उधळून तुझ्यासाठी
अंगावरचा हिरवा शालू
रंगवून टाकला
पिवळा, गुलाबी, केशरी,
अगदी भगवा न
मखमली तपकिरीही
अन मग थंडीने
कुडुडणाऱ्या तुझी
नजरही वर उठेना
थंडीचा कडाका उठला
तशी तुझ्या पापण्या
जडावल्या, झुकल्या.
फक्ता तुझ्यासाठी
पानगळही स्विकारली
तुझ्या पायासाठी
लालगुलाबी पानांचा
गालिचा पसरला
माझा गहिवर
उतरवून खाली टाकला
पानगळीचा सडा
आता चाल त्यावरून
पण जपून
थोड्याच दिवसात
अवघड होणारे तुला
साधं बाहेर पडणंही
मग घरातच रंगव
स्वप्न तुझी रंगीबेरंगी
तोवर मी आत,
आत गोठवून घेतो
माझ्यातलं सत्व
खोल तळाशी
अन खोडांच्या खरखरीत
फटिफटींतून
अंगाखांद्यावर बर्फाची
चादर लपेटून घेत
मी इथेच थांबेन
शिशीर संपण्याची
वाट बघत
उरातला हिरवेपणा
जपून ठेवत
थांबेन तुझ्यासाठी
फक्त तुझ्यात साठी!
No comments:
Post a Comment