Saturday, August 24, 2024

निळे पक्षी - विंदांच्या कवितेचे रसग्रहण

 निळेपणा हा मला आभाळाच्या अथांगतेशी, पाण्याच्या नितळ, शुचिर्भूततेशी, कृष्णाच्या प्रगल्भतेशी, अध्यात्माच्या सखोलतेशी निगडित वाटतो.


काही केल्या

काही केल्या

निळा पक्षी

जात नाही.


मग मला, निळा पक्षी हा वर म्हटल्या प्रमाणे अध्यात्माची आस असणं वाटलं. अध्यात्माची आस काही केल्या जात नाही.


प्रकाशाचे

पंख सान;

निळी चोच

निळी मान;

निळे डोळे

निळे गान;

निळी चाल

निळा ढंग;

त्याने चढे

आकाशाला

निळा रंग.


त्यासाठीची सगळी धडपड चालते (प्रकाशाचे सान पंख). मग सगळीकडे अध्यात्म शोधू पहाणे चालते.  पण ते इतकं गूढ आहे की कोणत्याच पट्टीत ते काही गवसत नाही. आपल्या छोटाश्या बुद्धीने अध्यात्म ( चोचीत चंद्र पकडणं) समजून घेण्याचा न जमणारी धडपड नुसती. अन तरीही ती आस काही सुटत नाही. अन सगळंच त्या आध्यात्म्याने व्यापून रहातं.



असली ही

जात न्यारी

बसे माझ्या

निंबावरी;

पृथ्वीमध्ये

पाळे खोल;

तरीसुद्धा

जाई तोल;

...अनंताचा

खड्डा खोल.


स्वत: मधला सर्वात शुद्धपणा, सर्वात उपयोगी पडणारा विवेक (निंब) त्याच्या डोक्यावर हे अध्यात्म चढून बसते. अन मग माझा सारा तोलच डगमगतो (पृथ्वीचा तोल)

अन मग पोटात खोल, तळ नसलेला खड्डा पडतो, विचार कर करून त्या अध्यात्माचा तळ सापडतच नाही. 

 

तर्काच्या या

गोफणीने

फेकितसे

काही जड;

आणि पाने

आघाताने

करतात

तडफड;

टिकाळीला

निळा पक्षी

जसा धड

तसा धड;

...उंच जागा

अवघड.


माझ्यातला तर्कनिष्ठपणा खूप प्रयत्न करतो.  विविध गृहितकं, चर्चा करून या अध्यात्माची कास सोडण्याचा निकराने प्रयत्न करतो. या धडपडीत काही अध्यात्माच्या आसपासचे विचार डगमगतात, पण तरीही सर्वात वरचा अध्यात्माचा विचार मात्र जसाच्या तसा अढळ रहातो, त्याचं अढळपद तसं अवघडच हलणं!



याचे गान

याचे गान

अमृताची

जणू सुई;

पांघरूण

घेतो जाड,

तरी टोचे;

झोप नाही

जागविते

मेलेल्याला;

जागृतांना

करी घाई.


जसं अमृत कधी संपत नाही अन त्याने संपण्याची शक्यताच संपते तद्वत या अध्यात्माचा विचार संपणं होऊच शकत नाही. अन एकदा हा विचार सुरु झाला की कितीही ठरवलं, कितीही प्रयत्न केले तरी त्याचा ससेमिरा सुटत नाही, संपत नाही. पूर्ण शांत झालेल्या विवेक- बुद्धीलाही हा विचार जागं करतो, शांत बसू देत नाही.


याचे गान

याचे गान

स्वरालाच

नुरे भान.

नाही तार

नाही मंद्र;

...चोचीमध्ये

धरी चंद्र.


एकदा का हा अध्यात्माचा विचार मनात फेर धरू लागला की सुटका नाही. कोणत्याही घटनेमागे, कोणत्याही विचारांतून शेवट अध्यात्माकडेच जाणं होतं. अन कितीही अवघड असला, अशक्यप्राप्य वाटला तरी ते अध्यात्म समजून घेण्याचा जिवापाड प्रयत्न करत रहाणं एव्हढच हाती उरतं.


काही केल्या

काही केल्या

निळा पक्षी

जात नाही.


तर अशी अध्यात्माची एकदा जाणीव झाली की ते अध्यात्म काही केल्या सुटू शकत नाही.


(- विंदांच्या कवितेचा मागोवा घेण्यासाठी धडपडणारी अवल😃)

No comments:

Post a Comment