा व्हावा या साठी अनेक रिलॅक्सिंगचे व्हिडिओज नेटवर उपलब्ध आहेत, त्यांचा उपयोग होतो.
आपली मैत्रीण वंदना हिला वाटलं की असे व्हिडिओज मराठीत असतील तर मराठी मैत्रिणींना जास्त आवडतील. मग तिने मला विचारले. की तू असे तणावमुक्तीचे लिखाण, वाचन करू शकशील का?
खरं तर हा काही माझा प्रांत नाही. पण वंदनाने माझ्या लेखन आणि सादरीकरणावर इतका विश्वास दाखवला की एकदा प्रयत्न करून बघायला मी होकार दिला.
हा असा मला काहीच अनुभव नव्हता. त्यामुळे खूप जपून सगळे लिखाण केले, वाचनही.
वंदना, नलिनी, अकु या साऱ्या मैत्रिणींनी हवी तेव्हा सगळी मदत अगदी चटकन आणि मनापासून केली. सानीचे प्रोत्साहनही दिलासा देऊन गेले. काही मैत्रिणींचा फर्स्ट हँड अनुभवही उपयोगी पडला.़ तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार.
कोणाला याची फक्त ऑडिओ हवी असेल तर मला कळवा. मी पाठवेन. ( व्हॉ अ +91 9890971443) तुमच्या सहृदयांनाही ही लिंक शेअर करायला, पाठवायला हरकत नाही.
मैत्रीणवरती हा नवीन प्रयोग टाकण्यासाठी मान्यता दिली त्या बद्दल बस्केचेही आभार!
तुमचा अनुभव जरूर शेअर करा. भावी काळात इतरही काही असे तणावमुक्ती साठी, विषयानुरुप काही करता येईल.
धन्यवाद!
---
काही टीप्स:
व्हिडिओ एेकताना शक्यतो आरामात बसा/ आडवे पडा. डिस्टर्ब करणारी सर्व गॅझेट्स बंद करा. अशी वेळ निवडा जेव्हा पुढील किमान 15 मिनिटं तुम्हाला इतर कोणतेही व्यवधान नसेल. शक्यतो डोळे मिटून, हेडफोन लावून एेका. कोणताही प्रयत्न मुद्दाहून नको. शक्यता आहे की हे एेकताना झोपही लागेल. काही हरकत नाही. मनाला शांत वाटणेच अपेक्षित आहे.
---
डिसक्लेमर: मी यातली तज्ञ नाही. केवळ मैत्रिणींच्या आग्रहावरून हे केले आहे.
No comments:
Post a Comment