Friday, April 15, 2022

परंपरा!

माझे आजोबा, शंकरराव चित्रे. आधी ते मुंबईत होते. नाव विसरले पण मोठ्या कंपनीत वरच्या पदावर. मुंबईत घरही होतं मोठं. पण मग वरिष्ठांशी तत्वावरून वाजलं तशी सगलं सोडून तडक नवसारीला आले. आजी सांगायची, सहा मुलं, त्यांच्या खाऊचा एक पितळी डबा अन पाण्याची सुरई इतकच घेऊ दिलं आजोबांनी अन नुसती दाराला कडी लावून मुंबई सोडली. परत फिरून बघितलंही नाही. आजीला फार वाईट वाटे, 12-15 एक वर्षाचा सगळा संसार, भांडीकुंडी, कपडेलत्ते सगळं टाकून यावं लागलं.

मग नवसारीला ब्रिटिश पोलिसदलात लागले. त्याची इतकी दहशत की त्या काळात सुरत इलाख्यातून एक सोडता सगळे दरेडोखोर बाहेर पडले.

एकटे घोड्यावरून रात्री अपरात्री गावातून, वेशीवरून थेट सुरतपर्यंत जाऊन येत.

एकच दरोडेखोर वाटमारी करे. एकदातर एकटे त्याच्या मागावर गेले, जंगलात त्याला पकडलं अन नवसारीत परतले.

आजी रात्र रात्र जागत बसे, तिचं वाचनवेड त्यामुळेच. हिंदी, मराठी, गुजराथी अनेक पुस्तकं वाचलेली तिने.

आजोबा फार तरुण वयात जिभेच्या कँन्सरला बळी पडले. शेवटच्या आजारपणात बडोद्याच्या दवाखान्यात होते, पण तिथली ट्रिटमेंट पटली नाही म्हणून निघून आले. फार लवकर गेले ते. माझी धाकटी आत्या तर जेमतेम 6 वर्षाची होती.

त्या नंतर काही काळ अतिशय हालाखीत दिवस काढले सगळ्यांनीच . बाबांची नऊ भावंडं, अन आजी.

मोठे काका, बाबा अन आत्या फार लवकर नोकरी करू लागले. मग थोडी परिस्थिती बरी झाली, किमान दोन वेळची भाजीभाकरी मिळू लागली.

आमच्या आजीने फार स्थित्यंतरं बघितली. नवसारीच्या जजची एकुलती एक मुलगी, मुलगे हेते चार पण लेक एकटी म्हणून अतिशय लाडात वाढलेली. नंतर हे सगळं आयुष्य. पण जिद्दीने जगली, अगदी पतवंडं ही बघितली. एक मात्र केलं तिनं, रहातं घर कधीच सेडलं नाही. 15 दिवस फारतर राही आमच्याकडे, परत नवसारी. खूप काटक, गोरी पान, सीकेपी सौंदर्य. अन आजोबा एकदम उंच, करारी, तेही गोरेपान.


पुढे मोठ्या काकांनीही ही परंपरा चालवली. आणंदला होते, एका खोट्या पेपरवर सही करायला नकार दिला अन तडकाफडकी नोकरी सोडलेली.


नंतर मीही नोकरी अशीच तत्वासाठी सोडली.

त्या वेळी .... विद्यापीठामधे वेगवेगळे प्रयोग सुरु होते संचालकांचे. त्यात त्यांना एक अडमिनिस्टेरशनचा माणूस मिळाला. त्याला आम्हा प्राध्यापकांच्या डोक्यावर बसवलं. तत्वत: अतिशय चुकीचा पायंडा पाडत होते ते. दरम्यान मला एक युनिट दिलं अन रिपोर्टिंग hod वा कुलगुरुंऐवजी या माणसाकडे करायला सांगितलं. मी स्वाभाविकच नकार दिला. 

दरम्यान घरच्या आघाडीवरही मला माझी गरज वाटत होती.

यातलं कोणतं एक कारण नाही तर दोन्ही कारणं तितकीच महत्वाची ठरली. मग मी एक वर्ष विदाऊट पे रजा घेतली.

परत वर्षानंतर जॉईन करताना सेम प्रश्न विचारला. सेम उत्तर. मग मी रजा एक्सटेंड करून मागितली. अमान्य झाली. मग तिथेच बसून रजिस्ट्रारकडून कागद घेऊन राजिनामा लिहिला, दिला. बात खतम

तर अशी परंपरा चालू आहे  ;)

No comments:

Post a Comment