Saturday, May 26, 2012

एक नवीन सुरेल सुरुवात ...

शास्त्रीय संगीताची आवड खुप लहानपणीच मनाच्या खोल कप्प्यात जपली गेली होती. घरात बाबा आणि बाबांकडच्या सगळ्यांना शास्त्रीय संगीत खुप आवडायचे, माझी  एक आत्या गायचीपण. आईलाही संगीताची खुप आवड. बाबा, आई हार्मोनियम वाजवत. मी मात्र लहानपणापासून खेळ, दंगा, मस्ती यात खुष असायची. घरात मी शेंडेफळ. त्यामुळे शास्त्रीय संगीत हे काही आपल्या ’ बस की बात ’ नाही हा समज लहानपणापासून मनात बसून गेला होता.
पुढे शिक्षणात मला इतिहासाची गोडी लागली. एम. ए. एम. फ़िल करतानाच टिळक महाराष्ट्र विद्यापीठात लेक्चरचची नोकरी लागली. अन मग पुढची १५ वर्षे प्राध्यपकी करण्यात गेली. तिथे वेळोवेळी २००-२०० विद्यार्थ्यांसमोर; कधीकधी माईक शिवाय; ४-४, ६-६ तास लेक्चर्स द्यावी लागत. प्रचंड प्रवास करावा लागे अन धूळ, खडूची पावडर हे तर सख्खे सोबती होते तेव्हा. या १५ वर्षात शास्त्रीय संगीतापासून मी कोसो दूर गेले.
१९९५ च्या सुमारास माझ्या या लहानपणीच्या आवडीने पुन्हा डोके वर काढले. निमित्त होते, मा. श्री मुकुंदराज गोडबोले आणि मा. श्री. रविंद्र आपटे या दोघांच्या ओळखीचे. गोडबोले काका शास्त्रीय संगीतातले सुरेल गायक अन आपटे काका एक संगीततज्ञ रसिक ! या दोघांमुळे  ’श्री स्वर मंडळ’ या संगीत सभेत काम करण्याची संधी मला लाभली. शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम ठरवणे, त्यांचे आयोजन, प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळची कामे, सूत्रसंचलन अशी अनेक कामे करायची संधी त्या वेळेस मला मिळाली. अन महत्वाचे म्हणजे शास्त्रीय संगीत प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मला मिळाली.
तेव्हापासून माझी शास्त्रीय संगीत ऐकण्याची आवड खरी सुरू झाली. मग माझा लेक, निखिल शास्त्रीय संगीत शिकू लागला. गायन आणि संवादिनी या दोन्हीच्या तीन तीन परीक्षांपर्यंत त्याने मजल मारली. मुख्यत्वे त्याचा कान तयार झाला. त्याचा हा अभ्यास मलाही खुप काही देऊन गेला. त्या नंतर अनेक मैफली, सीडीऐकणे; शास्त्रीय संगीतावरचे वाचन यांतून थोडीफार  माहिती मला मिळाली. पण म्हणतात ना माहिती अन ज्ञान, थिअरी आणि प्रॅक्टिकल यात महद्‌ अंतर असते. शास्त्रीय संगीतापासून मी कोसो दूर होते...
मध्यंतरी नोकरी सोडल्यानंतर मी माझ्या कलांसाठी वेळ देऊ शकले. लेखन - प्रामुख्याने कविता, चित्रकला, विणकाम, भरतकाम, मूर्तीकला, फोटोग्राफी, अ‍ॅनिमेशन अशा अनेक कलांमध्ये मी गुंगले. पण शास्त्रीय संगीताची आवड मात्र मनातच राहिली.
अन मागच्या वर्षी मे महिन्यात सवाई गंधर्व महाविद्यालयाची जाहिरात माझ्या वाचनात आली. अन कशी कोणजाणे पण माझ्या मनातली सुप्त इच्छा टुणकन उडी मारून बाहेर आली. धाडस करून महाविध्यालयात फोन केला, अन विचार बदलायच्या आत प्रवेश घेऊन टाकला.
पहिले पाऊल तर उचलले, पण पुढे काय ? प्रचंड भिती होती मनात. अनेक वर्षांची दडस होती. वयाची पन्नाशी, प्राध्यापकीच्या पेशामुळे अति वापरलेला गळा या सगळ्या गोष्टी घेऊन सवाई गंधर्व महाविद्यालयात प्रवेश केलापण पहिल्याच भेटीत सौ. गितांजली पुराणिक मॅडमनी आपलसं केलं. मनातली भीती, दडपण, शंका सगळ्या पळून गेल्या. त्यांच्या अतिशय प्रेमळ, आश्वासक, हस-या व्यक्तिमत्वाने एक वेगळाच उत्साह, आत्नविश्वास मिळाला. अन प्रत्येक सेशनबरोबर तो वाढतच गेला.




पुराणिक मॅडम तुमचे किती आभार मानू ? शास्त्रीय संगीतासारखा अनमोल खजिना, आयुष्यभर देणारा आनंद आज तुमच्यामुळे मला खुला झालाय. मनापासून धन्यवाद ! आमच्या या प्रवासात तुम्ही अगदी प्रत्येक पावलावर हात देऊन आधार दिलात, दिशा दाखवलीत. कोणतीही कला, त्यातून शास्त्रीय संगीत शिकवणे हे फार फार अवघड. पण तुम्ही ते किती प्रेमाने, कित्ती आनंददायक करून शिकवलत. खरच मनापासून धन्यवाद !

सवाई गंधर्व महाविद्यालयात यायचं ठरवल्यापासून एका व्यक्तीची मला प्रचंड भीती वाटत होती. त्यांचा शास्त्रीय संगीताचा अभ्यास, त्यांचा अनुभव, त्यांचे गायन या सर्वांचे माझ्यावर खुप दडपण होते. मा. डॉ. राजेन्द कंदलगावकर !


पण प्रत्य्क्षात त्यांना भेटले, तेव्हा लक्षात आले; अतिशय ॠजु, अत्यंत प्रेमळ, शांत स्वभावाचे सर कितीतरी हेल्पिंग आहेत. एकदा तर मी आणि निकिता ( वय वर्ष १२) दोघीच क्लासमध्ये होतो. अन त्या दिवशी सर आम्हाला मार्गदर्शन करायला आले.  शास्त्रीय संगीतातल्या बालवाडीतल्या आम्हा दोघींना शिकवायला सर आले हेच कित्ती भाग्याचे ! अन सरांनी दिड - दोन तास इतक्या गोष्टी सांगितल्या, शिकवल्या, आमच्या अगदी छोट्या छोट्या शंकांचे निरसन केले, खरोखरीच आम्ही भाग्यवानच ! धन्यवाद सर !
इतकच नाही तर आमच्या सारख्या नवोदित-नवशिक्या गायकांना स्टेज कॉन्फिडन्स यावा म्हणून त्यांनी आवर्जून एक कार्यकम आयोजित केला. आमचे गायन त्यांनी ऐकले, कौतुक केले. आजच्या व्यावसायिक जगातही एखाद्या गुरुकुलासारखे वातावरण त्यांनी सवाई गंधर्व महाविद्यालयात निर्माण केलेय. अशा या गुरुकुलातील या ॠषितुल्य गुरुंना माझा मनापासून नमस्कार !
आम्हाला वेळोवेळी येणारे तबलजी श्री. चासकर यांचेही मनापासून आभार. प्रात्यक्षिकाच्या परीक्षेला त्यांचाही खुप आधार वाटला.
आम्हा मुलींना सौ. गितांजली पुराणिक मॅडम शिकवत, तर मुलांना श्री. हर्षद डोंगरे सर शिकवत. ते जरी आम्हाला शिकवत नसले तरी त्यांनीही नेहमीच हसतमुखाने आम्हाला मानसिक आधार दिला, धन्यवाद सर !


कार्यालयातील सौ. सोनल कुलकर्णी मॅदमनेही नेहमी हसतमुखाने आम्हाला मदत केली. धन्यवाद मॅडम !
या शिकण्यात मजा आली ती माझ्या नव्या मित्रमैत्रिणींमुळे. त्यांच्या सहवासात खुप उत्साही वाटलं. ते हे सर्व माझे सहप्रवासी :
आणि सर्वात महत्वाचे आभार मानायचे ते सवाई गंधर्व महाविद्यालयाचे, आर्य प्रसारक मंडळाचे ! हा कोर्स सुरू करून सामान्य लोकांना शास्त्रीय संगीताकडे जाण्याचा एक खुप छान, चांगला मार्ग त्यांनी उपलब्ध करून दिलय. मनापासून धन्यावाद !


कालच या प्रशस्तिपत्रकाच्या प्रदानाचा कार्यक्रम झाला. प्रसिद्ध सतारवादक मा. उस्तान खॉं यांच्या हस्ते आम्हाला प्रशस्तिपत्रकं देण्यात आली. मी, सौ. वीणा देशपांडे आणि दिप खालसा आम्हा तिघींना प्रथम क्रमांक विभागून मिळाला. त्या वेळचे हे फोटो !


2 comments:

  1. आम्हाला कधी ऐकवणार तुझं गाणं?

    ReplyDelete
  2. आत्ताशी सुरुवात आहे प्रमोदजी. अभी दिल्ली बहोत दूर है । :)
    धन्यवाद !

    ReplyDelete