मुलींनो हँग इन देअर.
चाळीशीच्या आयपास आयुष्याला एक संथपणा येतो. अनेक जबाबदाऱ्या बऱ्याचशा पूर्ण झालेल्या असतात. मुलं पुरेशी सुटी , रादर स्वावलंबी होतात. नवरा त्याच्या मध्यमवयीन गुंतवणुकीत अडकलेला असतो. अन तशात मेनॉपॉज आपली सलगी करू लागतो. एकीकडे शरीरातले हार्मोन्स वेगळा नाच करू लागतात अन दुसरीकडे मनातले न्युरॉन्स वेगळा नाच करू लागतात. या दोघांच्या तालात आपला ताल हरवू लागतो. कधी हा ताल कधी तो ताल मिळवता मिळवता आपला मूळचा तालच हरवू लागतो. एक प्रकारची अस्वस्थता येऊ लागते. त्यातून अत्यावश्यक कामं, जबाबदाऱ्या राहिलेल्या नसतात. मग आपलं मनाच्या तालावर नाचलेलं शरीरही थकतं अन शरीराच्या तालाशी जुळवून घेताना मनही जडशिळ होतं.
अन मग या सगळ्यातून एक निर्विकार निष्क्रियता आपल्या आसपास घोटाळू लागते. त्यातून आसपास मुलं नसली की बायकांचे जन्माचे निधानच हरवते. उणीपुरी २०- २२ वर्ष आपण मुलांच्या रुटीनशी बांधलेले असतो. त्यांच्या प्रायॉरिटीज शी आपला दिवस बांधलेला असतो. हे हळूहळू सुटत जाते. एकीकडे त्याचा अभिमानही असतो पण एकीकडे एक हळवेपणा घेरू लागतो. माझी जगाला असणारी गरज एकदम संपली का अशी अनामिक भावना आपल्याही नकळत मनात कुठेतरी उमटत रहाते.
आपल्या कामाच्या ठिकाणी आपली गरज जास्त होत असते तर तिथे छान वाटतं. पण जेव्हा मोकळेपणा येतो; मी टाईम मिळतो तेव्हा त्यातं काय करायचं हे कळत नाही. मी टाईम म्हणून ठरवलेल्या अनेक गोष्टी तितक्याशा आनंद देत नाहीत. मेंदुच्या भाषेत बोलायचं तर डोपामाईन पुरेसं मिळत नाही.
हे सगळं सगळं काही काळापुरतं असतं. पण तो काळ असा काही अंगावर येतो की आपला आत्मविश्वास हलू लागतो. अशा वेळी स्वत: वर विश्वास ठेवणं हा सर्वात मोठा उपाय असतो. त्या फेजची गरज म्हणून काही काळ जरूर हे मुरझून जाणं होऊ द्यावं. पण, पण ज्या क्षणी तुम्हाला हे घडते आहे हे जाणवेल; तेव्हा झटझटून जागे व्हा. ही फेज आहे. माझ्या शरीराची, मनाची गरज आहे, होती. ठिके. पण आता मला यातून बाहेर यायचय. माझ्यातल्या मला शोधायचय. ह्याची मनाशी खूणगाठ बांधा.
सर्वात महत्वाचं म्हणजे माणंसांत रहा. शक्य तर लहान मुलांच्यात रहा. संध्याकाळी मुलं असतील अशा ठिकाणी फिरा. एरवी संगीत, इतर कला उपयोगी पडतात मूड ठिक करायला. पण या स्टेजमधे मला त्याने अजून एकटं केलेलं. कला ही बरीचशी एकांडी असते. तर त्या ऐवजी सोशल व्हा, प्रत्यक्ष भेटा. हाहा हीही करा. नाटकं सिनेमे पहा. बागेत जा. मानाची गरज असते संवादाची, ती भागेल असं काही करा. शरीराची गरज असते न थकता व्यायाम होऊल - शरीराला झेपेल असा व्यायाम तोही सोबतीने करा.
हे मला उपयोगी पडलेले उपाय आहेत. तुम्ही इथून सुरुवात करा. एखाद वेळेस तुम्हाला वेगळे उपीय उपयोगी पडतील.
पण एक नक्की. या वयात संवाद - प्रत्यक्ष भेटी अन संवाद जादूसारखा उपयोगी पडतो.
इतका निबंध वाचून बोलावं भेटावं वाटलच तर या🤗घराची, मनाची दारं उघडी आहेत😃
No comments:
Post a Comment