Friday, May 7, 2010

मानवी समाजात श्रद्धेचे स्थान !



आजकालच्या धकाधकीच्या जीवनात मानवाची मन:शांती हळूहळू हरवताना दिसते आहे. जीवन जगताना कराव्या लागणा-या अनंत कसरतींमुळे आणि आसपासच्या अशांत, असुरक्षित परिस्थितीमुळे आपले मानसिक स्वास्थ्य कमी होते आहे. अशा वेळेस मनःशांती साठी माणूस स्वतःला कोठेतरी गुंतवण्याचा प्रयत्न करतो.मग कधी एखाद्या व्यक्तीवर, कधी एखाद्या तत्वावर, कधी एखाद्याधर्मावर, कधी एखाद्या स्थानावर, आपले मन एकाग्र करण्याचा प्रयत्न व्यक्ती करते. आणि व्यक्तीपरत्वे हे श्रद्धास्थान वेगवेगळे असते. मनातली अशांतता, अस्थिरता, असुरक्षितता दूर करण्यासाठी ही श्रद्धास्थाने व्यक्ती जवळ करत असते.
अशी श्रद्धा व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनात अनेकदा उपयुक्त ठरते. किंबहुना ती उपयुक्त ठरते म्हणूनच ( किंवा त्या श्रद्धास्थानाची क्षमता, बळ याची खात्री पटल्यामुळे ) ही श्रद्धा निर्माण होत असते. व्यक्तिगत पातळीवर, मानसिक स्थैर्य निर्माण होण्यासाठी जोपर्यंत ही श्रद्धा स्विकारली जाते किंवा मर्यादित केली जाते तोपर्यंत ही श्रद्धा निश्चितच उपयुक्त ठरते. आणि या श्रद्धेचा उपयोग-निरुपयोग-दुरुपयोग त्या व्यक्तीपुरता मर्यादित असल्याने अशा श्रद्धेविरुद्ध ओरड करण्याचा कोणालाही अधिकार असत नाही. मग ही श्रद्धा देवाच्या अस्तित्वाबाबत असेल, विशिष्ट नियमांनी बद्ध अशा धर्माशी असेल वा एखद्या तत्वज्ञानावर असेल ; अशी श्रद्धा जोपर्यंत त्या व्यक्तीपर्यंत मर्यादित असेते तोपर्यंत तिची साधक-बाधकता त्या व्यक्तिपुरतीच असल्याने इतरांना या श्रद्धेबाबत बोलण्याचा अधिकार असत नाही.
सध्या समाजामध्ये श्रद्धा, धर्म, देव, तत्वांचे अंधानुकरण याबाबत मोठी चर्चा होताना दिसते आहे. देव आहे किंवा नाही, विशिष्ट धर्म कर्मठ, एखाद्या साधू महात्म्याचे श्रेष्ठत्व, बुवाबाजी, समाजवाद, साम्यवाद, आस्तिकता, नास्तिकता, धर्मनिरपेक्षता या आणि अशा अनेक वादविवादांमध्ये आजचा समाज हेलकावे खात आहे. वरीलपैकी कोणतीही गोष्ट व्यक्तीच्या स्वःताच्या मन - बुद्धी पर्यंत मर्यादित ठेवली जाते, तोपर्यंत वाद-विवाद, संघर्ष होत नाहीत. परंतु याबाबतची आपली मते - विचार व्यक्ती जेव्हा समाजात मांडू लागते तेव्हा वादविवाद, संघर्ष निर्माण होतात.
उदाहरणार्थ; मी समजा हिंदू धर्म, तत्वज्ञान मानते. माझी हिंदू धर्म, तत्वज्ञानावर श्रद्धा आहे. जोपर्यंत या हिंदू धर्म, तत्वज्ञानाची तत्वे, नियम मी माझ्यापुरती स्विकारत असते; तोपर्यंत वाद होत नाहीत. मी माझ्या घरात विठ्ठलाची पूजा केली, त्याची आरती म्हटली, त्याचे नामस्मरण केले तर या सर्व गोष्टींना मला कोणी आडकाठी करत नाही. परंतु जर ही माझी श्रद्धा मी समाजात राबवू लागले तर काय होईल ? पंढरपूरच्या देवळात जाऊन त्याची पूजा मीच करणार असा आग्रह मी धरला तर? किंवा मी म्हणते तीच आरती म्हणावयाची असा फतवा मी काढला तर ? अर्थातच यातून संघर्ष उभे राहतील. म्हणजेच एका व्यक्तीची श्रद्धा समाजावर लादली गेली तर त्यातून सामाजिक प्रश्ण निर्माण होतील.
मुळात श्रद्धा म्हणजे काय ? श्रद्धा म्हणजे एक मानसिक भावना होय.
* " शास्त्राचार्योपदिष्टे S र्थे S ननिभीते प्येवमेवैतदिति विश्वासः " - सर्व लक्षण संग्रह. म्हणजे " शास्त्र आणि आचार्य यांनी उपदेशिलेल्या गोष्टींबाबत स्वतःला अनुभव नसला तरी ' हे असेच आहे' असा जो विश्वास धरला जातो , त्याला श्रद्धा असे नाव आहे. "
* " अद्दष्टार्थेषु कर्मसु अस्तिक्याबुद्धिर्देवतादिषु च "- शंकराचार्य. म्हणजे " देवता आणि पारलौकिक व न दिसणा-या गोष्टींविषयी अस्तिकपणा म्हणजे श्रद्धा होय. "
एकूणात एखाद्या गोष्टीचा स्वतःला प्रत्यक्ष अनुभव नसताना व स्वतः विचार न करता केवळ शास्त्र वा आचार्य सांगतात म्हणून एखादी गोष्ट जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा ती श्रद्धा असते.
मांडणीसाठी सोईचे म्हणून अशा श्रद्धांची तीन प्रकारांत विभागणी करता येईल.
१. केवळ आचारांबाबतची श्रद्धा. यामध्ये रुढी - परंपरातून येणा-या कृती, संस्कारातून येणा-या कृती, अनुकरणातून येणा-या कृती यांबाबतच्या श्रद्धांचा समावेश करू.
या प्रकारच्या श्रद्धांचा समाजाला फारसा धोका नसतो. वयोवृद्धांना नमस्कार करणे, विशिष्ट दिशेला तोंड करून पुजा करणे, विशिष्ट पद्धतीचा पोषाख करणे, या आणि अशा श्रद्धांमुळे समाजामध्ये फारसा वाद उदभवत नाही. आणि या श्रद्धा काळ आणि परिस्थितीनुरुप बदलताना दिसतात; त्यांना ताठर स्वरुप येत नाही. स्वाभाविकच त्या कर्मठ श्रद्धा बनत नाहीत अन समाजात विरोधी वातावरण तयार होत नाही.
२. व्यक्ती वा स्थळावरील श्रद्धा यात दैवीगुणसंपन्न व्यक्ती, धार्मिक नेते, राजकीय नेते, सामाजिक नेते, सांस्कृतिक नेते, वैचारिक नेते यांवरील श्रद्धांचा समावेश करता येइल.
या प्रकारच्या श्रद्धा या दोन स्तरांवर घातक ठरू शकतात. एक व्यक्तिगत पातळीवर आणि सामाजिक पातळीवर. एखाद्या व्यक्तीवर आपण श्रद्धा ठेवतो तेव्हा, त्या व्यक्तीच्या सर्वच गोष्टी आपण हळूहळू श्रद्धास्थानी ठेवत जातो. मग त्या व्यक्तीचे चालणे , बोलणे, कृती सर्वांवर आपण श्रद्धा ठेवत जातो. एका अर्थाने आपल्या व्यक्तिमत्वावर त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा पगडा वाढत जातो. उदा. त्या व्यक्तीच्या विचारांवर आपण श्रद्धा ठेवतो तेव्हा, त्याचा सर्व विचार आपण स्वीकारतो, तोही आपण विचार न करता. अशा वेळेस आपण आपला विवेक, बुद्धिनिष्ठा मारतो. केवळ ती व्यक्ती म्हणते म्हणून आपण आपला सारासार विवेकही बाजूला ठेवतो.
विषबाधा झाली तरी मांत्रिकावरील श्रद्धेतून मुलाला वैद्यकीय उपचारासाठी न नेणे, एखाद्या देवळावरच्या श्रद्धेतून अभ्यासासाठी वेळ न देता त्या देवळाच्या लांबच लांब रांगेत तिष्ठत उभे राहणे. अशा व्यक्ती / स्थळावरील श्रद्धा कधी कधी समाज स्वास्थ्य धोक्यात घालतात. उदा. शंकराच्या श्रद्धेतून वैष्णवांचा छळ होणे वा विष्णूच्या श्रद्धेतून शैवांचा छळ होणे, अल्लाच्या श्रद्धेतून मंदिरे पाडणे वा रामावरील श्रद्धेतून मशीदी पाडणे, हिटलरच्या श्रद्धेतून ज्यूंचा छळ करणे, मार्क्सच्या श्रद्धेतून कामगारांची हूकूमशाही प्रत्यक्षात आणणे, इत्यादी. ( उदाहरणे फक्त उदाहरणे आहेत, कोणतीही मुल्यात्मक टीपणी वा चूक-बरोबर असा मुद्दा अभिप्रेत नाही.)
. विचारांबाबतची श्रद्धा. यामध्ये धर्माबाबतचे विचार, समाज जीवनाबाबतचे विचार, ज्ञान पद्धतीबाबतचे विचार या सर्व विचारांबाबतच्या श्रद्धांचा समावेश करता येईल.
ही तिस-या प्रकारची श्रद्धा अतिशय संवेदनक्षम ठरते. मुळात श्रद्धा ही तर्कशुद्ध बुद्धिनिष्टेपासून लांब असते. असे असताना एखाद्या विचारावर जेव्हा श्रद्धा ठेवली जाते तेव्हा ती अतिशय गंभीर बाब बनू शकते. ही श्रद्धा जोपर्यंत व्यक्तिगत पातळीवर मर्यादित ठेवली जाते तोपर्यंत फारसा प्रश्ण येत नाही; परंतु अशी विचारांची श्रद्धा समाजात उतरवली गेली तर ती निश्चितच वादात्मक-चर्चात्मक ठरू शकते.
समाज जीवन नीट चालावे, टिकून रहावे या साठी धर्म निर्माण झाला. समाजाला टिकवून ठेवण्यासाठी परिस्थितीनुसार जे नियम निर्माण केले गेले वा स्विकारले गेले; त्या नियमांना ' धर्म ' म्हटले गेले. मग ते आर्यवर्तामध्ये निर्माण झालेले वेदांमधील नियम असतील, जेरुसलेममध्ये निर्माण झालेले बायबलमधील नियम असतील, अरबस्तानामध्ये निर्माण झालेले कुराणातील नियम असतील वा आफ्रिकेतील घनदाट अरण्यवासीयांच्या धर्मातील नियम असतील.
या सर्व धर्मांचा, -वज्ञानचा उद्देश हा तत्कालीन समाज, निसर्ग, परिस्थितीमध्ये मानवाला टिकून राहण्यासाठी योग्य जीवनक्रम आखून देणे हाच होता. हे नियम जीवन जगण्यास उपयुक्त असे असल्याने स्वाभाविकच त्यांचा स्विकार केला गेला. परंतु कालांतराने समाज परिस्थिती, निसर्ग, मानवाकडील ज्ञान, तंत्रज्ञान यात प्रत्येक समाजात बदल होत गेले. परंतु धर्म तत्वांमध्ये असे बदल नेहमीच सहज झाले नाही. धर्माचा मूळ उद्देश ( समाजाला टिकवून ठेवण्यासाठीचे नियम ) हा काळानुसार, परिस्थितीनुसार नियम बनवण्याचा बदलत्या काळानुसार, परिस्थितीनुसार नियम बदलण्याचा होता. परंतु हा उद्देश बाजूला पडून नियमांवरील, धर्मतत्वांवरील श्रद्धा समाजात पसरली.
यातून सुरुवातीची वेदांमधली वर्णव्यवस्था, जातीव्यवस्थेत रुपांतरीत झाली. इस्लाम धर्म प्रसाराच्या काळात सततच्या युद्धांतून, पुरुषांची संख्या कमी झाल्याने, त्या काळाची गरज म्हणून अनेक स्त्रियांशी विवाह गरजेचा होता; तो त्या काळाची गरज राहता सहजसाध्य नियम होउन बसला.सुरुवातीला बायबल लॅटिन भाषेत असल्याने, लॅटिन भाषा येत असलेल्यांना त्याचा अन्वयार्थ लावता येत असे; परंतु पुढे याचा अर्थ केवळ काहींनाच बायबल वाचण्याचा अधिकार आहे असा होउन बसला.
म्हणजेच जर धर्मामध्ये काळानुसार बदल झाले नाहीत तर त्या धर्माचे नियम समाज जीवन सुसह्य करणारे राहता; समाज जीवन बांधून ठेवणारे - कर्मठ नियम बनू लागतात. आणि जेव्हा हे कर्मठ नियम म्हणजेच धर्म अशी श्रद्धा वाढीस लागते तेव्हा ही श्रद्धा - धर्मावरील श्रद्धा समाजाला घातक ठरू शकते. जातीव्यवस्थेतून होणारा अन्याय, पुरुषांच्या चार चार विवाहांची संमती आणि त्यातून स्त्रियांवर होणारा अन्याय, पोपची एकाधिकारशाही, नव्या ज्ञान- तंत्रज्ञानाला होणारा विरोध या सर्व गोष्टी धर्मातील कर्मठ बंधनांच्या श्रद्धेतून उदभवतात. अशा श्रद्धा समाजाला एकत्र टिकवून ठेउ शकत नाहीत. समाजात अंतर्गत संघर्ष यातून उदभवत राहतात.
विचारांबाबत आणखीन एक श्रद्धा मह-वाची ठरते ती म्हणजे ज्ञानपद्धतीबाबत ! आज जगामध्ये निसर्ग - परिस्थिती - समाज - मानव - प्राणी - भौतिक जग या सर्वांबाबत ज्ञान मिळवण्यासाठी वेगवेगळ्या ज्ञान पद्धती वापरल्या जातात. उदा. वैद्यकशास्त्रामध्ये ॅलोपाथी, होमिओपाथी, आयुर्वेद,युनानी, . सामाजिकशास्त्रांमध्ये उदारमतवाद, मार्क्सवाद, मानवतावाद, . गणितमध्ये पाश्चात्य गणनपद्धती, वैदिक गणनपद्धती,.
अशा विविध ज्ञानपद्धतींमार्फत आपण विश्वाचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहोत. या प्रत्येक शाखेच्या ज्ञानपद्धती वेगवेगळ्या असतात. यातील कोणती पद्धत आपण स्वीकारायची याचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला असते. परंतु आपण निवडलेली ज्ञानपद्धतीच योग्य आहे असे आग्रहीपणाने मांडणे म्हणजे त्या ज्ञानपद्धतीवरील श्रद्धाच ठरेल. तसेच एका ज्ञानपद्धतीतील जुने नियम श्रद्धेप्रमाणे स्वीकारणेही घातक ठरेल.
मानवाच्या मानसिक स्वास्थ्यासाठी श्रद्धा नेहमीच उपयोगी पडताना दिसते. पण त्याच बरोबर तिचा समाजात होणारा अंतरभाव मात्र असा समाज घातक ठरतो. मग करायचे काय ? श्रद्धा तर हवी पण ती व्यक्तिगत पातळीवर . हाच मार्ग मला दिसतो. एकीकडे वैयक्तिक श्रद्धा ठेवल्यामुळे मानसिक शांतता व्यक्तीला मिळू शकते, तर दुसरीकडे श्रद्धा सामाजिक पातळीवर आणल्यामुळे समाजात संघर्ष उभे राहणार नाहीत, आणि तिसरीकडे व्यक्तीच्या ज्ञानप्रक्रियेत श्रद्धा आणल्यामुळे मिळणारे ज्ञान सर्व समाजाला उपयुक्त ठरणारे असेल.
समाजात अनेक व्यक्ती श्रद्धावान असतात. अगदी न्यूटन - आईनस्टाईन सारखे शास्त्रज्ञही श्रद्धावान असतात. परंतु आपल्या श्रद्धेचा योग्य मान आणि मर्यादा ते ओळखतात. आपल्या वैयक्तिक श्रद्धेचा जगाच्या अर्थ लावण्याच्या प्रयत्नांवर प्रभाव पडता कामा नये याचे भान त्यांना असते. त्यामुळे त्यांनी मांडलेले ज्ञान हे कोणत्याही काळातील, कोणत्याही भूमीवरील समाजाला नेहमीच उपयुक्त ठरले.
आपल्या श्रद्धा, आपली बुद्धिनिष्ठा आणि समाजाप्रति आपले कर्तव्य यांचे तारतम्य आपण ठेवले तर स्वतःची मानसिक शांतता, अन पर्यायाने स्वतःची प्रगती आणि उन्नत्ती; अन समाज जीवनही शांत अन सुरळीत होउ शकेल. श्रद्धेचे मानवी जीवनात आणि समाजात हेच स्थान असावे, नाही का?

No comments:

Post a Comment