Sunday, January 8, 2012

काळालाही गुंगवणारा कलाकार

आताच 'स्वर झंकार' ऐकूम येतेय. अजून गुंगी उतरायचीय अन तरीही लिहितेय...

आताच एका महान कलाकाराला ऐकून येतेय. हरिप्रसाद चौरासिया नावाचे बासरीचे गारुड ! ९.४० ला आधीचा राग संपवून दुसरा सुरू करताना ते म्हणाले की "१० वाजता थांबायचं आहे , हे मला माहिती आहे." अन क्षण भर थांबून म्हणाले, "पण मी नाही थांबणार !" नर्म हास्याचा फवारा उठला. अन 'दुर्गा'चे सूर उमटले.

अवर्णनीयाचे कसे वर्णन करू ? मध्यात त्यांनी एक सुरावट वाजवली ... अहाहा... जणू कृष्णाच्या मुरलीतूनच उतरली होती....

बासरी हातात धरायच्या आधी अन नंतरही मध्येच बासरीवरचा हात खाली घेतला की थरथरत होता ! पण बासरीवर आल्यावर छे, नाव नको ! वय वर्ष ७३ पण बासरीतून उमटणारी प्रत्येक तान काय वर्णू ?
सोबत होते विजय घाटे. हरीजींचा मोठे पणा किती ? तबल्याला मध्ये मध्ये संधी देताना स्वतः वाजवत होते, अगदी साथीला त्यांचे शिष्य असूनही,!

त्या दोघांच्या जुगलबंदीने बहार केली. पण शेवटी विजयजींनी हार मानली दोन स्वरांना हे कसे काढू तबल्यातून म्हणून

दुर्गा कित्ती वेळ कानात, मनात बरसत राहिला असा ! अन शेवटची धून पावन पावन करून गेली सगळ्यांनाच ! सहज घड्याळाकडे लक्ष गेलं... हं अकरा नाही नाही ....पण छे, हे कसं शक्य होतं ? घड्याळात चक्क फक्त दहा वाजले होते ! डॉट दहा ! केवळ २० मिनिटात एक दिग्गज कलाकार काय करू शकतो !

हो, हो; त्यांनी नक्कीच काळाला थांबवले होते ! हो नक्कीच !

No comments:

Post a Comment