आणि तोही दिवस आठवतो राधे...
नुकतच मिसुरडं फुटायला लागलं होतं. फार काही कळत नव्हतं पण मोठं झाल्याची जाणीव मनामधे हळूहळू रुजत होती . कधी कधी माई का रागावते ते कळत होतं. कधीकधी नंदबाबा काय सांगतात ऐकावं वाटत होतं. तसं बरचसं कळतही होतं अन बरचसं कळतही नव्हतं.
पेंद्या आणि गोपांबरोबर त्या दिवशी नेहमी सारखं संध्याकाळी यमुनेवर आलो. नेहमी सारखं उपरणं कदंबावर टांगून सगळे भराभर यमुनेत घुसले. भरपूर डुंबून, पोहण्याची स्पर्धा करून, यमुनेला भरपूर दमवून बाहेर आलो. अन कदंबाच्या फांद्यांवर सुकवत बसलो. उपरण्याने एकीकडे डोकं पुसत एकमेकांचे पाय ओढणं चालून होतं.
" अरे आज सुधनला कसलं हरवलय"
"नाही हं आज अपूप जरा जास्त खालेले म्हणून, बघ उद्या हरवतो" मग काय, खाण्याच्या गप्पा सुरु झाल्या. आज काय काय जेवलो,
कोणी आज लोणी पळवलं, कोणी दह्याचं गाडगं संपवलं,....
हे सगळे चालू असताना समोरून तुम्ही मैत्रिणी चालत यमुनेकडे येऊ लागलात. काय छान छान रंगीत कपडे घातले होतेत तुम्ही. हो बरोबर, आज वसंत पंचमीचा दिवस नाही का. तुम्ही आपापले घडेही रंगवलेले. लाल, पिवळे, काळे, निळे.
आमचा इतका दंगा चाललेला की तुमच्या लक्षात आलं. मग तुम्ही वाट बदललीत अन वरच्या घाटावर, पायऱ्यांपाशी गेलात. तिथे पाणी भरून जरा टेकलात. मी कदंबावर बसलेलो, मला दूरूनही दिसत होतात तुम्ही. इतक्यात एक मंजूळ आवाज ऐकू येऊ लागला. तुमच्यातलं कोणी तरी बसंत गीत गात होतं. खूप स्पष्ट आवाज येत नव्हता. तितक्यात पेंद्या म्हणालाही, " ए गप्प बसा बरं, गाणं ऐकूयात"
अन मग सगळे तल्लीन होऊन ऐकू लागले. हा आवाज वेगळा होता. नेहमीच्या मुलींपैकी नव्हता.
" पेंद्या, कोण रे ही? ओळखीची नाही वाटते." मी हळूच पेंद्याच्या कानाशी लागलो.
" एव्हढंही माहित नाही तुला? अरे ही राधा, अनयची बायको. आमच्या लांबच्या नात्यातलीच आहे. त्या तिकडे चार गावं सोडून, बरसाना गाव आहे न, तिथली."
"राधा, हं..." हे नाव वेगळच होतं. आता पर्यंत कितीतरी मुलींची नावं ऐकली होती, पण हे नाव पहिल्यांदाच ऐकत होतो.
तिचं गाणं चालूच होतं...
"आले सोडूनिया घर माहेरा
सख्या शोधते कधीची तुला
स्मरते मनी तुलाच सखया
अजून अनोळखी तू जरा
तरी नजर शोधते आधारा
क्षण एक स्मित ओलावा
हरित तृणांचा गार ओलावा
हवेत पसरला सुगंधी मरवा
गाज उठे मनी तरंग नवा
झंकारले तनमन तूच हवा
गाजत वाजत बसंत आला
सोहळा सजला गार हिरवा
उभार आला आज यमुनेला
आस लागे दर्शनाची हृदयाला
भेटे जीवशीव, होई तृप्तता
आसमंत हा होई हिरवा
आकाशी बरसे रंग निळा
तोचि तू दिसे शाम सावळा"
ते शब्द तर फार सुंदर होतेच पण ते ज्या सुरांना धरून येत होते, ते फार मनमोहक होते ते.
आणि खरच ती संध्याकाळ अगदी त्या सूरांमधे रंगून गेली. तुम्ही आलात तशाच निघून गेलात. पण जाताना तुझं गाणं मात्र तू तिथेच ठेवून गेलीस.
पेंद्याला म्हटलं "चांगली गाते हं तुझी नातेवाईक."
" हा, कान्हा, जपून. जहाल आहे बरं." पेंद्या हसून म्हणाला. " हॅ मला काय करायचय? सहज आपलं विचारलं"
वर वर म्हणालो खरं पण तिचा आवाज घुमत राहिला मनात. ते सूर मनात वाजत राहिले. रात्रीही नीटशी झोप लागली नाही मला.
दुसऱ्या दिवशी लवकरच उठलो. सकाळची आन्हिकं उरकली अन आपसुक पाय यमुनेकडे ओढले गेले. पण आज कदंबापाशी न जाता, तुम्ही बसलेल्या पायऱ्यांवर आलो. आलो कसला, ओढलो गेलो. अजून झुजूूमुंजू होत होतं. पक्षांची किलबील चालू होती. यमुना संथ वहात होती. हवेत छान गारवा होता. हळूच एखादी झुळूक शहारा उमटवत होती. मी पायऱ्यांवर बसलो. कमरेची बासरी काढली अन तुझे सूर शोधू लागलो. डोळे मिटून आठवत आठवत मी वाजवत होतो. मधेच एक तान मला आठवे ना. मी थबकलो. अजून मन एकाग्र करून आठवू लागलो... अन ते सूर कानी पडले. मी चमकून डोळ् उघडले, वर बघितलं. तू घडा कमरेवर ठेवून ती लकेर गायलीस, पुन्हा गायलीस. मग हलकेच माझ्या बासरीतून ती पाझरली. " हं, असचं" ती हसत मान हलवलीस. मला कळलच नव्हतं तू कधी आलीस. म्हणजे मी तुला ओळखलं नाही. कसं ओळखणार? बघितलं नव्हतच न मी तुला. पण तुझ्या आवाजाने, सुरांनी तुझी ओळख पटवली.
" तू, तू राधा न?"
" हो, मीच राधा. पण तू माझं गाणं कसं काय वाजवत होतास रे? अच्छा, म्हणजे काल, त्या तिथे दंगा करत बसलेलं टोळकं तुझं होतं होय?" खळखळत हसत तू म्हणालीस. "तरीच, तरीच माझं गाणं वाजवत बसला आहेस."
" तुझं कस? तुझं नाही, मी ऐकलय एकदीया हे गाणं, मला माहितीय" मी उगाचच फुशारकी मारत बोललो.
"होय? कधी आलेलास तू बरसानाला? आमच्या गुरुजींनी बसवलय बरं हे गाणं."
आता जास्त खोटं बोलण्यात अर्थ नव्हता. मी सपशेल पकडलो गेलो होतो. मग हसत म्हणालो " नाही नाही, मी तुझंच ऐकून वाजवत होतो. चुकलं माझं. पण तू खूप छान गातेस." तू पुन्हा खळखळून हसलीस. म्हणालीस, "हम्... ऐकं हं. पुन्हा म्हणते."
आणि मग तू गायला सुरुवात केलीस. ती सारी सकाळ काही वेगळीच झाली. इतकी सुंदर, स्वच्छ, नितळ झाली ती सकाळ! तू, तुझं गाणं जणु, माझ्या साऱ्या आयुष्याची ती पायवाटच झाली!
जगातलं काय सुंदर, जगातलं काय निर्वाज. एखादा आवाज किती खरा अन स्निग्ध असू शकतो. एखादा सूर किती सच्चा असू शकतो. एखादा चेहरा किती सुंदर असू शकतो, किती आरसपानी असू शकतो. एखादं काव्य तुम्हाला किती भरभरून देऊ शकते. एखादी व्यक्ती किती सहजपणाने तुम्हाला सांभाळून घेऊ शकते याचं उदाहरणच घालून दिलस तू त्या दिवशी. आणि मग माझ्या आयुष्यातली ती सकाळ आयुष्यभर माझ्या संगतीत राहिली, अगदी तुझ्यासह!
राधे...
---