Sunday, February 20, 2022

धर्म की भारतीय


मुळात कोणताही धर्म निर्माण होतो तोच मुळी त्या त्या समाजाला टिकवून ठेवण्यासाठी केलेले नियम म्हणून. पण हल्ली धर्माचा वापर समाजात दुफळी कशी निर्माण होईल या साठी केला जातोय.

राजकारण, समाजातील पद-सत्ता मिळवण्यासाठी धर्मांचा वापर केला जातोय.

एकीकडे हिंदुत्व, सावरकर यांचा दबदबा निर्माण करायचा; पण प्रत्यक्ष कृतीत मात्र हिंदु धर्माने सांगितलेली तत्व विसरायची (सर्वो सुखिनाम भवन्तु, हे विश्वची माझे घर, सर्व मानव एकमेकांचे बांधव)

सावरकारांचा उदो उदो करायचा पण त्यांचे विचार प्रत्यक्ष वाचायचेही कष्ट घ्यायचे नाहीत ( त्यांचे विज्ञाननिष्ठ निबंध). ही आजची परिस्थिती. इतिहास तर आपल्याला हवा तसा तोडून मरोडून वापरून घेण्यासाठीच आहे असा समज झाला आहे. आणि हे कोणा *एका धर्मा संदर्भात नाही, सगळ्याच धर्मांमधेत केलं जातय.* करणारे प्रामुख्याने राजकारणी अन डोळे न उघडता त्यांना शरण जाणारे सामान्य जन. 

अनेकदा हिंदु धर्म नष्ट होणार असा गवगवा केला जातो. किती धर्मांतरं झाली याचे दाखले दिले जातात. पण आजवरचा इतिहास असा की *कोणताही धर्म हजारो वर्ष नष्ट झालेला नाही.* देशातही धर्माची टक्केवारी फार बदललेली नाही. साधं एकदा 1960 ते 2011चे सेन्सस गुगल करून बघा. पण तितकेही कष्ट आपण घेत नाही. राजकारणी सांगतात अन आपण मान्य करतो. त्यांचा राजकारण हा व्यवसाय आहे, अन सत्ता मिळवण्यासाठी,  निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी धर्माच्या पत्त्याचा ते उपयोग करतात. 

प्रश्न हा आहे की आपण किती काळ डोळे झाकून सांगितलं त्या सगळ्यावर विश्वास ठेवणार? आज गुगल वर अनेक सरकारी माहिती सहज उपलब्ध असके, तिची सत्यताही पडताळता येते. या माहितीचा का बरं उपयोग करत नाही? एखादे भडकावू फॉरवर्ड आले तर एक मिनीट थांबा. इंटरनेटवर याची काही माहिती मिळते का पहा. ती जर खरी वाटली तरच ते फॉरवर्ड पुढे पाठवा.

पण आज आपण आलं फॉरवर्ड, धर्माचं आहे म्हणून पूर्ण न वाचताही फॉरवर्ड करतो. 

एक चुकीचा मेसेज हजारो लोकांचा गैरसमज करून देतो. अकारण समाज दुभंगत रहातो. असा दुभंगलेला समाज फक्त अन फक्त राजकारण्यांच्या फायद्याचा असतो. सामान्य माणूस यातून भरडला जातो. एखादा धार्मिक दंगा उफाळला तर त्याचा त्रास सगळ्यात जास्त कोणाला होतो? मला अन तुम्हालाच न?

मग जात धर्म यागोष्टी आपापल्या घराच्या उंबरठ्या आतच ठेवुयात की. आपोआप समाजात संघर्ष चिघळणार नाही. 

आपला उद्देश सर्वांनी मिळून शांतपणे, सुखाने, समाधानाने जीवन जगण्याचा आहे. भांडून तंडून, एकमेकांना इजा करुन, दुखवून आपण तरी सुखी होऊ का?

जरा थांबूयात, विचार करूयात?

कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही, वा कोणाही एका धर्माची बाजू घेण्याचाही हेतू नाही. एक लाऊड थिंकिंग म्हणा हवं तर. पण मनापासून वाटतय आज की धर्म, जात, रुढी परंपरा, हे सगळं आपल्यासाठी आहे तर ते सगळं आपल्या घराच्या आत, उंबरठ्या आत जपून ठेवू. बाहेर पडताना एक भारतीय म्हणून पडू अन एक भारतीय म्हणून वागू 🙏🏻🙏🏻🙏🏻

No comments:

Post a Comment