सध्या SWAT सिरिज बघतेय. खरं तर टिपिकल कॉप सिरिज आहे. पण त्यात एक सटल पण अगदी महत्वाचा लेअर आहे. सिरिजच्या शेवटी तो जास्त प्रखरपणे पुढे येतोय. रेसिझम!
अफ्रो अमेरिकन मुलांचे बालपण, त्याचे टिनएज मधले जिवश्च कंठश्च मित्र, त्यांचे भावविश्व अन वास्तव यांतली दरी, त्यातून एखाद्या मुलाला मिळालेला चांगला मेंटॉर, त्याचं सारं आयुष्यच बदलून जातं. आधी मरिन अन मग पोलिस डिपार्टमेंट अन मग स्वाट. या सगळ्यात त्याचे एकीकडे टफ होत जाणे तर दुसरीकडे मानसिक प्रगल्भता अन हळवेपणा.
समाजातले दोन स्तर, सहकाऱ्यांमधले विविध जीवाला जीव देणारे दोस्त, कर्तृत्वाने मिळवलेले नेतृत्व, वेळोवेळी वरिष्ठांशी होणारे मतभेद अन सामंजस्यही, विविध गुन्हेगारी घटना अन त्यातून दिसणारे समाजाचे स्तर- कंगोरे- बारकावे- वाईटचांगल्या बाजू, माणूसपणाची हतबलताही अन मानवतेचा उच्चतर स्तरही,..... अनेक घटनांतून हे उलगडत जातं. त्या परिस्थितीतून त्या अफ्रो अमेरिकन व्यक्तीचा विविध स्तरांवरील संघर्ष, जीवनाचा पायाच हलेल असे प्रसंग, ज्यावर विश्वास ठेवला तेच डळमळीत होण्याची हतबलता अन त्यातून सगळं पणाला लागले तरी चालेल अशी फिनिक्सची उडाण!
या सगळ्यातून जाणवत रहातं की समाज ज्यांना ज्यांना नाकारत आला आहे, शेकडो - हजारो वर्ष त्यांचा नैतिकता पाळण्याचा संघर्ष किती अवघड आहे. सर्वसामान्य माणूस जे सहज म्हणून जगतो, तेच मिळवण्यासाठी काय अन कोणत्या पातळीवर जाऊन या लोकांना लढा- शब्दश: लढा द्यावा लागतो- स्वत:चा स्वत:शी, बुद्धीमनाशी, आप्तस्वकियांशी, समाजातील विरोधकांशी, राजकारण्यांशी, समाजधुरिणांशी, कायद्याशी, समाजमाध्यमांशी, ..... न संपणारी यादी...!
जमेल तर जरूर बघा. नेफि वर. नुसत्या समोर दिसणाऱ्या मारझोड कथानकाशी नाही तर आतून वाहणाऱ्या प्रवाहाशी - समाजाने सर्वसामान्य जीवन जगायलाही नाकारलेल्या या लोकांच्या जीवनप्रवाहाशी जोडून घेण्याचा प्रयत्न करत जरूर पहा.
No comments:
Post a Comment