Wednesday, September 16, 2015

तेचबुक स्टेटस : कृष्ण

स्टेटस अपडेट

कृष्ण : आज धम्माल नुसती Lol दहा मटकी फोडली. लोणी, दही, दूधाचा पूर नुसता. सगळ्या गँगने मनसोक्त हाणलं दही, लोणी. त्यात संध्याकाळी राधेची पाण्याची घागरही फोडली Proud रंगपंचमी नसतानाही साजरी केली. कसली भडकलेली राधा. नेमकी नव्वीकोरी साडी नेसलेली, अनयने दिलेली. त्या अनयचा तर चेहरा पार पडला ;)

लाईक्स : सुदामा आणि गँग, इतर टवाळ पोरं
डिसलाईक्स : राधा, अनय, गोकुलातल्या मोठ्या बायका ज्यांचे लोणी-दही कृष्णाने पळवले, पेंद्या

पेंद्या : काय र द्येवा, मला नेलं नाय राव तुमी. म्या पायानं असा, तुमच्या बिगर मला कसं मिळल लोनी-दही. हे चांगलं केलं नाय बगा देवा तुम्ही :(

रिप्लाय सुदामा :आर् तिच्या तू कुठं सुमडीत जाऊन बसलेला रे? देवान् सगळ्यांना आवतण दिलेलं नव्हं का? एकतर विसरतो, वर देवाला दोष देतो काय रे? हाणा याला चला
लाईक्स :सगळे गोप अन कृष्ण
डिसलाईक : राधा, यशोदा, नंद

रिप्लाय राधा : ए नका रे मारू बिचाऱ्याला. आधीच बिचारा परिस्थितीने नाडलाय वर अजून त्रास नका देऊत त्याला
लाईक : यशोदा, नंद
डिसलाईक : पेंद्या

रिप्लाय कृष्ण : :फिदीफिदी: राधे लई पुळका ना तुला त्याचा? घे त्यानेच डिलाईक केलय

रिप्लाय पेंद्या : राधे, सॉरी बरं का. काय हाय आताच देवाने एक मडकं भरून लोनी दिलं हाय ना, जागाया नक्को Lol
लाईक : कृष्ण आणि गँग
डिसलाईक : राधा, अनय

यशोदा : कृष्णा का रे असा वागतोस? घरी काय कमी पडलं रे तुला? :( का असं मान खाली घालायला लावतोस जगासमोर. आई म्हणून कुठे कमी पडले रे मी? नंदबाबा तर सगळं देतात तुला. अरे त्यांच्या स्टेटसचा तरी विचार कर. असं बरं दिसतं का रे ? जन हो मी सर्वांची मनापासून माफी मागते . ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले त्यांनी वाड्यावर येऊन हवे तेव्हढे दूध घेऊन जा बरे

लाईक्स : सगळ्या गोकुळवासिनी, कृष्ण आणि गँग
डिसलाईक :नंद

रिप्लाय एक गोकुळवासिनी : यशोदे किती ग तू प्रेमळ. अन कसा हा खट्याळ कान्हा. उद्या पहाटे येते ग मी दूध न्यायला. एरवी नसतं म्हटलं. पण नेमके पाहुणे यायचेत, घरात लोणी दही हवच ना ग
लाईक्स : गोकुळवासिनी, यशोदा, कृष्ण आणि गँग

रिप्लाय कृष्ण : माई कित्ती ग तू चांगली आहेस. आमच्या उद्याची कित्ती काळजी तुला
लाईक्स : सारी कृष्ण गँग

रिप्लाय पेंद्या : मला न्या रे या वेळेस तरी Lol

नंद : बलरामा, आहेस कुठे. आखाड्यातून बाहेर ये जरा. राज्याचा भावी नेता तू. जरा लक्ष दे. नाही तर हा कृष्ण सारे बळकावेल. शिवाय लोकांचा तुझ्या ताकदीवरचा विश्वास उडेल बरं. कृष्णा मला हे अजिबात आवडलेलं नाही. ताबडतोब सगळ्यांची नुकसान भरपाई तुझ्या पॉकेटमनीतून कर. यशोदा असं पाठीशी घालू नकोस सारखं त्याला.
लाईक्स : बलराम
डिसलाईक : यशोदा

बलराम :आता माईने सांगितले केव्हा कळले सारे. हो नंदबाबा आपली आज्ञा शिरसावंद्य. आजपासून गोकुळात संचारबंदीच करून टाकतो कृष्णाची

कृष्ण : दादा , दादा. अरे दोन चार मडकी लोणी ते काय रे....अन तू मला संचारबंदी करतोस? कुठे गेले तुझे प्रेम? अरे मी तुझा लाडका भाऊ ना रे. तुझा छोटा भाऊ. असं केलस तर मी कुणाकडे पहावं? दादा, प्लिज रे. तुझ्या शिवाय कोण मला समजून घेईल?

लाईक्स बलराम, कृष्णगँग, यशोदा

रिप्लाय बलराम : :) हो रे कृष्णा खरय तुझं. नंदबाबा जाऊ दे एकदा माफ करून टाका
लाईक्स कृष्ण आणि गँग, यशोदा, राधा

अनय : हे काही बरोबर नाही बलरामा. अरे राधेला तर किती त्रास झाला माहिती आहे?

राधा :जाऊ दे रे अनय. त्याला कळलीय ना चूक त्याची. सोडून दे.

अनय :अरे कुठे म्हणतोय तो तसं?

राधा: मला कळतं रे त्याच्या मनातलं. चल माफ करून टाक त्याला तूही. बरं कृष्णा आज येतोयस ना यमुनेवर उद्या संध्याकाळी?

लाईक : बलराम, यशोदा, नंद, सर्व गोकुळवासिनी, कृष्ण गँग आणि कृष्ण
डिसलाईक : अनय

रिप्लाय अनय : छे हे तर नेहमीसारखच झालं... :(

कृष्ण : धन्यवाद सर्वांना. आजचा दिवस खरच खूप धामधूमीचा गेला. प्रत्यक्षातही अन इथे तेचबुकावरही. चला मग हा दिवस एक सण म्हणूनच जाहीर करून टाकतो. आजच्या दिवसाला आपण दहीहंडी असे नाव देऊन टाकूत. काय म्हणता चेकबुक वासी... आपलं गोकुळवासी.
सखे उद्या भेटूच यमुनेवर :)

लाईक्स : कृष्ण गँग , राधा, यशोदा, नंद, सर्व गोकुळवासिनी, सर्व गोकुळवासी, (अन शेवटी नाईलाजास्तव) अनय

No comments:

Post a Comment