आज वळून बघताना जाणवतं; कितीतरी चांगली, मोठी, मेहनती, समृद्ध माणसं माझ्या आयुष्यात लाभली.
खुप काही उत्तम असं जीवन नव्हतं माझं. साधंच, निम्नमध्यम वर्गातलं कुटुंब, साधीच शाळा, साध्याच मैत्रिणी. मीपण काही फार वेगळी नव्हते. निम्नस्तरीय हुषारी, फार अभ्यास न करणारी, ना सुंदर, ना नाजूक, ना फार संस्कारी, ना कोणती स्तोत्र कानी पडली,ना कोणते श्लोक. उत्तम म्हणावी अशी पुस्तकंही वाचली नव्हती फार.अगदी सामान्य आयुष्य, साधं, सरळ.
पण तरीही काही काही क्षणांनी उजळवलं! प्रकाश दिला .उर्जा दिली. माझं नशीब बरं की ते ते माझ्यापर्यंत पोहोचलं, आत झिरपलं. या सगळ्याबद्दल कृतज्ञता आहे. आपलं सामान्यत्व माहिती होतं कधीपासून. पण त्याची खंत किंवा न्युनत्व नाही वाटलं कधीच. ती एक जाणीव होती फक्त, स्पष्ट, ठळक. अगदी घरातही आपण सर्वात लहान, सर्वार्थानेच हे माहिती होतं, मान्य ही होतं. त्याचं थोडं वाईट वाटायचं अन मग त्यातून थोडी बंडखोरीपण आली. अन मग मी अजूनच खुजी झाले. आज कळतय ते एक नैराश्य होतं, न समजलेलं-कोणालाच. अगदी आठवतय दहावीत असताना आत्महत्येवर एक कविताही केलेली. आपली मजल फक्त शब्दांपुरतीच हेही जाणवून विफल वाटलेलं. जवळच्या कोणाला हे कळलच नाही कारण बंडखोरी केली की विफलता लपवता येते हे अंगवळणीच पडलेलं.
दोष कोणालाच नाही; असलाच तर तो परिस्थितीचा, माझाही नाही अन आसपास कोणाचा तर नाहीच नाही. तेही बिचारे आपापली लढाई लढतच होते की!
या काळातही एखाद दुसरे क्षण आले, ज्यांमुळे तग धरून राहिले. म्हणजे दुसरा काही पर्याय नव्हताच पण तरी तग धरायला हाताशी छोटे छोटे तण हाती लागले. कधी वर्गातली सर्वात हुषार, सुंदर, कौटुंबिकदृष्ट्या संपन्न मुलगी मला बेस्टफ्रेंड म्हणते हा धागा असेल.
कधी उत्तम चित्रकार काकाचे चित्र पाटीवर तसेच काढता आले हे मनात आतून उमगले हा धागा असेल.
खेळात का होईना पण आपण जिंकू शकतो हा धागा असेल.
पण पहिला सकारात्मक, सशक्त, माझ्यात आत्मविश्वास निर्माण करणारा क्षण आला तो कॉलेजमधे. माझा ट्युटोरिअल पेपर सर्वात उत्तम आहे हे सरांनी भर वर्गात सांगितलं तो क्षण! मी पण कुणीतरी आहे, माझ्यात काहीतरी बरं आहे हे सांगणारा क्षण! आज इतक्या वर्षांनंतरही लख्ख आठवतो. तोपर्यंत असं स्वच्छ, स्पष्ट कौतुक कधीच झालं नव्हतं. मुळात मी काही बरं करू शकते हा विश्वास मलाच नव्हता, कधीच. एका अर्थाने मी चकित झाले होते. हे माझ्यासाठी? कौतुक अन माझं?मला वाटतं माझ्या आयुष्याचा तो एक टर्निंग पॉईंट होता. त्यानंतरही कित्येकदा हे कौतुक, ही मनाची उभारी सरांकडून मिळत राहिली. आजही त्या सरांना मी मानते, आणि आनंदाची अन अभिमानाची आणि समाधानाचीही गोष्ट ही की आजही त्यांच्याशी संवाद आहे; मैत्र आहे. नंतरच्या आयुष्यातील अनेक घटनांनंतरही, मी अपेक्षेप्रमाणे खुपदा कमी पडूनही; त्यांचा माझ्यावर विश्वास, माझ्याबद्दल आपुलकी टिकून आहे. अर्थात हा त्यांचा मोठेपणा। आजवर अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी असेच घडवलेय. पण असं निर्मळ, विश्वास जागवणारं, प्रेमळ आणि सकारात्मक समृद्ध व्यक्तिमत्व माझ्या आयुष्यात एक उजळता कोपरा निर्माण करणारं लाभलं! त्यांच्याबद्दल मनात नेहमीच आदर, आपुलकी, कृतज्ञता राहिल __/\__
---
No comments:
Post a Comment