Saturday, September 2, 2017

आपलाची संवादु आपणासि ... सारं काही आलबेल


(ही घडलेली घटना. नावं, काही तपशील अर्थातच बदलली आहेत.)
---

१.

" हलॉ, मावशी. मला एखादा चांगला चाईल्ड सायकॉलॉजिस्ट सजेस्ट कर ग. "
" ओह, थांब हं आठवते.... हा अग त्या ***रोडवर अगदी सुरुवातीला चाईल्ड सायकॉलॉजी सेंटर आहे बघ. तिथे डॉ.*** ना भेट. त्या नीट गाईड करतील. पण साधारण किती वर्षाचं आहे मूल?"
" अग दुसरं कोणी नाही ग, माझीच मुलगी, राही बद्दल बोलतेय..."
" अग... असं काय म्हणतेस?"
" मावशी मला काही कळेनासंच झालय. राही अशी का वागतेय? तू तरी मला मदत कर ना ग" आहानाचा सूर आता अगदीच रडवेला झाला.
" शांत हो आहाना, होईल सगळं नीट. बरं एेक असं करतेस का, उद्या राहीची शाळा संपली की इकडे येता का दोघी? जेवायलाच ये. तसंही खूप दिवसात आली नाहीस तू "
" मावशी अग जेवणाचा नको घोळ..."
" घोळबिळ नाही. नेहमीचच करते. ये. समोरासमोर नीट बोलता येईल. जमेल न उद्या?"
" हो,  मावशी. मी तर आताही उठून येईन. पण राही अगदीच झोपेला आलीय. येते उद्या दुपारी"
" हो या दोघी, मी वाट बघते. आणि काळजी करू नको. सगळं छान होणारे. झोप आता तूही निवांत"
" मावशी खरच बरं वाटलं ग. उद्या येतोच. गुड नाईट"
" गुड नाईट बेटा"
---

२.

सगळं आवरं अन शतपावल्या करताना मनात आहानाबद्दल विचार सुरू झाला.
आहाना, माझी भाची. पण खूपशी माझ्या अंगाखांद्यावरच वाढली. ताई नोकरी करत होती, शिवाय धाकटी, संसार या सगळ्यांत खूप गुरफटली होती. धाकटी लहान, सतत आजारी म्हणून स्वाभाविक तिला जास्त वेळ द्यावा लागे ताईला. मग आहानाची माझ्या गट्टी झाली.
तिची शाळा, कॉलेज, मित्रमैत्रिणी सगळ्यांबददल बोलत रहायची. तशी बडबडीच होती लहानपणापासून.

अन मग नवीन नोकरी, तिथे भेटलेला नवीन मित्र, आशिष.  त्यांचे जुळलेले बंध. खरं तर त्याचं घरी येणं जाणंही सुरू झालेलं.  पण का माहिती नाही ताईला हे नातं उमगलं नाही लवकर. तशी ताईची शिस्त थोडी कडक होती. अर्थात ते स्वाभाविकच होतं. संसार नोकरी, आलंगेलं सगळं पहायचं तर ही शिस्त असणं गरजेचं होतं. आहाना पहिल्यापासून ताईला थोडी घाबरून असायची.
एकदा मी आहानाला म्हटलंही,  की "तूहून आशिष बद्दल सांगायला हवंस आईला." पण ती घाबरत होती. शेवटी व्हायचं तेच झालं. बाहेरून ही बातमी ताईला कळली. ताईला हे खूप लागलं. अर्थात, ताईने मुलगा चांगला आहे हे बघून अगदी व्यवस्थित लग्न लावून दिलं आहाना आशिषचे. पण मायलेकींचं नातं तणावाचच राहिलं. असं म्हणावं असं काहीच नव्हतं. पण त्या दोघीही एकमेकींपासून अंतरावरच असत.
पण मग आहानाला दिवस गेले अन हे सगळे तणाव संपून गेले. राहीचा जन्म झाला अन मग तर सगळेच आलबेल झाले. या काळात ताईची खूप दगदग झाली. तिची नोकरी, तिथल्या वाढलेल्या जबाबदाऱ्या, आहानाचे बाळंपण, सगळे निभावले तिने, तिच्या नेहमीच्या शिस्तबद्ध रितीने.
दरम्यानच्या काळात आहानाने नोकरी सोडली. घर,  राही, सासुसासरे, नोकरी सगळं काही झेपेना तिला. हे ताईला अजिबातच आवडले नाही. आणि बरोबर होतं तिचं रागावणं. तिने स्वत: दाखवून दिलं होतं की सगळं कसं मॅनेज करता येतं. पण ती हे विसरत होती की प्रत्येकाची कपॅसिटी वेगळी. पण झालं, पुन्हा दोघींच्यातले संबंध ताणले गेले.

अनेकदा मनात येई की बोलूयात ताईशी. पण ते तिला अजिबात आवडलं नसतं. मुलगी आई हे इतकं नाजूक नातं असतं.  खरं तर प्रत्येकच नातं असच नाजूक. इतर कोणाचीही ढवळाढवळ ते नातं अजूनच बिघडायलाच कारणीभूत होऊ शकतं. नातं निर्माण होणं, ते वाढणं, जोपासणं, दुरुस्त करणं फक्त आणि फक्त त्या दोन व्यक्तींच करू शकतात. हे मला अगदी अगदी पटलं होतं. मग त्यांना योग्य तो वेळ देणं हेच आपलं काम.

पण लहान मुलांच्या बाबतीत मात्र तसं नसतं. त्यांचं त्यांना काही उमजतही नसतं. अशा वेळेस तिसरं माणूस मदतीला हवं वाटतं. म्हणूनच आहानाच्या हाकेला मला ओ द्यावी वाटलीय. बघु उद्या काय घडतय...
---

३.

आज खूप दिवसांनी आहाना आणि तिची लेक राही घरी यायची म्हणून सकाळचे सगळे पटपट आवरून घेतले. तिच्या आवडीचा स्वयंपाक करून कुकर खालचा गॅस विझवला अन तेव्हढ्यात बेल वाजली. अन दारावर थापट्या पण पडल्या.

लगबगीने  दार उघडलं. " या, अगबाई कित्ती मोठी झाली आमची राही? आतातर काय बाई शाळेत पण जाते न तू?" राहीला कडेवर उचलून घेत म्हटलं. " ये ग सावकाश. कशी आहेस? सगळं ठाकठिक न?"
" हो मावशी बरी आहे मी. राहीच जरा ..."
" हा हा ते बोलू आपण नंतर. आधी गरम गरम जेऊन घेऊत." जाणीवपूर्वक विषय थांबवला.
" चला चला आज राहीची आवडीची भेंडीची भाजी आहे. झालच तर जाम आहे. आणि मऊ मऊ खिचडीपण. चला जेवायचं न राही?"

तिघीजणी स्वयंपाक घरात आलो. राहीची गोड बालिश बडबड चालू होती आणि मावशी आजीच्या भोवती भोवती ती लुडुबत होती. " राही आजीला त्रास नको देऊन. इथे बैस खुर्चीवर" आहाना जरा चिडूनच म्हणाली. " असू दे ग. राही मदत करतेय आजीला, होकी नाही."
" आजी मला तू खूप आवडते, मी आज तुझ्याकडेच रहाणारे, राहू? सांग ना सांग ना. मला नाही आईबरोबर घरी जायचं. इथेच रहायचय. " माझ्या हाताला लोंबकळत राही म्हणाली.

अन आता पर्यंत रोखून धरलेला आहानाचा बांध कोसळला. " मावशी हेच, हेच चालू आहे राहीचं... मला नाही सहन होत हे आता... का, का म्हणते ती सारखी असं? काय कमी केलं मी तिच्यासाठी? मी, आशिष दोघे धडपडत असतो हिच्यासाठी..."
" आहाना, आहाना, सावर स्वत:ला. नाही अजिबात रडायचं नाही. हा विषय आता नाही काढायचा. हे पाणी पी. आणि जा उठ, तोंड धू, पाणी मार तोंडावर. आणि बस बाहेर जरा गाणी बिणी लाव. मी आलेच जरा वेळात , राहीला झोपवून."

मला घट्ट बिलगलेल्या राहीकडे पाहिलं. आणि पोटात खड्डाच पडला." राही, ये बेटा. आपण आता मस्त जेऊ.मग झोपताना मी तुला परीची गोष्ट सांगते. चालेल?"  असं म्हणत शाळेतल्या गप्पा गोष्टी करत राहीला भरवलं. राहीपण अगदी शहाण्या मुलीसारखी शाळेतल्या गमती जमती सांगत पटापट जेवली. पण माझा एक हात मात्र तिने घट्ट धरून ठेवला होता.
" शाब्बास राही. सगळी खिचडीपण संपवलीस, भाजीपण संपवलीस. जा आता बाथरुममधे जाऊन तोंड धू. आणि शू करून ये. तो पर्यंत मी आईला जेवायला वाढते. चालेल? " " आणि मग परीची गोेष्ट?"  " हो आणि मग परीची गोष्ट! "
पटकन आहानाचे ताट तयार केले अन बाहेर आले. आहाना अजूनही विमनस्कपणे बसलेली.

" आहाना, आता कसलाच विचार नको. आता आधी जेऊन घे. काही हवं असेल तर आत टेबलवर आहे ते घे.  मी राहीला निजवून येते"
" मावशी अगं तुझं जेवण?" " राहीला झोपवते अन येते मी पण"

मी आत वळली. तर राही कॉटवर पडून वाट बघत होती. मग तिला पांघरूण घातलं, पंखा लावला. अन शेजारी आडवी झाले. " मावशीआजी, आई कुठेय, ती झोपयला येणारे ना?"
" मनुराणी आई जेवतेय. जेऊन झालं की येणार तुझ्या शेजारी झोपायला" राही खुदकन हसली. "गोष्ट? गोष्ट सांग ना" मग परीची गोष्ट एेकता एेकता  राही पटकन झोपून गेली. माझा हात घट्ट पकडून. हळूच हात सोडवून घेतला अन तिच्या हातात बनी रॅबिटचा हात दिला. राहीन झोपेतचे बनीला पकडलं. राही गाढ झोपलीय हे बघून मग मी बाहेर आली. आपलं ताट वाढून हॉल मधे आले. बघितलं तर आहाना आता खूपच शांत झालेली.
" आहाना, कॉफी करतेस माझं जेवण होई पर्यंत? मग गप्पा मारत मस्त कॉफी घेऊ"
---

४.

" हं आता बोल. नक्की काय बिनसलय? आणि एक, न रडता, न चिडचिड करता बोलायतं, शांतपणे. "
" मावशी  खरच किती परफेक्ट सांगत असतेस तू. आणि माझी बाजू एेकून घ्याला नेहमी तयार असतेय." तिचा आवाज भरून यायला लागला.
" हं हं, आताच सांगितलं न? न रडता, शांतपणे. असं कर, तू जणूकाही दुसऱ्या आई अन लेकीची कथा सांगतेयस असं त्रयस्थ होऊन सांग बरं. म्हणजे तुला कमी त्रास होईल."
" हो मावशी" कॉफीचा एक घोट घेऊन एक क्षण आहाना थांबली, मग म्हणाली...

" बघ हं, आताचच उदाहरण घे. मगाशी राही म्हणाली न, 'मी आज तुझ्याकडेच रहाणारे, राहू? सांग ना सांग ना. मला नाही आईबरोबर घरी जायचं. इथेच रहायचय.' तसच करतेय ती सध्या सगळीकडे. म्हणजे आई कडे गेले तर तिला तिथेच रहायचं असतं, माझ्या मैत्रिणीकडे गेले तरी तेच. परवा तर शाळेतला मुलगा अन त्याची आई भेटली तर त्यांनाही म्हणाली, मी येऊ तुमच्याकडे रहायला? तिला मी, आशिष आवडेनासेच झालोत का ग? की तिला आमचं घर आवडत नाही?"
" एकदम टोकाला नाही जायचं ग. थांब आपण एक एक करत बोलू. मला सांग तुमचं रोजचं रुटीन कसं असतं? किती वेळ देतेस राहीला?"
" अग सध्या धावपळ होतेय जरा. म्हणजे आशिष पूर्ण त्याच्या कामात अडकलाय. तो सकाळी सातलाच डबा घेऊन बाहेर पडतो. मग मला साडे पाचला उठावच सागतं. राही उठते बाबा जायच्या वेळेस.मग तिचं आवरणं, आमचा नाश्ता. तोवर तिची रिक्षा येते. मग कुकर, उरलेला स्वयंपाक, इतर कामं. एकला ती परत येते. मग जेवण. दुपारी दोनला मी इतकी दमते की राही बरोबर झोप लागून जाते. चारला चहा, नाश्ता. तोवर राही उठते. मग तिचा अभ्यास. साडेपाचला ती आजी बरोबर खाली जाते खेळायला. मग रात्रीचा स्वयंपाक. ती खेळून आली की राहिलेला अभ्यास, जेवण. की झोप. दिवस कसा जातो कळतही नाही ग."
" हम्... म्हणजे तू अन राही भेटता एकमेकींना ते केवळ जेवण, झोपणं आणि अभ्यासापुरत्या. बरोबर?"
" अं... हो, सध्या झालय खरं तसं. पण खरच वेळच नाही पुरते."
" खरय, आयुष्यातला हा टप्पा खरच दमवणारा असतो. बरं मला सांग तू राहीला दिवसातून किती वेळा रागावतेस? हे कर, ते करू नको म्हणतेस?"
" अग ते तर दिवसभर चालूच असतं. हल्ली इतकी वेड्यासारखी वागते ती. खाऊच्या वाटीला पाय लावू नको म्हटलं की लावलाच हिने. अभ्यास करताना इतकी चुळबूळ. नीट सलग जेवत नाही. मग सारखी भूक भूक करते. पोट भरत नाही मग रात्रीची रडत उठते.पण हे सगळं ठिके. मूल म्हटल्यावर हे सगळं मला मान्य आहे. या कशाची तक्रार नाही माझी. पण ती जेव्हा आमच्या पेक्षा इतरांजवळ रहायला मागते न तेव्हा पोटात तुटतं ग."
" आहाना, एक सांगू? मला वाटतं तिला न तिची आई भेटतच नाहीये."
" मावशी, अग शाळा अन संध्याकाळचं खेळणं सोडलं तर तिन्ही त्रिकाळ मी सोबतच असते ग तिच्या"
" हो तू सोबत असतेस सतत पण कशी? बघ हं, ही वाक्य तू किती वेळा म्हणतेस?
राही, असं पाय पसरून बसू नाही. राही पसारा आवर. राही चल अभ्यास कर पटपट. राही लवकर लवकर खा ग. राही आजीला असं नाही बोलायतं. राही त्रास नको ग देऊ.
आणि आता सांग ही वाक्य तू किती वेळा म्हणतेस? राही माझं गोड गोड बाळ. राही,  चिमणे ये, मांडीत बस. राही चल आपण खेळुयात? राही जेवताना कोणती गोष्ट एेकायतीय? राही चल आपण अभ्यास करुयात? राही माझ्याबरोबर पसारा कोण आवरणारे?"

आहाना आता एकदम गप्प झाली. तिला हळूहळू कळायला लागलं, नक्की काय गडबड होतेय.
" कसय न आहाना, हे तिसरं वय जssरा वेडं असतं. मुलांना स्व बद्दल जाणीव होत असते. या वयात चांगलं वाईट कळत नसतं पण वेगवेगळं करायला हवं असतं, आवडत असतं. याच वेळेस मोठ्यांना वाटत असतं की आताच नीटनेटकेपणाची सवय लावायला हवी. शिस्त हवी. पण ही शिस्त मुलांना अवडणारी नसते. तशात कोण रागावतं, कोण लाड करतं हे त्यांना कळायला लागतं. मग मुलं जे रागावतात, शिस्त लावायला बघतात त्यांच्यापासून लांब जायला बघतात. जे रागवत नाहीत. हे कर, ते करू नको सांगत नाहीत ती लोकं मुलांना आवडायला लागतात."
" मावशी पण मग मुलांना शिस्त कशी लागणार? रागवायचच नाही का त्यांना?"
" खरं तर शिस्त, चांगलंवाईट, नियम कळण्याचं हे वयच नसतं ग. पण अगदी न सांगणंही बरोबर नाही. सांगत रहायचच पण प्रमाणात. आता कसं होतय तू जे काही राहीशी बोलतेयस ते सगळं शिस्त लावण्याचच बोलतेय, अनवधानाने. तिला लाड हवेत, प्रेम हवय, आईचा स्पर्श हवाय, बाबाचा आधार हवाय. आणि नव्या जगाचा अनुभवही हवाय. ही सगळी प्रोसेस सोपी नाहीच. पण आपणच मार्ग काढायला हवा न..किती तरी मार्ग असतात. जसं खाली खेळायला आजी बरोबर पाठवतेस, तर तूही जा सोबत. जेवायला बसताना तिच्या सोबत बैस, गोष्ट सांग, गाणी म्हण. अगदी तुझ्या लहानपणीच्या गमती सांग, शाळेतल्या गमती, अगदी काहीही सांग. तिला जे नवीन असेल. आता तिला तुझ्याकडून काही नवीन मिळत नाहीये, अन लाड करणारी आईपण हरवलीय."
" हम्... होतय खरं मावशी असच. खरं तर थांबून विचार करायलाही विचार मिळत नाही. वेळेचं कसं करू?"
" वेळ मिळत नाही ग. आहे त्यातच शोधून काढावा लागतो. स्वयंपाक करताना तिच्याशी गप्पा मारणं जमव. भाजी आणायला बाहेर गेलीस तर तिला सोबत ने, पैसे देणं, घेणं करायला लाव. तुझ्या सोबत तिला नवीन गोष्टी कळू दे. शक्य झालं तर घरातल्यांचा घरातल्या कामात सहभाग वाढव. ते शक्य नाही झालं तर जेवणाच्या पद्धती हळूहळू बदल. वन डिश मेन्यु ट्राय कर. मार्ग तुझा तुलाच शोधायचाच. फक्त तो शोधायचाय हे सांगण्याचे काम माझे."

" नक्की प्रयत्न करेन मी.  पण मी, आशिष आईबाबा म्हणून तिला आवडत नाही असं तर नाही ना ग झालं?" आहानाचा स्वर हळवा झाला.
" अग वेडी की काय तू. असं कसं होईल? ती इतरांकडे रहायला जायला मागते. पण दुसऱ्या दिवशी घरी येते न? आणि रात्री झोपताऩा तुझी आठवण काढतेच की. आताही तिने विचारलच की, आई कुठेय, कधी येणार झोपायला?"
" हो ग, ते आहेच. आईकडे राहिली तरी झोपताना फोन असतोच तिचा." डोळे पुसत  आहानाच्या चेहऱ्यावर हसू झळकले.
" बघ म्हटलं ना. अग ही एक फेज आहे. आता थोडी शिस्त बाजुला ठेव. तिला थोडं आश्वस्थ कर, की आई आहे, ती लाड करते. आईला राही आवडते. हे पोहोचू दे तिच्यापर्यंत. मग नंतर लाव काय शिस्त बिस्त लावायची ती."
" मावशी खरच किती मोकळं वाटतय मला. खरच मला इतकी भिती वाटत होती की आपलं पिल्लु आपल्याला विसरतं की काय?  काही काही सुचत नव्हतं. मी माझ्याच इवलुशा पिल्लाला किती एकटं पाडत होते ते कळलं. बिच्चारी राही. इतकी गुणी पोर किती कावरी बावरी झाली असेल न?"
" अगदी बरोब्बर ओळखलस. आईबाबा आपल्या बाजुला उभे नाहीत असं वाटलं की मुलं खरच कावरीबावरी होतात. तुम्ही एक हात पुढे केलात की कुशीत धावत येतात पोरं. फक्त विश्वासाने हात पुढे कर. बसं. सगळं छान होईल बघ."
तेव्हढ्यात आतून आवाज आला, " आई ये न झोपायला. मला झोप येत नाही तुझ्याशिवाय."
" आले ग पिल्लु, आले..." आहाना डोळ्यात पाणी अन ओठात हासू घेऊन तटकन उठली अन आत धावली.
---

५.

" हलॉ, मावशी अग तू सांगितलेले बदल करतेय. आणि काय सांगू राही पुन्हा चिकटलीय मला" आहानाचा हसरा आवाज एेकून अगदी बरं वाटलं.
" अग मी कुठे काही सांगितलं? तुझं तुलाच उलगडत गेलं काय करायचं."
" नाही ग मावशी. मी पार भंजाळले होते. काय होतय समजतच नव्हतं. तुझ्याशी बोलले अन सगळा उलगडा झाला."
 " वेडी मुग्गी. अग मावशी कशासाठी असते मग? बरं, पुन्हा ये राहीला घेऊन. आणि आता रहायलाच ये एक दिवस. "
" हो मावशी नक्की येते. राहीलाही तुझी गोष्ट एेकायचीय"
" ये, नक्की ये. ठेऊ फोन?"
" मावशी, मावशी लव्ह यु ग. कसली गोड आहेस तू. थांकु "
" चल चहाटळ कुठली. ते लव्ह यु म्हणा दुसऱ्या कोणाला तरी."
आहानाचा खळखळत हसणारा आवाज सांगून गेला, सारं काही आलबेल झालय म्हणून.
----

No comments:

Post a Comment